Oxygen Concentrator Sakal
सप्तरंग

महती निरोगी श्‍वासाची...

प्राणवायूअभावी तडफडून अखेर मृत्यूला शरण जाणारे रुग्ण आपल्या डोळ्यासमोर आहेत. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने हतबल होणारे रुग्णांचे नातेवाईक आपण पाहिले आहेत.

सुनीता नारायण saptrang@esakal.com

सध्या आपल्याला गरज आहे, ती शाश्वत आरोग्यपूर्ण जीवनमान, ऊर्जा सुरक्षा हवामान बदलाशी दोन हात करू शकेल अशा यंत्रणेची.

कोरोनासारख्या जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाचा (५ जून) विचार करणं खरं म्हणजे अवघडच. माणसावर कोसळलेल्या सध्याच्या या गंभीर आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या संकटात पर्यावरणाचा विचार कोण करणार ? मान्य आहे, असं नक्कीच वाटू शकतं. पण यावर थोडा विचार केला तर अनेक गोष्टी सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ दिसू लागतील. गेले महिनाभर आपण ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीसाठी धडपडतोय, प्रचंड मेहनत घेतोय, ती म्हणजे प्राणवायू मिळवण्यासाठी. आपल्या आप्तस्वकीयांसाठी ऑक्सिजन मिळवण्यासाठीची आपल्यापैकी अनेकांची धडपड आपण पाहिली आहे.

प्राणवायूअभावी तडफडून अखेर मृत्यूला शरण जाणारे रुग्ण आपल्या डोळ्यासमोर आहेत. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने हतबल होणारे रुग्णांचे नातेवाईक आपण पाहिले आहेत. ऑक्सिजनची वाहतूक देशभरात सुरळीत चालावी म्हणून न्यायालयांनाही मध्यस्थी करावी लागली.

ऑक्सिजन काँन्सनट्रेटरचा व्यापार होतानाही पाहिला. हे अनुभव आठवताना मनात वेदना उमटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक श्वास किती महत्त्वाचा आहे याची या परिस्थितीने आपल्याला नव्याने जाणीव करून दिली. हेच या जागतिक पर्यावरण दिनाच्या (जगभरपात कालच हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला.) निमित्ताने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच आपण घेतो तो प्रत्येक श्वास हा निरोगी आणि प्रदूषणमुक्त असायला हवा. यावर आपण अगदी सहज बोलतो, चर्चा करतो पण नंतर त्यावर गांभीर्याने कोणतीही कृती करणं विसरून जातो.

दरवर्षी ५ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाची यावर्षीची संकल्पना आहे परिसंस्थेचे पुनरुज्जीवन. वृक्षांची संख्या वाढवून ती ''घनदाट'' करणे आणि परिसंस्था निरोगी व मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे हे दोन मुख्य उद्देश आहेत. मात्र हे साध्य करण्यासाठी आपण आधी हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपलं निसर्ग आणि समाजाशी असलेलं नातं सुदृढ करणं आवश्यक आहे.

झाडं ही जमिनीला धरून ठेवतात, तिचं रक्षण करतात. त्यामुळे तेच खरे ''पालक'' असतात. भारतात वनविभागाकडे या वनप्रदेशाची मालकी आहे. पण भारतासारख्या देशांत पडीक आणि निर्मनुष्य जमिनी किंवा प्रदेश फारसे नाहीतच. आपल्या देशात असे वनप्रदेश आढळतात जिथे माणूस आणि प्राणी यांचे सहस्तित्व असते. हेच प्रदेश अतिशय गरीब आणि मागास म्हणून ओळखले जातात. परंतु प्रशासकीय आणि कायदेशीर अधिकार, तसंच काहीवेळा शारीरिक बळाचा उपयोग करूनदेखील वनविभागाने या प्रदेशांवरचे झाडांचे आच्छादन शाबूत ठेवण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. रोज या भागांतील नागरिक आणि त्यांचे प्राणी यांना या वनसंपत्तीपासून लांब ठेवण्यात त्यांची शक्ती खर्ची पडते. विकासप्रकल्पांसाठी होणारी वृक्षतोड, खाणकाम, धरणांचे बांधकाम असे इतरही अनेक प्रश्न आहेतच.

इथे महत्त्वाचा मुद्दा असा की नुसती झाडे लावून आणि वाढवून उपयोग नाही, तर त्यांच्या योग्य व्यवस्थापनाची जबाबदारीही लोकांनी स्वतःकडे घेतली पाहिजे. प्रत्येक झाडाला एक मूल्य आहे- त्यांच्यामुळे मिळणाऱ्या पर्यावरणीय सुविधा, लाकूडफाटा इत्यादींचे मूल्य त्यांच्या व्यवस्थापकाला मिळणे गरजेचे असते. यातून कदाचित वृक्षकेंद्रित आणि नूतनीकरणक्षम नव्या भविष्याची पायाभरणी होऊ शकेल. ज्यातून घरे बांधण्यासाठी आणि ऊर्जानिर्मितीसाठी लाकडाचा उपयोग होऊ शकेल. यामुळे गरिबांच्याही हातात थोडाफार पैसा खेळेल, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल आणि उर्जासुरक्षा व हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठीही याची मदत होईल.

आज निसर्गाधारीत जीवनशैलीबद्दल अनेकजण चर्चा करत असतात. म्हणजे काय हे मी याधीच्याच परिच्छेदात लिहिले आहे. परंतु, गरीब समाजाला केंद्रस्थानी ठेवून विचार केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. समाजातील दुर्बल आणि उपेक्षित समाजाचं सबलीकरण होणं गरजेचं आहे. जमीन आणि परिश्रम यांचं मूल्य यांना मिळायला हवं. हवेतला कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठीच स्वस्त उपाय म्हणून याकडे न पाहता यामुळे जे जीवनमान या लोकांना मिळू शकेल त्याकडे पाहायला हवे.

या सगळ्यात एक मोठे आव्हान म्हणजे आपण दररोज जो श्वास घेतो त्या श्वासावाटे ऑक्सिजनऐवजी जणू विषसमान प्रदूषकेच शरीरात ओढून घेत असतो. दरवर्षी याची चर्चा होते, मग हिवाळा येतो, हवा बदलते, ऋतू येत जात राहतात. यावर्षी हिवाळा संपत येताना, भारत सरकारने कोळसाधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसंदर्भातील नियम बदलले. आणि जणूकाही त्यांना प्रदूषण निर्माण करण्याची पूर्ण परवानगीच देऊन टाकली. म्हणजे थोडक्यात, ऊर्जा प्रकल्पांसाठी प्राणवायू आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या नशिबी प्रदूषित श्वास घेतल्यामुळे येणारं मरण अशी अवस्था झाली आहे.

आता उच्चभ्रू आणि श्रीमंत भारतीयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स आणि काँन्सनट्रेटर्स विकत घेऊन ठेवण्याची चढाओढ लागेल की काय अशी मला शंका येते. पण त्यामुळे त्याचा सुरक्षित साठा होईलच असं नाही. आपल्या घरात आणि ऑफिसेसमध्ये बसवलेल्या वातानुकूलन आणि शुद्धीकरण यंत्रणांमुळेही ते होणार नाही. अत्यावश्यक आणि अतिमहत्त्वाची जीवनसुरक्षा प्रणाली म्हणून प्राणवायूचे महत्त्व जगाने समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणूनच, या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, कोरोना संकटाचा विचार करून खेद किंवा शोक करत बसण्याऐवजी आपण प्राणवायूचे महत्त्व ओळखून आता पुढची पावलं टाकूया. चर्चा आणि बैठका घेऊन आयुष्य वाचवता येत नाही. नैसर्गिक, आरोग्यपूर्ण आणि सर्वसमावेशक उद्यासाठी निरोगी प्राणवायू ही आता आपल्या सर्वांची समान गरज आहे. हा आता आपला अस्तित्वासाठीचा संघर्षच आहे.

(सदराच्या लेखिका सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायर्नमेंटच्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत)

(अनुवाद : तेजसी आगाशे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT