ideal adda book sakal
सप्तरंग

स्मरणरंजनाचा अड्डा

अवतरण टीम

दादरला एका ठिकाणी दर महिन्याला ३०-३५ साहित्यप्रेमींची एका आंतरिक ओढीने मैफल जमते. साहित्यिक गप्पांची देवाणघेवाण, असा हा साधारण तीस वर्षांपूर्वी सुरू झालेला साहित्यमंच उत्तरोत्तर यशस्वी होत जातो.

- सुधीर सुखठणकर, sukhsudhir@yahoo.com

दादरला एका ठिकाणी दर महिन्याला ३०-३५ साहित्यप्रेमींची एका आंतरिक ओढीने मैफल जमते. साहित्यिक गप्पांची देवाणघेवाण, असा हा साधारण तीस वर्षांपूर्वी सुरू झालेला साहित्यमंच उत्तरोत्तर यशस्वी होत जातो आणि पाचेक वर्षांनी अचानक अस्तंगत होतो. अशा या आगळ्यावेगळ्या ‘आयडियल स्तंभलेखक मंच’चा चित्तवेधक वृत्तांत, ‘आयडियल अड्डा : छबिलदास लेन’ या शीर्षकाने प्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी आणला आहे. साहित्य चळवळीचा इतिहास शब्दबद्ध करण्याचा मराठीतील हा पहिलाच प्रयोग असेल...

महिन्यातून एकदा दादर येथे एका ठराविक सायंकाळी, त्या दिवशीचे वक्ते कोण याची कल्पनाही नसताना, किमान ३०-३५ साहित्यप्रेमी (यात अनेक नामवंत) एका आंतरिक ओढीने जमतात, दीड-दोन तास निमंत्रित पाहुण्यांशी गप्पांमध्ये रंगून जातात, परस्परांना जिव्हाळ्याने भेटतात, लेख, कात्रणं, पुस्तकांची देवाण-घेवाण करतात, औचित्य साधून बोलावलेल्या निमंत्रितांमध्ये अनेक दिग्गजांचा सहभाग, एका शाळेच्या वर्गात भेटण्याचं निमंत्रण (आणि तेही मानधनाशिवाय) ते आनंदाने स्वीकारतात, असा हा साधारण तीस वर्षांपूर्वी सुरू झालेला साहित्यमंच उत्तरोत्तर यशस्वी होत जातो आणि पाचेक वर्षांनी अचानक अस्तंगत होतो.

अशा या आगळ्यावेगळ्या ‘आयडियल स्तंभलेखक मंच’चा चित्तवेधक वृत्तांत, ‘आयडियल अड्डा : छबिलदास लेन’ या शीर्षकाने घेऊन आले आहेत, प्रसिद्ध साहित्यिक, संपादक अशोक बेंडखळे. ‘आयडियल स्तंभलेखक मंच’च्या आधी (आणि नंतरही काही काळ) दादरच्या ‘आयडियल बुक डेपो’च्या ‘त्रिवेणी अंगणात’ अनेक लेखक, प्रकाशक, वगैरेंच्या ठरवून किंवा अचानक भेटीगाठी होत असत. आयडियलचे सर्वेसर्वा कांताशेठ त्यांची (चहासह) उठबस करीत असे. या भेटींना काही निश्चित स्वरूप देता आले तर... असा विचार एकदा साहित्यप्रेमी अशोक बेंडखळे यांच्या मनात आला आणि कांताशेठ यांनीदेखील ही कल्पना तत्परतेने उचलून धरली. जागेची व्यवस्था, चहापान, वगैरे जबाबदारीही आनंदाने स्वीकारली. दोघांना साथ मिळाली वामन देशपांडे, रविप्रकाश कुलकर्णी, नीला उपाध्ये, प्रकाश चांदे यांची.

मुहूर्ताचा दिवस ठरला ८ जानेवारी, १९९३. धुरू हॉलची गच्ची नक्की झाली. आमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या आणि नेमकं याच दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट मालिकेने थैमान घातले. जनजीवन विस्कळित, जनता शोकाकुल, चिंतामग्न, तरी ते दोघेही कार्यक्रमावर ठाम. कार्यक्रम रद्द करायचा, तरी सर्वांना कळवायचं कसं, मोबाईल युग अद्याप अवतरलं नव्हतं आणि आश्चर्याची बाब म्हणजे बारा-चौदा साहित्यप्रेमी अगदी वेळेवर हजर झाले. नुकतेच जया दडकर संपादित ‘नरहर कुरुंदकरांची पत्रे’ प्रकाशित झालं होतं. रविप्रकाश कुलकर्णी त्याविषयी बोलले.

‘मौज प्रकाशन’च्या मुकुंद भागवतांनी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या आगामी आत्मचरित्राविषयी माहिती दिली. मंचचे काही अलिखित नियम ठरले. साहित्य, कला जगतातील घटनांशी संबंधित, रसिकांना निखळ आनंद देणारे विषयच असावेत; तसेच, कुणा लेखकाच्या वा कलाकाराच्या ऐकीव भानगडी, कानगोष्टी, उणीदुणी यांना स्थान न देण्याचंही ठरलं! तिसऱ्या कार्यक्रमापासून एखाद्या घटनेचं औचित्य साधून संबंधितांना छबिलदास शाळेतील एका वर्गात गप्पांसाठी पाचारण करण्यात येऊ लागलं.

विषयांचं वैविध्य आणि निमंत्रितांतील नावांवरून नजर फिरवली, तरी त्यावेळी उपस्थित श्रोत्यांचा हेवा वाटल्याखेरीज राहत नाही. अरुण साधू, रामदास भटकळ, डॉ. अरुण टिकेकर, डॉ. य. दि. फडके, कुमार केतकर, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, प्रा. सुभाष भेण्डे... नावं तरी किती सांगावीत? विषयवैविध्याविषयीही सांगायलाच हवे. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी नुकतंच ‘वृत्तमानस’ हे फक्त रविवारचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. डॉ. किशोर काळे यांचं ‘कोल्ह्याट्याचं पोर’ हे आत्मकथन’ नुकतंच प्रकाशित झालं होतं.

लेखक, संपादक रवींद्र माहिमकर, शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश जोशी हे दोघे पदभ्रमण करणाऱ्या ‘वे फेअरर्स इडिया’चे सदस्य. त्यांचं ‘पश्चिमवेळा’ हे अनुभवकथन गाजत होतं. पद्माकर महाजन आणि दिनकर ल. बरवे यांना जुन्या पाठ्यपुस्तकांतील कवितांनी झपाटलेलं. त्यांनी ‘आठवणीतल्या कविता’चे तीन संग्रहाची जमवाजमव करताना आलेले कडू-गोड अनुभव सांगितले. अन्य मासिकं बंद पडण्याच्या काळात ‘अंतर्नाद’ हे दर्जेदार मासिक चालवणारे कादंबरीकार भानू काळे आले. नरेंद्र जाधव यांचं ‘आमचा बाप आन् आम्ही’ प्रचंड गाजत होतं. अशा कित्येकांच्या चित्तवेधक आठवणींनी हा ‘आयडियल अड्डा’ रंगलेला आहे.

‘आयडियल स्तंभलेखक मंच’ची ही अलौकिक वाटचाल २४ वर्षांनंतर शब्दबद्ध करणं हे आव्हानात्मक काम होतं. या कार्यक्रमांची तपशीलवार नोंद कुठेच झाली नव्हती. सुप्रसिद्ध साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड अधूनमधून कार्यक्रमांना येत. त्यांनीच अशा दस्तावेजाची आवश्यकता बेंडखळे यांना सांगितली. त्यांच्या आधारे संबंधितांशी संपर्क साधून त्यांना लिहितं करणं हा व्याप मोठा होता.

एखाद्या साहित्य चळवळीचा इतिहास शब्दबद्ध करण्याचा मराठी साहित्यातील हा पहिलाच प्रयोगही असू शकेल! ‘आयडियल अड्डा’मध्ये नीला उपाध्ये, वामन देशपांडे, सुनील कर्णिक, प्रकाश चांदे, रवींद्र माहिमकर, विनायक कुलकर्णी, सुधीर सुखठणकर, माधवी कुंटे, प्रा. अविनाश कोल्हे, नंदकुमार रोपळेकर, रविप्रकाश कुलकर्णी, अशोक मुळे, विकास परांजपे आदींनी मंचविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. आज कांताशेठ हयात असते, तर हा दस्तावेज पाहून ते अतिशय आनंदित झाले असते. यास श्रीकृष्ण ढोरे यांचे समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे. हा ‘अड्डा’ सर्व संबंधितांना नक्कीच स्मरणरंजनाचा आनंद मिळवून देईल आणि इच्छुकांसाठी मार्गदर्शकही ठरू शकेल.

आयडियल अड्डा : छबिलदास लेन

लेखक : अशोक बेंडखळे

प्रकाशक : विघ्नेश पुस्तक भांडार, कणकवली

मुखपृष्ठ : श्रीकृष्ण ढोरे

पृष्ठे : १६० | किंमत : ३२० रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT