घरातल्या घरात मसाले तयार करण्यापासून त्याचा ब्रँड विकसित होण्यापर्यंतची संपूर्ण कथा ‘परंपरा’ या पुस्तकातून गुरुनाथ चिल्लाळ यांनी मांडली आहे.
एखादी कारखाना किंवा कंपनी सुरू करणे, त्याद्वारे ब्रँड विकसित करणे आणि अनेक वर्षे तो टिकविणे ही सोपी गोष्ट नाही. त्यातही त्या व्यावसायाची सुरुवात आई-वडिलांनी घरगुती स्वरुपातील व्यवसायापासून करून अगदी दुकान थाटेपर्यंत केली असेल तर पुढच्या पिढीवरील जबाबदारी अधिकच वाढते.
घरातल्या घरात मसाले तयार करण्यापासून त्याचा ब्रँड विकसित होण्यापर्यंतची संपूर्ण कथा ‘परंपरा’ या पुस्तकातून गुरुनाथ चिल्लाळ यांनी मांडली आहे. चिल्लाळ यांचे कुटुंब मूळचे विणकर आणि आंध्र प्रदेशातील. साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंबीय पुण्यात आले. तेव्हापासूनचा प्रवास त्यांनी पुस्तकात मांडला आहे. चिल्लाळ यांच्या आईने एके दिवशी घरीच मसाला तयार केला व त्याची भाजी केली. त्याची चव वडिलांना आवडली. तेव्हा या मसाल्याच्या छोट्या-छोट्या पुड्या बांधून दुकानात येणाऱ्यांना देण्यास सुरुवात केली. त्याची चव आवडू लागल्यानंतर त्या मसाल्याची विक्री चिल्लाळ यांच्या वडिलांनी सुरू केली. ही त्यांच्या व्यवसायाची सुरुवात होती. चिल्लाळ लोणची-मसाल्याचे व्यापारी असा त्यांच्या वडिलांचा लौकिक झाला. त्यातून कारखाना व दोन दुकानांची निर्मिती अशी प्रगती त्यांच्या वडिलांनी केली. प्रगतीच्या शिखरावर असताना कौटुंबिक कारणांमुळे त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली आणि अखेरीस तो बंद पडण्यापर्यंत वेळ आली. हा सगळा प्रवास गुरुनाथ चिल्लाळ यांनी पुस्तकातून कोणताही आडपडदा न ठेवता मांडला आहे.
घर आणि व्यवसायाच्या वाटणीत गुरुनाथ यांच्याकडे कारखाना आला. परंतु, आर्थिक कारणांमुळे तो कारखाना चालविता आला नाही. विकायला लागला. कुटुंबाची पुन्हा परवड झाली. तेव्हा बिर्याणी विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. छोट्या हांडीसह बिर्याणी पार्सल विकणे सुरू केले. परंपरा या नावाने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. एक दिवस रेडी मिक्स मसाल्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. ती गुरुनाथ यांनी पत्नी मीनाला बोलून दाखविली. त्यांच्या पत्नीने रेडी मिक्सचा ध्यास घेऊन ती संकल्पना प्रत्यक्षात आणली. म्हणजे गुरुनाथ यांच्या आईने आईने मसाले तयार करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली तर त्यानंतर ३०-४० वर्षांनी त्यांच्या पत्नीने रेडी मिक्स मसाले तयार केले. एकटे राहणारे, परदेशी जाणारे विद्यार्थी यांना हे रेडी मिक्स मसाले उपयुक्त ठरू लागले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय पुन्हा बहरला. मागणीनुसार नवनवे मसाले तयार झाले व लोकप्रिय झाले. त्यांचा परंपरा हा ब्रँड नावारूपाला आला. हा सगळा प्रवास गुरुनाथ यांनी मांडला आहे.
वडिलांचा व्यवसाय, त्याची वृद्धी, शिखरावर असताना वाताहात, पुन्हा शून्यातून सुरुवात, नव्या ब्रँडची स्थापना, देश-विदेशापर्यंत व्यवसायाचा विस्तार, शिखरावर असतानाच व्यवसाय विकून टाकणे आणि पुन्हा नव्या नावाने व्यवसाय असे सगळे टप्पे चिल्लाळ यांना पाहिले आणि पचविले. या सर्व टप्प्यांचे वर्णन त्यांनी पुस्तकातून केले आहे. पुण्यातल्या जोशी अभ्यंकर हत्याकांडासारख्या घटना, तसेच लहानपणीच्या विविध आठवणी यासारख्या गोष्टीही त्यांनी लिहिल्या आहेत. अगदी साध्या, सरळ भाषेत त्यांनी हे सर्व अनुभव लिहिल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. एखाद्या आत्मकथेसारखी याची मांडणी झाली आहे. मात्र आत्मकथेमध्ये असणारी लहानपणापासून उत्कर्षापर्यंतची पारंपरिक मांडणी त्यांनी यात टाळली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.