Helicopter Crash Sakal
सप्तरंग

हेलिकॉप्टर अपघातावर शंका कशासाठी?

देशाचे पहिले सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणाऱ्या एमआय -१७ व्ही ५ या अत्याधुनिक हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या निमित्ताने सध्या देशभर चर्चा सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

- सूर्यकांत चाफेकर saptrang@esakal.com

देशाचे पहिले सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणाऱ्या एमआय -१७ व्ही ५ या अत्याधुनिक हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या निमित्ताने सध्या देशभर चर्चा सुरू आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत असं कसं घडलं, याबद्दल सोशल मीडियासह राजकारणी व सर्वसामान्यांमध्ये चर्चा व अफवा सुरू आहेत. याबद्दल नेमकी काय स्थिती आहे किंवा अशा प्रसंगी किती काळजी घेतली जाते, यासंदर्भात एअर व्हाइस मार्शल (सेवानिवृत्त) सूर्यकांत चाफेकर यांनी टाकलेला प्रकाश...

विमान किंवा हेलिकॉप्टरचं उड्डाण खूपच धोकादायक असतं. त्यामुळंच यात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. जर महत्त्वाची व्यक्ती किंवा कुणी व्हीव्हीआयपी हवाई प्रवास करीत असतील तर, आणखीनच काळजी घेतली जाते. पण शेवटी हे मशीन आहे. त्यात कधी तांत्रिक बिघाड होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. विमान किंवा हेलिकॉप्टर हे हवेत चालतात, जमिनीवर नाही. त्यामुळे उड्डाणापूर्वी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. उड्डाणादरम्यान काही अघटित घडण्याची शंका आल्यास आपातकालीन स्थितीत विमान किंवा हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग कसे करायचे, हे सर्व वैमानिकाला प्राथमिक प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे शिकवले जाते. याचा बाराही महिने कसून सराव केला जातो. ही एक नियमित प्रक्रिया आहे.

सर्वसाधारण विमाने धावपट्टीवरून टेकऑफ व लँडिंग करतात. मात्र सैन्य विमानांच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. ही विमाने कधी डोंगराळ भागांतून उड्डाण करतात, तर कधी पहाडी भागातून हवेत झेपावतात. त्यामुळे पावलोपावली धोके असतात. ही स्थिती लक्षात घेऊनच आवश्यक काळजी घेतली जाते. अति महत्त्वाच्या व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या हवाई प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, अशा व्यक्तींसाठी वायुसेनेत एक विशेष युनिट आहे. त्यांच्याकडे व्हीव्हीआयपींच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी असते. आजच्या घडीला वायुसेनेच्या ताफ्यात अनेक दर्जेदार विमाने व हेलिकॉप्टर्स असतात. मात्र प्रवासासाठी सहसा यातील सर्वांत चांगले विमान किंवा हेलिकॉप्टरच वापरले जाते. शिवाय वैमानिकाची निवडही त्याची भूतकाळातील कामगिरी पाहूनच केली जाते. अनुभवी व सर्वोत्तम वैमानिकांनाच प्राधान्य देण्यात येते. केवळ उड्डाणापूर्वीच नव्हे, उड्डाणानंतरही विमानाचे तज्ज्ञांकडून सूक्ष्म निरीक्षण करण्यात येते. एवढी सर्व काळजी घेऊनही बऱ्याचवेळा दुर्घटना होत असतात.

साधारणतः व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी स्टॅण्डर्ड मेंटेनन्स प्रोसिजर’ असते. याअंतर्गत विमान किंवा हेलिकॉप्टरचे इंजिन, टायर, इंधन, गिअर बॉक्स, नट-बोल्ट, कॉकपिट व रोटरसह प्रत्येक बारीकसारीक पार्टसची कसून तपासणी होते. प्रत्येक उड्डाणाच्या वेळी ही कार्यप्रणाली अंमलात आणली जाते. याशिवाय व्हीव्हीआयपींसाठी अतिरिक्त गोष्टींचीही विशेष काळजी घेतली जाते. सहसा हवाई प्रवासासाठी कधीच नादुरुस्त विमान व हेलिकॉप्टर वापरण्यात येत नाही. उल्लेखनीय म्हणजे सर्व क्रू मेंबर व स्टाफ उच्च श्रेणीचा असतो. खराब वातावरण किंवा आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यास ते पूर्णपणे सक्षम असतात.

कुन्नूर (तमिळनाडू) मधील घटनेबद्दल बोलायचे झाल्यास, यात कमांडिंग ऑफिसर अनुभवी व सर्वोत्कृष्ट होता. त्याला पहाडी भागांत व वेगवेगळ्या वातावरणात उड्डाण करण्याचा भरपूर सराव होता. आपातकालीन स्थिती कशी हाताळायची, याचे संपूर्ण ट्रेनिंग त्याला देण्यात आले होते. हेलिकॉप्टर ज्या दिशेने जात होते, तो भाग मुळातच डोंगराळ आहे.

तिथे क्षणोक्षणी वातावरण बदलते. कधी पाऊस किंवा ढगाळ वातावरण असते, तर कधी दाट धुके. त्यामुळे बऱ्याचवेळा व्हिजिबिलिटी खूप कमी असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच वैमानिकाने उड्डाण केले होते. महत्त्वाचे म्हणजे, हवाई प्रवासादरम्यान लँडिंग होत असलेल्या ठिकाणी हेलिपॅड बनविले जाते. तिथे वायुसेनेचा स्वतंत्र ड्युटी ऑफिसर नियुक्त करण्यात येतो. तो व्यक्ती हवामान व अन्य गोष्टींचे संदेश नियमितपणे वैमानिकाला देत असतो. खराब हवामान किंवा घातपाताची शक्यता असेल तर, तो तशी सूचना देऊन वैमानिकाला हेलिकॉप्टर परत नेण्यास किंवा प्रतीक्षा करण्यास सांगतो. त्यामुळे या उड्डाणादरम्यान नेमके काय घडले असेल, हे सांगणे अवघड आहे. भविष्यात चौकशीअंती सत्य पुढे येईलच.

भारतीय वायुसेनेत व्हीव्हीआयपींच्या उड्डाणासंदर्भात एक ''स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर'' फॉलो केली जाते. विमान किंवा हेलिकॉप्टर विशिष्ट जागीच उभे केले जाते. त्या ठिकाणी मेंटेनन्स कर्मचारी व वैमानिकाशिवाय अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नाही. सुलूर येथे हवाईतळ आहे. त्यामुळे निश्चितच सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे या घटनेविषयी विनाकारण चर्चा किंवा अफवा उडविणे चुकीचे आहे. वैमानिकाने अपघात टाळण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असणार. शेवटी हेलिकॉप्टर ही एक मशिन आहे. त्यात अचानक तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपातकालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी येऊ शकते. मात्र त्यासाठी वैमानिक सदैव सज्ज असतो. वायुसेनेच्या भाषेत याला ''रिॲक्ट इमर्जन्सी'' म्हटले जाते. ट्रेनिंगच्या वेळी यासंदर्भात भरपूर प्रॅक्टिस केली जाते. त्यामुळे या सर्व गोष्टी वैमानिकाच्या अगदी तोंडपाठ असतात.

विमान किंवा हेलिकॉप्टर चालविणे हे एक टीमवर्क आहे. लढाऊ विमानात केवळ एकच वैमानिक असतो. मात्र हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक, सहवैमानिकासह इंजिनिअर व गनरचा समावेश असलेली अनुभवी व निष्णात चमू असतो. आणीबाणीच्या प्रसंगी ते एकमेकांना मदत व संवाद साधून एकत्रितपणे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे या घटनेत त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. या दुर्घटनेमागे मला प्रथमदर्शनी तांत्रिक बिघाड, खराब हवामान आणि वैमानिकाची चूक या तीन शक्यता दिसतात.

फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर (सीव्हीआर)द्वारे ते भविष्यात सर्वांसमोर येणार आहेच. शिवाय ''कोर्ट ऑफ इन्क्वायरी''चीदेखील प्रतीक्षा करावी लागेल.

अपघातग्रस्त एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर अत्याधुनिक होते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये दोन शक्तिशाली इंजीन होते. उच्च दर्जाचे स्पेअर पार्टस व नेव्हिगेशन होते. अधिक भार वाहून नेण्यास सक्षम होते. शिवाय त्यातील क्रू मेंबर अनुभवी होते. हेलिकॉप्टरचा ट्रॅक रेकॉर्डही उत्तम आहे. हिमालय किंवा पहाडी भागांमध्ये सैनिकांना रसद पुरविण्यासाठी नेहमीच या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अत्यंत सुरक्षित असल्यामुळेच पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींसह अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर वापरले जाते. याआधी एक-दोन वेळा हिमालयाच्या पहाडी भागांत अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्या अपघातांची नंतर ''कोर्ट ऑफ इन्क्वायरी'' होऊन त्यामागचे नेमके कारण समोर आले होते. या अपघातातसुद्धा ''कोर्ट ऑफ इन्क्वायरी'' होणार आहे. यात वैमानिकाची चूक आढळून आल्यास, तो इतरांसाठीही धडा असतो. भविष्यात अशा चुका टाळण्याच्या वैमानिकांना सूचना केल्या जातात.

त्यासंदर्भात निश्चित धोरण ठरते. आणि जर तांत्रिक बिघाडाने घटना घडली असेल तर, तो दोष तातडीने दूर करण्यात येतो. वेळप्रसंगी हेलिकॉप्टरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला त्यात सुधारणा करण्यास (मॉडिफिकेशन) सांगितले जाते.

मी एअर कमोडोर असताना दोनवेळा मुख्यालयात काम केले आहे. त्यावेळी व्हीआयपींच्या विमानांचे सुपरव्हिजन माझ्याकडे होते. त्यामुळे अति महत्त्वाच्या व्यक्तींची किती काळजी घेतली जाते, हे मी स्वअनुभवावरून सांगू शकतो. या गोष्टी सर्वसामान्यांना माहिती नाही. अपघातानंतर सध्या देशात जी चर्चा व अफवा सुरू आहे, ती मुळातच तथ्यहीन व चुकीची आहे. पुरेसे ज्ञान नसताना या विषयावर बोलणे, अफवा पसरविणे, विनाकारण शंका घेणे किंवा कुणाला दोष देणे बरोबर नाही. या चर्चेला इथेच पूर्णविराम देणे योग्य राहील. अपघाताचे नेमके कारण लवकरच जगासमोर येणार असून, तोपर्यंत सर्वांनी ''वेट अँड वॉच'' अशी भूमिका घेतलेलीच बरी, असे माझे स्पष्ट व प्रामाणिक मत आहे.

(लेखक एअर व्हाइस मार्शल (सेवानिवृत्त) व अति विशिष्ट सेवा मेडल व शौर्यचक्र पुरस्कारानं सन्मानित आहेत.)

(शब्दांकन : नरेंद्र चोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT