India Woman Cricket Team Sakal
सप्तरंग

स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटा!

२०२३ ची ऑस्ट्रेलियन स्पर्धा खेळायला आलेल्या नोवाक जोकोविचला २०२२ मध्ये काय मानहानी सहन करावी लागली होती, याची सगळ्यांना कल्पना आहे.

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

२०२३ ची ऑस्ट्रेलियन स्पर्धा खेळायला आलेल्या नोवाक जोकोविचला २०२२ मध्ये काय मानहानी सहन करावी लागली होती, याची सगळ्यांना कल्पना आहे.

ज्याचं बालपण बॉम्ब टाकणाऱ्‍या विमानांपासून लपण्यासाठी तळघरात गेलं, ज्यानं पालकांच्या पिझ्झा बनवण्याचा व्यवसायात मदत करून एका भिंतीवर टेनिसचे धडे गिरवले, ज्याला २०२२ मध्ये स्पर्धा खेळण्यापासून रोखून ऑस्ट्रेलियातून बाहेर काढलं गेलं, त्याच नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा विक्रमी दहाव्यांदा जिंकून सगळ्यांना कौतुक करायला भाग पाडलं. दुसरीकडं भारताच्या मुलींनी आयसीसीने आयोजित केलेल्या पहिल्या १९ वर्षांखालच्या मुलींच्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. या दोनही भन्नाट विजयांनंतर एकच गोष्ट सुस्पष्ट दिसून आली ती म्हणजे, स्वप्न बघणं गरजेचं असतं... स्वप्नांचा पाठलाग करणं गरजेचं असतं.

२०२३ ची ऑस्ट्रेलियन स्पर्धा खेळायला आलेल्या नोवाक जोकोविचला २०२२ मध्ये काय मानहानी सहन करावी लागली होती, याची सगळ्यांना कल्पना आहे. ते शल्य मनात घेऊन तो सराव करायला कोर्टवर उतरला, तर नेहमी दुखापतींपासून लांब राहिलेल्या नोवाकच्या मांडीच्या मागच्या स्नायूला दुखापत झाली. स्पर्धेत सहभागी होता येणार का आणि झाला तरी कठोर लढतीत टिकाव धरणं शक्य होणार का, अशा शंका मनात चुकचुकत होत्या. दुखऱ्‍या पायाला पट्ट्या बांधून आणि सामन्या दरम्यानही वेळोवेळी उपचार घेऊन नोवाक जोकोविच लढत होता. दुखापतीच्या भीतीने सामना लांबवायचा नाही यासाठी नोवाक अधिक आक्रमक खेळताना दिसला.

सलग सात सामने जिंकताना नोवाक जोकोविचने फक्त एक सेट गमावला. समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याची त्याने जणू धुलाई केली. त्याच्या अचूक आणि वेगवान ताकदवान फटक्यांना उत्तर देणं रूबलेव, डी मनोर, दिमित्रोव यांच्यासारख्या चांगल्या खेळाडूंना झेपलं नाही.

१९८३ ची गोष्ट मला आठवते. मी शिकत असलेल्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडादिनी जगविख्यात बिलियर्डस् खेळाडू मायकेल फरेरा आले होते. त्यांनी आपल्या भाषणात आम्हा खेळाडूंना एक छान सल्ला दिला होता. मायकेल फरेरा म्हणाले होते, ‘स्वप्नं त्यांचीच सत्यात उतरतात, जे स्वप्नं नुसती बघत नाहीत, तर ती खरी व्हावीत म्हणून मनापासून आणि सातत्याने प्रयत्न करतात. तेव्हा मुलांनो, स्वप्नं जरूर बघा आणि त्यांचा मेहनत करून पाठलाग करा.’’ मायकेल फरेरांचं ते सांगणं माझ्या मनात घर करून राहिलं.

नेमकी हीच गोष्ट नोवाक जोकोविचने सांगितली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यावर तो पहिला आपल्या कुटुंबीयांना, प्रशिक्षकांना भेटला. आपल्या भावाच्या गळ्यात पडून आनंदाने ढसाढसा रडला. मग त्याने आपल्या भावना विजेतेपदाचा करंडक हाती घेऊन बोलून दाखवल्या. तो म्हणाला, ‘मी आणि त्सीत्सीपास सर्बिया आणि ग्रीससारख्या छोट्या आणि परिस्थितीशी झगडणाऱ्‍या देशांतून आलो आहोत. आमच्या देशात टेनिसची संस्कृती जास्त नाही, ना आमच्या देशात टेनिस प्रशिक्षणाच्या सर्वोत्तम सुविधा आहेत, तरीही आम्ही आज इथं उभे आहोत, कारण आम्ही आमच्या स्वप्नांचा पाठलाग केला. खूप वेळा असे लोक भेटतात जे सांगतात की, तुम्ही बघत असलेली स्वप्नं सत्यात उतरणार नाहीत; पण मी सांगतो तुम्हाला, की तुमच्या स्वप्नांवर तुमच्याइतकाच विश्वास ठेवणारी एक व्यक्ती जरी तुम्हाला भेटली, तरी तिची साथ घ्या आणि सातत्यपूर्ण मेहनतीने स्वप्नांचा पाठलाग करा. अशक्य असं काहीही नसतं हे माझ्या आणि त्सीत्सीपासच्या उदाहरणातून तुम्हाला दिसून येईल.’’

एक सत्य नाकारून चालणार नाही की, खेळातून निवृत्त झाला तरी अजून रॉजर फेडररचे चाहते जास्त आढळतात. पाठोपाठ रफाएल नदालचा नंबर लागतो. नदालइतकीच, म्हणजे तब्बल २२ ग्रॅन्ड स्लॅम विजेतीपदे पटकावूनही आपण नोवाक जोकोविचला योग्य मान देतो का, हा माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो.

आयसीसीने पहिल्यांदाच १९ वर्षांखालच्या मुलींचा विश्वचषक आयोजित केला. भारतातून निघताना शेफाली वर्माच्या संघावर अपेक्षांचं ओझं होतं, कारण भारतीय संघ स्पर्धा जिंकणार असंच भाकीत बऱ्‍याच जाणकारांनी केलं होतं. भारतीय संघ त्या अपेक्षांना पुरून उरला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याचा एकमेव अपवाद वगळता भारतीय संघाने सर्व सामने नुसते जिंकले नाहीत, तर अगदी दिमाखात जिंकले.

श्वेता सेहरावत फलंदाजीत आणि तीतास साधू गोलंदाजीत या दोन मुलींची कामगिरी खूप लक्षणीय ठरली. शेफाली वर्माने चांगली फलंदाजी करताना नेतृत्वगुणही दाखवले.

अंतिम सामन्यात आपल्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव ६८ धावांमध्ये रोखून कमाल केली. पाठलाग करताना श्वेता सेहरावत आणि शेफाली वर्मा लवकर बाद होऊनही सौम्या तिवारी आणि त्रिशाने मोलाची भागीदारी रचून भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिलं आणि मुलींनी आनंदाने उड्या मारत, आरडाओरडा करत विजय साजरा केला. लक्षणीय बाब अशी की, भारताला ऑलिंपिक सुवर्णपदक पटकावून देणारा नीरज चोप्रा जातीने मैदानात हजर राहून, त्याने मुलींना प्रोत्साहन दिलं. बीसीसीआयने औचित्य दाखवून विजेत्या संघाला नुसतं पाच कोटी रुपयांचं बक्षीसच जाहीर केलं नाही, तर त्यासोबत संपूर्ण संघाला अहमदाबादला भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्‍या निर्णायक टी-२० सामन्याला बोलावून सचिन तेंडुलकरच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

एका बाजूला मुलींचा संघ १९ वर्षांखालचा पहिला विश्वचषक जिंकून मायदेशी परतला असताना दुसरीकडे जय शहांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआय महिलांच्या क्रिकेटला योग्य प्राधान्य देऊ लागली आहे. मार्च महिन्यात पहिली वूमेन्स प्रीमियर लीग रंगणार आहे. पाच संघमालकांनी करोडो रुपयांची बोली लावून संघ विकत घेतले आहेत. याचा चांगला परिणाम असा होणार आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या भारतातील बऱ्याच गुणवान मुलींना आपलं कसब दाखवायची नामी संधी लाभणार आहे. एकंदरीतच भारतातील महिला क्रिकेटला जोरदार प्रोत्साहन मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT