War sakal
सप्तरंग

जागतिक शांततेची शोकांतिका

निळू दामले

जागतिक शांततेचे प्रयत्न हा केवळ दिखावाच आहे. जगभरात विविध ठिकाणी संघर्षामुळे होणारी हानी दिसत असतानाही शस्त्रस्पर्धा कमी झाली नसल्याचे दिसते. एकीकडे शांततेसाठी प्रयत्न केले जात असताना जगातील नऊ अण्वस्त्रक्षम देशांनी आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला असल्याचे ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च’ संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. या नऊ देशांनी २०२३ मध्ये आपल्या अण्वस्त्रांसाठी एकूण १०.७ अब्ज डॉलरहून अधिक खर्च केल्याचे हा अहवाल सांगतो. ही एक प्रकारची शांततेची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

साधारण शंभर वर्षांपूर्वी १९१४ मध्ये ऑस्ट्रियाच्या सरदाराचा खून झाला आणि पहिलं महायुद्ध सुरू झालं. जर्मन, इटालियन, ऑटोमन ही साम्राज्यं एका बाजूला होती; तर ब्रिटिश, फ्रेंच, रशियन, अमेरिकन इत्यादी दुसऱ्या बाजूला... आजच्या हिशेबात माणसं मारण्याची तंत्रं अगदीच प्राथमिक होती. तोफा, रणगाडे आणि बंदुका. सैनिक खंदकात उतरून स्वतःचं संरक्षण करत. १९१४ ते १९१८ अशी चार वर्षं युद्ध चाललं.

एक कोटी ६० लाख माणसं मरण पावली. जखमींची संख्या सोडून देऊ या. या युद्धात ब्रिटिशांच्या वतीने भारतीय सैनिकही लढले. ४८ हजार भारतीय सैनिक मारले गेले. युद्धाच्या काळात साम्राज्यं कोसळली. ऑटोमन साम्राज्याचे तुकडे झाले. जर्मन साम्राज्य मोडलं. रशियन साम्राज्य मोडून तिथं कम्युनिस्ट सिंहासनावर बसले.

१९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धात जर्मनी दुखावला होता. युद्धाची भरपाई त्याला करावी लागत होती. अपमान झाल्याची भावना जर्मन राज्यकर्त्यांत तयार झाली होती. पहिल्या युद्धातल्या अपमानाचा बदला घ्यायची सुरसुरी जर्मनीला आली होती. जर्मनीने आक्रमण करून पोलंडचा प्रदेश बळकावल्यावर युद्धाला सुरुवात झाली. जगभरातले तीसेक देश युद्धात उतरले. १९४५ मध्ये युद्ध संपलं. युद्धात नऊ कोटी माणसं मारली गेली.

अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. अडीच लाख माणसं मरण पावली. तीन दिवसांनी नागासाकीवर बॉम्ब टाकला. तिथे दीड लाख माणसं मृत्युमुखी पडली. खरं म्हणजे हे बॉम्ब टाकण्याआधीच जर्मनीचा पाडाव झाला होता. युद्ध संपल्याची अधिकृत घोषणा होणं बाकी होतं; पण अमेरिकेला आपली ताकद तपासायची होती, सिद्ध करायची होती. आपल्या बॉम्बची ताकद किती आहे ते पाहायचं होतं. या युद्धाच्या दरम्यान जर्मनीने ६० लाख ज्यू मारले.

शांतता नांदावी, हिंसा न होता संघर्ष मिटवावेत, यासाठी पहिलं महायुद्ध संपल्यानंतर १९२० मध्ये लीग ऑफ नेशन्स ही संघटना तयार झाली. या संस्थेत, संघटनेत ५८ देश सहभागी होते. संस्थेतले मुत्सद्दी, विचारवंत, वकील इत्यादी नाना करार करत होते. युद्ध झालंच तर ते कमी तीव्र असावं, यासाठी बंधनं आखत होते. अर्थात याचा उपयोग झाला नाही.

एकीकडे ‘लीग ॲाफ नेशन्स’मध्ये देश चर्चेचं गुऱ्हाळ चालवत होते, दुसरीकडे त्या देशातले पुढारी आपापले पूर्वग्रह कुरवाळत पुन्हा केव्हा युद्ध करता येईल, याची वाट पाहत होते. अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर बॉम्ब टाकला. ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर बॉम्बवर्षाव केला. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी युनायटेड नेशन्सची स्थापना केली. चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्याबरोबर अमेरिका युनायटेड नेशन्सचा संस्थापक सदस्य होता.

दुसरे देश बळकावणं हा कुठल्याही युद्धाचा प्रमुख उद्देश असतो. दोन्ही महायुद्धं त्यातूनच झाली. करोडो माणसं मारली गेली; पण देश बळकावण्याची खुमखुमी संपली नाही. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी युनायटेड नेशन्सची स्थापना आणि ३० नोव्हेंबर १९४७ रोजी इस्राईलची स्थापना झाली. पॅलेस्टाईनमध्ये बाहेरून आलेल्या ज्यू लोकांना इस्राईल नावाचा देश युनायटेड नेशन्सने तयार करून दिला.

जर्मनी-रशियाने लाखो ज्यू मारले होते, लाखो ज्यू बेघर केले होते. ज्यूंना एक स्वतःचं घर द्यावं, असं लोकांना वाटलं. युरोपातल्या कुठल्याही देशात, फ्रान्समध्ये किंवा ब्रिटनमध्ये किंवा विशाल अमेरिकेत त्यांना कोणी जागा करून दिली नाही. ती जागा पॅलेस्टाईनमध्ये निर्माण केली. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. तिथे राहणाऱ्या मूळ रहिवाशांचं काय करायचं, याचा विचार केला नाही.

युनायटेड नेशन्स इस्राईलनिर्मितीची घोषणा करून मोकळं झालं. इस्राईल व अरब देश यांच्यात संघर्ष सुरू झाला. दोन वर्षांच्या काळात दोन्ही बाजूंचे २६ हजार नागरिक मारले गेले आणि सात लाख पॅलेस्टिनी बेघर झाले. युनायटेड नेशन्समध्ये चर्चा आणि ठरावांचं गुऱ्हाळ सुरू झालं.

युनायटेड नेशन्सच्या संस्थापक देशांनीच देश बळकवायला सुरुवात केली. कोरियाचा उत्तर भाग रशिया-चीन यांनी बळकावला आणि दक्षिण भाग अमेरिकेने. २५ जून १९५० रोजी उत्तर कोरियाने (म्हणजे रशिया आणि चीनने) दक्षिण कोरियात (म्हणजे अमेरिकेच्या प्रदेशात) सैन्य घुसवलं आणि युद्धाला सुरुवात झाली. तीन वर्षं कोरियातील युद्ध चाललं. ३० लाख नागरिक मरण पावले. कोरियाची दक्षिण आणि उत्तर अशी विभागणी झाली. २७ जुलै १९५३ रोजी कोरियन युद्ध संपलं.

१ नोव्हेंबर १९५५ रोजी व्हिएतनाम युद्ध सुरू झालं. खेळाडू तेच... चीन, रशिया आणि अमेरिका. व्हिएतनामच्या उत्तर भागात कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं, त्यांना चीन आणि रशियाचा पाठिंबा होता. दक्षिण व्हिएतनाममध्ये कम्युनिस्टविरोधक होते. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा. लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम आणि अमेरिका अशा चार देशांचे मिळून ३५ लाख नागरिक मरण पावले.

तिकडे ‘युनो’त चर्चा, शांततेचे ठराव होतच होते. व्हिएतनाममध्ये युद्ध खेळणाऱ्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना (हेन्री किसिंजर) युनायटेड नेशन्सने शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं. व्हिएतनाम युद्घ १९७५ मध्ये संपलं.

१९८० च्या सप्टेंबर महिन्यात इराकने इराणवर हल्ला केला. इराक-इराण युद्ध सुरू झालं. इराक हा प्रामुख्याने सुन्नींचा देश. इराणवर शियांची सत्ता. इराकला भीती वाटली, की इराणी धर्मनेते रुहोल्ला खोमेनी त्यांचा शिया पंथ इराकमध्ये पसरवतील. त्यातून युद्ध सुरू झालं. १९८८ मध्ये ते संपलं. १२ लाख माणसं मारली गेली.

युद्धं सुरू झाली तेव्हापासून युनायटेड नेशन्स ठराव पास करत होतं. युद्ध थांबवा म्हणत होतं. करारांच्या ढेपाच्या ढेपा तयार झाल्या. रशियाने युक्रेनवर २०२२ च्या फेब्रुवारीत आक्रमण केलं. रशिया त्याला आक्रमण म्हणत नाही. रशियाच्या मते, ती विशेष कारवाई आहे. रशियाचं म्हणणं असं की युक्रेन हा देश नाझी आहे. तो नेटो या रशियाविरोधी लष्करी गटात सामील झाला आहे. नाझींचा नायनाट करणं आणि आपल्याशी शत्रुत्व करणाऱ्या गटात जाणाऱ्यांचा बंदोबस्त करणं या योग्य कारणांसाठी आपण हल्ला केलाय, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं म्हणणं आहे.

रशिया टप्प्याटप्प्याने असा उद्योग करत आलाय. जॉर्जिया आणि क्रायमिया हे युक्रेनचे प्रदेश रशियाने आधीच गिळले आहेत.

युक्रेन हा एकेकाळी रशियन साम्राज्याचा आणि नंतर कम्युनिस्ट सोव्हिएत साम्राज्याचा भाग होता. त्यामुळे मुळात युक्रेन आपलाच आहे, असं रशियाचं म्हणणं आहे. गंमत अशी की आता रशियात झार सम्राटही नाही आणि कम्युनिस्ट सोव्हिएत सत्ताही नाही. या युद्धात आतापर्यंत सुमारे पाच लाख नागरिक ठार झाले आहेत. युरोपात युक्रेन युद्ध; तर मध्य पूर्वेत गाझा युद्ध...

पॅलेस्टाईन-इस्राईल संघर्ष १९४७ मध्ये सुरू झाला आणि आजही तो धुमसतो आहे. गाझा पट्टी आणि वेस्ट बँक या पॅलेस्टिनी वस्त्यांना इस्राईल मुक्तपणे जगू देत नाही. त्यांना सार्वभौम देश म्हणून जगू देत नाही. त्यांना इस्राईलच्या मेहेरबानीवरच जगावं लागतं. त्यामुळे पॅलेस्टिनी जनतेत एक असंतोष धुमसत असतो. या असंतोषाला मिळालेलं हिंसक वळण म्हणजे हमास ही संघटना.

पॅलेस्टाईनला सार्वभौमत्व मिळालं पाहिजे असं या संघटनेचं म्हणणं. इस्राईलच्या दादागिरीला आपण हिंसात्मक प्रतिसादही देऊ, असं त्यांचं म्हणणं. त्यासाठीच हमासने ऑक्टोबर महिन्यात इस्राईलमध्ये घुसून अपहरण केलं, माणसं मारली... अपहरणाचं निमित्त करून इस्राईलने गाझा संपवायचा बेत आखला. गाझावर आक्रमण सुरू केलं. आतापर्यंत गाझातली सुमारे ४० हजार माणसं मारली गेली आहेत.

१९४७ पासून पॅलेस्टाईन प्रश्नावर युनायटेड नेशन्स ठराव करतंय. नुकताच त्यांनी ठराव करून पॅलेस्टाईन हा स्वतंत्र देश स्थापन करावा, असा ठराव केला आहे. इस्राईल ठराव जुमानत नाही. युनायटेड नेशन्स हा दात पडलेला सिंह आहे, तो फक्त गुरगुर करतो. तिकडे आफ्रिकेत स्वतंत्र हिंसा चालूच आहे. काँगोत एव्हाना कोटीभर माणसं सहज मरण पावली असतील. रवांडातही काही लाख माणसं मृत्युमुखी पडली.

लीबिया, सुदान, इथिओपिया हे देशही लाखो माणसं मारत असतात. ...तर अशी आहे जागतिक शांततेची स्थिती. एखादा स्वित्झर्लंडसारखा देश सोडला, तर जगातले सर्व देश अशांतता माजवण्यात या ना त्या स्वरूपात सामील असतात. सर्व देश आपल्याला शांतता हवी आहे, असं म्हणतात; पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी अशांतता निर्माण करण्यात गुंतलेले असतात. साऱ्या जगालाच एखादा असा नेता हवा आहे जो देशांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन सारं जग नीट करू शकेल.

damlenilkanth@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक आणि समीक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT