- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com
सायबर-पालकत्वाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तंत्रज्ञान आणि डिजिटल-माध्यमं यांच्यामुळं जे विविध आजार आधुनिक काळात निर्माण होत आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्येही अनेक शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, आपल्याला पुढील आजारांची आणि व्यसनांची माहिती ठळकपणे असली पाहिजे.
फोमो : फोमो म्हणजे ‘फीअर ऑफ मिसिंग आऊट’. ‘एखादी माहिती, घटना, प्रसंग आपल्याला समजला नाही तर...’ अशी भीती कायम मनात असणं आणि त्यासाठी पुनःपुन्हा इंटरनेटवर, सोशल मीडियावर जाणं.
फँटम रिंगिंग सिंड्रोम : फोनची रिंग वाजलेली नसताना, फोन व्हायब्रेट झालेला नसताना, कुठलाही मेसेज किंवा नोटिफिकेशन ॲलर्ट आलेला नसताना आपला फोन वाजतो आहे असा भास होणं. त्यासाठी फोन पुनःपुन्हा उघडून बघणं.
इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर : सतत, पुनःपुन्हा ऑनलाईन गेम्स खेळावेसे वाटणं, स्वतःला रोखता येऊ न शकणं, सतत फक्त गेमिंगचाच विचार मनात असणं, त्यामुळं अभ्यासावरचं लक्ष उडणं, गेमिंगव्यतिरिक्त काहीही करू नये असं वाटणं म्हणजे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर. हे एक प्रकारचं व्यसनच आहे.
सोशल मीडियाचं व्यसन : सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जावंसं वाटणं, तिथं किती ‘लाईक्स’, ‘लव्ह’ मिळताहेत यावरून आपला आनंद, दुःख, समाधान ठरणं, अधिकाधिक ‘लाईक्स’ मिळवण्याचा सतत विचार करत राहणं, एक-दोन दिवस सोशल मीडियावर गेलं नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटणं...हेही व्यसनच आहे.
रील्सचं व्यसन : हे एक नवीन प्रकारचं व्यसन गेल्या काही दिवसांत दिसू लागलं आहे. रील्स एकदा बघायला सुरुवात केली की फोन चटकन् खाली ठेवता येत नाही. रील्स बघण्यात किती वेळ जातो याचा अंदाज येत नाही. सतत, पुनःपुन्हा पुन्हा रील्स बघत बसावेत असं वाटणं हेही व्यसनच आहे.
शेअरिंग सिंड्रोम : आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक लहान-मोठी गोष्ट सतत सोशल मीडियावर जगाशी शेअर करत राहण्याची ‘सक्ती’ काही माणसांमध्ये तयार होते. असं शेअरिंग आणि त्यानंतर मिळणारा प्रतिसाद याचीच त्यांना किक बसते. हे शेअरिंगमधून मिळणारं कौतुक, सतत कुणाचा तरी आधार घ्यावासा वाटण्याची भावना तीव्र होत जाते आणि गोष्टी किचकट बनू शकतात.
सायबर सेक्स किंवा पोर्नचं व्यसन : इंटरनेटवर सातत्यानं उपलब्ध असलेला ॲडल्ट कन्टेंट बघण्याचं व्यसन हा अतिशय काळजीचा विषय आहे. कारण, यात स्वदेहप्रतिमा, दुसऱ्याच्या देहाच्या प्रतिमा, परवानगी, लैंगिक सहजीवन याविषयीच्या चुकीच्या कल्पना तयार होण्याचा धोका असतो. वाढीच्या वयात हे प्रश्न किचकट होऊ शकतात.
माहितीचं व्यसन : यालाच ‘कम्पल्सिव्ह इन्फर्मेशन सीकिंग’ असंही म्हटलं जातं. म्हणजे, सतत माहिती मिळवण्याच्या शोधात असणं. त्या मिळवलेल्या माहितीचं नेमकं काय करायचं आहे हेही अनेकदा लक्षात येत नाही; पण सतत अपडेट असण्याचं, प्रत्येक गोष्टीतली माहिती बाळगण्याचं व्यसनच काही जणांमध्ये असतं. त्यातूनच अनेकदा ‘सगळ्यातलं सगळं समजतं’ असं वाटण्याचा संभाव असतो. अशा व्यक्तींना माहिती आणि ज्ञान यांत फरक करता येत नाही. मिळालेली माहिती खरी/खोटी तपासून न बघता तीवर आग्रही मत तयार करण्याचे प्रकारही होऊ शकतात.
इंटरनेट कम्युनिकेशन डिसऑर्डर : सतत निरनिराळ्या चॅटिंग प्लॅटफॉर्मचा वापर संवाद साधण्यासाठी करणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या उद्भवू शकते. त्यांना प्रत्यक्ष संवादच करता येत नाही. सतत संवाद केला पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे आणि ते फक्त चॅटिंगच्या माध्यमातूनच होऊ शकतं, त्याच माध्यमातून योग्य पद्धतीनं होऊ शकतं असं वाटायला लागतं आणि प्रत्यक्ष संवादात विलक्षण अडथळे यायला लागतात. प्रत्यक्ष संवाद न जमल्यानं मग ऑनलाईन चॅटिंगवरच विसंबून राहण्याची सवय वाढीस लागते.
ऑनलाईन जुगार : अनेक गेम्समध्ये आता रीतसर जुगार शिरलेला आहे. अनेक शाळकरी मुलं त्यात अडकताना दिसतात. सुरुवातीला पैसे मिळतात आणि नंतर गमावावे लागतात हा पॅटर्न माहीत असूनही मुलं त्यात अडकतात; कारण, जुगार हेही एक प्रकारचं व्यसन आहे. रमी असेल नाहीतर एखादा खेळ, ऑनलाईन गॅम्बलिंगनं जोर धरला आहे आणि त्याचं व्यसन फक्त मोठ्यांमध्येच नव्हे तर, लहान मुलांमध्येही दिसायला लागलं आहे.
ई-शॉपोहोलिक : ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या अनेक कंपन्या आता उपलब्ध आहेत. अनेक ई-कॉमर्स साईट्सवर पाहिजे ती वस्तू विकत घेता येते. त्यामुळं सतत शॉपिंग करण्याचं व्यसन लागण्याची शक्यता असते. टीनेजर्समध्ये याचं प्रमाण बघायला मिळतं. कपडे नाहीतर इतर वस्तू सतत घेतल्या जातात. आपल्याला गरज आहे का, याचा विचार मागं पडतो. कुठला तरी फेस्टिव्हल सुरू आहे, डिस्काउंट आहे म्हणूनही सतत शॉपिंग करणं, सतत शॉपिंगचाच विचार करणं, शॉपिंग केलं नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटणं, निराशा आली तर लगेच ऑनलाईन शॉपिंग करणं हे सगळेच प्रकार घातक असू शकतात.
बिंज वॉच : या शब्दाला खूप ग्लॅमर आलेलं आहे; पण बिंज वॉच म्हणजे मनोरंजनाचं व्यसनच. सतत काहीतरी बघत बसणं, सतत कुठल्या तरी सीरिअलमध्ये, नाहीतर सिनेमात मन अडकून पडलेलं असणं, जे काही बघतोय ते थांबवता न येणं, बघणं बंद केलं तर दुसरं काय करायचं हे न समजणं, दुसरं काहीच करू नये असं वाटणं, छंद मागं पडणं, अभ्यासावर, कामावर परिणाम होणं हे सगळंच बिंज वॉचमध्ये होऊ शकतं.
इगो सर्फिंग : सतत स्वतःला ऑनलाईन जगात शोधत राहणं हा प्रकार यात मोडतो. सोशल मीडियावर आपणच केलेल्या पोस्ट परत परत जाऊन बघणं, आपले ऑनलाईन जगातले फोटो, व्हिडिओ परत परत जाऊन बघत बसणं, आपले जुने फोटो - जे आपण कधीतरी सोशल मीडियावर टाकलेले असतात ते - बघत बसणं, आपल्याविषयी कोण काय बोलत आहे याचा सतत शोध घेत राहणं याला ‘इगो सर्फिंग’ म्हटलं जातं. यात किती वेळ जातो हे अनेकदा लक्षात येत नाही. शिवाय, सतत आपलेच जुने फोटो बघून, आपल्याविषयी वाचून निरनिराळ्या प्रकारच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असते.
कम्पल्सिव्ह डेटिंग/स्वाईप ॲडिक्शन : अनेक टीनेजर्समध्ये आणि तरुणाईमध्ये ऑनलाईन डेटिंगचं व्यसन दिसून येतं. आपण कुणाला तरी सतत डेट केलं पाहिजे असं वाटत राहणं, ते जमलं नाही तर डेटिंग ॲप्सवर जाऊन सतत डेटवर जाण्यासाठी कुणाचा तरी शोध घेत राहणं, प्रत्यक्ष डेटवर गेलं नाही तरी त्या व्यक्तीबरोबर आपण मजेत राहू शकतो... रोमँटिक नातं तयार करू शकतो...लैंगिक संबंध प्रस्थापित करू शकतो...अशा प्रकारचा विचार करत राहणं, त्यातून उत्तेजना मिळवत राहणं, एका व्यक्तीनंतर दुसरी व्यक्ती ऑनलाईन डेटिंग ॲपवर शोधत बसणं असे प्रकार यात मोडतात.
नोमोफोबिया : काही कारणानं फोन जवळ नसेल तर अस्वस्थ होणं, फोन जवळ नसेल तर जगता येणार नाही, असं वाटणं. फोन जवळ नसल्यामुळं सतत कसली तरी भीती वाटत राहणं, चिंता वाटत राहणं हे प्रकार घडतात.
(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.