Superstitions and their eradication in the digital age sakal
सप्तरंग

डिजिटल युगातील अंधश्रद्धा आणि त्यांचे निर्मूलन

सध्याच्या डिजिटल युगात रोज नवनव्या डिजिटल अंधश्रद्धा बघायला मिळत आहेत. लोकांना भुलवणाऱ्या जाहिरातींचा सुकाळ दिसून येतो.

डॉ. हमीद दाभोलकर

सध्याच्या डिजिटल युगात रोज नवनव्या डिजिटल अंधश्रद्धा बघायला मिळत आहेत. लोकांना भुलवणाऱ्या जाहिरातींचा सुकाळ दिसून येतो. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय आयुष मंत्रालयाला फसव्या जाहिरातींविषयी एक डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यानिमित्ताने डिजिटल युगातदेखील लोक या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींना का बळी पडतात, ते समजून घेऊ या.

जसा आपल्या समाजात शिक्षणाचा प्रसार होईल, तशा अंधश्रद्धा आपोआप कमी होतील. त्याच्यासाठी वेगळे काम करण्याची गरज नाही, असा अंधश्रद्धा निर्मूलन कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अनेक वेळा आक्षेप घेतला जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्प्युटर, इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्ट फोन या सगळ्यांच्या आगमनानंतर तर विज्ञानाचा प्रसार अधिक जोमाने होऊन माणूस विज्ञानवादी होईल, अशीदेखील एक भाबडी आशा काही लोक बाळगून होते; पण प्रत्यक्षात मात्र सध्याच्या डिजिटल युगात रोज नवनव्या डिजिटल अंधश्रद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत.

प्रिंट आणि डिजिटल माध्यमांनी खरे तर लोकांना या अंधश्रद्धांविषयी जागरूक करणे आवश्यक आहे; पण तिथेदेखील लोकांना भुलवणाऱ्या जाहिरातींचा सुकाळ दिसून येतो. पतंजली योग संदर्भातील केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय आयुष मंत्रालयाला अशा स्वरूपाच्या फसव्या जाहिरातींविषयी किती तक्रारी आल्या आणि त्याचे पुढे काय झाले, याविषयी एक डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणे करून अशा स्वरूपाच्या किती जाहिराती येतात आणि त्यांचे पुढे काय होते, याविषयी तरी माहिती मिळेल.

अगदी करणी, भानामतीवरचे उपाय मिळवून देण्याबाबतच्या जाहिरातीदेखील आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत सुशिक्षित लोक विज्ञानाची भाषा वापरून केलेल्या डिजिटल अंधश्रद्धांना बळी पडल्याचे आपल्याला दिसले. राईस पुलर यंत्राच्या माध्यमातून केलेला कथित चमत्कार, पैशांचा पाऊस पाडण्याचा दावा, सुपर कंडक्टर मेटलच्या नावाने केलेली फसवणूक याबरोबरच असाध्य आजार बरे करण्याचे दावे, दैवी शक्तीचा दावा करून आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचे दावे, अशा जाहिराती आपल्याला सातत्याने दिसत असतात. डिजिटल युगातदेखील लोक या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींना का बळी पडतात.

गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझ्या मुलाच्या शाळेत मिडब्रेन अॅक्टिव्हेशनची कार्यशाळा घेण्यासाठी काही प्रशिक्षक आले होते. याची मोठी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रातून करण्यात आली होती. यामध्ये त्या मिडब्रेन अॅक्टिव्हेशन केलेल्या व्यक्तीला डोळ्यावर पट्टी बांधूनदेखील वाचता येते, असा दावा केला होता. स्वाभाविक आहे की, जेव्हा मला आणि माझ्या पत्नीला हे कळले तेव्हा आम्ही त्याला विरोध केला.

मग त्या मिडब्रेन अॅक्टिव्हेशन प्रशिक्षकांच्या वतीने माझाच एक प्रथितयश असलेला डॉक्टर मित्र मला भेटायला आला होता. प्राथमिक पातळीवर या मिडब्रेन अॅक्टिव्हेशनचा उपयोग मुलांना होणार आहे, याविषयी त्याचे सकारात्मक मत झाले होते. बरे रूढ अर्थाने तो काही अंधश्रद्धाळू म्हणावा, असा अजिबात नाही.

मी जेव्हा त्याच्यामधील डॉक्टरला विचारले की, मिडब्रेन म्हणजे मध्यमेंदू आणि दिसणे याचा काही संबंध नाही, हे आपल्याला वैद्यक शास्त्रात शिकवलेले प्राथमिक ज्ञान आहे, मग मिडब्रेन अॅक्टिव्हेशनमुळे डोळ्यांवर पट्टी बांधून कसे काय दिसू शकेल, याचा तू विचार केला नाहीस का?

त्यावर तो अचंबित झाला आणि म्हणाला, खरे आहे रे, मी असा विचार केलाच नव्हता! हा माझा डॉक्टरमित्र प्रामाणिक होता. त्यामुळे त्याला इतके साधे प्रश्न आपण का विचारले नाही, याचे वैषम्य वाटले आणि त्याने थोडी चर्चा झाल्यावर आपले मत बदलले. या प्रसंगामधून मला मात्र एक गोष्ट स्पष्ट लक्षात आली की, विज्ञानाचे शिक्षण घेतलेली व्यक्तीदेखील दरवेळी वैज्ञानिक पद्धतीने विचार करेल, याची खात्री देता येत नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणायचे त्याप्रमाणे आपल्याकडे लोकांनी विज्ञानाची सृष्टी घेतली; पण दृष्टी घेतली नाही. त्याचाच एक भाग म्हणजे फसवे विज्ञान होय, असे वाटते. यामध्ये ज्या विज्ञानाचा आधार घेऊन आपण सत्य किंवा असत्य याचा शोध घ्यायचा, त्याचेच बाह्यरूप वापरून लोकांना फसवले जाते.

कुठलीही चिकित्सा करणे हे कष्टदायक काम आहे. त्यापेक्षा समोर आलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे मानवी मनाला कायमच सोपे वाटते आणि मानवी मनाच्या या अंगभूत जडणघडणीचा गैरफायदा जसे अंधश्रद्धा पसरवणारे घेतात, तसेच डिजिटल अंधश्रद्धा पसरवणारेदेखील घेतात.

मानवी मनाला असणारी अज्ञाताची भीती ही जसे अंधश्रद्धेच्या बाबतीत एक महत्त्वाचे कारण होते, तसेच ते अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींच्या बाबतीत होते. उडत्या तबकड्या आणि परग्रहावरून येणारे एलियन ही अशीच एक विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली डिजिटल अंधश्रद्धा आहे. यामध्ये उडत्या तबकड्या परग्रह अशा अनेक वैज्ञानिक संज्ञा जरी वापरल्या असल्या, तरी मानसिक पातळीवर अंधश्रद्धांमध्ये असलेले भूत, प्रेत, आत्मा यांच्यापेक्षा ते फारसे वेगळे नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे.

आपल्या स्वत:च्या क्षमतेने ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात, त्यापेक्षा अधिक मिळण्याची आसक्ती हीदेखील मानवी मनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. सध्याच्या काळात लहान मुलांच्या क्षमता वाढवण्याचा दावा करणाऱ्या अनेक पद्धतींना बरेचसे पालक या मानसिकतेमधून बळी पडतात.

हातावरील रेषांचा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची क्षमता वाढवण्याचा दावा करणारी डेक्टिलोग्राफी किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून वाचायला येण्याची क्षमता देण्याचा दावा करणारे मिडब्रेन अॅक्टिव्हेशन यासारख्या डिजिटल युगातील अंधश्रद्धांच्या जाहिरातींना पालक बळी पडतात. आपली मुले ही कमीत कमी कष्टात कायम दुसऱ्याच्या पुढे राहावीत, अशी पालकांची मानसिकता यामागे असते.

आपल्या मानसिकदृष्ट्या वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण साधारण तीन ते सहा वर्षांच्या दरम्यान असताना एक टप्पा येतो, त्याला ‘मॅजिकल थिंकिंग’ म्हणजे जादुई विचारांचा टप्पा असे म्हणतात. या टप्प्यामध्ये परिकथा, प्राण्यांच्या मानवी भावभावना असलेल्या कथा या त्या मुलांना खरे वाटत असतात. अंधश्रद्धा दाव्यांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मानसिकतेमध्ये हे जादुई विचारांवर अधिक विश्वास ठेवण्याची विचार पद्धती जास्त प्रमाणात दिसून येते.

आरोग्य आणि मृत्यूविषयक माणसाच्या मनात खोलवर असलेली भीती हेदेखील लोक अंधश्रद्धाविषयक दाव्याला बळी पडण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. चुंबक चिकित्सा, सेराजेम, प्राणिक हिलिंग अशा स्वरूपाच्या आरोग्यविषयक उपचारांचा दावा करणाऱ्या गोष्टी या डिजिटल अंधश्रद्धामध्ये येतात.

मतिमंदत्व स्किझोफ्रेनियासारखे दीर्घ मुदतीचे तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार, कर्करोग, वयोमानानुसार होणारी पाठीच्या मणक्यांची झीज किंवा गुडघ्याचे दुखणे अशा अनेक प्रकारच्या आजारांचे उपचार हे दीर्घकाळ चालणारे आणि ज्याच्यामध्ये आजार पूर्ण बरे होण्याची खात्री देता येत नाही, असे असतात. स्वाभाविकच आपल्याला लवकर बरे न होणारा आजार झाला आहे, हे स्वीकारणे मनाला अवघड असते.

त्यामुळे विज्ञानाचे नाव घेऊन फसवणाऱ्या आणि चुटकीसरशी आपले दुःख दूर करण्याचा दावा करणारे फसव्या वैज्ञानिक उपचारांची मानवी मनाला भुरळ पडते. वरून दिसताना या उपचारांमध्ये वैज्ञानिक पद्धती किंवा वैज्ञानकीय शास्त्रांशी संबंधित संज्ञा वापरलेल्या असतात. त्यामुळे लोक या उपचारांवर पटकन विश्वास ठेवतात.

डिजिटल माध्यमांमधून याचा प्रचार-प्रसार करणे सोपे जाते. लोकांच्या मृत्यूविषयक भीतीचा फायदा अशा स्वरूपाचे उपचार करणारे करून घेतात; तर त्याला बळी पडणारे लोक काही तोटा तर होत नाही, झाला तर फायदा झाला, या मानसिकतेमधून अशा जाहिरातींना बळी पडतात.

डिजिटल युगातील या अंधश्रद्धा आणि त्याच्या जाहिराती यांना समाजाने बळी पडणे थांबवायचे असेल, तर या फसव्या दाव्यांच्या अंधश्रद्धांच्या जाहिरातींविषयी कारवाई करणारी केंद्र पातळीवरील यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयुष मंत्रालयाला दिलेले निर्देश हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. एका बाजूला अशा जाहिरातींविषयी समाजात जागृती करत राहणे आणि दुसऱ्या बाजूला त्याविषयी कठोर कायदेशीर कारवाई करणे, या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला सातत्याने प्रयत्न करत राहावे लागेल.

(लेखक मनोविकारतज्ज्ञ आणि सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते असून, ‘परिवर्तन’ संस्थेमध्ये संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT