Games Playing sakal
सप्तरंग

खेळाची ताकद अचाट

उन्हाळी सुट्ट्यांचा काळ जवळ येत चालला असताना पालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या मुला-मुलीला कोणत्या क्रीडा प्रशिक्षणवर्गाला टाकायचं याची शोधाशोध सुरू झाली आहे.

सुनंदन लेले (saptrang.saptrang@gmail.com)

उन्हाळी सुट्ट्यांचा काळ जवळ येत चालला असताना पालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या मुला-मुलीला कोणत्या क्रीडा प्रशिक्षणवर्गाला टाकायचं याची शोधाशोध सुरू झाली आहे.

उन्हाळी सुट्ट्यांचा काळ जवळ येत चालला असताना पालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या मुला-मुलीला कोणत्या क्रीडा प्रशिक्षणवर्गाला टाकायचं याची शोधाशोध सुरू झाली आहे. एप्रिलच्या १५ तारखेनंतर सगळी मैदानं, पोहण्याचे तलाव उत्साही मुला- मुलींनी भरून जातात. मला कल्पना आहे की, एक-दीड महिन्याच्या शिबिराने कोणत्याच मुला-मुलीत लक्षणीय बदल होत नाही, की तो किंवा ती महान खेळाडू बनत नाहीत.. एक नक्की होतं ते म्हणजे, या शिबिरातून त्यांना खेळाची गोडी लागते, तसंच मैदानाची ओढ लागते. हीच ओढ मग त्यांना सुदृढ नागरिक बनवते.

पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे, मैदानावर, व्यायाम शाळेत किंवा पोहण्याच्या तलावावर जाताना मुलांच्यात काही गुण आपोआप कोरले जातात. पालकांनी व्यक्तिमत्त्व घडण्याच्या प्रक्रियेतील खेळाची ताकद समजावून घेणं खूप गरजेचं आहे. अहो, सुदृढ मुलांची तर गोष्ट सोडा, दिव्यांग मुलांनाही खेळ खूप आनंद देऊन जातो. दिव्यांगांना घरच्यांनी किंवा समाजाने जखडून ठेवलं असलं तर त्यांना खेळ ही बाब स्वातंत्र्य मिळवून देतं.

वयाच्या १९व्या वर्षी ग्लुकोमा नावाच्या भयानक आजाराने दिव्यांशू गणात्राची दृष्टी गेली. लगेच बऱ्‍याच लोकांनी त्याच्यापुढे काय कर यापेक्षा आता तू काय करू शकणार नाहीस, याची यादी वाचली. दिव्यांशूने मनातील जिद्द सोडली नाही. २०१६ मध्ये दिव्यांशू आपल्या मित्रासोबत मनाली ते खारदुंगला प्रवास सायकल हाणत गेला. आफ्रिकेतील किलीमंजारो शिखरावर त्याने यशस्वी चढाई केली, तसंच पॅरा ग्लायडिंगची सोलो फ्लाइट दिव्यांशूने त्याच्या अगोदर केली होती. सांगायचा मतलब इतकाच आहे की, अशक्य काहीच नसतं, फक्त आजूबाजूला सकारात्मक माणसं हवीत.

असंच मस्त उदाहरण मला पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असणाऱ्‍या महर्षी विनोद संस्थेत अनुभवायला मिळालं. एक आकडेवारी जरा सांगतो, मग मुद्दा काय आहे तो मांडतो. जन्माला येणाऱ्‍या १६६ मुलांपैकी एका बाळाला जन्मतः काहीतरी व्याधी असते. तसंच भारतात जन्माला येणाऱ्या ८३० मुलांपैकी एकाला डाउन सिंड्रोम असतो. बाळ जन्माला येताना दोनऐवजी तीन गुणसूत्रं एकत्र येतात, तेव्हा जन्माला येणाऱ्‍या बाळात अडचणी निर्माण होतात. अशा जन्माला येणाऱ्‍या मुलांची वाढ संथ असते, ज्याला डाउन सिंड्रोम समजलं जातं. महर्षी विनोदांचे सुपुत्र डॉ. संप्रसाद आणि त्यांची पत्नी ऋजुता यांना पहिलं बाळ झालं ज्याचं नाव समन्वय आहे, त्याला हाच आजार आहे. ‘‘ ज्या घरात असं बाळ जन्माला येतं, ते कुटुंब मनातून खट्टू होतं. समाजापासून ही गोष्ट लपवू लागतं. बाळाचे पालक डाउन सिंड्रोम झालेल्या मुलाला घेऊन लोकांच्यात मिसळणं सहसा टाळतात. दुर्दैवाने समाजही अशा मुलांकडे खूप विचित्र नजरेनं बघतो. मग लपाछपीचा खेळ सुरू होतो...’’ संप्रसाद विनोद समजावून सांगत होते.

‘आम्ही तसं अजिबात केलं नाही. समन्वयला आम्ही अगदी नेहमीप्रमाणे वाढवलं आणि समाजात मिसळू दिलं. आम्हाला दुसरा मुलगा झाला, ज्याचं नाव सनातन आहे, त्याचं समन्वयबरोबरचं नातं तूच बघ किती गोड आहे. कुटुंब आणि समाज दोघांनीही जर ही गोष्ट सहजी स्वीकारली, तर डाउन सिंड्रोम झालेल्या मुलांना समान वागणूक मिळू शकते. समन्वयसारख्या मुलांना सहजी मिसळू दिलं तर आपल्याला समजतं की, ही मुलं म्हणजे निरागस माणसं असतात. त्यांच्या सान्निध्यात आपण शांत होतो...’’ डॉक्टरांनी खास त्यांच्या शांत शैलीत मुद्दा मांडला.

सनातन विनोद स्पोर्टस् आणि फिटनेस क्षेत्रातील पदवीधर आहे. ऑस्ट्रेलियातून खेळाडूंना लागणाऱ्‍या तंदुरुस्तीचा सविस्तर अभ्यास केलेला सनातन भावाच्या नावाने सॅमीज् फिटनेस सेंटर चालवतो. या अनोख्या व्यायामशाळेत बरेच क्रिकेटर्स जातात. खास बात ही की, काही लोक केवळ समन्वयही व्यायाम करतो म्हणून आवर्जून जातात. ‘‘खेळाडूंना जेव्हा अपयश येतं आणि निराशा डोकावायला लागते, तेव्हा व्यायाम करावासा वाटत नाही. अशा मनोअवस्थेत सॅमीज् फिटनेसला गेलं आणि डाउन सिंड्रोम असलेला समन्वय शांतपणे व्यायाम करताना दिसतो, तेव्हा निराशा कुठल्या कुठं पळून जाते...’’ एका खेळाडूने सांगितलं.

खेळाचा होणारा परिणाम सांगताना सनातन विनोद म्हणाला, ‘‘खेळातून डोळे आणि हातांचा समन्वय साधला जातो, ज्याचा खूप मोठा फायदा कोणतीही शारीरिक व्याधी असलेल्या मुलांना होतो. सॅमीज् फिटनेस सेंटरला डाउन सिंड्रोम असणारा समन्वय मस्तपैकी टेबल टेनिस खेळताना दिसतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्‍यावरचा आनंद बघण्यासाखा असतो. आपण जितकं या मुलांना सामावून घेण्याचा मनापासून प्रयत्न करू, तितका आनंद आणि सुधारणा होणार आहे. फक्त यासाठी आपल्या मनातील गंड काढला पाहिजे. खास मुलांकडे बघायची आपली नजर बदलली पाहिजे...’’ सनातन विनोद स्वानुभवातून सांगत होता.

गौरी गाडगीळ... जिच्या जिद्दीच्या कहाणीवर सिनेमा निघाला आणि ऋत्विक जोशीसारखी अनेक उदाहरणं डोळ्यांसमोर येतात, जिथं डाउन सिंड्रोमच्या आजाराने खो घालूनही कमाल मजल मारली गेली आहे. सगळ्याचं मर्म कुटुंबाने त्या व्यक्तीला समानतेने जगायची संधी देणं आणि समाजाने ती मनोमन स्वीकारणं हे आहे. अशक्य काहीच नाहीये, गरज आहे ती नजर बदलायची. खेळाच्या माध्यमातून काय साध्य करता येतं याचा अभ्यास पालकांनी करावा, म्हणजे मुलांमधील सुधारणा आपोआप बाळसं धरेल.

उठसूट सिनेमा बघणाऱ्‍यांतील मी नाही; पण जेव्हा चांगली रुची असलेले मित्र किंवा मैत्रीण कोणतं नाटक किंवा सिनेमा आवर्जून बघायचा सल्ला देतात, तेव्हा तो मी मानतो. माझा उद्योजक मित्र मिहीर गोगटेनं मला ‘आहन’ नावाचा सिनेमा नेटफ्लिक्सवर बघायचा सल्ला दिला. निखिल फेरवानीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा खरंच खास निघाला. डाउन सिंड्रोम झालेल्या मुलावर हा सिनेमा बेतला गेला असताना दिग्दर्शकानं प्रमुख भूमिकेसाठी डाउन सिंड्रोम झालेल्या अबुली मामाजी नावाच्या मुलाला घेतलं आहे. अबुलीने अफलातून काम या सिनेमात केलं आहे. हा सिनेमा डाउन सिंड्रोम झालेल्या मुलावर असून एकही कण नकारात्मक नाही. उलटपक्षी हा सिनेमा डाउन सिंड्रोम झालेल्या मुलासोबत राहून बाकीच्या माणसांतील निराशा आणि नकारात्मकता कशी दूर होत जाते, हे दाखवणारा एकदम सकारात्मक सिनेमा आहे.

एकदा कधीतरी दिव्यदृष्टी असलेल्या मुलांना क्रिकेट खेळताना बघा, एकदातरी डाउन सिंड्रोम झालेल्या मुलांना टेबल टेनिस खेळताना किंवा पोहण्याच्या तलावात उतरल्यावर सपासप पाणी कापत पुढं जाताना बघा. मग तुम्हाला कळेल की, दिव्यांगांना समान संधी देण्याचं समाधान काय असतं; ते मनातून पटलं की तुम्ही नक्की एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीला सायकलवरून चक्कर मारून आणाल. एकदा करून तर बघा... सांगतो खेळाची ताकद अचाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT