Sudhindra Kulkarni writes about Shinzo Abe in my memory Kyoto arts and culture sakal
सप्तरंग

माझ्या आठवणीतले शिंझो आबे

प्राचीन मंदिरांमध्ये (आठव्या शतकात उभारलेल्या) सीता, लक्ष्मी, सरस्वती आणि इतर हिंदू देवतांची अत्यंत सुंदर भित्तिचित्रं पाहिली

सुधींद्र कुलकर्णी sudheenkulkarni@gmail.com

मृत्यू हे जगातलं सर्वांत मोठं गूढ आहे. तो कधी येईल, कसा येईल हेही तितकंच अनाकलनीय आहे. विशेषत: मृत्यू जेव्हा अचानक येतो तेव्हा हे ठळकपणे जाणवतं! म्हणूनच, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची आठ जुलैला एका जपानी नागरिकानंच हत्या केली तेव्हा, आपल्या आयुष्याचे हे अखेरचे क्षण आहेत, याची आबे यांना यत्किंचितही कल्पना नव्हती.

मृत्यू हे जगातलं सर्वांत मोठं गूढ आहे. तो कधी येईल, कसा येईल हेही तितकंच अनाकलनीय आहे. विशेषत: मृत्यू जेव्हा अचानक येतो तेव्हा हे ठळकपणे जाणवतं! म्हणूनच, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची आठ जुलैला एका जपानी नागरिकानंच हत्या केली तेव्हा, आपल्या आयुष्याचे हे अखेरचे क्षण आहेत, याची आबे यांना यत्किंचितही कल्पना नव्हती. त्यांच्या पाठीमागून झाडलेली पहिली गोळी हुकली; पण ते फिरल्यावर झाडलेली दुसरी गोळी सरळ छातीत घुसली आणि आबे कोसळले.

हा घृणास्पद गुन्हा ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणाला आपणा भारतीयांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. ज्या नारा शहरात निवडणुकीचा प्रचार करत असताना आबे यांच्यावर गोळी झाडली गेली, ती जपानची आध्यात्मिक राजधानी समजली जाते. जपानमधल्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या बौद्ध मंदिरांपैकी सर्वाधिक मंदिरं याच शहरात आहेत. अर्थात्, या शहराचे भारताशी अत्यंत दृढ सांस्कृतिक संबंध आहेत, हे बहुतांश भारतीयांना माहीत नसेल. डिसेंबर २००६ मध्ये माझ्या एका जवळच्या जपानी मित्राबरोबर मी नारा शहरात गेलो होतो, त्या वेळी मी या प्राचीन मंदिरांमध्ये (आठव्या शतकात उभारलेल्या) सीता, लक्ष्मी, सरस्वती आणि इतर हिंदू देवतांची अत्यंत सुंदर भित्तिचित्रं पाहिली आहेत.

या शहराजवळच असलेल्या आणि जपानच्या कला-संस्कृतीची राजधानी असलेल्या क्योतो शहरात अत्यंत नयनरम्य झेन उद्यानं आहेत. ‘झेन’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘ध्यान’ या शब्दापासूनच झाली आहे. जपानमधल्या बौद्ध संस्कृतीवर हिंदू संस्कृतीचा जो जबरदस्त प्रभाव आहे त्याचा गांभीर्यानं अभ्यास होणं आवश्‍यक आहे. आबे यांनी २०१५ च्या भारतदौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वाराणसीला जाऊन ‘गंगा-आरती’ केली, त्या वेळी त्यांना भारताच्या आध्यात्मिक वारशाबद्दल वाटत असलेला आदर स्पष्टपणे दिसून आला होता.

मी आबे यांना तीन वेळा भेटलो आहे. दोनदा टोकिओमध्ये, तर एकदा दिल्लीत. सन २००६ मधल्या जपानदौऱ्यात मी त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटलो होतो. त्यांच्या त्या काचेच्या ऑफिसमधून ‘दायेत’ (जपानची संसद) दिसते. त्या वेळी त्यांचं वय ५२ होतं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या सत्तेवर आलेले ते सर्वांत तरुण पंतप्रधान होते. या पदावर येऊन त्यांना तीनच महिने झाले होते. एका भारतीय लेखकाला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी चित्रकलेबाबत त्यांना असलेल्या आवडीबद्दल सांगितलं होतं. मी त्यांना विचारलं : ‘‘तुम्ही एक उत्कृष्ट चित्रकार आहात आणि मनात आकाराला आलेली एखादी सुस्पष्ट संकल्पना तुमच्याकडून कागदावर उतरवली जात नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाहीत, असं मी वाचलं आहे...आता जपानचे पंतप्रधान म्हणून, येत्या काही वर्षांतील भारत आणि जपान यांच्यातल्या भागीदारीचं चित्र तुम्ही कसं रंगवाल?’’

आबे यांनी उत्तर दिलं : ‘‘मला जर भारत-जपान भागीदारीचं चित्र रंगवायचं असेल तर त्या चित्रात प्रचंड ऊर्जा भरलेली असेल आणि ते अत्यंत आत्मविश्‍वासानं भविष्यात डोकावणारं असेल.’’

आबे बोलल्यानुसार वागले. जपानचे सर्वाधिक काळ (नऊ वर्षे) पंतप्रधानपद म्हणून काम करताना त्यांनी खरोखरच भारताबरोबरच्या भागीदारीचं ऊर्जेनं भारलेलं, आत्मविश्‍वासानं भरलेलं आणि भविष्यकेंद्री चित्र रंगवलं.सुरुवातीला डॉ. मनमोहनसिंग आणि नंतर नरेंद्र मोदी या भारताच्या दोन पंतप्रधानांच्या सहकार्यानं त्यांनी हे चित्र पूर्ण केलं.

जपानशी मैत्रीचे संबंध दृढ करण्यास आणि सहकार्य वाढवण्यास काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष, दोन्ही पक्षांनी, प्राधान्य दिल्याचं यावरून स्पष्ट होतं. भारताचं परराष्ट्रधोरण याच धर्तीवर आखलेलं असावं. आबे यांना लहानपणापासूनच भारताबाबत औत्सुक्य होतं. ते एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात जन्माला आले होते. त्यांचे आजोबा नोबुसुके किशी हे १९५७ मध्ये जपानचे पंतप्रधान झाले आणि त्याच वर्षी त्यांनी भारताला भेटही दिली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचं जोरदार स्वागत तर केलंच, शिवाय, ज्या ठिकाणावरून केवळ भारताचे पंतप्रधानच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भाषण देतात, त्या लाल किल्ल्यावरून हजारोंच्या समुदायासमोर भाषण करण्याचा मानही किशी यांना दिला गेला.

भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध दोन विशेष संदेशांवर आधारलेले असावेत, असं आपल्याला वाटत असल्याचं आबे यांनी मला सांगितलं होतं. ते संदेश म्हणजे : ‘शक्तिशाली जपानसाठी शक्तिशाली भारत, शक्तिशाली भारतासाठी शक्तिशाली जपान’ आणि ‘दोन देश, एक लक्ष्य’. ‘भारत आणि जपान या दोन्ही देशांचा स्वातंत्र्य, लोकशाही, मूलभूत मानवी हक्क आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवर विश्‍वास आहे. हाच आपल्या नैसर्गिक भागीदारीचा प्रमुख आधार आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटतो. हा पाया कायम ठेवून आपण त्यावर राजकीय विषय, सुरक्षाविषयक मुद्दे, आर्थिक सहकार्य, जनतेचा एकमेकांशी संपर्क या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय धोरणात्मक भागीदारीची पक्की इमारत उभारली तर आपण आपल्या द्विपक्षीय संबंधांचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व संधींचा पूर्ण क्षमतेनं उपयोग करू शकू. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढ जपानला फायदेशीर ठरेल आणि जपानमधल्या विकासाचा भारताला फायदा होईल. याशिवाय, दृढ धोरणात्मक जागतिक भागीदारीमुळेही अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही देशांचा आवाज बुलंद असेल आणि यामुळेही दोन्ही देशांचा आणि पर्यायानं जगाचाही फायदा होईल,’ अशी भूमिका आबे यांनी मांडली होती.

त्या वेळी एका इंग्लिश वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीमधले काही मुद्दे आताही सुसंगत आहेत. ते मुद्दे आबे यांच्याच शब्दांत पुन्हा मांडावेसे वाटतात :

प्रश्‍न : तुम्ही गेल्या वर्षी (२००५) मार्चमध्ये भारतात खासगी दौऱ्यावर आला होता. भारताबाबत तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या आहेत?

उत्तर : भारतात प्रचंड ऊर्जा आणि गतिमानता असल्याचं मला वाटतं. तुम्ही परदेशांतून येणाऱ्या पाहुण्यांचं इतकं प्रेमानं आदरातिथ्य करता, ते पाहून मी भारावून गेलो आहे. भारताच्या कला-संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा मी चाहता आहे.

प्रश्‍न : जपान-भारत यांच्या संबंधांत आपल्याला एक प्रकारचा विरोधाभास दिसून येतो. एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आपलेपणाचं रूपांतर दृढ आणि विविधांगी सहकार्यात झालेलं दिसत नाही. असं का?

उत्तर : जनमत घेतलं तर अनेक जपानी नागरिक भारताबद्दल मित्रत्वाच्या भावनेनं बोलतील, हे मला माहीत आहे. जपानबद्दल भारतीयांचीही अशीच भावना असावी. तरीही, आपली भागीदारी अद्याप पूर्णपणानं विकसित झालेली नाही. यामागं दोन कारणं आहेत. एक म्हणजे, दोन देशांच्या लोकांमध्ये संवाद अत्यंत कमी आहे. त्यामुळे आपले नागरिक भारतातून जपानमध्ये आणि जपानमधून भारतात मोठ्या संख्येनं प्रवास करतील, अशी सुविधा आणि यंत्रणा आपण निर्माण करायला हवी. दुसरं कारण मला वाटतं की, भारतात होत असलेला विकास आणि जपानच्या विकासासाठी भारताचं असलेलं महत्त्व याबाबत जपानमध्ये पुरेशा प्रमाणात जागृती झालेली नाही. भारतीयांच्या बाबतीतही असंच काहीसं असू शकेल.

प्रश्‍न : आशियाचं भवितव्य हे बहुतांशी भारत, जपान आणि चीन या त्रिकोणी संबंधांवर अवलंबून असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे...

उत्तर : चीनबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवण्याबाबत मी त्यांच्या नेत्यांशी अनेकदा चर्चा केली आहे. परस्परविश्‍वास आणि आदर या वातावरणात आपण हे त्रिकोणीय संबंध नैसर्गिक पद्धतीनं वृद्धिंगत केले, तर यामुळे आपल्या विभागाच्या आर्थिक विकासाला बळ तर मिळेलच, शिवाय, सबंध आशियात सुरक्षेचं आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण होईल. आशिया खरोखरच जागतिक अर्थव्यवस्थावाढीचं केंद्र झाला असून भारत आणि चीन हे देश या विकासाचं नवे इंजिन असल्याचं दिसून आलं आहे, तसंच, अनेक विभागीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आम्ही तिन्ही देश नियमितपणे सहभागी होत असतो. या व्यासपीठांवर आम्ही उपयुक्त चर्चा आणि भागीदारी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

प्रश्‍न : दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये भारतही एक आहे. या दहशतवादाचं उगमस्थान पाकिस्तान आहे. तुमचं काय मत आहे?

उत्तर : दहशतवादाच्या विरोधातल्या लढाईत भारतानं कायम आघाडीवर राहून सामना केला आहे. मुंबईतल्या रेल्वेगाड्यांमध्ये आणि दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अनेक निरपराध लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे, या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि जपाननं सहकार्य वाढवणं आवश्‍यकच आहे.

दैवदुर्विलास पाहा, अत्यंत शांततापूर्ण आणि शांतताप्रेमी असलेल्या देशात आबे हे स्वत: एका दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरले. या सदराद्वारे मी भारताच्या सर्वांत प्रिय जपानी नेत्याला वैयक्तिक पातळीवर आदरांजली वाहत असतानाच, जपान पूर्वीसारखाच शांततामय देश राहावा, अशी प्रार्थना करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT