shankarrao govarikar sakal
सप्तरंग

अणुऊर्जेतला स्वावलंबनाचा पाईक!

अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घालणारे डॉ. होमी भाभा यांचे जवळचे सहकारी डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी भाभा यांची स्वावलंबनाची परंपरा पुढे नेली.

उदय कुलकर्णी udaykd@gmail.com

अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घालणारे डॉ. होमी भाभा यांचे जवळचे सहकारी डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी भाभा यांची स्वावलंबनाची परंपरा पुढे नेली.

अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घालणारे डॉ. होमी भाभा यांचे जवळचे सहकारी डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी भाभा यांची स्वावलंबनाची परंपरा पुढे नेली. मूळचे कोल्हापूरचे असलेले गोवारीकर यांचा आज (रविवार, ३० ऑक्टोबर) दुसरा स्मृतिदिन. अणुकार्यक्रमासह त्यांच्या विविध क्षेत्रांतल्या योगदानाचा वेध....

‘डॉ. शंकरराव गोवारीकर म्हणजे देशविकासाच्या आणि रचनेच्या कामामध्ये स्वत:ला झोकून देणाऱ्या शास्त्रज्ञांच्या परंपरेचे पाईक! विशेषत: डॉ. होमी भाभा यांनी देशासाठी ज्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला, त्या कार्यक्रमातील डॉ. भाभांचे ते सुरुवातीपासूनचे सहकारी. प्रारंभी आण्विक भौतिकशास्त्रविषयक कार्यक्रमात गुंतलेल्या डॉ. गोवारीकरांना मूलभूत व उपयोजित आण्विक विज्ञानावर संशोधनासाठीच्या कार्यक्रमामध्ये डॉ. भाभांनी डॉ. गोवारीकरांना समाविष्ट करून घेतलं. कोलकत्यामध्ये ‘व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन’ निर्मितीच्या मुख्य चमूमध्ये सहभागी असलेल्या डॉ. गोवारीकर यांच्यासारख्यांच्या योगदानामुळं आता कोलकता या शहराची ओळख आण्विक विज्ञान क्षेत्रात ‘सायक्लोट्रॉन सिटी’ अशी बनली आहे. आज कोलकत्यामध्ये ‘सुपर कंडक्टिंग सायक्लोट्रॉन’ तसेच ‘मेडिकल सायक्लोट्रॉन’ यांचीही उभारणी झाली आहे. या सर्वांची सुरुवात डॉ. गोवारीकरांपासून झाली. डॉ. होमी भाभांनी अणुऊर्जा कार्यक्रम आखताना स्वावलंबनावर भर दिला होता. डॉ. गोवारीकरांनी ही परंपरा पुढे नेतानाही स्वावलंबनाचा मंत्र जपला आणि पुढच्या पिढीलाही दिला!’ अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे डॉ. गोवारीकरांचा विषय निघाला की त्यांच्याविषयीच्या भावना अशा शब्दांमध्ये व्यक्त करतात.

‘पद्मविभूषण’चा सन्मान मिळालेले केवळ डॉ. काकोडकर नव्हे तर डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ‘परम’सारखा महासंगणक बनवणारे डॉ. विजय भटकर असे देशातील अन्य मान्यवर शास्त्रज्ञही डॉ. शंकरराव गोवारीकर यांच्याविषयी गौरवानंच बोलतात. ‘अप्सरा’ अणुभट्टी उभारण्यात योगदान असणारे, ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये असताना ‘टेक्निकल फिजिक्स डिव्हिजन’चे प्रमुख म्हणून उद्योगांना नवंनवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे, ‘सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट्स ऑर्गनायझेशन, चंडीगडचे संचालक म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे आणि शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शालेय तसेच उच्चशिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटवणारे डॉ. शंकरराव गोवारीकर हे ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांचे सख्खे भाऊ, हे आज मोजक्या लोकांना ज्ञात आहे.

गोवारीकर कुटुंब हे मुळात कोल्हापूरचं. पाच भाऊ आणि पाच बहिणी असं हे मोठं कुटुंब. कोल्हापुरात बजापराव माने तालमीजवळून पाण्याच्या खजिन्याकडं जाताना गोवारीकर कुटुंबाचं निवासस्थान होतं. गजाननराव, शंकरराव, अशोक, वसंतराव, मिलन या सर्वांच्या वडिलांचं नाव रणछोड गोवारीकर तर आईचं नाव नर्मदाबाई.

रणछोड गोवारीकरांना घरातील सगळेच जण ‘दादा’ म्हणत. सार्वजनिक बांधकाम विभागात ते अभियंता होते, पण छायाचित्रण, चित्रकला, जादू अशा अनेक गोष्टी त्यांना अवगत होत्या. ‘कलामहर्षी’ बाबूराव पेंटर यांचं गोवारीकरांच्या घरी येणं-जाणं होतं. एकदा ‘तैलरंगातील निसर्गचित्र हे छायाचित्र घेण्याइतकं सोपं नाही!’ असं बाबूरावांनी दादांना ऐकवलं आणि त्यांनी ती गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारली. अगदी कमी कालावधीत दादांनी तैलरंगात चित्र रंगवण्यावर हुकूमत मिळवली. १९४१-४२ च्या सुमाराला शंकरराव अवघे १० वर्षांचे होते. सतत जादूगार, चित्रकार, छायाचित्रकार, अभियंते यांच्या गराड्यात असणाऱ्या दादांना शंकरराव त्या वयात मदत करत असत. यातूनच त्यांच्यामध्येही जादूसह अनेक गोष्टींची आणि विज्ञानाचीही आवड निर्माण झाली. १९४५ सालच्या जून महिन्यात दादांचं निधन झालं, त्या वेळी शंकरराव इयत्ता नववीत शिकत होते. वय होतं फक्त १४ वर्षे!

दादा गेल्यामुळं शंकररावांना बिंदू चौकात असलेला गोवारीकर लकी फोटो स्टुडिओ चालवण्यासाठी थोरल्या बंधूंना मदत करावी लागत असे. मोठं कुटुंब आणि सांपत्तिक स्थिती यथातथा, त्यामुळं शंकरराव आपल्या धाकट्या बंधूंना म्हणजे अशोक आणि वसंत यांना सोबत घेऊन सोलापूर, सांगली, कराड, कागल, तसेच कोल्हापूर अशा वेगवेगळ्या गावातील शाळांमध्ये जाऊन जादूचे प्रयोगही सादर करत. शाळेत जाणारे विद्यार्थी असे कार्यक्रम करतात याचं त्या वेळी सर्वांनाच अप्रूप वाटत असे. कधी पैसे मिळत तर कधी हात हलवत परतावं लागे. लहानपण असं गेलं तरी गोवारीकर कुटुंबातील सर्वांनीच आपापलं वेगळं क्षेत्र निवडत त्यामध्ये उत्तम कामगिरी केली. शंकरराव गोवारीकर इंग्लंडमध्ये जाऊन शिकले आणि भारतात येऊन त्यांनी डॉ. होमी भाभा, डॉ. राजा रामण्णा अशा शास्त्रज्ञांसमवेत काम करून अणुऊर्जेच्या संशोधनक्षेत्रात नाव कमावलं. वसंतराव गोवारीकर यांनी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात भरीव कामगिरी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि नांदेड येथील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे डॉ. शंकरराव गोवारीकरांविषयी बोलताना त्यांचा उल्लेख ‘भारतीय उपकरणशास्त्राचे प्रणेते’ असा करतात. ते सांगतात, ‘डॉ. गोवारीकरांचं उपकरणशास्त्रातील योगदान केवळ प्रशासकीय व विकासात्मक नव्हतं, तर त्यात नावीन्यही होतं. यामुळंच पोर्टेबल डिजिटल सॅलिनिटी टेस्टर आणि इनसिटू सॉईल पी. ए. मीटर विथ मेटॅलिक सेंसर यासारख्या उपकरणांबाबत स्वामित्वहक्क मिळवण्यात ते यशस्वी झाले. याखेरीज भारताची राष्ट्रीय स्तरावर उपकरणनिर्मिती, देखभाल व दुरुस्ती यांची गरज भागवण्यासाठी विभागीय उपकरण केंद्रे स्थापन करण्यातही डॉ. गोवारीकरांचं योगदान मोठं होतं. त्यांच्या याच कामासाठी १९९५ मध्ये बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्ट्रूमेन्टस्’तर्फे त्यांना ‘जीवनगौरव’ प्रदान करण्यात आला होता.’

शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर डॉ. शंकरराव गोवारीकरांनी थापर अभियांत्रिकी अभिमत विद्यापीठाचं काही काळ कुलगुरुपद भूषवलं. त्याचप्रमाणे तोलानी मॅरिटाईम या संस्थेसाठीही त्यांनी काम केलं. पुण्यात वास्तव्याला आल्यानंतर डॉ. गोवारीकरांनी भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण या विज्ञानकेंद्राशी आपलं नातं जोडलं. तेथे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी प्रयोगातून लहान मुलांमध्ये वैज्ञानिक बाबतीत उत्सुकता जागवण्याला प्राधान्य दिलं.

अणुविज्ञान, शिक्षणक्षेत्र यामध्ये भरीव कामगिरी केली तरी कायम पाय जमिनीवर असणारे डॉ. गोवारीकर यांचा तत्त्वज्ञानाचाही अभ्यास होता. गुरुदेव रानडे यांच्या आध्यात्मिक विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘३० ऑक्टोबर २०२० रोजी हे जग सोडून गेलेले डॉ. शंकरराव गोवारीकर म्हणजे विज्ञान, शिक्षण, पर्यावरण, कला, तत्त्वज्ञान, संगीत या सर्वांमध्ये रस असणारं ‘संपूर्ण मनुष्य’ म्हणता येईल असे व्यक्तिमत्त्व होतं!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT