Par Movie sakal
सप्तरंग

काळजाला भिडणारा जीवनसंघर्ष...

नौरंग्या आणि रमा जिवाच्या भयाने कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी लपूनछपून रहात असतात. मदतीसाठी धावा करत चहूकडे हिंडतात.

सुनील देशपांडे

नौरंग्या आणि रमा जिवाच्या भयाने कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी लपूनछपून रहात असतात. मदतीसाठी धावा करत चहूकडे हिंडतात.

‘तुमच्या जगण्याचं नेमकं उद्दिष्ट काय’ किंवा ‘कोणत्या ध्येयाने प्रेरित होऊन तुम्ही जगता...’ यासारखे गुळगुळीत प्रश्न विचारणाऱ्या आणि त्या प्रश्नांना तेवढीच गुळगुळीत उत्तरं देणाऱ्‍या, अशा दोन्ही प्रकारांतल्या लोकांना कधी कळलं असेल का, की आपल्या आजूबाजूच्या हजारो, लाखो माणसांपुढे रोजचं दोनवेळचं जेवण कसं मिळवायचं, हीच एकमेव समस्या आहे. हाताला काम नि पोटाला अन्न हेच ज्यांच्या जीवनाचं सर्वस्व, त्यांच्यासाठी बाकी ‘उद्दिष्टं’ आणि ‘ध्येयं’ फिजूल ठरावीत.

गौतम घोष दिग्दर्शित ‘पार’ या हिंदी चित्रपटातल्या नौरंगिया अर्थात ‘ नौरंग्या’ (नसिरुद्दीन शाह) आणि रमा (शबाना आझमी) या जोडप्याचं जगण्याचं ‘उद्दिष्ट’देखील फार वेगळं नाही. आपण दोघे आणि म्हातारे आई-वडील अशा चौघांचा उदरनिर्वाह चालेल एवढं काम हाताला मिळावं, हीच त्या जोडप्याची मर्यादित अपेक्षा असते.

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातल्या कोईरी या खेड्यातल्या दलित वस्तीत राहणारं हे जोडपं. जमीनदाराच्या शेतावर काम करून रोजीरोटी मिळवायची, शेतात काम नसेल तेव्हा इतर ठिकाणी मोलमजुरी करून कसंबसं पोट भरायचं, हा या दलितांचा दिनक्रम. नौरंग्याही त्याला अपवाद नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून साऱ्‍यांच्याच वाट्याला ओढग्रस्तीचं जिणं आलेलं. जमीनदाराच्या जुलमी भावाचा काही अज्ञात व्यक्तींनी खून केला, तेव्हापासून तिथली मोलमजुरी बंद झालेली. एका भयाण शांततेत सारी वस्ती जगत असतानाच एका रात्री या वस्तीवर अज्ञात बंदूकधारी चाल करून येतात, गोळीबार करून दहशत निर्माण करतात. हल्लेखोरांना नौरंग्या हवा असतो. चाहूल लागताच नौरंग्या पत्नीसह झोपडीच्या मागच्या खिडकीतून पळ काढतो, वस्ती सोडून दूर निघून जातो. हल्लेखोर नौरंग्याचं घर पेटवून देतात, त्याच्या बापास गोळी घालून ठार मारतात. बेछूट गोळीबारात एकंदर सोळा दलितांची हत्या होते, पंचवीस-तीस माणसं गंभीर जखमी होतात, अनेक घरांची राखरांगोळी होते.

नौरंग्या आणि रमा जिवाच्या भयाने कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी लपूनछपून रहात असतात. मदतीसाठी धावा करत चहूकडे हिंडतात. मात्र, कुठेच आश्रय मिळत नाही. शेवटी त्यांना सल्ला मिळतो कोलकात्याला जाण्याचा. बिहार सीमेलगत असलेल्या कोलकाता शहरात तुम्हाला पोटापुरतं काम मिळेल आणि तिथं कुणी ओळखणारही नाही, असं सांगून एक गृहस्थ त्यांना त्या शहरातल्या एका व्यक्तीचा पत्ता लिहून देतो.

जिवाच्या भीतीने घरदारच नव्हे, तर राज्य सोडून परागंदा होण्याची वेळ या जोडप्यावर का येते? खरंतर गाव सोडण्याची नौरंग्याची मनातून इच्छा नसतानाही रमा त्याला बळजबरीने गावापासून दूर का नेते? रमा आणि नौरंग्याचा तीन वर्षांचा मुलगा काही दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मरण पावलेला, त्या धक्क्यातून सावरत असताना ती पुन्हा गरोदर राहिलेली. अशा अवस्थेत घरी राहणं आवश्यक असतानाही ती नवऱ्‍यासोबत गाव सोडायला तयार होते, यामागचं कारण काय? या सर्व गोष्टींमागे एकच कारण असतं - ते म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून गावातली बिघडलेली परिस्थिती. ती बिघडायला अर्थातच जमीनदाराची (उत्पल दत्त) दडपशाही कारणीभूत असते. सरकारने ठरवून दिलेल्या किमान मजुरीपेक्षा खूप कमी पैशांवर मजुरांकडून काम करवून घेतलं जात असतं. याविरुद्ध मजुरांमध्ये असंतोष उफाळून येत असतो. गावातले गांधीवादी शाळामास्तर (अनिल चटर्जी) या मजुरांना संघटित करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतात. जमीनदाराकडे या मजुरांसाठी रदबदली करू पाहतात. ब्राह्मण जातीच्या मास्टरजींनी या खालच्या वर्गासाठी रक्त आटवावं हे जमीनदाराला मंजूर नसतं. ‘‘तुम्ही उच्च कुळातले आहात. विद्यादान हे तुमचं काम. शेती-शेतकरी, बैल, नांगर या फंदात कशाला पडता?’’ असं सांगत जमीनदार त्यांना समज देतो. मजुरांना थोडेफार पैसे वाढवून द्यायची आपली तयारी आहे; पण किमान मजुरी कायद्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचं तो निक्षून सांगतो. जमीनदाराचा मस्तवाल भाऊ हरिसिंग (मोहन आगाशे) याच्या डोळ्यांत मास्टरजी आधीच सलत असतात. त्यातून मजुरांनी काम बंद केल्याने हरिसिंग आणि मास्टरजी यांच्यात खटका उडतो. त्यात भर म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत मास्टरजींनी पाठिंबा दिल्यामुळे सरपंचपदी दलित उमेदवार राम नरेश (ओम पुरी) निवडून येतो.

खवळलेला हरिसिंग मास्टरजींची हत्या घडवून आणतो. या घटनेचा एक साक्षीदार असूनही पोलिसांना हाताशी धरून तो अपघाती मृत्यूच असल्याचा बनाव उभा केला जातो. या घटनेने दलितांमध्ये असंतोष उफाळून येतो. नौरंग्याच्या नेतृत्वाखाली तरुणांचा एक गट हरिसिंगला निर्जन ठिकाणी गाठून लाठ्याकाठांनी बेदम मारहाण करतो. यात हरिसिंग मरतो. जमीनदार पोलिसांची मदत घ्यायचं नाकारत ‘माझी माणसं माझ्या पद्धतीने हिशेब पूर्ण करतील’ असा इशारा देतो. त्यानंतर दलित वस्तीवर हा योजनाबद्ध हल्ला केला जातो.

दलित हत्याकांडानंतर बातम्या प्रसिद्ध होतात. पोलिस तपास, अधिकारी व मंत्र्यांच्या भेटी, नुकसान भरपाई आदी सोपस्कार पार पडतात. सरकारकडून भरपाई मिळतेय म्हटल्यावर नौरंग्याला गावी परत जाण्याची ओढ लागते; पण रमा तो विचार हाणून पाडत त्याला कोलकात्याला जाण्यासाठी राजी करते. पण, तिथं पोचल्यानंतर काम मिळणं दूरच, संकटांची मालिकाच त्यांच्यासमोर उभी राहते. राहायला छत नाही, खायला अन्न नाही या अवस्थेत काम मिळवण्यासाठी नौरंग्या वणवण भटकतो; पण कुठंही त्याला काम मिळत नाही. जवळचे सगळे पैसे संपलेले. गावी परत जायचं झाल्यास प्रवासापुरतेदेखील पैसे नाहीत अशी अवस्था.

आणि या अवस्थेत एक आशेचा किरण त्याला दिसतो. खूप गयावया केल्यानंतर एका ओळखीतून त्याला एक काम मिळतं. तिकिटापुरते पैसे मिळतील या आशेने तो ते करायला राजी होतो. काम असतं डुकरांचा एक कळप पोहत पोहत नदीच्या पल्याड घेऊन जाण्याचं. एक ठेकेदार त्याला हे काम देतो. एका डुकरामागे बारा आणे या दराने ३६ डुकरांचे २७ रुपये अशी मजुरी ठरते. (त्यातले सात रुपये काम मिळवून देणाऱ्‍याला दलाली म्हणून द्यायचे असतात.) नौरंग्याला गुरं हाकण्याचं काम माहीत असतं; पण डुकरं हाकारत न्यायची, तीही नदीच्या पात्रातून, हे कसं शक्य आहे? पण ठेकेदार त्याला दिलासा देतो, ‘‘डुकरं उत्तम पोहतात. आपण फक्त त्यांना हाकत पैलतीरावर न्यायचं. तुला पोहता येतं ना, झालं तर मग. पण लक्षात ठेव, एक जरी डुक्कर हरवलं, तर माझ्याशी गाठ आहे.’’

हे ‘घाणेरडं’ काम करायला रमा तीव्र विरोध करते. तिच्या पोटात मूल असतं. कोणताही धोका तिला पत्करायचा नसतो; पण नौरंग्यालादेखील कोणत्याही स्थितीत हे काम गमवायचं नसतं. तिचा विरोध झिडकारून तो या कामासाठी सज्ज होतो. नदीलगतच्या चिखलात लोळत पडलेल्या सर्व डुकरांना हाकारत तो नदीत घेऊन जातो. त्याचा तो आवेश पाहून रमादेखील त्याच्यासोबत नदीच्या पात्रात उतरते. डुकरं पाण्यातून सराईतपणे पोहत जात असतात. नौरंग्या हातात काठी धरून ‘हॅक… हॅक… फुर्र… डिवा डिवा...’’ असा आवाज करत त्यांना एका कळपात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. रमाही त्याच्या मागोमाग हातात काटकी पकडून एखाद्या चुकार जनावराला कळपासोबत आणायचा प्रयत्न करत असते. विशाल आणि खोल पात्रातून पोहत जात ही जीवघेणी कसरत ते करत असतात. सर्व डुकरं पैलतीरी नेऊन पोचवल्याच्या जाणिवेने दोघं जरा सुखावले असताना त्यांना धक्का बसतो. ते जिथं थांबलेले असतात, तो केवळ बेटासारखा भूभाग असतो. अजून अर्धं पात्र त्यांना पार करायचं असतं. तिचा तर धीरच खचतो. प्रचंड श्रमाने आणि डुकरांच्या सतत चिरकण्याच्या आवाजाने ती अर्धमेली होत पडून राहते. ‘आता मला शक्य होणार नाही...’ ती असहायपणे त्याला सांगते. पण तो तिला उठवतो, ‘‘चल ऊठ, धाडस गोळा कर. आता माघारी जाता यायचं नाही.’

विसावलेल्या डुकरांना ते पुन्हा पाण्यात ढकलत नेतात. पुन्हा तोच प्रवास, पुन्हा तेच हाकारणं. आता नदीचं पात्र आणखी खोल झालेलं आणि पाण्याला वेगही भरपूर आलेला. त्याही स्थितीत नौरंग्या आणि रमा डुकरं हाकारत नेतात. त्यात एक डुक्कर वाट चुकतं. तो त्याला वळवून आणतो. कशीबशी मोहीम फत्ते होते. त्या तीरावर ठेकेदार वाट बघत असतोच. तो डुकरं मोजून पाहतो. अतिश्रमाने नौरंग्या किनाऱ्‍यावर भेलकांडतो. कसंबसं सावरत ठेकेदारासमोर पैशांसाठी हात पुढे करतो. ठेकेदार मोजून वीस रुपये त्याच्या हातावर ठेवतो, शिवाय दोन रुपये बक्षीस म्हणून देतो. दोघांनाही खायला देतो. अधाशाप्रमाणे जेवून दोघं तिथल्या झोपडीत पडून राहतात. मधूनच तिला जाणीव होते, पोटातलं मूल हालत-डुलत नाही. ते दगावलं तर नाही ना? ती घाबरते. रडत, भेकत त्याला दोष देते. ‘‘मी आधीच म्हटलं होतं, हे असलं काम करायला लावू नका म्हणून... माझं मूल मला आणून द्या.’’ तो तिच्या पोटाला कान लावून पाहतो. त्याचा चेहरा उजळतो, ‘‘मूल आहे, जिवंत आहे… सगळं पहात आहे....’’ त्याच्या आश्वासक बोलण्याने ती सुखावली असतानाच चित्रपट संपतो.

समरेश बोस यांच्या ‘पारी’ या दोनपानी कथेवर गौतम घोष यांनी दोन तासांचा हा चित्रपट बनवला, तेव्हा साहजिकच कथेत नसलेल्या काही प्रसंगांचा समावेश त्यांनी केला असणार. ‘पार’ चित्रपट हिंदीत बनवताना पटकथा, संगीत, छायाचित्रण आणि दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी त्यांनी सांभाळली. जमीनदारांकडून होणारी सामान्यांची पिळवणूक हा या तीनही चित्रपटांचा समान धागा होता. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच नसिर व शबाना या दोघांनाही अभिनयाचे पुरस्कार मिळाले.

‘पार’ चित्रपट दोन स्तरांवर घडतो. पहिला स्तर ग्रामीण भागात जमीनदारीमुळे होणाऱ्‍या अन्यायाचा, तर दुसरा कोलकाता शहरात जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या संघर्षाचा. या दोन्ही स्तरांची कौशल्यपूर्ण गुंफण ‘पार’मध्ये दिसून आली. विशेषतः नदीतून डुकरं हाकत नेण्याचा प्रसंग या चित्रपटाचा थरारक कळसाध्याय! शेवटी नौरंग्या आणि त्याची पत्नी गावी परत जातात की नाहीत, हे दिग्दर्शकाने दाखवलेलं नाही. पण, तो प्रश्न मनात येऊ नये एवढ्या प्रभावीपणे नदीचा प्रसंग अंगावर येतो. नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमी या दोघांनी अभिनय केलाय अशी पुसटशी शंकाही येऊ नये, एवढा त्या दोघांचा स्वाभाविक वावर या भूमिकांमधून जाणवतो.

बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’शी या चित्रपटाचं कुठेकुठे साम्य आढळतं. जमीनदारीने नाडलेल्या नायकाचं खेड्यातून कोलकाता महानगरात जाणं व त्याच्या वाट्याला संकटंच येणं हे या दोन्ही चित्रपटांमधलं साम्य. त्या चित्रपटात हातरिक्षा चालवणाऱ्‍या नायकावर ओढवणारा जीवघेणा प्रसंग दिसला, तर इथे डुकरांचा कळप नदीपार घेऊन जाण्याची अवघड कसरत. अर्थात, हे साम्य सहज लक्षात आलेलं. बाकी या दोन्ही कलाकृतींचं श्रेष्ठत्व वेगवेगळ्या कारणांसाठी मान्य करावंच लागतं.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार आणि हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT