the pride of Tadoba Tiger Reserve forest animal tiger-tigress Sakal
सप्तरंग

ताडोबाची शान

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वन परिक्षेत्रात खूपच सुंदर असे जंगल आहे. दाट बांबू, आकाशाला गवसणी घालणारी झाडे, लहान लहान बारमाही वाहणारे नाले

अवतरण टीम

- संजय करकरे

ताडोबाच्या जंगलातील अनेक वाघ-वाघिणी उतरत्या वयात कोअर भाग सोडून, बफर क्षेत्राकडे किंवा जवळील प्रादेशिकच्या जंगलाकडे गेल्याचे बघायला मिळते; मात्र ‘हिरडीनाला’ ऊर्फ ‘टी ४’ वाघीण आजही आपली हद्द टिकवून ठेवण्यात काहीशी यशस्वी ठरली आहे, असेच म्हणावे लागेल.

तिच्या उतरत्या वयाची झाक तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसू लागली आहे. वाघाच्या सर्वसाधारण आयुष्याच्या पलीकडे तिचे वय आता झाले असूनही, ती निकराने आपल्या हद्दीत आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड करत आहे. आजही ती ताडोबाची शान आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वन परिक्षेत्रात खूपच सुंदर असे जंगल आहे. दाट बांबू, आकाशाला गवसणी घालणारी झाडे, लहान लहान बारमाही वाहणारे नाले, पुनर्वसन झाल्यानंतर कोळसा व बोटेझरी गावाच्या परिसरातील विस्तीर्ण गवती कुरण यामुळे हा सर्व परिसर वन्यप्राण्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे.

भरउन्हाळ्यातही या जंगलातील रामसिंग आंबा, कुवानी, हिरडी नाला, शिवनझरी तसेच अनेक परिसरात हिरवे गवत व दाट झाडी पाहायला मिळतात. साहजिकच हा सर्व परिसर रानडुक्कर, सांबर आणि गव्यांसारख्या प्राण्यांचा आवडता आणि हक्काचे ठिकाण बनतो.

याच तृणभक्ष्यी प्राण्यांना धरून, या सर्व परिसरात वाघाचाही मुक्काम सातत्याने पाहायला मिळतो. खरे तर कोळशाचे जंगल पर्यटकांपासून काहीसे दूरच राहिले आहे, जे अतिशय चांगले आहे. या ठिकाणी पांगडी आणि झरी या दोन प्रवेशद्वारांतूनच मोजक्या पर्यटकांना जंगलात प्रवेश मिळत असल्याने येथे गाड्यांची आणि पर्यटकांची कमीच वर्दळ पाहायला मिळते.

त्यामुळे येथे दिसणारे वाघही प्रसिद्धीपासून दूरच राहिले आहेत. या परिसरातील ‘कुवानी’ वाघीण मात्र सातत्याने दर्शन देत असल्याने पर्यटकांच्या चर्चेत राहिली आहे. आजच्या कथेची नायिकाही प्रसिद्धीच्या झोतापासून दूरच राहिली आहे. आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात वयोवृद्ध असणारी ही वाघीण म्हणजे ‘हिरडीनाला’ मादी

ऊर्फ ‘टी ४’.

ताडोबाच्या जंगलातील अनेक वाघिणी तसेच नर वाघ उतरत्या वयाला लागल्यावर कोअर भाग सोडून, बफर क्षेत्राकडे तसेच त्यानंतर जवळील प्रादेशिकच्या जंगलाकडे गेल्याचे बघायला मिळते; मात्र हिरडीनाला परिसरात दिसणारी ही मादी आजही कोळसा आणि पांगडीच्या बफर क्षेत्राला धरून आपली हद्द टिकवून ठेवण्यात काहीशी यशस्वी ठरली आहे, असेच म्हणावे लागेल.

अलीकडच्याच काळात काढलेला या वाघिणीचा एक फोटो मी समाजमाध्यमांवर बघितला. या वाघिणीच्या उतरत्या वयाची झाक तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसू लागली आहे. वाघाच्या सर्वसाधारण आयुष्याच्या पलीकडे तिचे वय आता झाले असूनही, ती निकराने आपल्या हद्दीत आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड करत आहे.

२००६ च्या सुमारास जन्म घेणारी ही वाघीण आता १७ वर्षांहून अधिक वयाची झाली आहे. पांगडी गावाजवळील जनावरे, त्या परिसरातील छोटे-मोठे प्राणी तसेच अन्य वाघाने आणि खासकरून तिच्या मुलीने केलेल्या शिकारीचा वाटा पळवून नेऊन ती आपला उदरनिर्वाह करत असल्याचे चित्र आता आहे.

वाघाच्या आयुष्यातील अतिशय कठीण असा हा काळ असून ही वाघीण त्यातून सध्या जात आहे. गतवैभव गमावलेली, साथ न देणारे शरीर अशी तिची काहीशी अवस्था म्हणता येईल; तरीही आपल्या क्षेत्रात ती निकराने फिरत असल्याचे चित्र आहे.

‘हिरडीनाला’ या मादीची आई अथवा तिचे वडील कोण होते, याचा तपशील उपलब्ध नाही. प्रामुख्याने पांगडी गावाजवळील परिसरात ती दिसत होती. साधारण २००६-०७ च्या सुमारास  पांगडी गावाजवळ एका नाल्याच्या काठी तिच्या आईने एका गाईला मारले होते. यावेळेस तिला

दोन पिल्ले होती. हे तीन वाघ या गाईजवळ थांबून, ते खात असल्याचे बघितल्यावर केवळ पांगडी गावच नव्हे; तर कुकडहेटी आणि परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ या वाघांना बघण्यासाठी धडपडत होते. या वेळी तेथे मोठी गर्दी झाली होती. ट्रॅक्टर, टेम्पोमधून लोकं येऊन या तीन वाघांना बघत असल्याची एक आठवण आहे. या तीन पिल्लांपैकी एक पिल्लू म्हणजे ही वाघीण. मोठी झाल्यानंतर ती कोळसा तलावाच्या रस्त्यावरील हिरडीनाला परिसरात स्थिरावली.

हिरडीनाल्याचा परिसर अतिशय सुंदर अशा जंगलाने आणि वन्यप्राण्यांनी समृद्ध आहे. साहजिकच या परिसरात या मादीने आसरा घेतला. ही वाघीण सातत्याने या परिसरात दिसत असल्याने तिचे ‘हिरडीनाला’ असे नामकरण झाले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्राचे अधिकारी रुंदन कातकर अगदी सुरुवातीपासून तिचा मागोवा घेत आहेत. २००६ मध्ये त्यांनी तिला, तिच्या आईसोबत पांगडी परिसरात बघितले होते. त्या वेळी रुंदन एका पर्यावरण संस्थेत काम करत होते. वाघांच्या अभ्यासाचा त्यांचा विषय असल्याने व निसर्गाची आवड असल्याने नंतरच्या काळात ते वनविभागात दाखल झाले.

सुदैवाने ज्या परिसरात त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले तिथलीच जबाबदारी आता त्यांना मिळाल्याने अनेक वाघांच्या माहितीचा साठा त्यांच्याकडे आहे. रुंदन सांगतात, ‘‘२००६ च्या सुमारास ही वाघीण अप्रौढ असताना मी तिला पांगडी परिसरात बघितले आहे. त्या सुमारास कोळसा परिसरात पर्यटन फारसे नव्हते.

त्यामुळे साहजिकच या परिसरातील वाघांचा फारसा मागोवा घेतला गेला नाही. माझ्या माहितीनुसार या वाघिणीला आतापर्यंत सहा वेळा पिल्ले झाली आहेत. पहिले बाळंतपण २०११ च्या सुमारास झाले होते. त्यावेळेस या परिसरात दिसणारा व अतिशय आकर्षक असा ‘शिवाजी’ नर या वाघिणीसोबत दिसत होता.

या वाघिणीला २०१२-१३ च्या सुमारास दोन पिल्ले झाली. ‘बंटी’ आणि ‘बबली’ नावाने ती ओळखली जात होती. त्या वेळेस दोघांच्या जोडीने कोळसा परिसरातील पर्यटन गाजवले होते. पिल्ले मोठी झाल्यानंतर नर ‘बंटी’चा पत्ता लागला नाही.

मात्र ‘बबली’ नावाची वाघीण पुढे ‘कुवानी’ नावाने प्रसिद्ध झाली. आज ती कोळसा परिसरातील प्रसिद्ध वाघीण असून तिचे वयही साधारण दहाच्या पुढे आहे. ‘हिरडीनाला’ वाघीण रामसिंग आंबा, सुकळीबोडी, हिरडीनाला, पांगडी व बोटेझरीचा काही परिसर धरून राहिली. या परिसरात तृणभक्षी प्राण्यांमध्ये गवा अधिक असल्याने साहजिकच ती त्यांना मारून आपल्या पिल्लांना वाढवत असल्याचे मला दिसून आले.

साहजिकच तिची मुलगी ‘कुवानी’ही गव्यांच्या मागावर अधिक असते. ‘हिरडीनाला’ मादीला साधारण दोन ते तीन पिल्ले विविध नरांपासून झाली. त्या नरांमध्ये  ‘टी ११’, ‘टी ४२’ तसेच काकडघाट परिसरात दिसणारा नर यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये ‘हिरडीनाला’ व ‘काकडघाट’ नराचे मिलनही मी बघितले आहे.’’

रुंदन पुढे सांगतात, ‘‘२०२२ मध्ये या वाघिणीच्या आयुष्यात कठीण काळ आला होता. एखाद्या नर वाघाशी सामना झाला असावा अथवा कुठल्यातरी नैसर्गिक घटनेमुळे तिचा मागचा पाय लंगडायला लागला होता. या वाघिणीला त्या वेळेस एका छायाचित्रकाराने त्याच्या कॅमेऱ्यात टिपले आणि तिचा हा फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला.

त्या वेळेस व्याघ्र प्रकल्पाने या वाघिणीला बेशुद्ध करून तिच्यावर उपचार करावेत, असा विचार करून डॉक्टरांचा चमू तिच्या मागावर तैनात केला होता. मात्र यावेळेस या वाघिणीला दोन पिल्ले असल्याने तिच्यावर उपचार करणे अवघड जाईल, हे लक्षात आले. नंतर ‘हिरडीनाला’ काही दिवसांत तंदुरुस्त झाल्याचे आमच्या लक्षात आले.

आज वयोवृद्ध झालेली ही वाघीण पांगडी गावाजवळ राहते. आता तिचे वय जाणवत आहे. एके काळी गव्याला लोळवणारी ही वाघीण आता लहान पाळीव जनावरे मारत आहे. चोरूनही काही प्राणी पळवत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची आपली मुलगी ‘कुवानी’सोबत जोरदार तू तू-मैं मैं झाली. या वेळेस कुवानी वाघिणीची पिल्ले घाबरून आईपासून दुरावली होती.

‘हिरडीनाला’ने आपल्या मुलीची शिकारही पटकावली होती. अधेमधे ती रानडुक्कर मारत असल्याचे आमच्या लक्षात आले. मात्र निश्चितच आता ती थकल्याचे जाणवते. या वाघिणीने आपल्या आयुष्यात तिला झालेल्या पिल्लांचा काटेकोरपणे सांभाळ केला आहे. पिल्लांच्या बाबतीत ती अतिशय दक्ष असल्याचे आम्ही बघितले आहे.

साहजिकच तिची पिल्ले आज ताडोबा तसेच ताडोबाच्या बाहेरच्या जंगलात पसरली आहेत.’’ गेल्या वर्षी या वाघिणीच्या दोन मादी पिल्लांपैकी एक वाघांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असणाऱ्या स्थलांतर प्रक्रियेमध्ये उपयोगी पडले. या ‘हिरडीनाल्या’चे एक मादी पिल्लू या जंगलातून नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पाठवले गेले.

आज ते नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल परिसरात स्थिरावले आहे. वाघांच्या संवर्धनासाठीचा हा महत्त्वपूर्ण प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी ठरला तर त्यात ‘हिरडीनाला’ मादीचा महत्त्वपूर्ण वाटा ठरेल. यासोबतच तिची वंशावळ ज्यात ‘युवराज’, ‘मोगली’, ‘रुद्रा’, ‘ताला’ व ‘पारस’ अशा नर वाघांचा समावेश आहे. हे सर्व वाघ ताडोबाची शान आहेत. साहजिकच यात ‘हिरडी’चा खूप वरचा वाटा आहे.

sanjay.karkare@gmail.com (लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT