Treatment before damage by Dr Hemant Ostwal Nashik news esakal
सप्तरंग

डॅमेजपूर्वीच ट्रीटमेंट; रामबाण औषध

सकाळ डिजिटल टीम

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

मला काही गंभीर आजार होऊ शकतो आणि हे मला माहीत पडले तर ते माझ्यासाठी फारच उपयुक्त असेल. कारण कुठलाही मोठा डॅमेज होण्याआधी माझी योग्य अशी ट्रीटमेंट झालेली असेल, अशी मानसिकता स्वीकारण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. कुठलाही आजार मला कशाला होईल? तो याला होईल, तो त्याला होईल, तो आमक्याला होईल, तो फलाण्याला होईल, मी तर इतका फिट आहे माझे सर्व काही कसे चांगले चालले आहे. त्यामुळे मला असला काही आजार होऊच शकत नाही या गोड गैरसमजुतीमध्ये अनेक चांगली चांगली मंडळी अडकलेली असते आणि मग अशा ठिकाणी घातक आजार घाला घालत असतात.

आमच्या घरातीलच अत्यंत थरारक प्रसंग. खरंतर या प्रसंगाची सुरवात कुठून करावी हाच मोठा अवघड प्रश्न आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये मी माझी स्वतःची हृदयविकाराची (heart disease) पडताळणी करून घेण्याचे ठरविले. मी स्वतः माझ्या वयाच्या बत्तिशीपासून म्हणजे १९९५ पासून दर सहा महिन्याला मी माझा संपूर्ण हेल्थ चेकअप करून घेत आलोय. यामध्ये माझ्या वयाच्या ४४ व्या वर्षी सिटी गाइडेड कार्डिॲक ॲन्जिओग्राफीदेखील (Cardiac Angiography) केलेली आहे. यामध्ये अजून एक स्ट्रेस थॅलियम नावाची टेस्ट २००९ व २०१४ मध्ये केलेली होती, अर्थातच त्या वेळेपर्यंतच्या सर्व तपासण्या नॉर्मल आलेल्या होत्या. आता कुणासही असा प्रश्न पडू शकतो की वयाच्या बत्तिशीपासूनच एवढ्या साऱ्या तपासण्या कशासाठी? यासाठी मला आपणा सर्वांना माझ्या पूर्वायुष्यात घेऊन जायला लागेल. माझे वडील म्हणजे (स्व.) श्री. पवन सर (पवनलालजी चंदुलालजी ओस्तवाल) वयाच्या ४६ व्या वर्षी अचानक बसल्याजागी (म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑन द स्पॉट असे म्हणतो) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडले होते.

त्याआधी त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, कुठल्याही प्रकारच्या वाईट सवयी (ज्याला आपण असे म्हणतो की सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही) नव्हत्या. थोडक्यात काय तर कोणी स्वप्नातही अंदाज करू शकत नव्हता की, पवन सरांना असा जीवघेणा ऑन द स्पॉट घेऊन जाणारा हार्टअॅटॅक येईल; परंतु दुर्दैवाने आमचे वडील असे अचानक १९८६ मध्ये आम्हाला सोडून इहलोकीच्या यात्रेला निघून गेले. गोष्ट इथेच थांबत नाही, तर वडिलांच्या पाठोपाठ माझे सख्खे चुलते म्हणजे वडिलांचे सख्खे मोठे भाऊ मोजून वडील गेल्यानंतर फक्त दोनच वर्षांनी याच पद्धतीने ऑन द स्पॉट कुठलाही आजार नसताना मृत्युमुखी पडले होते. त्यांचे वय फक्त पन्नास होते. त्यांच्याहूनही मोठे वडिलांचे सख्खे भाऊ तेही त्यानंतर काही वर्षांनी याच पद्धतीने (अगदी काहीच बदल नाही) स्वर्गवासी झाले. माझ्या तीन आत्यांचा कमी-अधिक पद्धतीने असाच मृत्यू झाला.

थोडक्यात काय तर, आमच्या ओस्तवाल परिवारामध्ये तीही खासकरून अकाली वयामध्ये पुरुषांमध्ये हृदयविकाराची फार मोठी टेंडन्सी होती, जी आमच्या पिढीलाही लागू होत होती. मेडिकल सायन्स असे म्हणते, की पुढच्या पिढीमध्ये हा आजार दहा वर्षे लवकर येण्याची शक्यता असते, म्हणून आम्हाला हा धोका वयाच्या अगदी ३५-३६ पासूनच होता. मी अगदी सकारात्मकपणे वयाच्या बत्तिशीपासून माझ्या सर्व तपासण्या करून घेत होतो, पण मी नुसतीच आरोग्य तपासणी करून घेत होतो असे नव्हे तर फिजिकल फिटनेससाठी मी अतिशय आनंदाने अव्याहतपणे प्रयत्न, मेहनत करीत होतो. १९८० पासून तर आजतागायत माझा वर्कअप सकाळी दोन तास महिन्यातले २८ दिवस कमीत कमी होतच असतो. त्यामध्ये कधी पोहणे, तर कधी बॅडमिंटन, तर कधी रनिंग, तर कधी चालणे, याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही. या सगळ्या गोष्टी अव्याहतपणे सुरूच होत्या आणि सुरू राहतील पण याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टीवर मी संपूर्ण आयुष्यभर लक्ष केंद्रित करीत आलो आहे, ती म्हणजे, सकारात्मकता सकारात्मकता आणि सकारात्मकता सकारात्मकता ही नुसतीच बोलून होत नसते तर खऱ्या अर्थाने मनापासून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये वापरायची असते.

कदाचित त्यामुळेच वयाच्या ५७ पर्यंत मला सर्व रिपोर्ट अगदी छान येत होते. अशीच सर्वांगीण तपासणी मी फेब्रुवारी २०१९ मध्ये करून घ्यावयाचे ठरविले. त्याच वेळी माझ्या मनामध्ये एक विचार आला, की या वेळी माझ्याबरोबरच माझा लहान बंधू म्हणजे पुष्कराज (ज्याला सर्व जण संजय नावाने ओळखतात)ची संपूर्ण तपासणी माझ्याबरोबरच का नाही करून घ्यावयाची, कारण त्यालाही आनुवंशिकतेने येणारा हृदयविकाराचा धोका हा माझ्या एवढाच होता तसा तोही अधूनमधून त्याच्या तपासण्या करूनच घेत होता, अर्थातच माझ्या एवढ्या सखोल नव्हे. त्याचा स्ट्रेस थॅलियम एकदाही झालेला नव्हता. तसा त्याला कुठलाही आजार नव्हता. कुठलाही रिस्क फॅक्टर नव्हता. त्याला कुठलाही त्रास होत नव्हता. तोही रोज बऱ्यापैकी चालण्याचा व्यायाम करीतच होता, अर्थात माझ्याएवढा वेळ आणि त्यामध्ये माझ्यासारखा नियमितपणा नक्कीच नव्हता. सातत्य नव्हते, परंतु त्रास पण नक्कीच काही नव्हता. आमच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या आणि त्याच्या संपूर्ण तपासण्या करून घेतल्या, ज्या की अर्थातच संपूर्ण नॉर्मल व्यवस्थित होत्या.

आता फक्त स्ट्रेस थॅलियमची तपासणी बाकी होती, जी मी मुंबईत करून घेण्याचे ठरविले होते. तशी कल्पना संजयलादेखील दिली. मला तर संजयने काहीच उलट उत्तर न देता ‘हो’ सांगितले; परंतु त्याने आमच्याच हॉस्पिटलमधील अजून दोन फिजिशियन्स व दोन कार्डिओलॉजिस्टशी चर्चा केली. सर्वांनी त्याला एकमुखाने सांगितले, की ना तर तुला ना तर तुझ्या भावाला म्हणजे मला या मोठ्या तपासणीची गरज आहे. तुमचे सगळे रिपोर्टस अगदी व्यवस्थित आहेत आणि ते खरेही होते. कारण एक फक्त स्ट्रेस थॅलियम वगळता सर्व टेस्ट जशा की सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या टू डी इको कॉम्प्युटराइझ स्ट्रेस टेस्ट ईसीजी इत्यादी आमच्या केलेल्या होत्या, ज्या की अगदीच व्यवस्थित होत्या आणि प्रथमदर्शनी आम्ही दोघेही अतिशय फिट दिसत होतो. तरीही मी कोणाचेही न ऐकता स्ट्रेस थॅलियम तपासणी करण्यावर ठाम होतो. संजयचा येथे नाइलाज झाल्यावर त्याने जिथे त्याचा वशिला चालतो आणि जिथले मलाही ऐकायला लागते ते म्हणजे आमचे गृहमंत्री म्हणजेच आमच्या सौभाग्यवती सौ. सुरेखा, तर संजयने सुरेखाकडे वशिला लावण्याचा प्रयत्न केला, ‘भाभी मला तर काही त्रास नाही ना. मी एकदम फिट आहे.

माझ्या जवळपास सगळ्या तपासण्या अगदीच व्यवस्थित आहेत मग भाऊ मला का त्रास देतो. खरोखर त्या तपासणीची गरज आहे का? तुम्हाला का तो नेत नाही, मलाच का बरे? माझ्याऐवजी तुम्ही जा ना. मला नाही करावयाची ती तपासणी,’ असा त्रागा कम संताप कम वशिला लावण्याचा प्रयत्न आमच्या संजयने करून बघितला; परंतु मी मात्र माझ्या तपासणी करून घ्यावयाच्या निर्णयावर ठाम होतो आणि त्याप्रमाणे संजयला जवळपास बळजबरीने घेऊन मुंबईला २७ फेब्रुवारी २०१९ ला गेलो आणि तेथे आम्हा दोघा भावांच्या स्ट्रेस थॅलियमची टेस्ट करून घेतली. टेस्ट रिपोर्ट तीन-चार दिवसांनी आले. अपेक्षेनुसार माझा रिपोर्ट व्यवस्थित नॉर्मल आला; परंतु आश्चर्यजनकरीत्या संजयचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह म्हणजे इथे त्याचा अर्थ खराब असा होतो, असा आला होता. आता वेळ आली होती पुढच्या तपासण्या करण्याची. मी आमच्या हॉस्पिटलमधील दोन कार्डिओलॉजिस्टशी चर्चा केली. अजूनही ते दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या मते पुढची तपासणी म्हणजेच रेग्यूलर ॲन्जिओग्राफीची गरज नाही, ही तपासणी म्हणजे स्ट्रेस थॅलियम कशी फॉल्स पॉझिटिव्ह येऊ शकते हे मला समजावून सांगण्याचा असफल भरपूर प्रयत्न केला. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम, त्यात काडीचाही बदल झालेला नव्हता. यामुळे एक गडबड नक्कीच झाली होती, ती म्हणजे, आमचे भाऊसाहेबदेखील ॲन्जिओग्राफी न करण्याबद्दल ठाम झाले होते. एका दृष्टीने त्याचेही बरोबरच होते, कारण

नंबर एक त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता.

नंबर दोन त्याचे आतापर्यंतचे सर्व रिपोर्टस अगदी नॉर्मल चांगले होते.

नंबर तीन दोन कार्डियोलॉजिस्ट + दोन फिजिशियन ही सर्व मंडळी छाती ठोकून गरज नाही म्हणून सांगत होती.

नंबर चार नाही म्हटले तरी ॲन्जिओग्राफीची भीती व त्यातून होणारा किरणोत्सर्ग.

नंबर पाच त्याचा स्वतःचा असलेला तपासण्या ना करण्याचा माइंडसेट.

या सगळ्या पार्श्वभूमीवर माझे काम अतिशय अवघड झाले होते आणि नुसतेच संजयला समजावयाचे नव्हते तर मला आता घरातील सर्व व्यक्तींनादेखील समजावून सांगायला लागणार होते. आता जणू काही माझीच कठीण परीक्षा होती, कारण माझ्यातला सिक्स्थ सेन्स मला आतून काही वेगळ्याच सूचना देत होता.

सुदैवाने संजयने आणि घरातील सर्वांनी माझे समजावून सांगणे ऐकून घेतले व फॉलो करण्याचेदेखील ठरविले. शेवटी एकदाची ॲन्जिओग्राफी आम्ही केली. तुम्हास आश्चर्य वाटेल, आमचे कार्डिओलॉजिस्ट संजयला टेबलावर घेण्याआधीदेखील मला समजावून सांगत होते, की सर काहीच निघणार नाही, काहीच निघणार नाही, निघाला तर एखादा चिंटू ब्लॉक निघेल. काही टेन्शन घेऊ नका वगैरे वगैरे. असा एवढा मोठा घटनाक्रम घडत घडत शेवटी एकदाची ॲन्जिओग्राफी झाली आणि आता मात्र पाळी होती आश्चर्यचकित होण्याची, ती म्हणजे, आमचे संजूभाऊ स्वतः, दोन्ही कार्डिओलॉजिस्ट, दोन्ही फिजिशियन आणि आमच्या घरातील फॅमिली मेंबर्सची. कारणही तसेच मोठे होते. संजूभाऊच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जबरदस्त मोठे ब्लॉकेजेस तीन ते चार ठिकाणी होते. ब्लॉकेजेस किती मोठे असावेत बरे? तर संपूर्ण रक्तवाहिनीची वाहिनी ब्लॉक म्हणजेच ॲन्जिओप्लास्टी करण्याचा मार्गदेखील उपलब्ध नव्हता. कारण एवढे मोठाले स्टेंट्स मिळतच नाहीत आणि कोणी टाकूही शकत नाही. एकमेव पर्याय म्हणजे इमर्जन्सी त्वरित बायपास इतके वाईट ब्लॉकेजेस संजूभाऊंच्या हृदयामध्ये निघाले होते. हार्टॲटॅक यायलाही फार दिवस उरलेले नव्हते.

आश्चर्यजनकरीत्या संजूभाऊंना कुठलाही त्रास नव्हता. मात्र संजूभाऊंना जर हार्टअॅटॅक आला असता तर मात्र जगण्याची शक्यता फारच कमी होती. पुन्हा एकदा आमच्या ओस्तवाल परिवाराची आनुवंशिकता सिद्ध झाली होती. आमचे वडील चुलते सर्व अकाली कसे गेले जणू याचे प्रूफच मिळाले होते. सुदैवाने संजूभाऊंना कुठलाही हार्टअॅटॅक येण्याच्या आधी निदान झाले होते आणि ट्रीटमेंट करण्याची पूर्ण संधी मिळाली होती, अर्थातच आम्ही त्या संधीचे सोने करणार होतोच. विद्युत वेगाने पुढच्या हालचाली करीत आम्ही मुंबईच्या एका निष्णात कार्डिओथोरॅसिक सर्जनची ॲन्जिओग्राफी केल्याच्या फक्त तिसऱ्या दिवसाची बायपास सर्जरीसाठी वेळ मिळविली. दुसऱ्याच दिवशी आम्ही संजूभाऊंना मुंबईतील प्रख्यात रुग्णालयात दाखल केले आणि ॲन्जिओग्राफी केल्याच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत संजूभाऊंची बायपास सर्जरीदेखील झालेली होती आणि इतर कुठलेही आजार किंवा रिस्क फॅक्टर नसल्याने संजूभाऊ अगदीच लवकर चांगल्या पद्धतीने रिकव्हरदेखील झाले. आम्ही त्यांना कोविडमधील लॉकडाउन जस्ट सुरू होण्याच्या आधी ॲडमिट केले आणि लॉकडाउन सुरू झाल्या झाल्या घरी आणले. लॉकडाउनचा फायदा असाही झाला, की भेटायला येणारे पूर्णपणे गायबच झाले आणि आमच्या संजूभाऊंना त्यामुळे पूर्णपणे आराम मिळून अगदी लवकर छान रिकव्हरी झाली.

आज या सर्व गोष्टींची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. एक मन भरून समाधान मिळते, कृतकृत्य झाल्यासारखे वाटते, कारण ज्या पद्धतीचे ब्लॉक्स संजूभाऊंचे डिटेक्ट केले गेले होते ते अत्यंत जास्त असेच घातक होते. ज्याला आमच्या भाषेमध्ये म्हणजे वैद्यकीय परिभाषेमध्ये ट्रिपल व्हेसल डिसिज म्हटले जाते; परंतु हा नुसता ट्रिपल व्हेसल डिसिज नव्हता तर आमच्या संजूभाऊंच्या पूर्ण व्हेसलच्या व्हेसल डिफ्युज्ड झालेल्या होत्या. ज्यांच्यावर ती ॲन्जिओप्लास्टीदेखील होऊ शकत नव्हती आणि असा हार्टअॅटॅक म्हणजे मृत्यूची जवळपास गॅरंटीच, ज्यामध्ये वाचण्याची शक्यता फारच धूसर असते. यामध्ये अजून एक गोष्ट फार महत्त्वाची असते, ती म्हणजे, कुठल्याही पेशंटला हार्टअॅटॅक येण्याच्या अगोदर जर आपणाला अशी ट्रीटमेंट करता आली तर ते फारच महत्त्वाचे आणि उपयुक्त असते. एकदा हार्टअॅटॅक आल्यानंतर तर आपल्याला ट्रीटमेंट ही करावीच लागते पण त्या वेळेला ती बाय फोर्स असते. नॉट बाय चॉइस आणि एकदा हार्टअॅटॅक आल्यानंतर आपले हृदय काहीना काही डॅमेज होते परंतु अॅटॅक येण्याच्या अगोदर जर आपण अशी मॅनेजमेंट करू शकलो तर ते खूपच चांगले असते, शिवाय अॅटॅक आल्यानंतरचा मृत्यूचा धोकाही टळलेला असतो अशा अनेक अर्थाने आमचे संजूभाऊ नशीबवान ठरले होते.

माझा नेहमीचा अनुभव असा आहे, की मला काही गंभीर आजार होऊ शकतो आणि ते जर मला माहीत पडले तर ते माझ्यासाठी फारच उपयुक्त असेल, कारण कुठलाही मोठा डॅमेज होण्याच्या आधी माझी योग्य अशी ट्रीटमेंट झालेली असेल, अशी मानसिकता म्हणजेच मलाही आजार होऊ शकतो हे सकारात्मकतेने स्वीकारण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. याउलट बहुसंख्य वेळा अशा गोष्टी नकारात्मकतेने स्वीकारल्या जात असतात. डायबेटिस, हार्टॲटॅक, उच्च रक्तदाब, इतर कुठलाही आजार मला कशाला होईल? तो याला होईल, तो त्याला होईल, तो आमक्याला होईल, तो फलाण्याला होईल, मी तर इतका फिट आहे माझे सर्व काही कसे चांगले आहे. त्यामुळे मला असला काही आजार होऊच शकत नाही या गोड गैरसमजुतीमध्ये अनेक चांगली चांगली मंडळी अडकलेली असते आणि मग अशा ठिकाणी असे घातक आजार माणसांवर घाला घालत असतात.

आज आपण या सकारात्मकतेची शपथच घेऊ या, की जेणेकरून आपला स्वतःचा जीव तर वाचवालच परंतु आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपला मित्रपरिवार व समाजामध्ये कुठेतरी कोणाचा जीव वाचविण्यामध्ये नक्कीच आपला वाटा खूप मोठा असेल.

(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT