Gautam Gambhir sakal
सप्तरंग

खेळातला गंभीर अन् समाजकार्यातला गौतम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून मी गौतम गंभीरला जवळून बघत आलो आहे. काहीसा जात्याच आक्रमक असलेला गंभीर चणीनं लहान दिसला.

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून मी गौतम गंभीरला जवळून बघत आलो आहे. काहीसा जात्याच आक्रमक असलेला गंभीर चणीनं लहान दिसला, तरी त्याच्या फलंदाजीत ताकद आणि एकाग्रतेचा संगम असल्याचं पहिल्यापासून समजलं होतं. वीरेंद्र सेहवागबरोबर सलामीला गंभीर येऊ लागला आणि भारतीय संघाची ताकद अजून वाढली. दिल्ली रणजी संघाकडून भरपूर धावा केल्यावर निवड समितीचं लक्ष त्याच्याकडे वळालं होतं.

२००३ ला एकदिवसीय सामन्यातून पदार्पण करणाऱ्या गंभीरला कसोटी पदार्पणासाठी अजून दीड वर्षं वाट बघावी लागली. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वानखेडे मैदानावर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना त्याला अपयश आलं होतं. वानखेडेची खेळपट्टी इतकी फिरकीला पोषक होती, की त्यावर फलंदाज म्हणून संघात खेळणाऱ्या मायकेल क्लार्कला सहा भारतीय फलंदाजांना बाद करता आलं होतं.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघानं चांगली आघाडी घेऊनही तो सामना भारतीय संघानं १३ धावांनी जिंकला होता. म्हणजेच वैयक्तिक पातळीवर फलंदाज म्हणून अपयश येऊनही गंभीरचं कसोटी पदार्पण भारताच्या विजयानं हसत झालं होतं.

पहिल्या बऱ्याच सामन्यांत मिळून जेमतेम दोन शतकं करू शकलेल्या गंभीरला भारतीय संघातील जागा गमवावी लागली होती. २००७ विश्वकरंडक स्पर्धेतही त्याच्याकडे निवड समितीनं कानाडोळा केला होता. त्यानंतर रणजी स्पर्धेत पोत्यानं धावा काढल्यावर गंभीरला निवड समितीनं परत एक संधी दिली ती २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत.

२००७ टी-२० विश्वकरंडक अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ७५ धावांची अत्यंत मोक्याची खेळी करून त्यानं भारतीय संघाच्या मोठ्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्या खेळीनं भारतीय कसोटी संघाचे दरवाजे त्याच्यासाठी परत उघडले. कसोटी संघातील त्याची जागा मजबूत व्हायला २००८ ते २०१० चा काळ सोन्याचा ठरला. या काळात त्यानं आठ शतकं ठोकली.

त्यात नेपियर कसोटी वाचवताना गंभीरनं ६०० पेक्षा जास्त मिनिटं फलंदाजी करून नाबाद शतक ठोकताना, लक्ष्मणबरोबर भलीमोठी भागीदारी केली होती. सलग ११ कसोटी सामन्यांत त्यानं अर्धशतकी मजल मारून सातत्य दाखवलं. भारत सरकारनं त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं.

आपले विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्यात गंभीर कधीच मागं पडायचा नाही. एकदिवसीय सामन्यात तो चांगली फलंदाज जमत असली, की धावगती वाढवून सामना आटोक्यात आणायचा खेळ करायचा; तर कर्णधार महेंद्रसिंह धोनी जम बसवायला भरपूर वेळ घ्यायचा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एका सामन्यात गंभीरनं भन्नाट आक्रमक फलंदाजी करून सामना लढवला असताना धोनीनं त्याच्या शैलीत सावध खेळ करून दडपण निर्माण करून आणि ते झेलून मग अगदी शेवटच्या षटकात सामना जिंकवला होता.

‘धोनी दडपण झेलू शकतो...भारतीय संघातील सगळे खेळाडू नाही...तेव्हा त्यानं हा विचार करायला पाहिजे, की सामना इतका लांबण्याची खरच गरज आहे का...त्याला अगोदरही आक्रमक खेळ करून धावगती आटोक्यात ठेवता आली असती,’ या शब्दांत सामना जिंकूनही गंभीरनं धोनीवर टीका केली होती.

आपली मतं स्पष्टपणानं मांडणाऱ्या गंभीरचं धोनीबरोबर नेहमी खूप पटलं असं नाही; पण धोनीलाही फलंदाज म्हणून गंभीरच्या क्षमतेची पूर्ण जाणीव होती. म्हणून वैचारिक वाद होत असूनही, धोनीनं आपल्या संघातील प्रमुख फलंदाज म्हणून गंभीरला नेहमीच मानलं.

२०११ च्या अंतिम सामन्यातही सचिन तेंडुलकर आणि सेहवाग लवकर बाद झाल्यावर गंभीरनं पहिल्यांदा विराट कोहलीबरोबर भागीदारी करून डावाला स्थिरता दिली. नंतर त्यानं खरंतर भारतीय आक्रमणाची काळजी घेतली. अत्यंत कुशलतेनं आक्रमक फलंदाजी करून दडपणाचं ओझं अलगद श्रीलंकेकडे वळवलं. ९७ धावांची भन्नाट खेळी करून गंभीर बाद झाला; तेव्हा त्यानं भारतीय संघाला विजयपथावर नेलं होतं.

धोनीनं सुंदर नाबाद खेळी करून विजय नक्की केला. बऱ्याच लोकांनी गंभीरचं भारतीय विजयगाथेतील योगदान जाणलं. भारतीय संघ मुंबईच्या हॉटेलमध्ये परतल्यावर गंभीरनं त्याला बसमधून खूप आनंदानं तिरंगा फडकवताना दिसलेल्या फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबाला जेवण पाठवून आपला आनंद वेगळ्या प्रकारे साजरा केला.

२०१८ मध्ये गौतम गंभीर क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच वर्षी भारत सरकारनं त्याला पद्मश्री पुरस्कार दिला. त्यानंतर २०१९ ला त्यानं भाजपकडून दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं तो निवडूनही आला. त्याची क्रिकेटनंतरची दुसरी इनिंग सुरू झाली.

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू किंवा नंतर समालोचक म्हणून अत्यंत परखड विचार मांडणारा गौतम गंभीर लोकांनी विश्वासानं निवडून दिलेला सच्चा कार्यकर्ता बनला. क्रिकेट असो वा राजकारण मी माझ्या नावाप्रमाणंच सगळेच गांभीर्यानं घेतो. माझी जबाबदारी जाणतो आणि कोणी काही सांगण्याची वाट न बघता योग्य काम करायचा विचार करतो, असं तो म्हणतो.

मनापासून समाजकार्य करण्याच्या बाबतीत गेल्या चार वर्षांत गंभीर खऱ्या अर्थानं ‘गौतम’ बनला आहे. स्वत:चं फाउंडेशन सुरू करून त्यानं भुकेल्या जिवांसाठी अन्नदानाचा उपक्रम सुरू करून ३ वर्षं होऊन गेली. दिल्लीतील चार ठिकाणी फक्त एका रुपयात जेवण देण्याची सोय त्यानं केली आहे. ज्याचा लाभ गरजू लोक रोजच्या रोज घेत आहेत. तसंच त्यानं क्रांतिकारक भगतसिंग यांच्या नावानं वाचनालय सुरू करून तरुण मुलांची मोठी सोय केली आहे.

भारतासाठी बलिदान देणाऱ्या सैन्यातील जवानांच्या मुलांसाठी शिक्षणाचा खर्च उचलायला तो पुढं सरसावला आहे. इतकंच नाही, तर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी उपचारांचा आधार देताना त्यांच्या मुलींना शिक्षणाबरोबरच मानसिक आधार देण्यासाठी तो अविरत काम करतो आहे.

गंभीर लोकसभा सदस्य असून, तो क्रिकेट सामन्यांचं समालोचनही करताना दिसतो. आपली मतं परखडपणानं मांडताना दिसतो. मग त्याला निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला कधी वेळ मिळतो, असं विचारताच तो म्हणतो, ‘सगळा वेळेच्या नियोजनाचा खेळ आहे.

खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करायची असली, तर अचानक मैदानात उतरून चालत नाही...भरपूर तयारी करावी लागते, मेहनत घ्यावी लागते...तसंच जनतेची कामं करतानाही करावं लागतं. तयारी, नियोजन, अर्थकारणाची सोय सगळं अगोदर केल्यास; काम करायला अडचण येत नाही. मला पूर्ण कल्पना असते, की मी कधी क्रिकेटचं काम करणार आणि कधी माझ्या लोकांसाठी काम करणार.

काही कामं मी नसतानाही अव्याहतपणे सुरू असतात. त्यात बाधा येत नाही. उदाहरणार्थ, अन्नदानाचं काम. ते कोणासाठी थांबवून चालत नाही. माझा माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी चांगला संपर्क आहे. स्मशानाच्या व्यवस्थेपासून ते वाचनालयापर्यंत आणि अन्नछत्रापासून ते शैक्षणिक सोयींपर्यंतची कामं बरोबर सुरू आहेत ना, याकडे माझं बारीक लक्ष असतं.’

असं ज्यावेळी त्यानं सांगितलं, त्यावेळी गौतम गंभीर हा ‘खेळातला गंभीर आणि समाजकार्यातला गौतम’ झाल्याचं लक्षात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT