Mount Shivling Sakal
सप्तरंग

माउंट शिवलिंग : कलाटणी देणारी मोहीम

शंकराच्या पिंडीसारखा आकार असलेलं माउंट शिवलिंग हे शिखर जगातील समस्त गिर्यारोहकांना भुरळ पाडणारं आहे. ऋषितुल्य गिर्यारोहक सर ख्रिस बॉनिंग्टन यांनी या शिवलिंगपर्वताचं वर्णन ‘ड्रीम माउंटन’ असं केलं आहे.

उमेश झिरपे

शंकराच्या पिंडीसारखा आकार असलेलं माउंट शिवलिंग हे शिखर जगातील समस्त गिर्यारोहकांना भुरळ पाडणारं आहे. ऋषितुल्य गिर्यारोहक सर ख्रिस बॉनिंग्टन यांनी या शिवलिंगपर्वताचं वर्णन ‘ड्रीम माउंटन’ असं केलं आहे. ‘एव्हरेस्ट’, ‘अन्नपूर्णा-२’ यांसारख्या तांत्रिकदृष्ट्या अवघड शिखरांवर यशस्वी चढाई करणाऱ्या बॉनिंग्टन यांनी त्यांना भावलेल्या सात पर्वतांवर पुस्तक लिहिलं आहे. त्यातील एक संपूर्ण एकखंड शिवलिंग या शिखरावर आधारित आहे.

बॉनिंग्टनसारख्या दिग्गज गिर्यारोहकाला प्रेमात पाडणाऱ्या शिवलिंग शिखराची उंची ६५४३ मीटर इतकी आहे. स्वित्झर्लंड-इटलीच्या सीमेवर वसलेल्या मॅटरहॉर्न या जगप्रसिद्ध पर्वतशिखराचा जुळा भाऊ वाटावा इतकं साम्य मॅटरहॉर्न व शिवलिंगशिखरात आहे. त्यामुळे शिवलिंगला ‘इंडियन मॅटरहॉर्न’ असंही म्हणतात. भारतीय हिमालयातील गढवाल भागातील गंगोत्रीच्या परिसरात शिवलिंगशिखर वसलेलं आहे. चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड असलेल्या या शिखरावर अगदी बोटावर मोजण्याइतक्या मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.

७० ते ८० अंश कोनातून अधिक असलेल्या खड्या भिंती, शिखरमाथ्याच्या खाली असलेल्या मोठमोठ्या हिमभिंती, सतत होणाऱ्या हिमप्रपातांचा धोका व लहरी हवामान यामुळे शिवलिंगशिखरावर चढाई करणं अत्यंत कठीण आहे. इथं चढाई करण्यासाठी रॉक क्लाइम्बिंग, आईस क्लाइम्बिंगसारखी गिर्यारोहणातील तांत्रिक कौशल्यं अवगत असणं गरजेचं आहे. याशिवाय संयम, चिकाटी व धाडस या बाबीही हव्यातच, म्हणूनच अनेक कसलेले व दिग्गज युरोपीय गिर्यारोहक तांत्रिक चढाईतील कौशल्यं तासण्यासाठी आवर्जून शिवलिंग मोहीम करतात. भारतीयांसाठी मात्र शिवलिंगशिखर नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे, त्यामुळे ‘गिरिप्रेमी’नं या शिखरावर मोहीम आयोजित करावी अशी माझी इच्छा होती. कारणही तसंच होतं.

शिवलिंगमोहीम २००७ मध्ये आयोजिण्याची योजना होती. हे वर्ष म्हणजे ‘गिरिप्रेमी’चं रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. पंचविसावं वर्ष अत्यंत धूमधडाक्यात व अभिनव पद्धतीनं साजरं करता येईल व गिर्यारोहण अधिक परिणामकारकरीत्या जनमानसापर्यंत पोहोचवता येईल हा यामागं उद्देश होता. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या एक वर्ष आधीच शिवलिंगमोहिमेची व वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची तयारी सुरू झाली.

अर्थात्, या सर्व घडामोडींमध्ये माझा सक्रिय सहभाग होता. पंचवीस वर्षांच्या वाटचालीत ‘गिरिप्रेमी’नं अनेक गिर्यारोहणमोहिमा यशस्वी केल्या होत्या. सह्याद्रीतील प्रस्तरभिंतीवर आपलं कौशल्य सिद्ध केलं होतं. शिवाय, हिमालयातदेखील आपल्या कौशल्यांची चुणूक दाखवली होती. मात्र, आता वेळ होती अधिक व्यापक होण्याची. म्हणूनच माउंट शिवलिंगसारखं आव्हान ‘गिरिप्रेमी’नं पेलावं व त्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावं अशी सर्वांचीच इच्छा होती. मात्र, अडथळा होता तो निधी-उभारणीचा. सन २००७ पर्यंत ‘गिरिप्रेमी’नं आयोजिलेल्या मोहिमांचं बजेट हे जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत असे. मोहीम करताना नेहमी बचतीला प्राधान्य दिलं जात असे. पुण्यातून बाहेर पडताच या काटकसरीला सुरुवात होत असे. रेल्वेचा परवडू शकणारा प्रवास करणं, मोहिमेसाठी आवश्यक अधिकाधिक सामान आपणच वाहून नेणं, स्वस्तातील जॅकेट, स्लीपिंग बॅग वापरणं, हिमालयातील तीव्र हवामानापासून संरक्षण करण्यासाठी उच्च प्रतीचे महागडे कपडे न परवडल्यानं कमी प्रतीचं साहित्य वापरणं, याबरोबरच श्रमाची अधिकाधिक कामं आपणच उचलणं, यांमुळे गिर्यारोहकांची अर्धी ऊर्जा बेसकॅम्पला पोहोचेपर्यंत खर्ची पडत असे.

त्याचा परिणाम हा शिखरचढाईवर होत असे. याचा अनुभव मी विविध मोहिमांतून घेत होतो. त्यामुळे माउंट शिवलिंगमोहीम करायची तर संपूर्ण नवीन पद्धतीनं, यावर मी ठाम होतो. सर्वांगीण अभ्यास करून, शिवलिंगमोहिमेसाठी १० लाख रुपयांचं बजेट असावं, असा प्रस्ताव मी सर्वांसमोर मांडला. सन २००६-०७ मध्ये १० लाख हा खूप मोठा आकडा होता. एवढं निधिसंकलन कसं करणार हा यक्षप्रश्न सर्वांनाच होता. मात्र, काहीही झालं तरी शिवलिंगमोहिमेचं शिवधनुष्य पेलायचंच या भूमिकेवर मी ठाम होतो. सर्वांना माझी तळमळ दिसत होती; किंबहुना सर्वांचीच तीच इच्छा होती. मात्र, सगळं काही करता येईल; पण पैशाचं सोंग आणता येत नाही. सर्वांनी हातभार लावला तर दहा लाख रुपये उभे करता येऊ शकत होते याचा मला अंदाज आला. यासाठी मदतीला धावून आला आमचा गिर्यारोहक मित्र अविनाश फौजदार. माझा जवळचा मित्र आणि गिर्यारोहणक्षेत्रातील माझा गुरू असलेल्या अविनाशनं तीन लाख रुपये उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली.

आमच्या दहा लाख रुपयांतील ३० टक्के रक्कम ही उच्च प्रतीचं गिर्यारोहणसाहित्य विकत घेण्यासाठी खर्च होणार होती. या खर्चाची जबाबदारी स्वीकारून ते उभं करण्यात अविनाशनं पुढाकार घेतला आणि आमच्या शिवलिंगमोहिमेच्या तयारीची गाडी सुसाट सुटली. मे-जून २००७ मध्ये आम्ही शिवलिंगमोहिमेवर जाणार होतो. हा रौप्यमहोत्सवी वर्षाचा कळसाध्याय होता.

मोहिमेच्या आधी गिर्यारोहण व प्रस्तरारोहण यांची सर्वसामान्यांना ओळख व्हावी यासाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेतले होतेच. यात सिंहगड किल्ल्यावर २५ विविध मार्गांनी चढाई, तसंच सिंहगड किल्ल्याच्या विविध कातळकड्यांवर २५ मार्गांनी प्रस्तरारोहण असे अभिनव उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमात शेकडो लोकांनी भाग घेतला. सिंहगडाचे विविध बुरुज-कडे झेंडूच्या माळांनी सजवले. जंगी कार्यक्रम सिंहगडावर आयोजिण्यात आला. याशिवाय ‘ड्यूक्स नोज’सारख्या अत्यंत कठीण कातळकड्यावर महाराष्ट्रातील २५ विविध निष्णात प्रस्तरारोहकांनी चढाई करत ‘गिरिप्रेमी’चं रौप्यमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरं केलं. या संपूर्ण जल्लोषाचा कळस शिवलिंगमोहिमेद्वारे होणार होता.

(क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT