- प्रा. सुजाता राऊत
मराठी साहित्यात प्रवासवर्णन हा वेगळा वाङ्मय प्रकार समजला जावा, अशी समृद्ध परंपरा आहे; परंतु मराठीतील प्रवासवर्णने प्रामुख्याने युरोप-अमेरिका या देशांवर आधारित आहेत. या पार्श्वभूमीवर अतिशय नेटके निवेदन व महत्त्वपूर्ण बाबींचे साद्यंत विवेचन करणारे डॉ. नितीन बळवल्ली यांचे ‘स्कँडिनेव्हियाची नजरभेट’ हे नवीन प्रवासवर्णन मराठीच्या या दालनात विशेष भर घालणारे आहे.
इंग्रजीमध्ये एक वचन आहे, ‘The world is a book and those who do not travel read only one page.’ पर्यटन करणाऱ्या व्यक्तीकडे चातुर्य येते असे सांगणारे संस्कृत सुभाषितही आहे आणि आपल्या जगण्याचा अनुभवही सांगतो की, आपल्या प्रदेशाच्या सीमा ओलांडून जेव्हा आपण अपरिचित ठिकाणी पोहोचतो तेव्हा आपल्या मनाची भूमी समृद्ध होते.
प्रवास करणारी व्यक्ती जेव्हा तपशीलवार वृत्तांत लिहिते तेव्हा वाचकांना ते जग पाहिल्याचा अनुभव येतो. अर्थात त्यासाठी प्रवासवर्णन लिहिणाऱ्या लेखकाकडे तशी प्रतिभा व विशेष शैली असणे जरुरीचे असते.
मराठी साहित्यात प्रवासवर्णन हा वेगळा वाङ्मय प्रकार समजला जावा, अशी समृद्ध परंपरा आहे; परंतु मराठीतील प्रवासवर्णने प्रामुख्याने युरोप-अमेरिका या देशांवर आधारित आहेत. या पार्श्वभूमीवर अतिशय नेटके निवेदन व महत्त्वपूर्ण बाबींचे साद्यंत विवेचन करणारे नवीन प्रवासवर्णन ठाण्याच्या ‘सृजनसंवाद प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.
डॉ. नितीन बळवल्ली यांचे ‘स्कँडिनेव्हियाची नजरभेट’ हे सर्वार्थाने देखणे पुस्तक आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे मराठीत अलक्षित ठेवलेल्या स्कॅंडिनेव्हियन देशांची भ्रमंती तशी काही नवीन आहे.
आपल्याला ढोबळपणे डेन्मार्क म्हटले की हॅम्लेट नाटक आणि शेक्सपियर आठवतात किंवा स्वीडन म्हटले की चटकन नोबेल पारितोषिक आठवते किंवा नॉर्वे हा मध्यरात्रीचा सूर्य असणारा देश इतकीच माहिती असते; पण व्यवसायाने शस्त्रक्रिया विशारद असणाऱ्या डॉ. नितीन बळवल्ली यांनी एखाद्या शल्यचिकित्सकाच्या कुशलतेने या देशांचा सर्वांगाने वेध घेतला आहे.
या संपूर्ण पुस्तकात अचूक व वेचक माहिती संख्यात्मक नोंदींसकट, बारीक-सारीक तपशील देत काटेकोरपणे मांडलेली आहे. त्यामध्ये येणारे निवेदन ओघवते व सहज आहे. काही प्रवासवर्णनांमध्ये येणारी पाल्हाळीक वर्णने, पुनरुक्ती या पुस्तकात नावालाही नाही, हे त्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
आपल्या मनोगतात लेखक म्हणतात, ‘विसाव्या शतकात उदयाला आलेली समृद्ध, शांतताप्रिय आधुनिक राष्ट्रे आम्हाला पाहता आली. इंग्रजी भाषेचा दुस्वास न करता आपली भाषा, संस्कृती, वारसा जतन करण्याची वृत्ती यांचा संबंध थेट आपल्या आधुनिक भारताशी जुळतो.’ लेखकाचे हे निरीक्षण, प्रत्येक ठिकाणचा, वैशिष्ट्यांचा नेमकेपणाने घेतलेला वेध याचे दर्शन पुस्तकात पानापानांवर घडते.
स्कँडिनेव्हियाच्या भौगोलिक स्तराची पूर्ण ओळख करून देऊन एकेका देशासाठी- ठिकाणासाठी स्वतंत्र छोटे प्रकरण आहे. प्रत्येक प्रकरणात त्या ठिकाणच्या सर्व वैशिष्ट्यांचे ओघवते वर्णन येते. त्याचबरोबर तिथल्या वास्तू, भौगोलिक वैशिष्ट्ये यांची अचूक माहिती मिळते. त्या त्या स्थळांचे फोटो दिले असल्याने वाचकांना नावे जरी अपरिचित किंवा कठीण वाटली तरी वाचन सोयीचे होते.
ड्युरगॉडन नावाच्या बेटावर ‘वासा’ म्हणजे जहाजाचे म्युझियम, हेलसिंकी येथील आर्ट गॅलरी, मार्केट स्क्वेअर, दक्षिणेला असणारा बाल्टिक समुद्रकिनारा यांचे वर्णन करताना तिथे असणाऱ्या कॅथेड्रलचेही इत्यंभूत वर्णन लेखक करतो. टॅलीन ही इस्टोनियाची राजधानी. तेथील किल्ला, चर्चेस, जतन केलेले दगडी रस्ते, कॅफेज यांचे सुरेख दर्शन लेखक आपल्याला घडवतो.
इथल्या चर्चेची बांधणी, स्थापत्यशैली, त्यातील सौंदर्य सांगताना त्यामागील इतिहास, वर्तमानकालीन धारणा, राजकीय प्रभाव ही सगळी माहिती आपल्यासमोर येते. त्याच वेळी तिथे असणारे खाद्यपदार्थ, बाजार, दुकाने त्यांची वैशिष्ट्ये यांचे सहज वर्णन येते.
‘बर्गन’ या प्रकरणात लार्डेल टनेलमधील निळ्या-पिवळ्या प्रकाशाचे सरस वर्णन लेखकाने केले आहे. मुख्य म्हणजे या लार्डेल टनेलचे एक रेखाचित्रही पुस्तकात आहे. फ्लेम हे नॉर्वेतील निसर्गरम्य गाव. वर्णन करत असतानाच धबधब्याच्या फोटोबरोबरच त्या प्रदेशाचा नकाशाही येतो.
येथील विग्लँड पार्क हे जगातील सर्वांत मोठे शिल्पकृतींचे उद्यान. तेथील ‘मोनोलीथ’ हे गुस्तावने पहिल्यांदा स्टुडिओत मातीने बनवले. तेच दगडाचे बनवायला त्याला १४ वर्षे लागली. त्याबाबत लेखक म्हणतो, ‘हा १४ वर्षांचा वनवास गुस्तावला सुखाचा झाला की नाही हे सांगणे कठीणच!’
पुस्तकाला १३ परिशिष्टे जोडलेली आहेत. त्याचा अभ्यासकांनाही खूप उपयोग होईल. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची अर्थवाही प्रस्तावना, राजीव मळगी यांनी केलेले मुखपृष्ठ, स्मृती बळवल्ली यांनी केलेले मलपृष्ठ व रेखाटने या सगळ्यांनी पुस्तकाचे सौंदर्यमूल्य व उपयुक्तता वाढवली आहे. या अशा अनेक नजरेत भरणाऱ्या गोष्टी देणारी ‘स्कँडेनेव्हियाची नजरभेट’ ही मराठी वाचकांची प्रवासी दृष्टी नक्कीच विकसित करेल.
स्कॅंडिनेव्हियाची नजरभेट
डॉ. नितीन बळवल्ली
सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठसंख्या : ११६
मूल्य : तीनशे रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.