table tennis player pune education parenting career Sakal
सप्तरंग

‘सुरक्षित वातावरण’ सोडायला हवं...

सुनंदन लेले saptrang@esakal.com

अनुक्रम जैन (जयपूर), जश मोदी (मुंबई), पिनाक पाटकर (कोल्हापूर), श्रुती अमृते (बदलापूर), अनिर्बान घोष (कोलकाता), आदी चिटणीस (नागपूर), शौनक शिंदे (पुणे) अशी नावं वाचायला मिळाली की मनात चांगलं येण्यापेक्षा वाईट येतं.

काही चुकीचं केलं म्हणून ही यादी वर्तमानपत्रातून आपण वाचतोय का असं वाटू शकतं. काळजी करू नका, मी नकारात्मक बाबी सांगत नाहीये. उलट या लेखात खूप सकारात्मक बाबी मी मांडणार आहे आणि त्याचं कारण स्पष्ट आहे, की वर जी मी यादी दिली आहेत त्यातली ही सगळी मुलं-मुली टेबल टेनिसमधले उत्तम खेळाडू आहेत आणि ते पुण्यात दर्जेदार प्रशिक्षण घेत आहेत.

‘आयपीएल’ सामन्यांचं वार्तांकन मैदानावर जाऊन करत नसलो, तरी खेळाच्या प्रांतापासून लांब राहणं मला शक्य होत नाही. नुकतीच मी पुण्यातील सहभाग टेबल टेनिस सेंटरला भेट दिली. खेळाच्या हॉलमधलं दृश्य खूपच प्रेरणादायी होतं.

तरुण मुलं-मुली निष्णात प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव करत होते. टेबल टेनिस न खेळणाऱ्या लोकांना जे टेबल अगदीच छोटं वाटतं तेच टेबल चांगल्या खेळणाऱ्या खेळाडूंना खूप मोठं वाटत असतं. साहजिकच चार टेबलवर आठ खेळाडू टकटक आवाज काढत टेबल टेनिसचा चेंडू टोलवत होते.

दर १५ मिनिटांनी खेळाडू बदलत होते. खेळाच्या वातावरणानं भारलेलं दृश्य बघून माझ्यातील चौकस पत्रकार जागा झाला. कोण आहेत हे खेळाडू... कुठून आले आहेत... काय पातळीवर खेळत आहेत... त्यांना प्रशिक्षण देणारे कोण आहेत... वगैरे सगळे प्रश्‍न मनात पिंगा घालू लागले.

प्रत्येक पालकाला वाटतं, की आपल्या मुलाला किंवा मुलीला अमुक तमुक खेळाचं प्रचंड वेड आहे. जात्याच त्याला किंवा तिला त्या खेळाची जाण, कसब आहे. प्रत्येकाचा कोणीतरी आदर्श खेळाडू असतो किंवा असते.

मग त्या खेळाडूला मिळणारा मान मरातब, पैसा, प्रसिद्धी हे सारं बघून पालक आपल्या मुला-मुलीला घडवण्याचा निर्धार करतात. असा विचार करण्यात काहीच चूक नाही. फक्त लक्षात हे घेतलं पाहिजे.

खेळाडू मग तो कुठलाही खेळ खेळत असू दे, त्याला घडायला प्रचंड वेळ लागतो. दर्जेदार खेळाडू तयार होण्यामागं सुनियोजित स्वरूपातले प्रचंड कष्ट आणि खेळाडूसह पालकांचा त्याग असतो. त्याच गोष्टींची महती मला ’सहभाग टेबल टेनिस सेंटर’ला भेट दिल्यावर परत एकदा उमगली.

एखादा कर्मचारी जसा आठ तास ऑफिसात जाऊन काम करतो. अगदी तसंच चांगला खेळाडू दिवसात सहा ते आठ तास मेहनत करतात. सकाळ-संध्याकाळ खेळाचा सराव करण्याबरोबरच तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली व्यायाम, योगाभ्यास, फिजिओथेरपी आणि पूरक आहार असं सगळं नित्य नियमानं करत असतात.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रयत्नात कमालीचं सातत्य राखावं लागतं. हे सगळं केल्यावर जेव्हा सामना खेळायची वेळ येते, तेव्हा अपेक्षांचं ओझं झेलत आणि दडपण सहन करत बऱ्याच वेळा आपल्यापेक्षा सरस खेळाडूविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करायचं धैर्य दाखवावं लागतं.

जेव्हा प्रचंड मेहनत करूनही पदरी अपयश पडतं, तेव्हा त्यातूनही काहीतरी शिकून पुन्हा मेहनतीचा मार्ग पकडून यशाच्या दिशेनं प्रवास करावा लागतो. पालकांना, प्रशिक्षकांना आणि खेळाडूंना हे समजून घ्यावं लागतं, की खेळ हा एकच विषय असा आहे जिथे मेहनत करूनही अपेक्षेइतकं यश लगेच मिळतंच असं नाही.

पालकांचा प्रयत्न आणि त्याग

नाव जाहीर न करता पालक आपल्या पाल्याच्या खेळातील प्रगतीसाठी काय प्रयत्न करतात आणि काय कमालीचा त्याग हसत हसत करतात याची दोन ताजी जवळून बघितलेली उदाहरणे देतो. एक मुलगी रॅकेट स्पोर्टस् प्रकारात कनिष्ठ वयोगटात उत्तम कामगिरी करत जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंच्यात नाव कमावून होती.

आता काही वर्षांनी मोठी झाल्यावर तिचा सामना क्रीडा क्षेत्रात खुल्या गटातील सर्वोत्तम खेळाडूंशी करावा लागतो आहे. बाहेरगावाहून आलेल्या या मुलीचं प्रशिक्षण पुण्यात सुरू आहे. तिची आई तिच्यासोबत पुण्याला आली आहे.

वडील काम करून पैसे कमावून मुलीच्या खेळाच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणापासून ते पुण्यात राहण्यापर्यंतचा खर्च करत आहेत. तरीही तुम्हाला वाटेल की ठीक आहे कारण असे अनेक खेळाडू भारतभर खेळाच्या प्रगतीसाठी झगडत आहेत,

ज्यांना त्यांचे पालक जिवापाड साथ देत आहेत. या कहाणीतील वेगळेपण हे आहे की मुलीच्या आईला कर्करोग झाला आहे. एकीकडं मुलीचं प्रशिक्षण चालू आहे तर दुसरीकडं तिच्या आईवर कर्करोगाच्या आजारावर उपचार सुरू आहेत.

दुसरी कथा वेगळ्या खेळातील एका अशाच जिद्दी पालकाची आहे. हैदराबादला काम करणाऱ्या या पालकाची नोकरी कोरोना महासाथीच्या काळात गेली. त्या माणसाच्या मुलाला खेळात चांगलीच गती असल्यानं केवळ सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावं म्हणून त्या गृहस्थानी आपला संसार हैदराबादहून हलवून पुण्याला आणला. प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील एका खोलीत हे ध्येयवेडे पिता-पुत्र राहतात. एकीकडं हा माणूस चांगली नोकरी शोधतोय आणि मुलगा मन लावून सराव करतो आहे.

सध्या आयपीएल चालू आहे. विविध संघांतून खेळताना काही खेळाडूंची नावं अशी दिसतात, ज्यांनी केलेले कष्ट-त्याग जरा वेगळीच छटा दाखवून जातो. अशा खेळाडूंना काही सामन्यांत चांगला खेळ करून माफक यश मिळालं की त्यांच्या जीवनकथा माध्यमातून वाचायला मिळतात. आपापल्या गावाचं,

घराचं आणि कुटुंबाचं आरामाचं कवच तोडून खेळाडू जेव्हा पठडीबाहेरील जीवन जगत खेळाचं अध्ययन करतात, तेव्हा कहाणी वेगळी होते. पुराण काळात गरीब घरातील मुलांसारखंच महालात राहणाऱ्या राजपुत्रालाही गुरुच्या घरी जाऊन अध्ययन करायला धाडलं जायचं. म्हणजेच खरा अभ्यास करायला कोणालाही कम्फर्ट झोन सोडण्यावाचून पर्याय नव्हता.

ज्या मुलामुलींना पालक असं आरामाचे कवच फोडून जगायची संधी देतात, त्यांना खरे टक्केटोणपे समजतात. सत्य सांगायचं तर आर्थिकदृष्ट्या कमजोर किंवा खेळाच्या प्रांतात प्रगती करायची तीव्र इच्छाशक्ती असलेले लोकच असं आउट ऑफ कम्फर्ट झोन जीवन जगायची हिंमत करतात. शहरी सुखवस्तू घरातील फार कमी कुटुंबप्रमुख स्वत: असं खडतर जीवन जगायची तयारी दाखवतात तर ते पालक म्हणून मुलाला किंवा मुलीला काय झगडायची संधी देणार?

चांगला खेळाडू घडायला सराव आणि प्रशिक्षणाबरोबरीनं खेळाडूंना चांगली लढत निर्माण करणाऱ्या स्पर्धांमधून सामने खेळायला मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. बऱ्याच खेळातील कथा अशी आहे की खर्च वारेमाप आणि त्या मानानं स्पर्धांमधून मिळणारी रोख रकमेची मिळकत तुटपुंजी असते. त्याचाच विचार करून पुण्यातील परांजपे कुटुंब सर्व प्रयत्नांनिशी जन क्रीडा अभियानातून निदान टेबल टेनिस खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळवून देत आहेत.

एकंदरीत खेळाडूंना घरून पाठिंबा देणारे पालक काय किंवा त्यांना घडवायला जिवाचं रान करणारे प्रशिक्षक काय सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कम्फर्ट झोनचं कवच तोडून खेळाच्या क्षेत्रात लांब उडी मारायचा प्रयत्न करणार्‍या पालक आणि प्रशिक्षक वर्गाला धनाढ्य समाजातून थोडा आर्थिक पाठिंबा मिळाला तर वेगळीच क्रांती घडेल.

मे महिना चालू झाला असताना विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग चालू झाले आहेत. पालक आणि खेळाडू लगेच फळाची अपेक्षा न धरता कष्टाचा मार्ग पकडून संयमानं खेळाची आराधना कशी करतात, यावर पुढच्या पिढीचं भवितव्य अवलंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT