naseeruddin shah and ravi baswani sakal
सप्तरंग

ब्लॅक कॉमेडी : यासम ही!

रहस्यपट किंवा हास्यपट एकदा बघून झाल्यावर पुनःप्रत्ययात तेवढे रंजक वाटत नाहीत, हा सर्वसाधारण नियम आहे. अर्थात, हा कोणत्याही चित्रपटाला लागू पडणारा नियम आहे.

सुनील देशपांडे

रहस्यपट किंवा हास्यपट एकदा बघून झाल्यावर पुनःप्रत्ययात तेवढे रंजक वाटत नाहीत, हा सर्वसाधारण नियम आहे. अर्थात, हा कोणत्याही चित्रपटाला लागू पडणारा नियम आहे.

रहस्यपट किंवा हास्यपट एकदा बघून झाल्यावर पुनःप्रत्ययात तेवढे रंजक वाटत नाहीत, हा सर्वसाधारण नियम आहे. अर्थात, हा कोणत्याही चित्रपटाला लागू पडणारा नियम आहे. काही विनोदी चित्रपट मात्र कितीही वेळा बघितले तरी त्यातला विनोद शिळा न वाटता दर वेळी नवा आनंद देऊन जातो. दर वेळी त्यातल्या राहून गेलेल्या, दडलेल्या जागा नव्याने कळत जातात आणि त्या विनोदाची गंमत आणखी वाढते. ‘चलती का नाम गाडी’, ‘पडोसन’, ‘प्यार किये जा’, ‘गोलमाल’ (हृषीदांचा), ‘अंगूर’, ‘हेराफेरी’ (प्रियदर्शनचा) ही अशा काही हास्यप्रधान चित्रपटांची नावं. याच मालिकेतला आणखी एक चित्रपट होता कुंदन शाह यांचा ‘जाने भी दो यारो’. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने विनोदी चित्रपटांना एक वेगळं परिमाण तर दिलंच; पण या प्रकारातली ‘ब्लॅक कॉमेडी’ (याला मराठी प्रतिशब्द काय?) तेवढ्या ताकदीने त्याआधी व नंतरही न आल्याने हास्यपटांच्या प्रभावळीत या चित्रपटाचं वर्णन ‘यासम हा’ असंच करावं लागेल.

मुंबईतले दोन नवोदित छायाचित्रकार विनोद चोप्रा (नसिरुद्दीन शाह) आणि सुधीर मिश्रा (रवी वासवानी), दोन बडे बांधकाम ठेकेदार तर्नेजा (पंकज कपूर) आणि आहुजा (ओम पुरी), तसंच ‘खबरदार’ या नियतकालिकाची मालक, संपादक शोभा सेन (भक्ती बर्वे) या प्रमुख पात्रांभोवती ही कथा फिरते. (पुढल्या काळात नावारूपाला आलेले विधू विनोद चोप्रा आणि सुधीर मिश्रा हे दोन दिग्दर्शक या चित्रपटाच्या वेळी कुंदन शाह यांच्या चमूत होते, हे कळायला काही वर्षं जावी लागली.)

विनोद आणि सुधीर या दोघांनी मुंबईतल्या एका प्रतिष्ठित भागात स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरू केलेला असतो. सुरुवातीला एकही काम न मिळाल्याने ते काहीसे निराश होतात. मात्र ‘हम होंगे कामयाब एक दिन’ हे गीत आणि ‘सच्चाई की जीत होगी और बुराई की हार’ हे वचन यांवर त्यांची श्रद्धा असते. अखेर त्यांना ‘खबरदार’ या मासिकाची पत्रकार शोभा हिच्याकडून काम मिळतं. शोभा तिच्या मासिकातून भ्रष्टाचार, गैरव्यवहार आदींविरुद्ध आवाज उठवत असते. महापालिकेतले अधिकारी आणि कंत्राटदार यांची भ्रष्ट युती तिला चव्हाट्यावर आणायची असते. याचाच एक भाग म्हणून ठेकेदार तर्नेजा आणि पालिका आयुक्त डिमेलो (सतीश शाह) यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या बैठकीची गुप्त छायाचित्रं आणण्याची कामगिरी शोभा त्यांच्यावर सोपवते. आयुक्त डिमेलो हा कमालीचा भ्रष्ट असतो आणि मुंबईतले चार उड्डाणपूल बांधण्याचं कंत्राट आपल्याला मिळावं असा तर्नेजाचा प्रयत्न असतो. या मेहेरबानीपोटी डिमेलो याला मोठी लाच द्यायची त्याची तयारी असते.

या दोघांवर पाळत ठेवण्यासाठी विनोद आणि सुधीर जातात तेव्हा ठेकेदार आहुजा हाही या कंत्राटासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. वास्तविक आहुजाला पालिकेने ‘काळ्या यादीत’ टाकलेलं असतं आणि तसं करण्यासाठी तर्नेजा यानेच डिमेलो यास पैसे चारलेले असतात. मात्र, आता त्याला काळ्या यादीतून काढून स्पर्धेत उतरवायचं आणि त्याद्वारे तर्नेजाकडून मोठी रक्कम वसूल करायची, असा डिमेलोचा डाव असतो. डिमेलो आणि तर्नेजा यांची बैठक सुरू असताना विनोद व सुधीर चोरून त्यांचे फोटो काढतात. त्याच वेळी आहुजादेखील तिथे टपकतो. नुकसान टाळण्यासाठी तर्नेजा आपला हाडवैरी आहुजापुढे ‘फिफ्टी फिफ्टी’चा प्रस्ताव ठेवतो.

दोघांनी प्रत्येकी दोन उड्डाणपुलांची कंत्राटं घ्यावीत, शिवाय मुंबईत एका ठिकाणचं कबरस्तान हटवून त्या ठिकाणी निवासी इमारतींचा प्रकल्प उभारण्याची तर्नेजाची महत्त्वाकांक्षी योजना असते, त्यातही आहुजाला वाटा मिळावा यावर या दोघांमध्ये डिमेलोच्या साक्षीने समझोता होतो. विनोद व सुधीर आता या दोघा ठेकेदारांमध्ये फूट पाडण्याची चाल खेळतात. आहुजा हा पत्रकार शोभाचा मित्र असून तर्नेजाला फसविण्याचा त्याचा डाव आहे, अशी पुडी ते तर्नेजाचा सहायक अशोक (सतीश कौशिक) याच्यासमोर सोडतात. त्यांची खेळी यशस्वी होत असतानाच पालिकेचा उपायुक्त श्रीवास्तव तिथे येऊन उघड करतो की, डिमेलोने दोन्ही ठेकेदारांना गाफील ठेवून पुलाचं कंत्राट तिसऱ्याच व्यक्तीला दिलंय.

दरम्यान, विनोद व सुधीर यांनी अन्य ठिकाणी काढलेल्या एका फोटोत तर्नेजा कुणावर तरी पिस्तुलातून गोळी झाडत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर तर्नेजा पद्धतशीरपणे डिमेलो याचा आजारपणात मृत्यू झाल्याची बातमी पसरवतो. नवीन पुलास डिमेलोचं नाव देऊन उद्‍घाटन समारंभात त्याला श्रद्धांजलीदेखील वाहण्यात येते. विनोद आणि सुधीर यांना यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येतो. तपास केल्यानंतर डिमेलोचा खूनच झाल्याचं त्यांना कळतं. डिमेलोच्या खुनाची बातमी कळाल्याने शोभा त्या दोघांच्या कामगिरीवर खूष होते. मात्र, या धावपळीत डिमेलोचं प्रेत गायब होतं. पैसे उकळण्यासाठीच त्या दोघांनी प्रेत गायब झाल्याचा बनाव केला असावा असा संशय शोभा घेते.

दरम्यान, शोभा ही वरकरणी निर्भीड पत्रकारितेचा देखावा करणारी; पण प्रत्यक्षात भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणारी संपादक असून, आपण काढलेल्या फोटोंच्या आधारे तर्नेजाला ब्लॅकमेल करण्याचा तिचा डाव असल्याचं उघड झाल्याने विनोद व सुधीर यांना धक्का बसतो. तिकडे उद्‍घाटन केलेला पूल दोनच दिवसांत कोसळल्याने खळबळ उडते. पुलाच्या बांधकामात कोणताही दोष नसून हा घातपात असल्याचा कांगावा तर्नेजा करतो. दुर्घटना घडण्याच्या आदल्या रात्री पुलाखाली दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरत होते अशी माहिती एका पोलिसाकडून टीव्ही प्रतिनिधीला मिळते. ती पाहून विनोद व सुधीर यांची घाबरगुंडी उडते. कारण डिमेलोचं प्रेत गायब होण्याआधी याच पोलिसाने त्या दोघांना हटकलेलं असतं. यातून सुटायचं असेल तर डिमेलोचं प्रेत ठेवलेली शवपेटी शोधून काढणं हाच मार्ग असतो. ही शवपेटी आहुजाने दारूच्या नशेत त्याच्या मोटारीला बांधून नेलेली असते.

आहुजाच्या फार्म हाउसमधून ही शवपेटी पळवून नेण्यात विनोद-सुधीर यशस्वी होतात. तर्नेजा, आहुजा, उपायुक्त श्रीवास्तव हे सारे त्या दोघांच्या मागे लागतात. डिमेलोचं प्रेत ढकलत घेऊन जाणारे विनोद व सुधीर आणि त्यांचा पाठलाग करणारे इतर सर्वजण अशी ही वरात योगायोगाने एका नाट्यगृहात शिरते. तिथे महाभारतातला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रवेश सुरू असतो. विनोद व सुधीर मेकअप रूममध्ये जाऊन डिमेलोच्या प्रेतास द्रौपदीचा वेश चढवून हळूच रंगमंचावर घेऊन जातात. इतर मंडळी त्याच नाटकातली वेशभूषा चढवून मंचावर येतात. डिमेलोचं प्रेत हस्तगत करण्यासाठी त्या सर्वांमध्ये चढाओढ लागते. त्यातून विनोदी घटनांची मालिका सुरू होते. दरम्यान, या गोष्टीचा सुगावा लागल्याने पोलिसांचं पथकही तिथे हजर होतं. विनोद व सुधीर पोलिसांना सर्व प्रकार समजावून सांगत त्यांच्याजवळचे पुरावे सादर करतात. पोलिस अधिकारी त्यांना कारवाईचं आश्वासन देतात. भ्रष्टाचाऱ्‍यांना शिक्षा होणार, या कल्पनेने दोघांना अत्यानंद होतो. ‘सच्चाई की जीत होगी और बुराई की हार’ या विचाराने ते सुखावतात. पण....

तर्नेजा आता वेगळा डाव खेळतो. आपण तुरुंगात गेलो तर आहुजा आणि शोभा यांचे काळे धंदेही उघड करू, अशी धमकी तो देतो. आयुक्तपदावर बढती मिळालेला श्रीवास्तव त्यांच्यात समेट घडवून आणतो. त्यांच्या संगनमताने पोलिस विनोद व सुधीर या दोघांना पुलाची दुर्घटना घडवून आणल्याबद्दल अटक करतात. दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा होते. चित्रपटाचा शेवट विनोद व सुधीर हे कैद्याचा वेश परिधान करून मुंबईच्या रस्त्यावर गर्दीत फिरत असल्याच्या दृश्याने होतो. त्यांची सुटका होऊन खूप दिवस वा महिने झाले असले तरी अंगावर अजूनही कैद्यांचे कपडे असतात. ‘हम होंगे कामयाब...’ ही ओळ गुणगुणत ते कॅमेऱ्यासमोर येतात आणि हाताने गळा कापल्याचा अभिनय करत मान कापल्याचं सूचित करतात. इथंच चित्रपट संपतो.

कुंदन शाह यांनी संपूर्ण चित्रपटाची हाताळणी फार्सिकल अंगाने केली असून प्रसंगनिष्ठ, शब्दनिष्ठ आणि उपरोधिक विनोदांवर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला आहे. अर्थात, फार्सिकल हाताळणीमुळे त्यांना हवं ते ‘स्वातंत्र्य’ (सिनेमॅटिक लिबर्टी) घेता आल्याने ‘हे कसं शक्य आहे’ हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येत नाही. यातल्या विनोदात ताजेपणा व उत्स्फूर्तता यांचा विलक्षण संगम दिसून येतो.

याच उपरोधिक विनोदाचा एक मासला म्हणजे भ्रष्टाचाराच्या घाणीत आकंठ बुडालेला तर्नेजा परक्या माणसाशी संभाषण करताना त्याच्या अंगावर सुगंधी स्प्रे फवारून बोलतो. आयुक्त डिमेलो यांना श्रद्धांजली वाहताना तर्नेजा ‘त्यांना मुंबईच्या गटार व्यवस्थेबद्दल किती आस्था होती’ हे सांगतो. त्यांना आदरांजली म्हणून मुंबईतील सर्व गटारे एक दिवस बंद ठेवली जातील अशी घोषणाही याप्रसंगी केली जाते. कबरस्तान हटवून इमारती बांधण्याच्या प्रस्तावावर डिमेलो ‘कम से कम मुर्दा लोगों को तो चैन से सोने दो’ अशी टिप्पणी करतो. (डिमेलोच्या तोंडी असलेलं ‘उल्लू का पिल्लू’ हे पालुपद असंच!) ‘टाइम बॉम्ब में टाइम बहोत कम है’ हा संवाद काय, किंवा ‘तुम क्या समझता है मुन्सिपालटी हमारे बाप का है?’... ‘नही सर, आप का है’ यासारखे सवाल-जवाब हास्य फुलवून जातात.

अखेरीस नाट्यगृहातल्या महाभारताच्या प्रवेशात होणारी धमाल, हा तर या हास्यपटाचा कळसाध्यायच! ही धमाल पडद्यावर पाहण्यातच मजा आहे. द्युतात पांडव हरल्यानंतर दुर्योधनाने दुःशासनाला ‘द्रौपदीला सभेत आण’ असं सांगणं, भीमाला त्याच वेळी डुलकी लागल्याने अन्य पांडवांनी त्याला जागं करणं, दुःशासनाने आवेशाने विंगेत जाणं आणि द्रौपदीऐवजी साडी नेसवलेलं डिमेलोचं प्रेतच रंगमंचावर ओढत आणणं, प्रेताचा तोल जाऊन ते दुर्योधनाच्या अंगावर कोसळणं, दुर्योधनाला विंगेत पिटाळणं, वस्त्रहरण होणार हे ध्यानात येताच विनोदने दुर्योधनाच्या वेशात मंचावर उडी घेत द्रौपदीच्या वस्त्रहरणाला विरोध करणं, त्याच वेळी गॉगल लावून पांडवाच्या वेशात रंगमंचावर आलेल्या आहुजाने ‘द्रौपदी तेरी अकेली की नही, हम सब शेअर होल्डर्स है’ असं ठणकावणं, दुःशासनाला वस्त्रहरणाची आठवण करून दिल्यानंतर विनोदने ‘नही, द्रौपदी जैसी सती नारी को देख कर मैने चीरहरण का आयडिया ड्रॉप कर दिया’ म्हणणं, शेवटी दुर्योधन व दुःशासन यांच्यातच हाणामारी होणं, मागे बसलेल्या अंध धृतराष्ट्राने अधूनमधून ‘ये सब क्या हो रहा है’ असं विचारत राहणं, महाभारत सुरू असताना मधूनच ‘मुघल-ए-आझम’चा प्रवेश सुरू होणं आणि हे सगळं पाहून प्रेक्षकांची हसून पुरेवाट होणं... एक ना दोन, अनेक धमाल प्रसंग घडत राहतात.

शेवटी विनोद व सुधीर यांनाच अटक होऊन शिक्षा झाल्याने या कथानकाला वेगळीच कलाटणी मिळते. ‘सत्याचा विजय आणि असत्याची हार’ हे वचन अखेरीस तर्नेजा उच्चारतो, तेव्हा त्यातला उपरोध आणखी दाहक ठरतो. रंजीत कपूर आणि सतीश कौशिक यांनी लिहिलेल्या संवादांचा या यशात मोठा वाटा आहे. नसिरुद्दीन शाह, रवी वासवानी, पंकज कपूर, ओम पुरी, सतीश शाह, सतीश कौशिक आणि भक्ती बर्वे या सर्वच कलाकारांनी सहज अभिनयाने या चित्रपटाची रंगत वाढविली. (भक्तीचे संवाद मात्र अनिता कंवर हिच्या आवाजात डब केले होते.)

पालिकेतले अधिकारी, कंत्राटदार, पत्रकार यांना लक्ष्य करताना कुंदन शाह यांनी राजकारण्यांना (विशेषतः राजकीय नेते व नगरसेवक) नजरेआड का केलं असावं, ही शंका मनाला चाटून जाते. अर्थात, यासारख्या उणिवा दृष्टीआड केल्या तरच या चित्रपटाचा आनंद घेता येईल.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT