tiger sakal
सप्तरंग

ताडोबाची राणी ‘माया’

देशभरातीलच नव्हे; तर जगभरातील वन्यप्रेमींनी सर्वाधिक टिपलेली ‘माया’ वाघीण ताडोबा जंगलाची राणीच होती.

अवतरण टीम

- संजय करकरे

देशभरातीलच नव्हे; तर जगभरातील वन्यप्रेमींनी सर्वाधिक टिपलेली ‘माया’ वाघीण ताडोबा जंगलाची राणीच होती. ‘माया’ने एक दशकाहून अधिक काळ पांढरपवनीच्या जंगलावर एकछत्री अंमल राखला. आपली आई आणि आजीसारखी बिनधास्त असणाऱ्या ‘माया’ने ताडोबाच्या जंगलाला एक वेगळी ओळख दिली. तिच्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सर्वाधिक महसूल मिळाला, असेही म्हणता येईल. ‘माया’ बिनधास्त रस्त्यावरून चालत निघाली की, तिच्या मागे-पुढे गाड्यांची गर्दी झालीच म्हणून समजा...

२०१० चा एप्रिल महिना होता. ताडोबाच्या जंगलात आमची भ्रमंती सुरू होती. आदल्या दिवशी सायंकाळच्या फेरीमध्ये ताडोबातील जामुनझोरा परिसरात वाघीण पिल्लांसह दिसल्याने सर्व गाड्यांमधील पर्यटक मोठ्या उत्साहाने तिथेच वारंवार फिरत होते. साडेआठ-पावणेनऊच्या सुमारास जामुनझोरा पाणवठ्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या जंगलातून चितळांचे आणि भेकराचे दणादण अलार्म कॉल झाले.

वाघ नक्कीच तिथे असल्याची सर्वांना खात्री पटली. प्रत्येक जण गाड्यांमध्ये अंतर ठेवून वाघीण पाण्यावर येईल, याची वाट बघत थांबले. मी ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती ती नाल्यावर होती. प्रत्येक जण ज्या बाजूने अलार्म कॉल आले त्या जंगलाकडे बघत होते. थोडे पुढे आतल्या बाजूने मी दुर्बिणीतून न्याहाळत असताना अचानक वाळलेल्या बांबूमध्ये काहीतरी हालचाल जाणवली.

अधिक बारकाईने बघितल्यावर वाघीण बसल्याचे दिसून आले. ती सर्व गाड्यांना बघत होती. तिचे बारकाईने सर्वांवर लक्ष होते. त्याच सुमारास दोन लहान पिल्ले तिच्या अंगावर चढून खेळत असल्याचेही दुर्बिणीतून स्पष्ट दिसले. आमच्या गाडीतील हालचाल बघून अन्य वाहनांतील पर्यटकांना त्याचा अंदाज आला. प्रत्येक जण आम्ही बघत असणाऱ्या दिशेने पाहू लागला. इथेच खरी मेख लक्षात आली.

आम्ही अनाहूतपणे ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती, नेमक्या त्याच अँगलने आम्हाला जंगलात बांबूच्या दाट झुडपामागे बसलेली वाघीण दिसत होता. अन्य पर्यटकांना त्यांच्या अँगलमधून वाघीण दिसत नसल्याने प्रत्येक जण आमच्या गाडीच्या मागे-पुढे वाहने उभी करून तिला बघण्याचा प्रयत्न करू लागला; पण एखाद-दोन गाड्या वगळता कोणालाही त्या दाट बांबूमध्ये बसलेल्या वाघिणीचे दर्शन झाले नाही.

आतमध्ये बसलेली वाघीण आणि तिची पिल्ले निवांत खेळत होती. नेमकी किती पिल्ले आहेत, याचा अंदाज आला नाही. ती वाघीण होती ‘लीला’ आणि तिला असलेल्या चार पिल्लांमध्ये एक पिल्लू होते ‘माया’ नावाचे. त्या वेळेस ती पिल्ले अवघ्या तीन-साडेतीन महिन्यांची होती. अर्थातच त्या वेळेस त्यांना त्यांची नावे दिली गेली नव्हती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिद्ध झालेल्या ‘माया’ वाघिणीची आणि माझी ती पहिली गाठ होती.

त्यानंतर ती पिल्ले मोठी होतानाच्या काळात मी अनेक वेळा त्यांना बघितले. त्यातील ‘माया’ वाघीण मोठी झाल्यानंतर तिने तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी करत असलेला संघर्ष बघितला. पिल्लांसंदर्भात ती घेत असलेली काळजी अनेक वेळा अनुभवली. ‘माया’ची शिकारीची पद्धत, नर वाघांना हुलकावणी देणारा अनोखा प्रकार आणि तिला पर्यटकांच्या गराड्यात रमलेले बघितले. गेल्या एक तपाहून अधिक काळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अत्यंत समृद्ध अशा परिसरात तिने घालवलेला काळ बघता आला.

देशभरातीलच नव्हे; तर जगभरातील वन्यप्रेमींनी सर्वाधिक टिपलेली ‘माया’ खरे तर या जंगलाची राणीच होती. मी होती म्हणतोय, कारण गेल्या वर्षीपासून ती अदृश्य झाली आहे. तिचा ठावठिकाणा कळला नाही. ती मृत्युमुखी पडली, जंगलाच्या बाहेर गेली की आसमंतात तारा होऊन गेली, काही कळले नाही. व्याघ्र प्रकल्पाने तिच्या शोधासाठी मध्यंतरी एक मोठी मोहीम राबवली.

‘माया’च्या क्षेत्रात अन्य दोघा वाघिणींनी आपले बस्तान मात्र बसवले आहे, हे साऱ्यांनी आता बघितले आहे. ‘माया’ वाघीण अजरामर झाली हे मात्र त्रिवार सत्य आहे. ‘माया’ची कीर्ती बघून सुप्रसिद्ध वन्यजीव फिल्ममेकर नल्ला मुथू यांनी या जंगलात चार वर्षे तिच्या मागावर घालवली आहेत. या वाघिणीवर नल्ला यांनी चित्रित केलेले व शंतनू मोईत्रा यांनी लिहिलेले गाणे यापूर्वीच गाजले आहे.

या गाण्यात माया वाघीण आणि तिचे एक पिल्लू यांचे प्रेमळ भावबंध बघायला मिळतात. अगदी परवाच चंद्रपुरात झालेल्या ताडोबा महोत्सवात नल्ला यांनी या वाघिणीवर तयार केलेल्या फिल्मचे टिझरही रिलीज झाले. त्यातील सर्व शूटिंग बघितल्यानंतर ताडोबा आणि या वाघिणीवरील ही फिल्म कमालीची उत्कंठा वाढवणारी आहे.

‘माया’ची ही चारही पिल्ले सहा-सात महिन्यांची झाल्यानंतर पांढरपवनी आणि संपूर्ण परिसरात त्यांचे सातत्याने दर्शन होत असे. पांढरपवनी येथील दोन्ही पाणवठे, ताडोबा तलाव, ९७चा पाणवठा हे मायाचे गाभाक्षेत्र होते. ‘माया’ची आई ‘लीला’ आणि तिची आई ‘बांडी’ यांचेही हेच क्षेत्र होते. ‘माया’ने ते राखले होते.

‘माया’ची ही चारही पिल्ले साधारण सात-आठ महिन्यांची असताना एक काहीसा भीतीदायक प्रसंग माझ्याबाबत घडला होता. मी माझ्या घरच्यांसह ताडोबामध्ये फिरत असतानाच ही चारही पिल्ले आणि ‘माया’ मेमसाब बोडी नंबर दोनमधील पाण्यात बसली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्यात डुंबून झाल्यानंतर ‘माया’ने जवळच्या झाडाचा आसरा घेतला. सायंकाळीची वेळ असल्याने झाडाच्या सावलीत ती निवांत बसली होती.

मात्र, कमालीची उत्सुकता असलेली तिची दोन पिल्ले संशोधनासाठी बाहेर पडली. त्यातील दोन पिल्ले थेट सर्व जिप्सी गाड्यांच्या दिशेने चालत आली. त्यातील नर पिल्लू आईच्या जवळच रेंगाळत होते. त्या पिल्लाचे नाव ‘पांडू’ अर्थातच घाबरट असे ठेवले होते. ते सतत आईच्या छत्रछायेत अथवा सर्वांना टाळून कुठेतरी दूर राहणे पसंत करत होते.

दोन पिल्ले आम्ही बसलेल्या जिप्सी गाडीच्या इतक्या जवळ आली की, माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये ती मावेनाशी झाली. मी व माझी मुलगी मयूरी जिप्सीच्या सर्वात शेवटच्या सीटवर बसून दोघेही कॅमेऱ्यातून त्या पिल्लाचे फोटो काढत होतो. अतिशय जवळ आल्यावर मी कॅमेरा उभा करून छायाचित्र काढू लागलो. मयूरी फिल्म काढत होती.

वाघ इतक्या जवळ आल्यानंतर ती म्हणाली, ‘बाबा आता काय करायचे?’ मी कॅमेऱ्याच्या लेन्समध्येच बघत म्हणालो, ‘जे काय करायचे ते वाघच करेल. आपण फक्त शांत बसायचे.’ मग ती वाघिणीची पिल्ले गाडी व्यवस्थित न्याहाळून बाजूच्या गवतात शिरली. त्यानंतर पुढे जाऊन वनरक्षकाच्या मोटरसायकलीला लावलेल्या पिशवीतील डब्याला पाय लावून त्यात काय आहे, याचा अंदाज घेऊ लागली.

त्यावेळेस मोटरसायकलने आलेला वनरक्षक ही सर्व पिल्ले जवळ आल्यानंतर एका जिप्सीमध्ये चढून बसला होता. पिल्ले दूर झाल्यानंतर मी जिप्सीत बघितले असता चालक संतोष कावडे दिसेनासा झाला होता. थोडे पुढे डोकावल्यानंतर बघितले तर संतोष चक्क स्टेअरिंगच्या खाली मान घालून लपून बसला होता. अनेक वर्षे जंगलात फिरणारा संतोषही त्या पिल्लाच्या बेधडक स्वभावामुळे घाबरून गेला होता.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील पांढरपवनीच्या या परिसराला प्रत्येक पर्यटक भेट देतोच. मुबलक पाणी, गवती कुरण आणि चितळ, सांबर, रानडुक्कर या तृणभक्षी प्राण्यांची उत्तम संख्या येथे असल्याने पर्यटकांचा हा आवडता परिसर आहे. साहजिकच या परिसरात राहणारे प्राणी हे पर्यटकांकडून कॅमेऱ्याद्वारे सर्वाधिक टिपलेही जातात. या क्षेत्रातील राहणाऱ्या वाघांनाही त्यामुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळते.

एका अर्थाने बोलायचे झाल्यास हे सर्व वाघ ‘व्हीआयपी’ या गटातच मोडले जातात. म्हणजे त्यांचे सर्वाधिक दर्शन होते, ते सर्वाधिक टिपले जातात, ते सर्वाधिक प्रसिद्ध होतात आणि सर्वाधिक चर्चेतही राहतात. ‘माया’च्या बाबतही हेच झाले. ‘माया’ची आजी ‘बांडी’ हिचा काळ केवळ दोन वर्षांचाच होता. त्यानंतर तिची मुलगी असलेल्या ‘लीला’चाही काळ फार मोठा नव्हता.

मात्र, ‘माया’ने एक दशकाहून अधिक काळ पांढरपवनीच्या या नितांत सुंदर जंगलावर एकछत्री अंमल राखला. आपली आई आणि आजीसारखी बिनधास्त असणाऱ्या ‘माया’ने ताडोबाच्या जंगलाला कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवले. तिच्याद्वारे सर्वाधिक महसूल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला प्राप्त झाला, असेही म्हणता येईल. या सर्व परिसरात ‘माया’ कशा पद्धतीने राहत होती ते बघणे पण महत्त्वाचे ठरेल.

पर्यटकांना ही वाघीण काही क्षण दिसली आणि निघून गेली असे क्वचितच घडले. ‘माया’चे दर्शन म्हणजे कमालीचा माहोल तयार झालाच म्हणून समजा. म्हणजे असे व्हायचे की, ही वाघीण बिनधास्त रस्त्यावरून चालत निघाली की, तिची वरात निघालीच म्हणून समजा. तिच्या मागे-पुढे गाड्यांची गर्दी झालेली असायची. केवळ रस्त्यावरून चालून दर्शन देण्यापूर्तीच हे मर्यादित नव्हते.

अनेक वेळा गव्याच्या मागे धावणारी, चितळांचा कळप व्यवस्थित फोडून, त्यातून लहान पिल्लाला अलगद पकडणारी ‘माया’, गव्याच्या पाठीवर बसून त्याची शिकार करणारी, आपल्याला लहान पिल्लांना तोंडात घेऊन जाणारी, पिल्लू लहान असताना दुसऱ्या नराकडून ते मारू न देणारी, पिल्लांना वाचवण्यासाठी खोटे मिलन करणारी असे एक ना अनेक प्रसंग या दशकात पर्यटकांनी अनुभवले आणि कॅमेऱ्यातही टिपले आहेत. या सर्वांची यादी करायची झाली तर ती फारच मोठी होईल. म्हणजेच ‘माया’च्या प्रत्येक हालचालीतून काहीतरी ॲक्शन घडेल, काहीतरी रोमांचकारक घडेल, असेच तिचे दर्शन राहत असे.

मला आणखी एक प्रसंग आठवतो. यूकेमध्ये राहणारे डॉक्टर अश्विन पावडे आणि मी एका जिप्सीमध्ये होतो. पांढरपवनीच्या दोन्ही तलावांच्या मधील गवती कुरणाजवळ रस्त्यावर आम्ही थांबलो होतो. ‘माया’ रस्त्याच्या कडेला बसली होती. साहजिकच पर्यटकांच्या अनेक गाड्या तिच्या मागे-पुढे वेगवेगळ्या ठिकाणी थांबल्या होत्या. साधारण दहा मिनिटे बसल्यानंतर ‘माया’ने उठून गवती कुरणाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

त्यावेळेस तिला दोन लहान पिल्ले होती. ती पिल्ले तिने कुठेतरी लपवून ठेवली होती. ही वाघीण आमच्या पुढच्या गाडीचा आधार घेत गवती कुरणाच्या दिशेने आली. तिने कुरणामध्ये चरणारा चितळांचा कळप हेरला होता. गाडीकडे क्षणही नजर न टाकता ती आपल्या भक्ष्यावर नजर ठेवून कुरणाच्या कडेला आली. तिथे एखाद मिनिट थांबून अत्यंत वेगाने गवती कुरणांमध्ये धावली. ती जशी वेगाने आत शिरली तसे गाडीत बसलेल्या पर्यटकांच्या तोंडून मोठा गलका झाला.

‘माया’ने गवतात बसलेले चितळाचे लहान पिल्लू हेरले होते. बोराच्या झाडाखालील गवतात त्या पिल्लाला पकडल्याबरोबर त्या पिल्लाने जोरदार चित्कार केला. काही सेकंद तिने पायानेच ते चितळाचे लहान पिल्लू दाबून ठेवले होते. ती जशी उठली तसे ते पिल्लू निसटल्यासारखे झाले. तिने झटक्यात त्या पिल्लाला पुन्हा पायाने आणि तोंडाने धरले अन् तलावाच्या मागील बाजूला निघून गेली. हे सर्व ३० ते ४० जिप्सींच्या समोर घडले असले तरी मोजक्याच लोकांना तिची वेगाने होणारी हालचाल टिपता आली. असे एक ना अनेक प्रसंग पर्यटकांनी अनुभवले आणि टिपलेही आहेत.

(पूर्वार्ध)

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT