politics in movie sakal
सप्तरंग

सत्ताकारणाचा सुन्न करणारा खेळ!

सत्ताकारणाचा म्हटला तर रंजक, म्हटला तर सुन्न करणारा खेळ ‘सिंहासन’ या १९७९ मध्ये तयार झालेल्या मराठी चित्रपटातून दिसला.

सुनील देशपांडे

सत्ताकारणाचा म्हटला तर रंजक, म्हटला तर सुन्न करणारा खेळ ‘सिंहासन’ या १९७९ मध्ये तयार झालेल्या मराठी चित्रपटातून दिसला.

‘राजकारण’ या शब्दाचा उगम शोधायला गेल्यास तो कदाचित आदिमानवापर्यंत घेऊन जाईल, एवढं राजकारण मानवी जीवनात मुरलेलं आहे. अगदी थेट रामायण-महाभारत काळापासून आजघडीला तुमच्या-आमच्यासमोर सुरू असलेल्या घडामोडींपर्यंत जीवनातल्या सर्व टप्प्यांवर सत्तेच्या राजकारणाचे उभे-आडवे धागे-दोरे व्यवस्थित हाताला लागतात. सत्तेकरिता साधला जाणारा टोकाचा स्वार्थ, त्यासाठीची साठमारी, शह-काटशह, सफाईने सहकाऱ्‍यांचे गळे कापण्याची वृत्ती हे सारे याच सत्ताकारणाचे ताणे-बाणे!

सत्ताकारणाचा म्हटला तर रंजक, म्हटला तर सुन्न करणारा खेळ ‘सिंहासन’ या १९७९ मध्ये तयार झालेल्या मराठी चित्रपटातून दिसला. प्रख्यात लेखक अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ (१९७२) आणि ‘सिंहासन’ (१९७७) या दोन कादंबऱ्यांतील निवडक प्रसंगांवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं जब्बार पटेल यांनी, तर पटकथा आणि संवाद लिहिले होते विजय तेंडुलकर यांनी.

आशय आणि आकृतिबंध या निकषांवर साधू यांच्या या दोन्ही साहित्यकृती श्रेष्ठ आहेत यात शंकाच नाही. गेल्या साडेचार-पाच दशकांत या दोन कादंबऱ्यांना मागे टाकणाऱ्‍या साहित्यकृती मराठीत निर्माण झाल्या नाहीत हे जेवढं खरं, तितकंच ‘सिंहासन’च्या ताकदीचा निखळ राजकीय चित्रपट किमान मराठीत तरी पुन्हा झाला नाही हेही खरं. बांधीव पटकथा, टोकदार संवाद, सफाईदार दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, ठरवून ‘कृष्ण-धवल’ चित्रपट बनवला असावा असं वाटण्याजोगं छायाचित्रण (सूर्यकांत लवंदे) आणि संकलन (एन. एस. वैद्य) या गुणांनी ‘सिंहासन’ आजही खिळवून ठेवतो.

महाराष्ट्रातल्या १९६० आणि १९७० या दशकांमधल्या राजकीय व सामाजिक घटनांची पार्श्वभूमी साधू यांच्या कादंबऱ्यांना जशी आहे, तशी ती ‘सिंहासन’ चित्रपटालासुद्धा आहे. ‘सिंहासन’ कादंबरी आणि चित्रपट या दोहोंमध्ये अवघं दोन वर्षांचं अंतर होतं आणि बरोबर मधल्या वर्षात (१९७८) महाराष्ट्रात मोठं सत्तांतर घडून आलं होतं. हे सत्तांतर निवडणुकीद्वारे किंवा विरोधी पक्षांनी सरकार पाडल्यामुळे घडलं नव्हतं, तर सत्तारूढ पक्षातल्याच आमदारांचा मोठा गट फुटून बाहेर पडल्याने झालं होतं. सांगायचा मुद्दा हा, की राज्यातल्या ‘७८च्या सत्तांतराची झलक ‘सिंहासन’ कादंबरीमध्ये (फसलेल्या) बंडाच्या रूपात दिसली होती.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे (अरुण सरनाईक) आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (डॉ. श्रीराम लागू) व कृषिमंत्री माणिकराव पाटील (दत्ता भट) यांच्यातल्या सत्तासंघर्षाचं नाट्य म्हणजे ‘सिंहासन’. हे तीनही नेते आपापल्या आमदारांचे गट सांभाळून आहेत आणि एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी ते सोडत नाहीत. अर्थात, या कुरघोड्या उघडपणे नव्हे, तर छुपेपणानेच होत असतात. वरकरणी ते एकमेकांशी सौहार्दाचा देखावा करत असतात. कारण ‘काही झालं तरी पक्षशिस्त मोडायची नाही’, या तत्त्वाशी ते बांधील असतात. या सत्तासंघर्षाची साक्षीदार असलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे वार्ताहर दिगू टिपणीस (निळू फुले). दिगू हा निःपक्ष, स्वच्छ आणि सामाजिक भान असलेला वरिष्ठ पत्रकार. साहजिकच सर्व पक्षांमध्ये आणि गटांमध्ये त्याचा आदरयुक्त दरारा असतो.

चित्रपटाची सुरुवातच सत्तारूढ पक्षातल्या संभाव्य बंडाच्या चाहुलीने होते. विधिमंडळात सत्ताधारी नि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी सुरू असताना मुख्यमंत्र्यांना अचानक दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचा फोन येतो. ते तातडीने आपल्या कक्षात जातात; पण तो फोन दिल्लीचा नसून, कुणा अनामिक व्यक्तीचा असतो. पलीकडची व्यक्ती बोलत असते,

‘तुला सावधगिरीचा इशारा देतो. तुझ्याविरुद्ध मोठा कट शिजतोय... तुझ्या जवळचे, तुझ्या पक्षातलेच लोक त्यात सामील आहेत... हा इशारा पुन्हा मिळणार नाही... दुर्लक्ष केलंस तर पस्तावशील...’ मुख्यमंत्री हे ऐकताना ‘कोण बोलतंय?’ असं विचारत राहतात; पण पलीकडची व्यक्ती ‘तुझा एक हितचिंतक बोलतोय, गुडबाय.’ एवढं सांगून फोन ठेवते. त्या फोननंतर मुख्यमंत्री अस्वस्थ होऊन घरी परत जातात. कशी कोण जाणे; पण मुख्यमंत्र्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याची बातमी फुटते. कर्णोपकर्णी होते. पत्रकार दिगूलाही ती कळते. तो त्याच्यापरीने कामाला लागतो. तिकडे मुख्यमंत्र्यांचे विरोधकही मोहिमेला लागतात. आपापला गट मजबूत करण्याच्या हालचालींना वेग येतो. राज्यात भीषण दुष्काळ पडलेला. काही भागांत भूकबळीच्या घटना घडल्याच्याही वार्ता. सरकारकडून त्या बातम्यांचा इन्कार केला जातो. याउलट सरकारला कोंडीत पकडायची आयतीच संधी विरोधकांना मिळालेली.

मुख्यमंत्री शिंदे कमालीचे धूर्त आणि धोरणी. स्वतःच्या मनाचा थांग आपल्या शत्रूलाच काय, मित्रालाही लागू न देणारे; पण वाणी मात्र एकदम मिठास. गोड बोलून कधी कोणाचा काटा काढतील हे कळायचंही नाही. घरात काळजी वाहायला सुशील पत्नी असली, तरी साहेबांना विरंगुळा म्हणून घराबाहेर थोडी शीतल ‘झुळूक’ हवी असते. अधूनमधून ‘एकांतात’ भेटायची त्यांची ठिकाणं व प्रेमपात्रं त्यांच्याखेरीज कुणाला ठाऊक नसतात. शिवाय, घरात ‘कर्तबगार’ मेहुणा व इतर नातलगांचा राबता असतोच.

अर्थमंत्री दाभाडे हेही राजकीय धूर्तपणात कमी नसतात. विदर्भातल्या आमदारांची मोठी ‘लॉबी’ त्यांच्या पाठीशी असते. शिवाय, ‘सीएम’ना अडचणीत आणण्याच्या उपद्रवमूल्यामुळे विरोधी पक्षांनाही विश्वासरावांविषयी खास जवळीक असते. वागण्या-बोलण्यात एक ‘सोफिस्टिकेटेड टच’ असलेल्या विश्वासरावांच्या सूनबाईदेखील अलीकडे राजकारणात रस घेऊ लागलेल्या. साहेबांचे सुपुत्र एकूणच ‘निष्क्रिय’ असल्याने सूनबाई सार्वजनिक जीवनात आणि विश्वासरावांच्या आयुष्यात ‘सक्रिय’ होत चाललेल्या.

तिकडे मराठवाड्यातील माणिकराव हीदेखील राजकारणातली प्रभावी असामी. वागणं अघळपघळ आणि बोलणंही एकदम थेट. कुणी इंग्रजीत बोलू लागलं की यांचा चेहरा बुचकळ्यात पडल्यासारखा होतो. एक दिवस मुख्यमंत्री व्हायचंच ही त्यांची जबर आकांक्षा. त्यांनीही आपला एक गट तयार केलेला. शिवाय, कोकणातले आमदार उस्मान दळवी यांचाही छोटा गट असतोच. तूर्तास त्यांनी आपल्या निष्ठा विश्वासरावांना वाहिलेल्या.

असं हे पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरू असताना राज्यापुढचे भीषण प्रश्न तसेच लोंबकळत पडतात. दुष्काळामुळे भूकबळी जात असताना काही नेते वाढदिवसानिमित्त जेवणावळी घालत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. औद्योगिक क्षेत्रातल्या अशांततेचा फायदा घेत कामगार नेता डी-कास्टा (सतीश दुभाषी) संप, बंद, मोर्चे आदी मार्गांनी सरकारला अडचणीत आणू पाहतो. डी-कास्टाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी सीएम आणि विश्वासराव हे दोघेही प्रयत्नशील असताना खुद्द डी-कास्टावरच प्राणघातक हल्ला होतो. मुख्यमंत्र्यांचे साडू असलेले ग्रामीण भागातले बलशाली आमदार रावसाहेब टोपरे यांचा मुलगा एका दलित मजुराच्या मुलीशी बळजबरीने संबंध ठेवतो. त्यातून ही मुलगी गरोदर राहून तिला मूल होतं. हे प्रकरण अंगाशी येऊ लागताच रावसाहेबांची माणसं तो दलित मजूर, त्याची मुलगी आणि तिचं तान्हं मूल या तिघांनाही संपवून टाकतात. या तिघांचे मृत्यू ‘भूकबळी’ असल्याच्या बातम्या तत्परतेने प्रसिद्ध होतात. प्रक्षुब्ध दलित कार्यकर्त्यांचा जमाव आमदारांच्या तोंडाला काळं फासतो. पोलिसांनी स्मगलरांच्या एका अड्ड्यावर घातलेल्या छाप्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचा मेहुणाच सापडतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर विश्वासराव मंत्रिपदाचा राजीनामा देतात. राज्य संकटात असताना आपण स्वस्थ बसू शकत नाही, असं पत्रकार परिषदेत सांगत ते अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवतात. आपण पक्षाचे एकनिष्ठ पाईक असल्याचं सांगायलाही ते विसरत नाहीत. शिंदे सरकार अस्थिर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. दोन्ही बाजूंनी भेटीगाठी, खलबतं, सह्यांची मोहीम यांना जोर येतो. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विश्वासराव आणि माणिकराव यांच्याबरोबरीने महसूलमंत्री दत्ताजीराव हेही उतरतात. मुख्यमंत्रिपद कोणाला मिळावं यावरून तिघांमध्ये रस्सीखेच सुरू होते; आणि तेवढ्यात हृदयविकाराचा झटका आल्याने सीएमना इस्पितळात दाखल करण्यात येतं. त्यांना भेटण्यासाठी इस्पितळात रीघ लागते. मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी राजीनामा देणार... मंत्रिमंडळात फूट पडणार... आता नेतृत्वबदल अटळ, अशी एकूण वातावरणनिर्मिती होते. पुन्हा सह्यांची मोहीम. मुख्यमंत्री यथावकाश बरे होतात, घरी परत जातात. आपल्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पक्षश्रेष्ठींच्या अनुमतीने मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आणि फेरबदलाची मोठी घोषणा करतात. कडवे विरोधक असलेल्या विश्वासरावांचं अर्थ खातं काढून घेऊन ते त्यांना समाजकल्याण आणि क्रीडा ही तुलनेने सामान्य खाती देऊ करतात. अवमानित झालेले विश्वासराव ही ‘ऑफर’ नम्रपणे नाकारत आपली लढाई अजून संपली नसल्याचं सूचित करतात. माणिकरावांना अर्थ खातं देऊन गप्प केलं जातं. अन्य काही मंत्र्यांना पदोन्नती, तर काही नव्या चेहऱ्‍यांना संधी दिली जाते. अशा रीतीने राज्यातल्या राजकीय पेचप्रसंगावर ‘तोडगा’ निघतो.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा एकेक निर्णय ऐकत असताना दिगू टिपणीस मात्र हतबुद्ध होत जातो. या सगळ्याचा उबग आल्याने तो पत्रकार परिषदेतून बाहेर पडतो. मंत्रालयाबाहेर एक वेडा भिकारी हसत हसत दिगूसमोर भिकेसाठी हात पसरतो. त्याला पाहून दिगूही भ्रमिष्टासारखा हसू लागतो आणि त्या भरात तोच त्या वेड्यासमोर हात पसरतो. दिगूचं ते विकट हास्य सुरू असतानाच चित्रपट संपतो.

मूळ कादंबरीतला शेवट असा नाही. चित्रपटात तो अंगावर येत असला तरी, असा शेवट गरजेचा होता का, असा प्रश्न काहींच्या मनात येत असतो. (हा शेवट दिग्दर्शक जब्बार पटेलांना हवा होता, असं दिगू टिपणीस साकारणाऱ्‍या निळू फुले यांनी एका वार्तालापात सांगितल्याचं स्मरतं. जब्बार पटेलांनी ‘जैत रे जैत’चा शेवटसुद्धा बदलला होता; पण तो विषय वेगळा.) अर्थात, हा शेवट करण्यामागे दिग्दर्शकाची काही भूमिका असू शकते. पत्रकाराने तटस्थ राहून काम केलं पाहिजे हे खरं असलं तरी, अनाचाराची परिसीमा झाल्यास पत्रकार तटस्थ राहू शकत नाही, त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी होऊ शकते, असा अर्थ दिग्दर्शकाला कदाचित अभिप्रेत असावा. दिगूच्या सामाजिक जाणिवा अधोरेखित करण्यासाठी तो एका वेश्येच्या प्रेमात पडतो आणि ती मरणपंथाला असताना तिच्या शुश्रूषेची काळजी घेतो, हाही भाग चित्रपटात येतो. ‘उषःकाल होता होता’ हे पृष्ठभूमीवर चित्रित गाणं अंतर्मुख करणारं होतं.

वर म्हटल्याप्रमाणे ‘सिंहासन’ हा सुन्न करणारा अनुभव असला, तरी काही प्रसंग झकास जमून आले होते. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते या तिघांची एकत्रित कामगिरी काय कमाल करू शकते, याचा हा आदर्श वस्तुपाठ ठरावा. सीमाप्रश्नावर आमरण उपोषण करणाऱ्‍या देशभक्त तात्यांच्या समोर भररस्त्यात लोटांगण घालून त्यांना उपोषण गुंडाळायला लावणारे मुख्यमंत्री आणि त्यावर ‘मनात आणलं तर हे परमेश्वरालादेखील खिशात घालतील’ ही दिगू टिपणीसची टिप्पणी, सरकारच्या गरिबी हटाव घोषणेची खिल्ली उडवताना आमदार बापट (चंद्रकांत काळे) यांनी प्रवचनकाराच्या थाटात सभागृहात केलेलं भाषण, यासारखे प्रसंग धमाल करतात. सलूनमध्ये दाढी करताना ‘ मुख्यमंत्री राहणार की जाणार? ’ या न्हाव्याच्या शंकेवर ‘शिंदे राहिले काय अन् विश्वासराव आले काय, तुमच्या आयुष्यात याने काय फरक पडणाराय?’ हा दिगूचा प्रश्न म्हणजे तर ‘सिक्सर’च!

विषण्ण करतानाच मनाची समृद्धी वाढवणं, हे श्रेष्ठ कलाकृतीचं वैशिष्ट्य असतं. ‘सिंहासन’ अशा काही चित्रपटांमधला आहे.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार आणि हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT