traditional grains almost disappeared farmer agriculture weather sakal
सप्तरंग

परंपरागत धान्ये गेली कुठे ?

आपल्या जेवणातून पारंपरिक धान्यप्रकार जवळपास बाद झाले आहेत.

अवतरण टीम

आपल्या जेवणातून पारंपरिक धान्यप्रकार जवळपास बाद झाले आहेत.

- किशोर रिठे

आपल्या जेवणातून पारंपरिक धान्यप्रकार जवळपास बाद झाले आहेत. त्यामुळे आपला खास भारतीय आहार आणि खाद्य पदार्थात किती वैविध्य होते, त्याविषयी नव्याने उजळणी करण्याची गरज आहे. हे वर्ष पारंपरिक ‘धान्य वर्ष’ म्हणून साजरे होत असताना आपल्या दैनंदिन आहारातून काय हरवले आहे, याची जाणीव व्हावी, ही अपेक्षा आहे.

संपूर्ण भारताचा विचार केल्यास दक्षिण भारत, मध्य भारत, उत्तर भारत व ईशान्येकडील राज्ये या प्रत्येक भागात शेतजमिनीची उपलब्धता, जमिनीचा पोत, हवामान व पर्जन्य यात वैविध्य आहे. त्यानुसारच तेथील शेतकरी हे त्या भागात होऊ शकणारी स्थानिक पिके घ्यायचे.

त्यामुळे भारतात तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जवस, तीळ अशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जायची. यासोबतच कोदो, कुटकी, सावा, जिगणी, राजगिरा अशी अनेक माहिती

नसलेली पिकेही घेतली जायची. ही यादी खूप लांब आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पिके आमच्या भारतीय जनतेच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असणारी होती.

महाराष्ट्रातील मेळघाटसारख्या पर्वतीय प्रदेशात कोदो मिलेटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायचे, आज ते धोक्यात आले आहे. कोदो मिलेट हा भरड धान्य गटाचा प्रकार असून तो अगदी गहू किंवा तांदळाप्रमाणे वापरला जाऊ शकतो.

त्यात प्रथिने, फायबर आणि लोह हे खूप जास्त असते. आपण भात शिजवितो तसा कोदो शिजविला जातो. पांढऱ्या तांदळापेक्षा कोदो अधिक संतुलित आणि पोषक आहार असून तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, हृदयासंबंधित रुग्णांसाठी कोदो उपयुक्त आहे. कोदो मिलेटची लागवड भारत आणि नेपाळमध्ये सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते. पीक तयार होते तेव्हा कोदोचे दाणे लाल आणि तपकिरी होतात.

त्याचा वापर करण्यापूर्वी त्याचे टरफल काढून टाकणे आवश्यक आहे. आपण नाचणी जशी भरडून घेतो तसे कोदो मिलेट भरडून घ्यावे लागते. त्यामुळे ते लाल रंगाच्या तांदळासारखे दिसतात. वैशिष्ट्य म्हणजे ते उपवासालासुद्धा खाता येते.

असेच महात्म्य कुटकी सावा, जिगणी, राजगिरा, नाचणी, ज्वारीचे पारंपरिक वाण यांचेही आहे; परंतु आज गहू, तांदूळ व थोडीफार ज्वारी सोडले तर यातील अनेक पिके घेणे आता बहुतांश भागात बंद झाले आहे. याची कारणमीमांसा करायची झाल्यास तो खूप मोठ्या संशोधनाचा भाग होईल.

मुख्यत्वे नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा झालेला कल आणि वन्यप्रण्यांचा वाढलेला हैदोस यामुळे यातील अनेक पिके घेणे शेतकऱ्यांना कठीण होऊ लागले. एकीकडे पारंपरिक पिके घेणे कठीण झाले असताना त्यांचे बाजारमूल्यही फार काही वाढले नाही.

त्यामुळे त्यांच्या तुलनेत जास्त आर्थिक फायदा मिळवून देणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. सध्याच्या जाहिरातीच्या युगात तर या स्थानिक पारंपरिक पिकांचा टिकाव लागणे आणखीच कठीण होऊन बसले. परंपरागत धान्ये, स्थानिक फळे, पालेभाज्या या वापरण्यापेक्षा या जाहिरातींचा प्रभाव असलेल्या गोष्टींचा वापर करतो.

मग बदाम खा, सफरचंद खा, ब्रोकोली खा, ओट्स खा असे सल्ले भारतात दिले जातात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ओट्‌सपेक्षा आपली धान्ये जास्त उपयुक्त आहेत. आपल्याकडील ५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या या परकीय फूल-फळ-भाज्यांपेक्षा जास्त पौष्टिक आहेत.

पाश्चात्त्यांनी आपल्याला लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाईंड तांदूळ खायला शिकवले. स्वतः मात्र पांढरा तांदूळ आरोग्याला घातक असल्याने आज लाल तांदूळ खायला लागले. असे बऱ्याच धान्यांबद्दल सांगता येईल.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद मानवी खाद्य व त्यांची पौष्टिकता यामध्ये काम करते. या संस्थेने भारतीय परंपरागत कडधान्ये आणि त्यांचा आपल्या जेवणात आवश्यक असणारा दैनंदिन वापर यावर भर दिला आहे.

त्यांच्या मते, ओट्सपेक्षा (३६१) अधिक आरोग्यदायी उष्मांक बाजरीतून (३८९) मिळतात. ओट्सहून (११) अधिक चोथा बाजरीमधून (११.३) मिळतो. हाडांना पोषक असलेले १०० ग्रॅम तीळ भारतीय गरीब माणसाला दिवसभरातून खाता येतील.

आम्हाला अत्यावश्यक असणारी कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात. पण हे सर्व जाहिरातीतून आम्ही सांगत नाही.

सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणारच! म्हणूनच परकीय खाद्यान्नातून होणारे देशाचे आर्थिक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके हे समाजासमोर येणे आवश्यक आहे.

२०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३ हजार ५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लिटरमागे अगदी वीस टक्के - म्हणजे २०० रुपये फायदा आहे,

असे गृहीत धरले तरी १३ हजार ५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रुपये इतका फायदा परकीय विक्रेत्यांना होईल. आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे.

तो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा हा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.

आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती लाभलेल्या भारतीयांनी ‘मिलेट वर्षा’निमित्त याचा विचार करणे आवश्यक आहे. आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्यास काहीच हरकत नाही.

मात्र, तो आपल्या आहाराचा भाग बनता कामा नये. आयुर्वेदानुसार जो आहार निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच, उलट ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.

आमचे कीटक व पक्षी हेसुद्धा या पारंपरिक धान्य प्रकारांवर अवलंबून होते. आज ही पिकेच नष्ट होत असल्याने या पक्ष्यांची संख्यासुद्धा घसरली आहे. आपण नाचणी, बाजरी, कोदो, कुटकी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल. भारतात जेथे जेथे अशी पिके अद्यापही काढली जातात, तेथे तेथे त्यांना उत्तेजन देणे आवश्यक आहे. जे लोक या पिकांच्या बिजांचा संग्रह करतात, त्यांनाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

‘मिलेट वर्षा’निमित्त आम्ही आपल्या मातीत पिकणारेच पारंपरिक धान्य खाणार, असा संकल्प करण्याची गरज आहे. त्यासाठी थोडी जास्त किंमत देऊन आम्ही आमच्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देऊया. तरच आमची पारंपरिक पिके वाचविणे शक्य आहे, अन्यथा केवळ ‘मिलेट वर्षा’चे कार्यक्रम घेऊन काहीही साध्य होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT