women Menstrual cycle period sakal
सप्तरंग

मासिक पाळीचा मागोवा घ्या!

काही वर्षांतील निरीक्षणांवरून दिसून आले आहे, की मासिक पाळीचा मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो.

अवतरण टीम

- डॉ. हिमानी शर्मा

काही वर्षांतील निरीक्षणांवरून दिसून आले आहे, की मासिक पाळीचा मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. मेजर डिप्रेशन डिसऑर्डर किंवा बायपोलर डिसऑर्डर अशा गंभीर मानसिक समस्या असलेल्या सुमारे ८० टक्के स्त्रिया तणावात असतात. मनःस्थितीत बदल होण्याचा त्रास त्यांना सतावू शकतो; पण तो टाळायचा असेल तर मासिक पाळीचा मागोवा घ्यायला हवा.

पाळी किंवा मासिक धर्म प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सर्वसामान्य टप्पा असतो आणि बहुतेक वेळा त्याचा त्रासही होत नाही; परंतु काही स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी हार्मोन्सच्या पातळीतील बदलांमुळे अनेक मज्जातंतू यंत्रणा सक्रिय होतात, ज्यामुळे वेदना आणि सूज अशी शारीरिक आणि मनःस्थितीत बदल अशी मानसिक लक्षणे उद्‍भवतात. मासिक पाळीदरम्यान रक्त कमी होण्याबरोबरच पेटके व स्नायू कडक होणे, स्तनांमध्ये वेदना आणि नाजूकपणा, खाण्याची लालसा, मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, थकवा, डोकेदुखी आणि सूज अशा समस्या जाणवतात.

गेल्या काही वर्षांतील अध्ययन आणि नैदानिक निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे, की मासिक पाळीचा मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे तणाव आणि इतर मानसिक समस्या उद्‍भवतात. दुर्दैव म्हणजे मानसिक आरोग्यावर उघडपणे बोलले जात नाही. दोन्ही गोष्टींमुळे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्या मुद्द्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

मासिक पाळीदरम्यान, स्त्रीच्या शरीरात हार्मोनल पातळी बदलणे त्यामागचे मुख्य कारण आहे. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील चढ-उतार सेरोटोनिनसारख्या मेंदूतील मनःस्थिती-नियमन करणाऱ्या रसायनांवर थेट परिणाम करतात. त्यामुळे मूड बदलणे, चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसून येतात.

अध्ययनातून असे दिसून आले आहे, की मासिक पाळीदरम्यान, हार्मोनल बदलांमुळे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) आणि त्याचे अधिक गंभीर स्वरूप म्हणजे प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (पीएमडीडी) उद्‍भवतात. त्यामुळे मानसिक आरोग्यावर आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे मासिक पाळीशी संबंधित मानसिक लक्षणे अधिक बिघडू शकतात.

‘पीएमएस’ ही एक व्यापक संज्ञा आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या तीव्रतेच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा समावेश होतो आणि त्यामुळे मासिक पाळीदरम्यान ८० टक्के स्त्रिया प्रभावित होतात. चारपैकी तीन स्त्रियांमध्ये आपल्या प्रजनन जीवनात कोणत्याही वेळी ‘पीएमएस’ची लक्षणे दिसून येतात, जशी की डोकेदुखी, मनःस्थिती बदलत राहणे आणि सूज. २०१३ मध्ये, प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (पीएमडीडी) नावाचा एक नवीन सिंड्रोम वैद्यकीय पुस्तकांमध्ये समाविष्ट झाला आहे.

‘पीएमडीडी’ ही मासिक पाळीच्या सामान्य हार्मोनल बदलांमुळे होणारी तीव्र भावनिक प्रतिक्रिया आहे, जी मासिक पाळी येणाऱ्या सुमारे सहा टक्के स्त्रियांना प्रभावित करते. त्याचा परिणाम स्त्रीच्या दैनंदिन कामकाजावर किंवा सामाजिक जीवनावर होऊ शकतो. पीएमडीडी असणाऱ्या महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये दुर्बल करणारे नैराश्य, तीव्र चिंता, मनःस्थितीत तीव्र बदल, अस्वीकृतीची संवेदनशीलता, गंभीर क्रोध आणि चिडचिडेपणा इत्यादींसारखी लक्षणे दिसतात.

स्त्रियांना अचानक उदास वाटू शकते किंवा रडू येऊ शकते. त्यांच्यात नैराश्य, चिंता, नाराजी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असल्यामुळे दैनंदिन कामांवरून इच्छा उडणे आणि गोंधळल्याची भावना अशी लक्षणे दिसू शकतात. त्यांना खूप झोप येते. हायपरसोम्निया किंवा निद्रानाश किंवा इन्सोम्नियामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. असा सिंड्रोम मासिक पाळीच्या एक आठवडा आधी सुरू होतो. त्यानंतर एक आठवड्यापर्यंत टिकून राहतो.

‘पीएमडीडी’वर औषधोपचार केला जाऊ शकतो आणि लक्षणांच्या तीव्रतेनुसार डॉक्टर अँटीडिप्रेसस, गर्भनिरोधक गोळ्या किंवा न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स लिहून देऊ शकतात. कॉग्निटिव्ह-बिहेव्हियरल थेरपी (सीबीटी) सारख्या थेरपी अशा वेळी प्रभावी ठरतात. कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे, धूम्रपान थांबवणे आणि चांगली झोप घेणे व व्यायाम करणे अशा प्रकारे आहार आणि जीवनशैलीत बदल केला पाहिजे.

ध्यानधारणेसारख्या मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोष्टी केल्याने मदत होते. तुमच्या मासिक पाळीचा मागोवा घेत जा, जेणेकरून तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यावरील बदलांचा सामना करण्यासाठी रणनीती आखू शकता आणि तयारीदेखील करू शकता. तुम्हाला दर महिन्याला त्रास सहन करावा लागू नये म्हणून तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन करतील.

ज्या स्त्रियांना मानसिक आरोग्याच्या समस्या पूर्वी होत्या किंवा आता सतावत आहेत, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण मासिक पाळीपूर्वी त्यांच्यामधील लक्षणे अधिक बिघडू शकतात, ज्यास प्रीमेनस्ट्रुअल एक्झार्सबेशन (पीएमई) असे म्हणतात. अध्ययनातून असे दिसून आले आहे, की मेजर डिप्रेशन डिसऑर्डर किंवा बायपोलर डिसऑर्डर अशा गंभीर मानसिक समस्या असलेल्या सुमारे ८० टक्के स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित मनःस्थितीत बदल होण्याचा त्रास सतावू शकतो.

स्किझोफ्रेनिया असणाऱ्या स्त्रियांमध्ये, मासिक पाळीपूर्वी होणाऱ्या हॅल्युसिनेशन्ससारख्या मानसिक लक्षणांची तीव्रतादेखील उद्‍भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये अधिक काळजी घेणे आणि गरज लागली तर औषधांमध्ये योग्य बदल करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

जगभरात दर महिन्याला मासिक पाळी येणाऱ्या महिलांची संख्या १.८ अब्ज एवढी आहे! त्यांपैकी अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान मानसिक समस्या सतावतात. म्हणून त्याची कारणे समजून घेणे आणि लक्षणांवर उपचार करण्यासाठी कृती करणे महत्त्वाचे आहे. मॉडर्न मेडिसीनमुळे महिलांना दर महिन्याला त्रास सहन करावा लागत नाही. आपण त्यावर उघडपणे चर्चा केली पाहिजे आणि जनजागृती करायला हवी, जेणेकरून महिलांची अनावश्यक त्रासापासून सुटका होईल.

drhimani_s@apollohospitals.com  

(लेखिका नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोगावरील वरिष्ठ सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टीने 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाजगी विमानाचं ईम्मर्जन्सी लँडिंग

अखेर तारक मेहतामधील भिडेंची सोनू अडकणार लग्नबंधनात ! टप्पूशी नाही तर या क्रिएटरशी डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

३८ चेंडूंत १७८ धावांचा पाऊस! RCB चा निर्णय चूकला, संघातून रिलीज केलेल्या Mahipal Lomror चे खणखणीत त्रिशतक

Mallikarjun Kharge: खर्गेंच्या सभेचा मंडप कोसळला! त्र्यंबकेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT