Tiger sakal
सप्तरंग

मामा-भांजा

अवतरण टीम

- संजय करकरे

साधारण १८ ते २४ महिन्यांनंतर वाघीण आपल्या पिल्लांना सोडून देते. ती पिल्ले स्वतंत्रपणे आपली हद्द निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. माणसांच्या बाबतीत मामा-भाच्याचे नाते सर्वांना परिचित आहे, मात्र वाघांमध्ये ते कसे राहू शकेल, याचे आश्चर्यच आहे.

कारण मादीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि जागेसाठी त्यांना संघर्ष करावाच लागणार आहे. ‘छोटी तारा’चे बेपत्ता झालेले नर पिल्लू तिच्याच मुलीने अर्थात ‘बिजली’ने वाढवल्याचे दिसते. ‘बिजली’ने आपल्या पिल्लाप्रमाणेच त्याचा सांभाळ केला. आता हे ‘मामा’ आणि ‘भाचा’ चांगलेच मोठे झाले आहेत. ‘मामा-भांजा’ नावानेच ते ओळखले जातात.

फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा आठवडा होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वारातून सायंकाळची सफारी करण्यासाठी आम्ही जंगलात शिरलो. मोहर्ली रेंजमध्ये सर्व ठिकाणी फिरून आमची गाडी खातोडा गेट पार करून कोसेकनालच्या रस्त्याला लागली. फेब्रुवारी महिना असल्याने जंगलात पानगळ सुरू झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ताडोबातील बांबूला फुलोरा यायला सुरुवात झाली होती.

या वर्षी हा फुलोरा मोठ्या प्रमाणावर फुलल्याने संपूर्ण जंगल वाळल्यासारखे वाटत होते. रामपूरची फायर लाईन पार करून गाडी पुढे जात असतानाच रस्त्यावर गाड्यांची रांग दिसली. इतक्या गाड्या थांबल्यामुळे साहजिकच व्याघ्रदर्शन सुरू असल्याची जाणीव झाली. कोसेकनालचा हा रस्ता अरुंद असल्याने साहजिकच २०-२२ गाड्या रांगेत लागल्या होत्या. हळूहळू आमची जिप्सी पुढे सरकत गेली.

उजव्या हाताला बांबूच्या दाट रांजीमध्ये एक वाघ पहुडलेला होता. त्याच्याच डाव्या हाताला, आतल्या बाजूला आणखी एक वाघ त्याच पद्धतीने संपूर्ण आडवा झोपला होता. निवांत झोपलेल्या वाघांना बघून गाड्या निघून जात होत्या. दुर्बिणीतून बघत असतानाच अचानक मागे झोपलेला वाघ उठला आणि जंगलातूनच चालत समोरच्या बाजूला निघून गेला. त्या वेळेस या वाघाचा आकार बांबूच्या झुडपातूनही मोठा असल्याचे लक्षात आले.

सोबत असलेला वाघ उठल्याचे पाहून दुसऱ्यानेही हालचाल केली, मात्र तो त्याच्या मागे न जाता सरळ आमच्या गाडीच्या दिशेने आला. चेहऱ्यावर अतिशय शांत भाव असणारा हा वाघ दिसायला अत्यंत सुरेख  होता. तारुण्यात पदार्पण करत असल्याने त्याच्या चेहऱ्यावरील उत्सुकता न लपणारीच होती.

शांतपणे गाडीकडे बघत त्याने फायर लाईनवरच बसकण मारली, मात्र कदाचित आपला सोबती दुसऱ्या बाजूला निघून गेल्यामुळे मान मागे वळवत तो काही क्षण त्या दिशेने बघत राहिला आणि उठून त्याच्यापाठोपाठ निघूनही गेला. हे दोन वाघ एकमेकांचे भाऊ नव्हते. ते होते ‘मामा’ आणि ‘भाचा’. अर्थात, ‘मामा’-‘भांजा’... त्यांची ही माझी पहिलीच भेट होती.

२०२२ च्या सुमारास ‘छोटी तारा’ या वाघिणीचा जामनी तलावाच्या परिसरात मुख्यतः वावर होता. या सुमारास तिला ‘युवराज’ नरापासून एक पिल्लू झाले होते.  त्या वेळी या परिसरात ‘मोगली’ नर वाघाचा धुमाकूळ सुरू होता. त्याच्या आगमनामुळे ‘छोटी तारा’चे नर पिल्लू तिच्यापासून दुरावले गेले. आपल्या पिल्लाच्या शोधात ती आठ ते दहा दिवस जंगलात ओरडत फिरत असल्याचे अनेक गाईड आणि पर्यटकांनीही पाहिले आहे.

‘छोटी तारा’ या वाघिणीची मुलगी ‘बिजली’ने आपल्या आईच्या परिसराच्या बाजूची जागा पटकावली होती. ती पण अधूनमधून जामनी तलाव आणि कोसेकनालच्या परिसरात दिसत असे. तिलाही ‘युवराज’ वाघापासून दोन पिल्ले झाली. त्यात एक नर व एक मादी होती, मात्र तिचे हे मादी पिल्लू साधारण चौथ्या-पाचव्या महिन्यापासूनच गायब झाले.

नंतर ‘छोटी तारा’चे बेपत्ता झालेले नर पिल्लू ‘बिजली’च्या नर पिल्लासोबत दिसायला लागले. ‘बिजली’ वाघिणीनेही मोठ्या प्रेमाने या पिल्लांचा सांभाळ केला. ‘बिजली’ वाघिणीवर मी लिहिलेल्या कथेमध्ये या सर्व बाबींचा उल्लेख केलेला आहे. आता हे ‘मामा’-‘भाचा’ चांगलेच मोठे झाले आहेत. या वर्षीच्या उन्हाळ्यात या दोन्ही नर वाघांनी हा परिसर ताब्यात ठेवला होता.

या दोन नर वाघांबद्दल कोलारा येथील गाईड विनोद उईके सांगतो, ‘या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या सुमारास हे दोन्ही वाघ नियमितपणे आम्हाला दिसत होते. पर्यटकांना आम्ही या दोघांच्या नात्यांची कहाणी सांगत असे. तेव्हा त्यांच्यातील मामा आणि भाच्याचे नाते सांगितले जात असताना नकळतपणे दोन्ही वाघांचे नामकरण ‘मामा-भांजा’ असे झाले. आता हे दोन्ही वाघ साधारण दोन वर्षांचे झाले आहेत.

आम्ही या दोन्ही वाघांना ज्या वेळेस ‘छोटी तारा’ने आपले पिल्लू हरवले होते तेव्हापासून बघत आहोत. पिल्लू गायब झाल्याने ही वाघीण काही काळ त्याच्या शोधात ओरडत असल्याचेही आम्ही बघितले. साधारण दहा-बारा दिवसांनंतर आम्हाला हे बेपत्ता झालेले पिल्लू ‘बिजली’सोबत बघायला मिळाले. यावेळेस या दोन्ही पिल्लांमधील आकाराचा फरक लक्षात येणारा होता.

आम्हाला त्यावेळेस मोठे आश्चर्य वाटले होते, मात्र नंतर ‘बिजली’ने व्यवस्थितपणे या दोन्ही पिल्लांचा सांभाळ केल्याचे आमच्या नजरेसमोर घडले. ‘बिजली’चे हे पहिलेच बाळंतपण होते, मात्र तिने व्यवस्थितपणे आपल्या, तसेच आपल्या आईच्या पिल्लाचा सांभाळ केला.’ या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुमारास  ‘बिजली’चे ‘युवराज’सोबत पुन्हा एकदा मिलन झाले.  या वेळी हे दोन नर जवळच होते.

या दोन्ही नर वाघांमधील एकजुटीबाबत विनोद पुढे सांगतो, ‘हे दोघेही वाघ भावंडासारखेच राहतात. दोघेही एकत्रितपणे शिकार करण्याचा प्रयत्न करतात. या दोघांनाही आम्ही गव्याच्या मागे धावताना बघितले आहे. एक-दोनदा तर ‘युवराज’ नर म्हणजेच या दोघांचेही वडील आणि हे दोन पूर्ण वाढ झालेले वाघ उन्हाळ्यात एकत्रितपणेही बघितले गेले आहेत.

या दोन्ही वाघांसोबत ‘युवराज’चे वर्तनही अतिशय सौम्य असेच दिसले. ज्याप्रमाणे पिल्ले मोठी झाल्यानंतर नर वाघ त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, तसे वर्तन ‘युवराज’मध्ये दिसले नाही. हे दोन्ही ‘मामा-भांजे’ही शांत वाघ आहेत. कधी कधी गाडीच्या जवळ उत्सुकतेपोटी येण्याचा प्रयत्न ते करतात; पण त्यांच्या चेहऱ्यावरील सौम्य भाव त्यांच्या डोळ्यातून दिसून येतो.

सध्या ‘बिजली’ वाघीण कमी दिसत आहे. कदाचित येत्या जुलैमध्ये ती पिल्ले देण्याच्या तयारीत असावी, मात्र तिच्या परिसरात जामनी तलावाच्या पाण्यात हे दोन्ही नर वाघ या वर्षीच्या उन्हाळ्यात पर्यटकांना दिसले आहेत.’

सुप्रसिद्ध ‘माया’ वाघिणीची रिकामी झालेली पांढरपवनीची जागा ‘छोटी तारा’ या वाघिणीने मिळवली. ‘माया’ गायब झाल्यानंतर काही महिन्यांतच जामनीचा परिसर सोडून ‘छोटी तारा’ पांढरपवनीच्या परिसरात दिसायला लागली. यावेळेस या परिसरातील मुख्य नर वाघ ‘मोगली’सोबत तिचे मिलन झाले. आता ‘छोटी तारा’ला तीन-साडेतीन महिन्यांची दोन पिल्ले असून तीही पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहे.

पांढरपवनीच्या दोन्ही तलावांमध्ये अधूनमधून तिचे पिल्लांसह दर्शन होऊ लागले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जामनी तलावाच्या सांडव्याच्या दगडी भिंतीवर हे दोन्ही ‘मामा’-‘भांजे’ नागपूरचा प्रसिद्ध छायाचित्रकार दीप काठीकर याने टिपले आहेत. त्या वेळेस ते दोन्ही वाघ साधारण पंधरा-सोळा महिन्यांचे होते. आता मात्र पूर्ण वाढ झालेले हे वाघ शरीरयष्टीने अतिशय दणकट असे दिसू लागले आहेत. ‘युवराज’ नर वाघाचा देखणेपणा त्यांच्यात दिसून येत आहे.

साधारण १८ ते २४ महिन्यांच्या दरम्यान वाघीण आपल्या पिल्लांना सोडते. त्यानंतर ती पिल्ले स्वतंत्र होऊन आपली हद्द निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. येथे पूर्ण वाढ झालेली ही नर पिल्ले एकत्रितपणे आपल्या वडिलांच्या छत्राखाली दिसत आहेत. माणसांच्या बाबत मामा-भाचा हे नाते सर्वांना परिचित आहे, मात्र वाघांमध्ये ते कसे राहू शकेल, हे आश्चर्यच आहे.

या नात्याचे पूर्ण वाढ झालेले दोन नर वाघ एकत्र कसे राहतात, हे न सुटणारे कोडे आहे. येणारा काळ मात्र त्यांना निश्चितच कठीण जाणार यात दुमत नाही. मादीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी व जागेसाठी त्यांना संघर्ष करावा लागणार. कदाचित आपल्या वडिलांशी दोन हातही करावे लागतील. यावेळेस त्यांच्यातील असणारे हे सुमधुर नाते त्या वेळेस कदाचित गळून पडलेले असेल.

हे दोन्ही ‘मामा’-‘भाचे’ एकमेकांसमोर उभे ठाकल्याचेही चित्र बघायला मिळेल. येणारा पावसाळा आणि पुढील दिवसात या साऱ्या घडामोडी घडतील. येत्या १ जुलैपासून ताडोबातील कोअर क्षेत्रातील  पर्यटन पावसाळ्यामुळे बंद होईल.  ऑक्टोबरमध्ये ते पुन्हा सुरू होईल. त्या वेळेस या दोघांच्या नात्याला काय वळण मिळाले आहे, ते समजू शकेल. आपण वाट बघूया!

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT