शेतीचा आधार! 
सप्तरंग

शेतीचा आधार!

जयंत महाजन

झाले असतील 50-60 वर्ष या गोष्टीला ! जुनी असली तरी गोष्टच आहे. गोष्ट म्हणजे जी पूर्ण खरीही नसते आणि पूर्ण खोटीही नसतेच. तर त्याकाळी शेती म्हणजे एकदमच जोरात असे. पाऊस म्हणजे पाऊस असे. एकदम खराखुरा धो-धो पडणारा. नदीनाल्यांना नेहमीच पूर आणणारा. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर न चुकता येणारा आणि दसऱ्याचे सीमोल्लंघन झाल्यावर जाणारा. थोडक्‍यात काय तर भरवशाचा पाऊस असे. शेतीत पिकाचे वाण देशीच असे त्यामुळे त्यावर रोगराई नसे. खेड्यापाड्यात खत म्हणजे शेणखत व लेंडीखत एवढेच असे. शेजारी पाजारी गुण्या गोविंद्याने राहत . अशाच एका एका खेडेगावात रामराव नावाचे धोरणी शेतकरी राहत होते   होते. माणसे कमी आणि शेतजमीन जास्त असा तो काळ !

रामारावांची वडिलोपार्जित ५० एकर शेती होती. गावात जुना २०-२५ खणी सागवानी वाडा होता .  गावात प्रतिष्ठा होती . शेतीत  मोठाले बांध होते. त्यावर डौलात पिढ्यान्‌पिढ्या उभी असलेली आंब्याची, सागाची झाडे होती. रामरावांना शेतीची खूप आवड होती. पंचक्रोशीतील माणसे त्यांच्याकडे सल्लामसलतीस येत असत. रामरावांना दोन मुले होती. त्यांनी शिक्षणासाठी मुले शहरात ठेवली. प्रत्येक सणासुदीला गावाकडे घरी धाव घेणारे सदू-मदू शहरात शिकून सदाशिव-महादेव झाले. कॉलेजात गेल्यावर 4-6 महिन्यांनी त्यांची गावाकडे चक्कर होऊ लागली. तीही आर्थिक रसदीसाठी. दोघेही चांगले शिकले पण शेतीकडे जाणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले.

शिकून सवरून  मोठ्या शहरातल्या एका अजस्र कारखान्यात दोघेही नोकरीला लागले. नोकरीत रमले . शरी मित्रांच्या पार्ट्यात गुंतले .   घरदार विसरले. शेती विसरले. त्यांच्या शेतात काय पिके आहेत ते त्यांना सांगता येईना ! कारण शेतात कोणते पीक आहे हे पहायला तरी शेतात जावे लागते ! गावाचे तोंड पहावे लागते. दोघेही भाऊ शहरात रमले होते.भावांचे केव्हाच दोनाचे चार झाले होते.  वय झाल्याने रामराव आता थकले होते. पोरांची इच्छा होती आई-वडिलांनी शेती विकून शहरात यावे. आराम करावा. शहरात मोठा बंगला बांधावा. जागा घ्यावी, पण रामरावांना शहरात करमायचे नाही आणि त्यांच्या पत्नीलाही सुनांच्या लहान घरातील साम्राज्य नको वाटे ,त्यांना   गावातल्या आपल्या वाड्यातील सत्ता चांगली वाटायची. दोघेही शहरात आले तरी त्यांचे मन शेतात बहरलेल्या पिकात आणि गायीगुरांच्या आठवणीत रमायचे. गावाकडच्या मोकळ्या हवेची आणि निवांत जीवनाची ओढ त्यांना असे. शहरातल्या औपचारिक आणि बंदिस्त वातावरणात त्यांना नकोसे व्हायचे. त्यांनी गाव सोडले नाही. इकडे शहरात भावाभावात हळूहळू स्पर्धाही सुरू झाली होती. पगाराचे पुरत नाही तर कर्जाचे हप्ते काढून मौजमजा चालू होती.

वय झाल्याने  रामरावांनी आता अंथरूण धरले होते. मुले-सुना-नातवंडे भेटायला यायची. कारभारी दत्तूबाला बाजूला घेऊन आता जमिनीचे भाव काय आहेत असे विचारून झाले की जमीन विक्रीच्या पैशातून रो-हाउस येईल का फ्लॅट यावर चर्चा करीत शहरात परतायची.

अखेरच्या वर्षभरात रामरावांची कारभारी दत्तोबाशी सल्लामसलत वाढली होती. एका एकादशीला पांडुरंगाचे नामस्मरण करीत आप्तेष्टांच्या गराड्यातून रामराव इहलोक सोडून गेले. सदाशिव आणि महादेवाचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या वडीलधाऱ्यांनी, एकजुटीने रहा, घरच्या शेतीकडे लक्ष द्या. वगैरे सल्ला-उपदेश केला. दुखवटा सरला. गावाला गोडजेवण झाले. आईने गावातला वाडा सोडणार नाही असे मुलांना ठामपणे सांगितले. आईला एकटी सोडून भाऊ शहरात परतले.

मात्र काही दिवसातच दोघाभावात वाटणीवरून जुंपली. दोघांनाही गावाकडची जागा आणि वाडा विकून बंगले-गाड्या-दागिने घ्यायचे होते. मात्र वाट्यावरून कोणीच पडते घ्यायला तयार होईना. मध्यस्थी करून पाहुणे-रावळे थकले. दोघेही शिकलेले मग काय? भांडण गेले कोर्टात. सुरू झाली तारीख पे तारीख आणि वकिलांच्या फीसचे हप्ते. या भांडणात ५-७ वर्षे गेली.

अचानक एकेदिवशी त्यांचा मोठा कारखाना बंद पडला. दोघांच्याही नोकऱ्या गेल्या. कारखाना मालक भारी. प्रॉव्हीडंड फंडही लटकावलेला.कर्जाने घेतलेल्या घराचे हप्ते थकले. किराणाचे बिल थकले. शहरातील मित्रानी पाठ फिरवली . एकाची मुलगी लग्न करण्याच्या वयात आलेली .  तर दुसऱ्याचा मुलगा डोनेशन भरून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत  होता. दुसऱ्या नोकरीसाठी दोघेही आपापल्या परीने दारोदार हिंडले. पण त्यांच्याकडील बी.ए.च्या डिग्रीला आता काही तेवढी किंमत नव्हती. अखेर सदू-मदू ताळ्यावर आले. एकत्र बसले. त्यांना घर आठवले शेती आठवली . बालपणचे सुखाचे दिवस  आठवले .  त्यांनी ठरवले, चला आता भांडण नको. वकिलाचे पैसे भरणे नको. इथे नोकरी नाही मिळत तर गावाकडे जाऊन शेती करू.

दुसऱ्या दिवशी एस.टी.ने दोघे गावाकडे परतले. जुन्या मित्रांशी गप्पा झाल्या. कोणी ट्रॅक्‍टर देतो, तर कोणी पाइपलाइनचे पाइप देतो असे म्हणाले. जुने मित्र कामाला आले. पण वडिलांच्या माघारी पाच सात वर्षे पडीक पडलेल्या पन्नास एकर जमिनीची साफसफाई करणे जिकिरीचे होते.  शेतात जागोजागी बोरी -बाभळी उगवल्या होत्या. तण माजले होते. शेतीची गाडी रुळावर आणण्यासाठी 4-5 लाख लागणार होते. जुने कारभारी दत्तोबा भेटीला आले. ते आता स्वतःची 4-5 एकर जमीन कसून भागवत होते. दोघा भावांनी त्यांना साकडे घातले, आम्हाला मदत करा शेती कशी करायची ते शिकवा .  त्यावर दत्तोबा म्हणाले, उद्या नांगर घेऊन या शेतात. नक्की मार्ग निघेल!
दोघेही मित्राच्या फौजफाट्यासह शेतात पोचले. ट्रॅक्‍टरचा फाळ जमिनीत घुसला आणि नांगरट करीत पुढे निघाला. मागे पांढरे बेटाडे, ढेकळे निघू लागले. सदाशिव आणि महादेव कारभारी दत्तोबाला म्हणाले, ""नांगरटीत जमिनीतून ही पांढरी ढेकळे कशी बाहेर येताहेत? दत्तोबा हसून म्हणाले, ""हे ढेकळे नाहीत. हे बेटाडे आहेत आल्याची-अदरकाची !  तुमच्या वडिलांना तुमची फार काळजी होती. तुमचे स्वभाव ते ओळखून होते. तुम्ही आपसात भांडणार, जमीन पडीक पाडणार आणि शेवटी विकणार अशी त्यांना भीती होती. त्यांनी शेवटच्या एक-दोन वर्षात माझ्याकडून खूप कामे करून घेतली.  हे दहा  एकर अद्रक-आले लावून घेतले होते. आल्याचे पीक वेडे असते . दरवर्षी पावसाळ्यात हे अद्रक उगवायचं, वाढायचे आणि जमिनीखाली एका कंदाला पाच कंद फुटायचे .   उन्हाळ्यात जमिनीवर पाने वाळून जायची पण जमिनीखाली कंद तसेच राहायचे. 5- 6 वर्ष हा गुणाकार चालूच  राहिला . आता  या पिकाने संपूर्ण जमीन  व्यापली आहे. किमान हजार-बाराशे क्विंटल आले निघेल. ते विका आणि तुमच्या सगळ्या गरजा भागवून जोमाने शेती करा.आंब्याची, जांभळाची आणि चिंचेची खूप झाडे तुमच्या वडिलांनी लावून घेतली होती . त्यांचे उत्पन्न १-२ वर्षात सुरु होईल .  या ठिकाणी हे बाजूला जे जंगल दिसतेय ते  सागवानाचे आहे. 10 एकरावर सागवानाची डेरेदार झाडे बहरली आहेत. ही सर्व झाडे चांगल्या पावसावर वाढली आहेत. पण तुमच्या वडिलांची एकच इच्छा होती की, जमीन विकू नका! आणि सागवानाची झाडे पुढच्या पिढीसाठी ठेवा.दोघे भाऊ आनंदले. उत्साहाने कामाला लागले. त्यांचे दिवस पालटले. दोघेही भाऊ शेतीत रमले. आता त्यांची पुढची पिढी शेती करते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT