tomato price hike expert approved alternatives food monsoon agriculture esakal
सप्तरंग

दीड महिन्यांपूर्वी खर्चही न निघाल्याने रस्त्यावर टाकून दिल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० च्या वर का पोहोचले?

शेतमालाच्या एकाच उत्पादनाचे हे इतके परस्पर विरोधी चित्र तेही इतक्या कमी काळात कसे तयार होते ?

विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा

विलास शिंदे

टोमॅटोचा सद्यस्थितीत वाढलेला भाव हा सर्वस्तरात मोठा चर्चेचा विषय ठरलाय. किरकोळ बाजारात टोमॅटो खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकाला किलोला साधारण शंभर रुपये मोजावे लागत आहेत.

टोमॅटोच्या दराचे आजचे हे चित्र आहे. त्याच्या नेमके उलट चित्र दीड महिन्यांपूर्वी होते. मे महिन्यात टोमॅटोचे दर एक ते दीड रुपये किलोपर्यंत घसरले होते. टोमॅटोचा खर्चही न निघाल्याने टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला जात होता.

शेतमालाच्या एकाच उत्पादनाचे हे इतके परस्पर विरोधी चित्र तेही इतक्या कमी काळात कसे तयार होते ? या दोन्ही बाजू नीट समजून घेतल्या तर लक्षात येते की शेतीमालाची पुरवठा साखळी शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही दृष्टीने संयुक्तिक, शाश्‍वतही तसेच फायदेशीर राहील ही व्यवस्था उभी करण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत. हे टोमॅटोच्या या उदाहरणावरून परत एकदा समोर आले आहे.

टोमॅटो, कांदा अनन्यसाधारण

कांदा, टोमॅटो या भारतीयांच्या आहारातील नियमित महत्त्वाच्या भाज्या आहेत. टोमॅटोचा घरगुती तसेच संस्थात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात वापर आहे. फक्त टोमॅटोचा विचार करता भारताची दर महिन्याची फ्रेश व प्रक्रिया केलेल्या टोमॅटोची गरज तब्बल १५ लाख टनांची गरज आहे.

दर महिन्याला १५ लाख टनांची मागणी असली तरी प्रत्येकवेळी त्या प्रमाणात टोमॅटोचा पुरवठा होईलच याची खात्री नसते. टोमॅटो हे शेतातील पीक आहे ते कारखान्यात तयार होणारे उत्पादन नाही ही महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.

पुरवठा हा शेतात शेतकरी जसे पिकवतो त्यानुसार होतो. देशातील एकूण उत्पादनातील ९९ टक्के उत्पादन हे छोट्या शेतकऱ्यांच्या शेतातून येते. तो त्याचे व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेत असतो. लागवड कधी करायची? बियाणे कोणते वापरायचे? त्या त्या नुसार बाजारात त्याचा माल आणत असतो.

तेजी- मंदीचं गणित

सध्या आपण कमी पुरवठ्याच्या परिस्थितीत सापडलो आहोत. अगदी ४० ते ४५ दिवसांपूर्वीचे पाहिले तर टोमॅटोचा बाजारातील पुरवठा हा बाजारातील गरजेपेक्षा जास्त होता. तेव्हा भाव अक्षरश: दीड ते दोन रुपये किलोपर्यंत उतरलेले होते.

त्यावेळी ग्राहक १० ते १५ रुपये किलो दराने खरेदी करीत होता. टोमॅटोचा उत्पादन खर्च प्रति किलो ४ ते ५ रुपये येतो. या उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळणे ही परिस्थिती कोणत्याही उत्पादकाला निरुत्साही करणारीच असते.

तिचा परिणाम पुढील उत्पादनावर होतो. मागील दोन महिन्यांत बऱ्याच शेतकऱ्यांनी तोट्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातून काढून टाकले होते. त्याच बरोबर उन्हाळी हंगामात एप्रिल, मे महिन्यात ज्या नवीन लागवडी होतात. त्या खूप कमी झाल्या. बाजारातील मंदीची परिस्थिती आणि पाऊस लांबल्यामुळे पुढील लागवडीही कमी झाल्या. याचा एकत्रित परिणाम म्हणून आजची तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली.

भारतात वेगवेगळ्या विविध राज्यांमध्ये विविध हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. विशेषत: एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतच्या लागवडी या चार राज्यांत होत असतात.

पुढील ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत भारतात सर्वच राज्यांत टोमॅटो पिकतो. उत्तरेकडील राज्यात उन्हाळा तीव्र असल्यामुळे तिकडे फक्त हिवाळ्याच्या दरम्यानच टोमॅटो पिकवला जातो. एप्रिलनंतर तिकडे लागवडी होत नाहीत.

एप्रिल ते सप्टेंबर या लागवडी फक्त महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या चार राज्यांत होतात. त्यामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत होणारा टोमॅटोचा एकूण पुरवठा या चार राज्यांतूनच होतो.

हा पुरवठा तिथल्या एकूण टोमॅटो क्षेत्राच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. या चारही राज्यात पाऊस तुलनेने कमी आहे. भाव पडल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पीक काढून टाकले आहे. या परिस्थितीत टोमॅटोच्या लागवडी या लांबलेल्या आहेत.

त्यामुळे टोमॅटोचा पुरवठा खूपच कमी म्हणजे मागणीच्या अवघा तीस टक्केच होत आहे. १५ लाख टनाच्या मागणीच्या तुलनेत एकूण ४ लाख टनाच्या आसपासच पुरवठा बाजारात होत आहे. नारायणगाव बाजार समितीच्या आवारात जून महिन्यात दरवर्षी दिवसाला दीड लाख क्रेटपर्यंत आवक असते.

तिथे ती घटून यावर्षी १५ हजार क्रेट म्हणजे नेहमी येणाऱ्या मालाच्या १० टक्के इतकीच होत आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतरही बाजार समित्यांतून पहायला मिळते. ग्राहकांना प्रत्येक गोष्टीत टोमॅटो वापरण्याची सवय असल्यामुळे मागणी तीव्र असते. ती गोष्ट आहारातून वर्ज्य करू शकत नसल्यामुळे कांदा, टोमॅटोसारखी उत्पादने ही प्रत्येकाच्या घरात लागतातच. दर वाढला तरी ग्राहक ती घेत असतात. अशा परिस्थितीत दर अजून वाढतात ही वस्तुस्थिती आहे.

फळे व भाजीपाला नाशवंत आहे म्हणून त्याची सक्षम अशी विक्री व्यवस्था होऊ शकत नाही असे बऱ्याचदा बोलले जाते. आपल्या रोजच्या आहारात दूध हा घटक आहे. दूध हा घटक तर भाजीपाल्याच्या तुलनेत जास्त नाशवंत आहे.

दूध काढल्यानंतर चार तासाच्यावर टिकू शकत नाही. फळे व भाजीपाला मात्र आठ दिवसांपर्यंत टिकून राहू शकतो. तरीही दुधाची चांगली विक्री व्यवस्था उभी राहिली आहे. दुधाच्या दरातही चढ उतार होतात पण ते फळभाजीपाल्याच्या तुलनेत फारच कमी असतात. मग जे दुधात होऊ शकते ते फळ भाजीपाल्यात का होऊ शकत नाही?

दुधाच्या विक्री व्यवस्थेत मध्यवर्ती यंत्रणा तयार झाली आहे. भाजीपाल्यात बाजार समिती तर दुधात डेअरी व्यवस्था आहे. प्रत्येक टप्प्यावर दुधाचे संकलन होते. डेअरीच्या मध्यवर्ती पातळीवर एकूण दुधाची नोंद होते.

इथेच एकत्रित दुधाबाबत निर्णय होतात. बाजाराच्या मागणीनुसार फ्रेश दूध तत्काळ विकले जाते. जास्तीचे दूध असेल तर त्यावर प्रक्रिया करून पावडर तसेच दुधाचे क्रिम केले जाते. त्याची साठवणूक केली जाते. दही, लस्सी सारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातात.

दुधाचा तुटवडा निर्माण झाल्यावर साठवणुकीतील पावडर पासून दूध तयार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. बाजारातील पुरवठ्याची साखळी टिकून राहते. ग्राहकाच्या पातळीवरही दूध महाग झाले तर पावडरचा पर्याय उपलब्ध राहतो. या पद्धतीने जगभरात, देशभरात पर्याय अवलंबले जात आहेत. फळे व भाजीपाल्यात नेमके याच व्यवस्थेचा अभाव आहे. दुधासारखीच विक्री व्यवस्था फळे भाजीपाला उत्पादनात उभारणे शक्य आहे.

या व्यवस्थेच्या संदर्भात मला पाण्याचे उदाहरण आठवते. पाण्याची गरज तर आपल्याला रोज लागतेच. ते पाणी आपल्याकडे कुठून येते? आपल्याकडे भारतात मोजके चार महिने पाऊस पडतो. आपली पाण्याची गरज मात्र बाराही महिने असते.

आपण पावसाचे वाया जाणारे पाणी अडवतो. त्यावर धरणे बांधतो. शहरे, गावे यांच्या मागणीचा विचार करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था उभारतो. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण आधीपासूनच दूध आणि पाण्याच्या वितरणाची व्यवस्था निर्माण केली आहे. तर फळ भाज्यांच्या संदर्भात आपण असा विचार करू शकत नाही का?

आपण पाणी, दूध याचे जसे नियोजन करतो तसे फळ भाजीपाल्याचे कधी केलेले नाही. त्याची तशी व्यवस्थाही आपण केलेली नाही. त्याचा परिणाम म्हणून अशा आपल्याकडे फळभाजी बाजारात अवघ्या ४० दिवसांत टोमॅटो फेकून देणे व तो महाग झाला म्हणून राग व्यक्त करणे अशी पूर्ण परस्परविरोधी परिस्थिती आपल्याकडे तयार होते.

ही परिस्थिती परत उदभवू नये असे जर वाटत असेल तर यात दुधासारख्या एकात्मिक यंत्रणा उभ्या करणे ही दिशा ठेवावी लागेल. ‘सह्याद्री‘मध्ये मागील पाच वर्षांपासून हा विचार प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. शेतकरी एकत्र येऊन तयार झालेली ‘सह्याद्री’ची सहकारी तत्त्वावरील व्यावसायिक यंत्रणा आहे.

निर्धाराची गरज

"निश्‍चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ" या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ‘सह्याद्री‘ म्हणून आम्ही फळे भाजीपाल्याची अशी एकात्मिक यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षांपूर्वी याबाबतचा जो निश्‍चय केला होता त्याची काही फळे आता दिसत आहे.

बाजारात भाव पडले तर शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला बाजारात संरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ग्राहकालाही सातत्याने चांगले उत्पादन उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून आम्ही आमची पावले टाकायला सुरुवात केली.

दुधाच्या धर्तीवर टोमॅटोमध्ये मागणी आणि पुरवठ्याचा समन्वय साधण्याचा मार्ग सह्याद्री फार्म्समध्ये आम्ही अवलंबित आहोत. स्वतंत्र हाताळणीची यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.भाव कोसळले तर प्रक्रियेवर भर दिला जातो व बाजारपेठेत भाव असेल तर प्रक्रियेऐवजी फ्रेश मालाची विक्री खुल्या बाजारात करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर असतो.

टोमॅटोतील वेगवेगळ्या ब्रीक्स प्रमाणानुसार त्याचे प्युरी, पेस्ट, पावडर या मध्ये त्यांचे रुपांतर करता येते. त्याची टिकवणक्षमता १२ महिने ते१८ महिने इतकी असते. मागील वर्षी सह्याद्रीने तीन हजार सभासदांचा टोमॅटो सहा हजार एकरावरील उत्पादनाची एकत्रित यंत्रणेमार्फत १.५ लाख टन टोमॅटो प्रक्रिया केला.

प्रक्रिया केलेल्या टोमॅटोची पेस्ट हिंदुस्थान युनिलिव्हर तसेच अन्य कंपन्यांनाही पुरवली जाते. प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्या उत्पादनाचा भाव वर्षभर स्थिर असतो. केचपची किंमत बदलत नाही. कारण तिची किंमत ही फ्रेश किंवा कच्च्या टोमॅटोवर अवलंबून नसते तर ती पेस्टवर अवलंबून असते. ती वर्षभर स्थिर असते.

जेव्हा ग्राहकाच्या पातळीवर टोमॅटो महाग असेल तेव्हा तेव्हा टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो पेस्ट वापरणे हा पर्याय तयार होतो. जसा दुधामध्ये दूध पावडरचा पर्याय तयार होतो. त्यामुळे ग्राहक काही महिने नियोजन करू शकतो.

गरजेनुसार तो फ्रेश टोमॅटो किंवा प्रक्रिया केलेले उत्पादन घ्यायचे हे तो त्याच्या क्रयशक्तीनुसार ठरवू शकेल. त्यात ग्राहकाच्या पातळीवर किंमत स्थिर होण्यास उत्तर सापडू शकते. तेच दर कोसळले तर प्रक्रियेमुळे शेतकऱ्याला किमान उत्पादन खर्च निघेल इतक्या तरी उत्पन्नाची शाश्‍वती मिळवता येते. ही किमान किंमत शाश्‍वत झाल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादनाचा उत्साह टिकून राहण्यास मदत होते.

सध्या टोमॅटोचे वाढलेले दर व त्यातून झालेल्या कोंडीकडे आपण इष्टापत्ती म्हणून पाहिले व दूध उद्योगातील मूल्य साखळीच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या मालकीच्या पीकनिहाय मूल्य साखळ्या भक्कमपणे उभ्या करण्यातच ग्राहक व शेतकऱ्यांचे हित दडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT