Two eclipses in the month of October Annular solar eclipse lunar eclipse esakal
सप्तरंग

Astronomical Event : ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन ग्रहणे

या महिन्यात कंकणाकृती सूर्यग्रहण व खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे. आपल्याकडे १४ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण दिसणार नाही.

डॉ. प्रकाश तुपे

- डॉ. प्रकाश तुपे
या महिन्यात कंकणाकृती सूर्यग्रहण व खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे. आपल्याकडे १४ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण दिसणार नाही. मात्र २८/२९ ऑक्टोबरच्या रात्री होणारे खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येईल. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री २८ रोजी रात्री १ वाजून ५ मिनिटाने चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत शिरून चंद्रग्रहणाचा स्पर्श होईल.

रात्री १.४५ वाजता चंद्रबिंबाचा अवघा १२ टक्के भाग काळवंडेल व ग्रहणमध्य होईल. या नंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होऊन रात्री २.२२ वाजता ग्रहण सुटेल. असे असले तरी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतच असेल व तो पहाटे ३.५७ वाजता पूर्णपणे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल. हे ग्रहण भारतासह युरोप, आफ्रिका व आशियामधून पाहता येईल.

या महिन्यात १४ ऑक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होईल. यावेळी चंद्र पृथ्वीपासून काहीसा दूर असल्याने त्याची दाट सावली पृथ्वीपर्यत पोहोचणार नाही. त्यामुळे चंद्र पूर्णपणे सूर्यबिंबाला झाकू न शकल्याने त्याची कड दिसत राहील.

काळ्या गोलाकार भागाभोवती सूर्यबिंबाचे प्रकाशित कडे दिसू लागल्याने सूर्यबिंबाचे कंकण दिसेल. हे ग्रहण भारतीय वेळेप्रमाणे १४ ऑक्टोबरच्या रात्री ८.३४ वाजता सुरू होऊन १५ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२५ वाजता सुटेल. ग्रहण मुख्यतः अमेरिका, मेक्सिको, निकारूग्वा, कोलंबिया व ब्राझीलमध्ये दिसेल. या भागात ४ ते ५ मिनीटे सूर्याचे कंकण दिसेल.

ग्रह ः
बुध : गेल्या महिन्याच्या अखेरीस बुध पूर्व क्षितीजावर ठळकपणे दिसत होता. आता तो सूर्याकडे सरकू लागल्याने स्पष्टपणे दिसू शकणार नाही. महिन्याच्या सुरूवातीस तो सूर्योदयापूर्वी जवळजवळ तासभर उगवताना दिसेल. मात्र आठवड्याभरातच बुध संधीप्रकाशात उगवत असल्याने दिसेनासा होईल. त्याची सूर्याबरोबर युती २० तारखेला होईल. युतीनंतर तो सूर्यापासून दूर होत पश्‍चिम क्षितीजावर दाखल होईल. मात्र बुधाला पाहण्यासाठी पुढील महिन्याची वाट पहावी लागेल.

शुक्र ः पहाटे सव्वातीनच्या सुमारास तेजस्वी शुक्र दक्षिणपूर्वेस उगवताना दिसेल. त्याच्या जवळच सिंह राशीतील ‘मघा’ तारा दिसेल. शुक्र व मघा एकमेकांजवळ ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान दिसतील. यानंतर शुक्र मघाला मागे टाकून खाली सरकू लागेल. तो सूर्यापासून दूरात दूर अशा ४६ अंशावर २४ तारखेला पोहचेल. गेल्या महिन्यात शुक्र परमतेजस्वी म्हणजे उणे ४.८ तेजस्वितेने चमकत होता. आता त्याचे तेज काहीसे कमी होत उणे ४.४ होईल. तर त्याचे बिंब ३२ विकलांपासून २२ विकलांएवढे छोटे होताना दिसेल. तसेच बिंबाचा प्रकाशित भाग ३७ टक्क्यांपासून ५४ टक्के होताना दिसेल. चंद्रकोरीजवळ मघा व शुक्राची जोडी १०-११ ऑक्टोबर रोजी दिसेल.

मंगळ ः सूर्याजवळ गेल्याने या महिन्यात मंगळ दिसू शकणार नाही.

गुरू ः अंधार पडताच उत्तरपूर्व क्षितीजावर तेजस्वी गुरू उगवताना दिसेल. पुढील महिन्यात त्याची सूर्याबरोबर प्रतियुती होत असल्याने तो लवकर उगवताना दिसेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री साडेआठ वाजता उगवणारा गुरू महिना अखेरीस संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उगवताना दिसेल. पृथ्वी गुरूजवळ जात असल्याने गुरूच्या बिंबाचा आकार ४९ विकलांएवढा मोठा दिसू लागेल व त्याची तेजस्विता उणे २.९ होईल. गुरू मेष राशीच्या दक्षिणेकडच्या भागात दिसत असून दुर्बिणीतून पाहता त्याचे चार मोठे चंद्र गुरूच्या बिंबाभोवती प्रदक्षिणा घालताना ग्रहणे व पिधाने घडवताना दिसतील. या व पुढील महिन्यात गुरूचे बिंब मोठे दिसत असल्याने दुर्बिणीतून त्याच्या बिंबावरचे चट्टे व इतर खाणाखुणा स्पष्टपणे दिसतील. आज एक ऑक्टोबर रोजी चंद्राजवळ गुरू दिसेल.

शनी ः पिवळसर रंगाचा शनी रात्र होताच दक्षिणेकडच्या आकाशातील कुंभ राशीत दिसेल. या महिन्याच्या प्रारंभी तो पहाटे चार वाजता मावळताना दिसेल व नंतर लवकर लवकर मावळत जात महिनाअखेरीस दोन तास आधी म्हणजे रात्री दोन वाजता मावळेल. आता पृथ्वी शनीपासून दूर जात असल्याने त्याची तेजस्विता ०.५ पासून ०.७ पर्यंत बदलेल. शनीच्या १८ विकलांच्या बिंबाभोवती ४१ विकलांची कडी दिसतील. ही कडी १० अंशाने कललेली दिसतील.

चंद्राजवळ शनी २४ तारखेला दिसेल.

युरेनस-नेपच्यून ः युरेनसला शोधण्यासाठी कृत्तिकांची मदत होईल. युरेनस कृत्तिकांच्या ९ अंश दक्षिण पश्‍चिमेस व गुरूच्या उत्तरपूर्वेस दिसेल. युरेनस ‘टाऊ’ ताऱ्याजवळ दिसत असून त्याची तेजस्विता ५.७ असेल. गेल्याच महिन्यात नेपच्यूनची प्रतियुती झाल्याने तो या महिन्यात जवळ जवळ रात्रभर दिसेल. मीन राशीतील २० क्रमांकाच्या ताऱ्याजवळ ७.७ तेजस्वितेचा निळसर नेपच्यून दिसेल.

उल्का ः हॅली धूमकेतूच्या अवशेषांमुळे दिसणाऱ्या ‘ओरियानिड्स’ च्या उल्का २१/२२ तारखेला दिसतील. या उल्का मृग नक्षत्रातील ‘काक्षी’ ताऱ्‍याजवळून फेकल्या जात असल्याचे वाटेल. पहाटे पंधरावीस उल्का पडल्याचे अंधाऱ्या ठिकाणाहून दिसेल.

चंद्र-सूर्य ः भाद्रपद अमावस्या १४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.२४ वाजता तर अश्विन पौर्णिमा २८ ऑक्टोबर रोजी रात्री १.५३ वाजता होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,०५,४२६ कि.मी.) १० ऑक्टोबर रोजी तर पृथ्वीजवळ (३,६४,८७३ कि.मी.) २६ ऑक्टोबर रोजी असेल. या महिन्यात २८/२९ तारखेला खंडग्रास चंद्र ग्रहण होत असून ते आपल्याकडे दिसेल.
या महिन्यात सूर्याचे कंकणाकृती ग्रहण होत असून ते मुख्यतः अमेरिका, मेक्सिको, ब्राझील मध्ये दिसेल. हे ग्रहण १४ ऑक्टोबर रोजी होत असून आपल्याकडे दिसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT