mahabalipuram village ekashm mandir sakal
सप्तरंग

पल्लवांचं वैभवशाली महाबलीपुरम

तमिळनाडू अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. देशातलं दक्षिणेकडील राज्य आणि आग्नेय आशियासोबत कमीत कमी हजार वर्षांपासूनचे संबंध अबाधित ठेवणारा भूभाग म्हणून तमिळनाडू प्रसिद्ध आहे.

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

तमिळनाडू अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. देशातलं दक्षिणेकडील राज्य आणि आग्नेय आशियासोबत कमीत कमी हजार वर्षांपासूनचे संबंध अबाधित ठेवणारा भूभाग म्हणून तमिळनाडू प्रसिद्ध आहे. पल्लव, चोळ, मराठ्यांसारख्या राजसत्तांनी या राज्यात अनेक धार्मिक वास्तू उभारल्या, महाल उभारले, ग्रंथालयं उभारली.

तमिळनाडूमधील मंडगपट्टू येथे पल्लव राजा महेंद्रवर्मन याने पहिली शैवलेणी खोदली. ‘वीट, लाकूड अथवा कोणत्याही धातूविरहित’ ही वास्तू उभारण्यात आल्याचा शिलालेख महेंद्रवर्मननं कोरून ठेवला.

यानंतर तमिळनाडूत स्थापत्यामध्ये फार मोठा बदल घडला. पल्लव आणि बदामी चालुक्यांच्या सततच्या युद्धामुळं जितके अनिष्ट परिणाम या भागावर झाले, तेवढ्याच प्रमाणात कलेची देवाणघेवाण या दोन राज्यांमध्ये झाली. पल्लवांच्या स्थापत्यशैलीचे मुख्यत्वे तीन भाग पडतात आणि हे तिन्ही टप्पे तीन राजांच्या नावे ओळखले जातात. पहिल्या टप्प्यात लेण्यांची निर्मिती दिसते, ज्याचं श्रेय जातं महेंद्रवर्मनला.

दुसऱ्या टप्प्यात लेणी मंदिर, एकाश्म मंदिर (केवळ एका दगडातून साकारलेलं ) आणि काही प्रमाणात बांधीव मंदिरांचा प्रयोग आढळतो. याचं श्रेय नरसिंहवर्मनला जातं. तिसऱ्या टप्प्यात पूर्णपणे बांधीव मंदिरांची उभारणी झाली, ज्याचा निर्माता राजसिंहवर्मन आहे. हे तीन पल्लव राजे आणि त्यांच्या काळात विकसित होत गेलेल्या स्थापत्यशैलीचा प्रभाव कांची आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळतो.

कांचीपुरम पासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर एक महत्त्वाचं शहर समुद्र किनाऱ्यावर वसलंय. जिथं दीड हजार वर्षांपूर्वी पल्लव राजा नरसिंहवर्मन आपल्या प्रचंड फौजेनिशी येत असे, या भागात वावरत असे, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असलेल्या दगडांमध्ये एक वेगळीच दुनिया तयार करण्याची जबाबदारी त्यानं अनेक कलाकारांना दिली आणि एका समृद्ध शहराची उभारणी केली. त्या अतिशय सुंदर शहराला नाव देण्यात आले ‘मामल्लपुरम’ ऊर्फ ‘महाबलीपुरम’.

नरसिंहवर्मन याचा उल्लेख कित्येकदा ‘मामलं’ म्हणून करण्यात आलाय. मामल्ल म्हणजे महान मल्ल. त्याच नावापासून महाबलीमपुरम रूढ झाल्याचं मत अनेक अभ्यासकांचं आहे. दुसरीकडं, दानशूर राजा बळी याच्याशीही या गावाचा इतिहास जोडला गेल्याचा उल्लेख स्थानिक लोक आवर्जून करतात. पौराणिक तसेच ऐतिहासिक कथांनी हा प्रदेश समृद्ध झालेला आहे.

महाबलीपुरम गावात अनेक लेणी, अनेक बांधीव मंदिरं आणि एकाश्म मंदिरं जगप्रसिद्ध आहेत. ही पाच एकाश्म मंदिरं ‘पंच रथ’ नावाने लोकांच्या परिचयाची आहेत. त्यांची नावे सुद्धा लोकप्रिय पांडवाच्या नावावरूनच ठेवण्यात आली आहेत.

अर्जुन आणि कुंती रथ जवळ जवळ आहेत. सर्वांत मोठ्या रथाला ‘भीम रथ’ नावाने ओळखतात. त्याच्या बाजूला ‘धर्मराज रथ’ आहे तर समोर ‘नकुल-सहदेव रथ’ आहे. या पाच रथांसोबत एकाच दगडात कोरलेले नंदी, सिंह आणि हत्तीचं भव्य शिल्प आहे. धर्मराज रथावर बरेच शिलालेख आहेत. हे सर्व रथ आणि त्यांची निर्मिती सातव्या शतकातील. त्यासाठी हा नरसिंहवर्मन राजा कारणीभूत ठरला.

इथून काहीसं पुढं गेल्यावर आपल्याला अनेक लेणी लागतात. कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलल्याची किंवा गोकुळात आपल्या मित्रांसोबत मजामस्ती करतानाची गोष्ट एका लेणीत कोरून ठेवली आहे. त्याच्यापुढं सत्तर-ऐंशी फुटांच्या भल्यामोठ्या दगडी भिंतीवर गंगावतरण शिल्प कोरलंय.

पण यात केवळ गंगा पृथ्वीवर अवतरत आहे, एवढचं कोरलं नाही तर त्या वेळी पृथ्वीवर काय काय घडत होतं, त्या भगीरथानं कसे प्रयत्न केले, भगवान शिवाची आराधना करणारे साधू आणि पृथ्वीवरील अनेक प्राणी हे त्या भव्यदिव्य शिल्पात अगदी जिवंत वाटावेत असे कोरले आहेत.

महिषासुरमर्दिनी लेणीमध्ये तर सिंहावर आरूढ झालेली दुर्गा आणि म्हैस आणि मनुष्य यांच्या मिश्ररूपात महिषासुराचं आठ-दहा फुटांचं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. गणेश मंदिर, ब्रह्मा-विष्णू-महेश यांची छोटेखानी लेणी, एका दगडावर कोरलेले माकड, सिंह, हत्ती यांसारखे प्राणी हे सगळं पाहत आपण येऊन पोचतो वराह लेणीच्या समोर. या लेणीचं छत पूर्णपणे रंगवलेलं होतं. अजूनही त्याचे अवशेष आपल्याला दिसतात.

वराहनं आपल्या हातात भूदेवीला उचलल्याचं शिल्प अतिशय प्रमाण, सुंदर आणि आकर्षक आहे. या वराह लेणीच्या मागं, एक लाइटहाउस आपल्या नजरेस पडतं. ते ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलं असलं, तरीही त्याच्याखाली पल्लवकालीन लेणी आपल्याला आढळतात. हे सगळं काही एकाच ठिकाणी, थोड्याफार फरकाचं अंतर ठेवून खोदण्यात आलं आहे. पाच रथ आणि इतर सर्व लेणी पाहायला आपल्याला कमीत कमी चारपाच तास निवांत हवेत.

महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अतिशय सुंदर मंदिर पल्लावांच्या काळात उभारण्यात आलंय. भौगोलिक स्थानामुळं या मंदिराला ‘Sea Shore’ किंवा शोर मंदिर म्हणून ओळखतात. या मंदिराच्या गर्भगृहात सोमस्कंदाची प्रतिमा आहे. शिव, पार्वती आणि कार्तिकेयच्या एकत्रित प्रतिमेला सोमस्कंद या नावानं ओळखण्यात येतं. मंदिराच्या बाहेर सिंहारूढ दुर्गा विराजमान आहे. सिंह हा पल्लावांच्या स्थापत्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

नरसिंहवर्मन किंवा राजसिंहवर्मन यांच्या काळातील बांधकाम ओळखायला फार भारी सोय या दोघांनीच करून ठेवली आहे. ज्या मंदिर किंवा लेण्यातील खांबांच्या पायामध्ये बसलेल्या सिंहाचं शिल्प असेल तर ते नरसिंहवर्मनच्या काळातील आणि जर दोन पायांवर उभारलेला सिंह असेल, तर ती वास्तू राजसिंहवर्मनच्या काळातील आहे हे स्पष्टपणानं ओळखता येतं आणि मुख्यतः सर्व बांधीव मंदिरांची उभारणी ही राजसिंहवर्मनच्या काळात झाली आहे.

नरसिंहवर्मन पल्लवांच्या घराण्यातील फार ताकदवान राजा होऊन गेला. त्याचे वडील, महेंद्रवर्मन उत्तम नाटककार होते. स्वतःला ‘विचित्र चित्त’ या नावाने तो संबोधत असे. नरसिंह ऊर्फ मामल्लने बदामीवर आक्रमण केलं आणि पुलकेशी दुसरा चालुक्य याला हरवलं. पुलकेशी दुसरा दख्खन भागात होऊन गेलेला बलाढ्य राजा होता. कांचीवर आक्रमण करणं, आपल्या वडिलांना हरवणं यांसारख्या गोष्टींमुळे मामल्ल दुखावला गेला होता. त्यानं बदामीवर हल्ला केला, पुलकेशीला हरवलं आणि स्वतःला ‘वातापीकोंड’ अशी पदवी धारण केली.

कांचीपुरम, चेन्नई आणि पुदुचेरी या तिन्ही प्रसिद्ध स्थळांपासून महाबलीपुरम दीड-एक तासांच्या अंतरावर आहे. चौदाशे वर्ष जुन्या या गावामध्ये पल्लवांच्या वैभवशाली साम्राज्याच्या पाऊलखुणा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. त्या पाहायला आणि तो इतिहास जगायला एकदातरी जायला हवं.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: १११ वर्षांच्या आजींनी केले मतदान; तुमचं काय?

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

विकासाचे मारेकरी कोण अन् वारकरी कोण? मतदानाच्या दिवशी सूचक ट्विट; 'भाईं'नी चेंडू जनतेकडे पाठवला, काय म्हणाले?

व्हा सज्ज! Lionel Messi १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येतोय, अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा दौरा

SCROLL FOR NEXT