बदलत्या काळानुसार देशात आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विषयात विकास आणि व्यावसायिक व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत १९८६ मध्ये स्वतंत्र अशा जैवतंत्रज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली. जैवतंत्रज्ञानाचा विकास व संशोधन साध्य करत जैवतंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मूलभूत सोयीसुविधांची निर्मिती करणं, तसेच निधींचं नियोजन करत जैवतंत्रज्ञान विकासाला चालना देणं अशी ध्येय-धोरणं या विभागानं आखली आहेत.
ध्येय-धोरणांच्या अनुषंगानं विभागाचे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत ः जैवतंत्रज्ञानाचा विस्तृत स्तरावर प्रसार, जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या माध्यमातून जैविक औषधनिर्मिती उद्योगाला साह्य, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातल्या स्वायत्त संस्थांची जबाबदारी, याविषयासंदर्भात उद्योग-व्यवसाय आणि विद्यापीठं यांच्यात परस्परसहकार्यवृद्धी, अद्ययावत संशोधन विकासाच्या केंद्रांची स्थापना, जैवसुरक्षित मार्गदर्शक तत्त्वांचा विकास, तसंच या विषयक्षेत्रांच्या माहितीचं संग्रहण आणि प्रसार.
उपक्रमांमध्ये साध्यता आणण्यासाठी मूलभूत संशोधन, वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, अन्न आणि आहार, जैविक ऊर्जा, जैविक स्रोत व पर्यावरण, प्राणीविषयक जैवतंत्रज्ञान, मत्स्य आणि सामुद्रिक जैवतंत्रज्ञान, तसेच सैद्धान्तिक आणि संगणकीय जैवतंत्रज्ञान या शाखांबरोबरच आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणं आणि मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विभाग कार्यरत आहे. याशिवाय जैवतंत्र बाग आणि वनस्पतींची संवर्धनकेंद्रं आदी संकल्पना प्रचलित करणं व तत्सम कार्यक्रमही विभागाकडून आखले गेले आहेत. ईशान्य भारतासाठी जैवतंत्रज्ञान विभागानं काही खास योजना आखल्या असून, त्यांची अंमलबजावणी प्रगतिपथावर आहे.
संशोधन, तसेच प्रकल्पांसाठी या विभागाच्या संस्थांची दारं संबंधित विषयांमधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींसह उघडी आहेत. युवा आणि महिला शास्त्र-संशोधकांसाठीही खास संशोधन स्रोतांची सुविधा असून विशेष कामगिरीबद्दल पुरस्कारही देण्यात येतात. आधुनिक संपर्क माध्यमात उपलब्ध असलेला चर्चारूपी मंच हे जैवतंत्रज्ञान विभागाचं उल्लेखनीय वैशिष्ट्य.
जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत सध्या संशोधन विकासाच्या १५ स्वायत्त, तर सर्वाजनिक क्षेत्रातल्या तीन संस्था आहेत. अवघ्या चार दशकांपूर्वी उदयास येऊन जैवतंत्रज्ञानात भारताचा ठसा उमटवणाऱ्या आणि देशाच्या भविष्यासाठी अनेक उपक्रम-योजना आखलेल्या या विभागाच्या प्रत्येक संस्थेची माहिती यथावकाश सादर होईलच.
संस्थेचा पत्ता : जैवतंत्रज्ञान विभाग
ब्लॉक क्रमांक २, सहावा ते आठवा मजला,
सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी मार्ग,
नवी दिल्ली ११० ००३
दूरध्वनी : (०११) २४३६३०१२
संकेतस्थळ ः www.dbtindia.nic.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.