suhas shirvalkar writer who become popular through stories and novels Sakal
सप्तरंग

शिरवळकरांची ‘दुनियादारी’

आपल्या कथा-कादंबऱ्यांतून वाचकप्रिय झालेले लेखक म्हणजे सुहास शिरवळकर. मराठी लेखक केवळ लेखनावर आपला चरितार्थ चालवू शकत नाही

अवतरण टीम

- डॉ. अनंत देशमुख

आपल्या कथा-कादंबऱ्यांतून वाचकप्रिय झालेले लेखक म्हणजे सुहास शिरवळकर. मराठी लेखक केवळ लेखनावर आपला चरितार्थ चालवू शकत नाही, ती तारेवरची कसरत असते; पण लेखनावर शिरवळकरांचा उदंड आत्मविश्वास होता आणि वाचकांचं प्रेम हे त्यांचं भांडवल होतं.

त्याच ‘दुनियादारी’वर उण्यापुऱ्या ५५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या आजही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. त्यांचे अमृतमहोत्सवी जयंती वर्ष सुरू झाले आहे, त्यानिमित्त...

मराठीत अगदी सुरुवातीपासून भिन्न अभिरुचीचे आणि आकलनक्षमतेचे लेखक लेखन करीत आले आहेत. मनोरंजन, करमणूक, यशवंत, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, ज्योत्स्ना, पारिजात या नियतकालिकात कथालेखनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.

या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांचे पुढे संग्रहही प्रकाशित झाले आहेत. मराठी वाचकांनी कथांना विशेष पसंती दिली. पण १९४४ नंतर सत्यकथा मासिकाचे संपादक म्हणून श्री. पु. भागवत काम पाहू लागले आणि कथेच्या स्वरूपाविषयी गांभीर्याने विचार होऊ लागला.

तिथे प्रसिद्ध होणाऱ्या कथा याच काय त्या गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ कथा असा एक दंडकच होऊ लागला. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, शांताराम, दि. बा. मोकाशी, विद्याधर पुंडलिक, श्री. दा. पानवलकर, कमल देसाई, जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांना अशी मान्यता लाभली.

पण त्याचवेळी य. गो. जोशी, द. र. कवठेकर, श्रीपाद काळे, स्नेहलता दसनूरकर, महादेवशास्त्री जोशी यांच्यासारखे कथाकर मध्यमवर्गीय जाणिवांची आणि कौटुंबिक स्वरूपाची कथा लिहू लागले. याशिवाय बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर हेही लेखन करीत होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या कथांचा वाचकांचा वर्ग फार मोठा होता.

मराठी कथेच्या नकाशावर सुहास शिरवळकर यांचे कथाकार म्हणून असलेले स्थान असे आहे. त्यांचा जन्य १९४८ सालचा. मृत्यू २००३ मध्ये झाला. म्हणजे ५५ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. एका कीर्तनकारांच्या पोटी ते जन्मले. जन्माने ब्राह्मण.

घरात कोणी ना कोणी लेखन करीत. अशी वाङ्‌मयीन परंपरा घेऊन ते आलेले. पण त्यांनी स्वधर्म ओळखला आणि सातत्याने जपला. इंग्रजी रहस्यकथा आणि कादंबऱ्या त्यांना जवळच्या वाटल्या. त्यांच्या सुरुवातीच्या लेखनावर त्याचा प्रभाव आहे.

पुढे त्यांनी स्वत:चा मार्ग धुंडाळला आणि तो एकापाठोपाठ एक अशा कादंबऱ्या लिहून सिद्ध केला. स्वत:चा तरुण वाचकवर्ग निर्माण करण्यात ते अल्पावधीतच कमालीचे यशस्वी झाले. त्यांनी दीडशेच्या घरात कथा, कादंबऱ्या, एकांकिका लिहिल्या.

त्यांच्या साहित्य कलाकृती आजही वेगवेगळ्या माध्यमकर्मींना खुणावत आहेत. ‘समांतर’ या त्यांच्या कादंबरीवरील वेबसेरिजने या नव्या माध्यमात यशस्वी वाटचाल केली.

ते लिहीत होते त्या काळात ‘सत्यकथे’चा अस्त झाला होता. व. कृ. जोशी, श्रीकांत सिनकर, गुरुनाथ नाईक यांच्या पोलिसीकथांचा, रहस्यकथांचा जमाना सुरू झाला होता. डिजिटल आणि सोशलमाध्यमांमध्ये स्थित्यंतरे होत होती.

मराठी मालिका, चित्रपट, व्हिडीओ यांच्या विलक्षण बदलाचे वारे सुरू झाले होते. काहीतरी चटपटीत, काहीतरी रंजक वाचक, प्रेक्षकांना हवे होते. निर्माते, पटकथा-संवादलेखकांना असे काही तरी हवे होते की जे अधिकाधिक प्रेक्षक खेचू शकेल.

टीआरपीला महत्त्व प्राप्त झाले होते. अशा वेळी शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीकडे संजय जाधव यांचे लक्ष गेले. या तरुण दिग्दर्शकाने त्याचा सिनेमा केला. शिरवळकरांच्या डोक्यात हा एक मानाचा शिरपेच खोवला गेला.

शिरवळकर यांच्याविषयी नागेश कांबळे यांनी लिहिले आहे की, ‘सुहास शिरवळकर हे नाव त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमुळे जनताभिमुख झाले होते. या व्यक्तीने त्या वेळच्या तरुण पिढीला झपाटून टाकले होते, मंत्रमुग्ध केले होते.

त्यांच्या साहित्याला इतर लेखकांच्या तुलनेत बहुतांश वाचनालयांत प्राधान्य मिळत असल्याचे एक ग्रंथपाल म्हणून मी सतत अनुभवत होतो. आपल्या साहित्यातून बॅरिस्टर अमर विश्वास, दारा बुलंद, मंदार पटवर्धन, फिरोज इराणी इ. नायक असलेल्या त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना‌ अतीव लोकप्रियता लाभली होती.

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्यमय घटना, रोमांचक प्रसंग, हाणामारी व संवाद यामुळे ती कथानके व घटना जिवंतपणे आपल्या डोळ्यांसमोर घडत असल्याचे फिलिंग येई. या नायकांच्या साहसी घटनांतील सहभागाने वाचक मोहरून जात. या अशा लेखनसामर्थ्यामुळे शिरवळकर हे अर्नाळकरबंधू, नारायण धारप इ. दिग्गज रहस्यकथा, कादंबरीकारांच्या पंगतीत दिमाखात मिरवू लागले होते.’

मराठी लेखक केवळ लेखनावर आपला चरितार्थ चालवू शकत नाही. ती तारेवरची कसरत असते; पण अगदी सुरुवातीलाच शिरवळकर यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. त्यांच्यापाशी एकामागून एक कथा-कादंबरी लिहिण्याची क्षमता होती.

आपल्या लेखनावर त्यांचा उदंड आत्मविश्वास होता आणि वाचकांचे प्रेम हे त्यांचे भांडवल होते. सर्वसाधारण एखाद्या नवख्या लेखकाला आपली साहित्यकृती प्रकाशित व्हावी म्हणून प्रकाशकांचे उंबरठे झिजवावे लागतात. असंख्य नकार पचवावे लागतात.

नाउमेद व्हावे असे अनेक प्रसंग येतात. आपल्या लेखनावरील श्रद्धा डळमळीत व्हावी असे हताश अनुभव येतात. पण याबाबतीत शिरवळकर सुदैवी म्हटले पाहिजेत. कारण त्यांना ‘दिलीपराज प्रकाशन’सारखे प्रकाशन मिळाले. त्याच्या राजेंद्र बर्वे यांनी त्यांना आपले मानले आणि त्यांची सर्वाधिक पुस्तके प्रकाशित केली. वाचकांनीही त्यांच्या आणि त्यांच्या लेखनावर उदंड प्रेम केले.

सुहास शिरवळकर यांच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. दुर्दैवाने ते फार काळ जगले नाहीत, पण मराठीतील लोकप्रिय साहित्यामध्ये त्यांनी आपली खणखणीत नाममुद्रा उमटवली आहे हे मात्र निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT