काश्मीर ते कन्याकुमारी आणि कोहीमा ते मुंबई तमाम भारतीयांना एकाच वेळी आनंदी करायची ताकद फक्त आणि फक्त खेळात आहे, याची प्रचिती सगळ्यांना ३० जूनच्या पहाटे आली असेल. एकाच वेळी १४० कोटी भारतीय आपल्या क्रिकेट संघाच्या भन्नाट यशानं बेभान झाले. कोणी नाचून तर कोणी प्रचंड जोरानं ओरडून आनंद साजरा केला.
बरेच दिवस हुलकावणी देणारे निर्भेळ यश भारतीय क्रिकेट संघाला मिळाल्याचा सगळ्यांना अभिमान वाटत होता. दिसून आलं की संपूर्ण भारताला एकाच वेळी आनंदी आणि एकजूट करायची ताकद खेळात आहे म्हणून सांगावेसं वाटतं आता तरी खेळाचं महत्त्व जाणा.
१९ वर्षांखालच्या गटातील क्रिकेट खेळत असताना पश्चिम विभागातील निवडक खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात भरलं होतं. प्रशिक्षणाची जबाबदारी कर्नल हेमू अधिकारींकडे होती. कोणावरही एकदाही न ओरडता अधिकारी सरांचा शिस्तीचा आग्रह कमाल होता. सर खूप चांगले क्षेत्ररक्षणाचे धडे द्यायचे.
एक एक खेळाडूला समोर उभे करून सर एका वेळी सलग पाच झेल घ्यायला लावायचे. त्यांची झेल देण्याची क्षमता अशी होती की जिवापाड प्रयत्न केला तरच झेल हाती लागायचा. किंचित प्रयत्न कमी केले तर चेंडू चार बोटे इतकाच लांब राहायचा.
सराव संपल्यावर सरांनी एक प्रश्न विचारला होता आम्हा सगळ्यांना, की झेल कोणाच्या हातून सुटतो? त्यांच्या त्या प्रश्नाला प्रत्येकानं वेगळं उत्तर दिलं होतं. सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर सर म्हणाले होते, एक नेहमी लक्षात ठेवा... झेल ज्याच्याच हातून सुटतो जो प्रयत्न करतो... प्रयत्न करून झेल सुटला तरी मला चालेल...
मी ओरडणार नाही... पण जर प्रयत्न करण्यात तुम्ही चूक केलीत तर मग मला आवडणार नाही. सरांचे ते शब्द माझ्या मनात कायमचे घर करून राहिले.हा किस्सा सांगायचं कारण आहे नुकताच संपलेला टी-२० क्रिकेट विश्वकरंडक आणि खास करून त्याचा अंतिम सामना.
जय पराजयाच्या शक्यतांवर झोपाळ्यासारखा हेलकावे खाणाऱ्या या सामन्यानं डोकं चक्रावून टाकलं. सामना कधी भारतीय संघाच्या बाजूला होता तर कधी अचानक दक्षिण आफ्रिकेकडं झुकत होता. हाती असलेला विजय दक्षिण आफ्रिकेनं घालवला म्हणावं की भारतीय संघानं पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणला म्हणावं, मला कळत नाहीये इतका सामना चुरशीचा झाला.
भारतीय संघानं गेल्या काही वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करून उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठली होती. शेवटच्या पायरीवर संघ अडखळून पडत होता. भारतीय संघाला तब्बल अकरा वर्ष विजेतेपदाची प्रतीक्षा करावी लागली होती.
दुसर्या बाजूला दक्षिण आफ्रिकन संघ नेमका आयसीसी स्पर्धेत अत्यंत नको त्या वेळी अपयशी होत होता. गुणवत्ता ठासून भरलेल्या त्यांच्या संघात सर्वोच्च पद पटकावण्याची क्षमता असून अपयश हात धुऊन पाठीमागं लागलं होतं. मग अशा वेळी भारतीय संघ जिंकला म्हणून त्यांचे गोडवे गाताना दक्षिण आफ्रिकन संघाला चोकर्स म्हणून हिणवणे मला तरी पटत नाही.
मुद्दा इतकाच मांडायचा आहे, की चूक त्यांच्याच हातून होते जे प्रयत्न करतात. अपयश त्यांनाच येते जे यशाच्या मार्गावर जाताना कष्ट करतात पण निर्भेळ यशाचा रस्ता सापडत नाही. खरी खेळ संस्कृती हेच शिकवते,
की भारतीय संघाला जिंकले म्हणून डोक्यावर घेण्याची गरज नाही तसेच दक्षिण आफ्रिकन संघाला दूषण देण्याची गरज नाही. भारतीय संघाइतकाच चांगला खेळ दक्षिण आफ्रिकेने केला होता. एकही सामना न गमावता ते सुद्धा अंतिम सामन्यात येऊन धडकले होते. अंतिम टप्प्यावर ते कोलमडून पडले हा खेळाचा भाग आहे.
या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचं कौतुक वेगळ्या कारणांसाठी व्हायला पाहिजे. यजमान देश अमेरिकन संघानं मोठ्या दोन सामन्यांत लक्षणीय कामगिरी करून सुपर एटची फेरी गाठली, ज्याला तोड नव्हती. तसेच अफगाणिस्तान संघानं चक्क उपान्त्य सामन्यापर्यंत धडक मारली हा सुद्धा विलक्षण कामगिरीचा नमुना होता.
ज्या देशात क्रिकेटची पाळेमुळे रुजलेली नाहीत, त्या अमेरिकन संघानं पाकिस्तानला पराभूत करून हलचल माजवली. दुसरीकडं अफगाणिस्तान संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना केलेला खेळ संस्मरणीय ठरला. हे दोन संघ खूप आनंद देऊन गेले.
वैयक्तिक कामगिरीत अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची कहाणी सर्वदूर पसरली. भारतीय १९ वर्षांखालच्या संघाचा सदस्य असलेल्या सौरभला क्रिकेट बरोबर अभ्यासातही रस होता. मुंबई संघातून खेळताना एकाच वेळी सौरभ कॉम्प्युटर इंजिनीयरिंगचा अभ्यास करत होता.
त्या कालखंडाबाबत बोलताना सौरभ नेत्रावळकर म्हणाला, जेव्हा मला लक्षात आलं, की मुंबई रणजी संघात जाऊनही योग्य वेळी योग्य कामगिरीचा गियर पडत नाहीये तेव्हा अगदी काळजावर दगड ठेवून मी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला. मास्टर्स डिग्री नेटाने अभ्यास करून पूर्ण केली. शिकत असतानाही क्रिकेट खेळणे सोडले नाही. कधी कल्पना केली नव्हती, की अमेरिकेत क्रिकेट इतके खेळले जाईल.
मायनर लीगपासून चालू केलेला प्रवास नंतर मेजर लीग क्रिकेट आणि अंतिमत: अमेरिकन संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यापर्यंत पोहोचेल, कधी स्वप्न बघितलं नव्हतं. क्रिकेटनं हे सगळं घडवून आणलं. खूप मोठं स्वप्न साकारलं गेलं. माझी कामगिरी चांगली झाली. संघाला त्याचा फायदा झाला. सर्वांत सुखावह दोन गोष्टी म्हणजे पाकिस्तान विरुद्ध खेळता आले.
अटीतटीच्या सामन्यात त्यांना पराभूत करता आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवसोबत मला भारतात वयोगटातील संघात एकत्र खेळता आलं होतं त्यांच्या सोबत विश्वचषक सामन्यात खेळता आले. हे सगळे कायम स्मरणात राहील, सौरभ नेत्रावळकरनं भेटल्यावर हे आवर्जून सांगितलं.
जुने जाणते लोक आशीर्वाद देताना नेहमी सांगायचे की चांगल्या लोकांबरोबर चांगलेच व्हायला पाहिजे तरच चांगुलपणावरचा विश्वास टिकून राहतो. या म्हणण्यावर अजून विश्वास बसला जेव्हा भारतीय संघानं टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
रोहित कर्णधार आणि द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर अमिरातीत झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खूप मोठ्या फरकानं पराभूत झाला. टीकाकारांनी भलतीच दूषणं लावली. त्या सामन्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत आला होता आणि म्हणाला होता, लगेच धीर गमावू नका... हा संघ चांगला आहे...
संघातील वातावरण चांगल्या खेळासाठी पोषक असावं म्हणून आम्ही जाणीवपूर्वक मेहनत घेतली आहे... हा संघ नक्की जिंकेल. कसलं काय आणि कसलं काय. नंतर झालेला टी-२० विश्वकरंडक, मग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि २०२३ चा एक दिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना जीवघेणा ठरला. संघ अंतिम पायरीवर अडखळला.
रोहितच्या संघात निर्भेळ यश मिळवण्याची क्षमता आहे, की नाही याची शंका यायला लागली. त्या सगळ्याला २९ जून रोजी सडेतोड उत्तर मिळालं. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडनं स्वप्नांचा पाठलाग नेटानं मेहनत करून केला. हे दोघे माणूस म्हणून इतके चांगले आहेत की त्यांना अंतिम यश एकदा का होईना मिळायलाच पाहिजे असं मनोमन वाटत होतं.
चांगुलपणावरचा विश्वास राहायला दोन चांगल्या माणसांबरोबर चांगलं होणं गरजेचं झालं होतं. क्रिकेट देवानं जणू त्यांच्या मेहनतीला विश्वविजेतेपदाचा प्रसाद दिला. विजेतेपद पटकावल्यावर रोहित शर्मा नाचला-बागडला नाही तर केन्सींग्टन ओव्हलच्या मैदानावर पालथा पडून जोरजोरात हात गवताच्या भूमीवर आपटून आनंदाने ढसाढसा रडला. दुसरीकडे शांत संयमी राहुल द्रविडनं हाती विश्वचषक आल्यावर टारझन मारतो तशी आरोळी ठोकली, ज्यातून त्याच्या मनातील भावना स्पष्ट दिसल्या.
अमेरिकेतील तीन शहरे आणि ५ कॅरेबियन बेटांवर एक महिना सलग दगदगीचा प्रवास करत वार्तांकनाचे समाधान भारताच्या विजेतेपदामुळं सार्थकी लागल्यासारखं वाटलं. संघानं निर्भेळ यश मिळाल्यावर भारतात जी आनंदाची लाट आली, त्याची दृश्यं बघून वाटले की खेळाची ताकद आपण जाणायला पाहिजे. खेळ अखंड भारताला आनंदाने नाचायला लावतो.
खेळ भारताला एकजूट करतो. खेळ माणसाला अपयश मागं टाकून परत नव्या जोमानं मेहनत करून यशाचा मार्ग शोधायला भाग पाडतो. खेळच खऱ्या अर्थानं सकारात्मकता पसरवतो आणि भारतीय संघाकडं बघितल्यावर ‘अनेकता में एकता’ चा दाखला मिळतो. म्हणून खेळाचे महत्त्व जाणावे. भारतातील प्रत्येक मुला-मुलीला मनासारखे खेळायचे स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. शरीराने आणि मनाने निरोगी समाज घडवायचा तो सकारात्मक तरणोपाय मला वाटतो. तुमचे मत काय आहे मला जरूर सांगा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.