आशिया करंडकाचं वार्तांकन करायला श्रीलंकेत आलो असताना, भारताबरोबर स्पर्धेत समावेश असलेल्या इतर पाच देशांच्या क्रिकेटची आणि समाजकारणाची कहाणी डोळ्यांसमोर येत आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्या सीमा भारताला थेट भिडतात. श्रीलंका बेटसदृश देश आहे; पण भारताच्या समुद्रसीमेला लागून आहे.
अफगाणिस्तान आणि भारत यांच्या बरोबर मध्ये पाकिस्तान आहे. तरीही हे पाचही देश शेजारीच आहेत असंच म्हणावं लागेल. गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तान वगळता बाकीच्या देशांत वार्तांकनासाठी जायची संधी मिळाल्यानं त्या त्या देशातील क्रिकेट आणि सामाजिक परिस्थिती कशी बदलत गेली हे पाहता आलं आहे.
श्रीलंकेनं मजल मारली
सन १९८१ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळायची संधी मिळालेला श्रीलंकेचा संघ नेहमी प्रगतिपथावर वाटचाल करताना दिसला आहे. अत्यंत कठीण अवस्थेतून जाताना या संघानं एकदिवसीय विश्वकरंडक, चॅम्पियन्स करंडक आणि टी २० अशा आयसीसी आयोजित करत असलेल्या तिन्ही स्पर्धा जिंकल्या आहेत.
सन १९९५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ गेलेला असताना मुरलीधरनच्या शैलीवर शंका घेताना ऑसी पंचांनी नो बॉल दिला होता. श्रीलंकेचा तेव्हाचा कप्तान अर्जुन रणतुंगा यानं त्यावर थेट आक्षेप नोंदवताना संघ सीमापार नेला होता. श्रीलंकेच्या संघानं त्या प्रसंगानं कच नाही खाल्ली. उलट, चांगली उचल खाताना १९९६ मध्ये त्याच ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावलं होतं.
रणतुंगा यानं दाखवलेल्या दिशेनंच पुढं जाताना महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी बराच काळ श्रीलंकेच्या संघाची जबाबदारी सक्षमपणे पेलली. श्रीलंकेच्या क्रिकेटनं वेगळ्या शैलीच्या गोलंदाजांना नेहमी पाठिंबा दिला; मग तो मुरलीधरन असो वा मलिंगा किंवा नव्या जमान्यातील पथिराना असो. त्या त्या वेळचे कर्णधार नेहमी गोलंदाजांच्या मागं ठाम उभे राहिले.
विचित्र गोलंदाजीच्या शैलीला पाठिंबा देत असल्याबद्दल रणतुंगा याला एकदा विचारलं असता त्यानं छान उत्तर दिलं होतं: ‘श्रीलंकेत आम्ही योग्य परिणाम साधणाऱ्या गोलंदाजाची शैली बदलायला जात नाही. सगळे खेळाडू तंत्रशुद्ध नसतात. त्यामुळे सगळे खेळाडू दीर्घ काळ खेळतात असं नसतं.
तो खेळाडू किती खेळेल यापेक्षा जोपर्यंत खेळेल तोपर्यंत तो योग्य परिणाम संघासाठी साधू शकेल की नाही याचा विचार आम्ही करतो. गोलंदाजाला विचित्र शैलीमुळे दुखापत होण्याचा अनावश्यक त्रास प्रशिक्षकही करून घेत नाहीत की त्याची शैली बदलायला जात नाहीत. कारण, शैली बदलली तर परिणाम साधला जातोच असं नाही.
सन १९७६ ते २००९ या कालावधीत श्रीलंकेत एलटीटीईचं यादवी युद्ध सुरू होतं. कोलंबोत कोपऱ्याकोपऱ्यावर पोलीस आणि सैनिक असायचे असा तो काळ. सन २००९ नंतर एकदम परिस्थिती बदलली. श्रीलंकेत शांतता आली. सन २०२० मध्ये एकदम झालेल्या एका दहशतवादी घटनेमुळे श्रीलंका हा देश परत हादरला. कोरोनामहामारीच्या संकटानं श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. तरीही इथले लोक शांत, समंजस आहेत असंच वाटतं.
प्रगती आणि अधोगती
गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानं; खासकरून, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केलेली प्रगती कौतुकाचा विषय ठरली आहे. टी २० सामन्यांत भल्याभल्या संघांच्या तोंडचं पाणी त्यांनी पळवलं आहे. चालू आशिया करंडक स्पर्धेत सुपरफोरची पात्रताफेरी गाठायच्या प्रयत्नात त्यांनी श्रीलंकेच्या संघाला दिलेली झुंज क्रिकेट रसिक आ वासून बघत राहिले होते.
अफगाणिस्तान हा देश राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असूनही आणि त्या देशात क्रिकेटच्या सुविधाही अगदी प्राथमिक असूनसुद्धा संघानं केलेली प्रगती लक्षणीय आहे.
याच्या उलट कहाणी बांगलादेशाची आहे. सन १९९७ मध्ये पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या बांगलादेशाच्या संघानं त्यामानानं प्रगती केलेली दिसत नाही. बांगलादेशमधलं क्रिकेट वाढण्यासाठी आयसीसीनं प्रचंड प्रमाणात मदत केलेली असूनही, तिचा म्हणावा तसा चांगला परिणाम, तो संघ खेळत असताना दिसून येत नाही.
सन २००७ मध्ये भारतीय संघाला एकदिवसीय विश्वकरंडक सामन्यात दिलेला पराभवाचा दणका सोडला तर बांगलादेशाच्या संघानं तशी लक्षणीय कामगिरी केलेली आढळून येत नाही. उलटपक्षी, दरवेळी फक्त ‘आमच्यावर अन्याय होतो आणि आम्हाला योग्य सुविधा, मान मिळत नाही,’ असंच रडगाणं बांगलादेशाचा संघ नेहमी गात आला आहे.
तरीही क्रिकेट बहरत आहे...
पाकिस्तानात कमालीची राजकीय अस्थिरता असूनही आणि स्थानिक क्रिकेटचा मजबूत ढाचा नसूनसुद्धा पाकिस्तानचं क्रिकेट सातत्यानं चांगल्या संघाची बांधणी करत आहे. पाकिस्तानात राजकीय समीकरणं जशी बदलतात तसे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी बदलले जातात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळात जशी लोकशाहीप्रक्रिया राबवली जाते, तशी कोणतीही प्रक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नव्हती आणि नाही.
नवा नेता सर्वोच्च पदी आला की तो त्याच्या मर्जीतला माणूस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार सांभाळायला नेमतो असंच बघायला मिळालं आहे. भारतात असते तशी रणजी स्पर्धेसारखी ‘कायदे आझम स्पर्धा’ आणि लाहोरला असलेली ‘नॅशनल क्रिकेट अकादमी’ या दोन मूळ गोष्टी सोडल्या तर पाकिस्तानच्या क्रिकेटला तशी दिशा किंवा शिस्त नाही. तरीही कमालीची गोष्ट अशी की, पाकिस्तान राष्ट्रीय संघाला अव्याहतपणे चांगल्या खेळाडूंची रसद मिळते आहे.
गेली काही वर्षं मुख्य संघाचा कारभार बहुतकरून कप्तान बाबर आझम याच्या हाती आला आहे. बाबरची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे आणि संघाचा प्रवास ‘मी’कडून ‘आम्ही’कडे कसा होईल हे बाबरनं स्वत: लक्ष घालून पाहिलं आहे. संघातील खेळाडू बाबरला कप्तान म्हणून मानतात आणि त्याच्याविषयी आदर व्यक्त करतात.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानातील सामाजिक-राजकीय परिस्थिती इतकी अस्थिर आहे की, संघ उत्तम खेळत असूनही त्या देशात जाऊन क्रिकेट खेळायला सगळे संघ राजी नसतात. भारताबरोबरचे पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत.
भारताच्या पंतप्रधानांनी पाऊल पुढं टाकत संबंध सुधारायला केलेल्या प्रयत्नांवर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी पाणी ओतलं आहे. परिणामी, भारतीय संघानं २००८ नंतर पाकिस्तानचा दौरा करायला साफ नकार दिलेला आहे.
जाता जाता नेपाळच्या संघाचा उल्लेख करणं महत्त्वाचं. पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेत खेळताना नेपाळच्या संघानं दाखवलेली चमक सगळ्यांना खूश करून गेली. विशेषकरून, नेपाळच्या संघानं भारतासमोर फलंदाजी करताना दाखवलेली धमक चकित करणारी आणि आनंद देणारी होती.
सरतेशेवटी, सांगायचं ते एवढंच की, मला काही पाकिस्तानबद्दल किंवा बाकी शेजारीदेशांबद्दल उतू जाणारे प्रेम नाहीय. मात्र, ‘तुम्ही सुखी राहा आणि आम्हालाही सुखानं जगू द्या,’ एवढाच मुद्दा आहे.
क्रिकेट हा सगळ्यांना बांधून ठेवणारा, आनंद देणारा धागा आहे, त्याचा आधार घेत संबंध सुधारले गेले तर सगळ्यांचंच भलं होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.