Upanayana Sanskar Vratbandha sakal
सप्तरंग

भाई-आप्पांचं प्रेम, जबाबदारी अन् पौरोहित्य!

घराचा खर्च भागवण्यासाठी भाईंनी पौरोहित्य करण्याचा निर्णय घेतला; परंतु ज्योतिषावर त्यांचा विश्वास नव्हता. भाईंबरोबरच आप्पा काकांचाही माझ्यावर मोठा जीव होता.

अवतरण टीम

- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com

घराचा खर्च भागवण्यासाठी भाईंनी पौरोहित्य करण्याचा निर्णय घेतला; परंतु ज्योतिषावर त्यांचा विश्वास नव्हता. भाईंबरोबरच आप्पा काकांचाही माझ्यावर मोठा जीव होता. मला निरोप द्यायची वेळ आली की त्यांचं चित्त भिरभिरे. पुढे माझी मुंज झाल्यानंतर प्रथेप्रमाणे पाच घरी जाऊन भिक्षा मागायची असते. मी तर आप्पांबरोबर आधीच भिक्षा मागायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला काही नवीन वाटलं नाही. मुंज झाल्यानंतर मला जबाबदारीची जाणीव झाली आणि वडिलांबरोबर माझंही पौरोहित्य सुरू झालं.

‘तो’रविवार होता. भाईंना सुट्टी होती... आमच्या वसाहतीत राहणारे देवराम कर्णिक हे सोबत एका फोटोग्राफरला घेऊन आमच्या घरी हजर झाले. फोटोग्राफर घरी आल्यामुळे आजूबाजूचे सर्वजण कुतूहलाने जमा झाले. मध्यम बांध्याचे, मध्यम उंचीचे, भरदार मिशा असणारे कर्णिक गिरणीमध्ये काम करायचे. त्या दिवशीही भल्या पहाटेच ते आले होते.

भाई पट्ट्या-पट्ट्याची अर्धी विजार आणि बाह्यांची बनियन घालून त्यांच्या सुटीच्या दिनक्रमानुसार खुर्ची बाहेर टाकून वर्तमानपत्र वाचत बसले होते. कर्णिक आल्यानंतर त्यांनी भाईंचे पाय धरले. तसे ते नेहमीच धरत; पण आज त्यांनी साष्टांग दंडवत घातला. भाईंनी त्यांना खांद्याला धरून उठवलं. ‘‘गुरुजी कपडे करा... मला तुमचा फोटो घ्यायचा आहे.’’ भाईंना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘अरे, माझा फोटो कशाकरता घेता?’ ‘गुरुजी माझ्या घरात देवघराच्या बाजूला फक्त साईबाबांचा फोटो आहे.

त्या साईबाबांच्या फोटोच्या बाजूला मला तुमचा फोटो लावायचा आहे.’ भाई म्हणाले, ‘अरे, माझा फोटो कशाकरता लावता तुम्ही? तुमच्या आई-वडिलांचा लावा. माझा का लावता?’ ‘नाही, नाही... गुरुजी, तुम्हाला कल्पना नाही इतके तुम्ही महान आहात...’ कर्णिक बोलत होते. भाईंनी त्यांना कारण विचारलं. त्यांनी कारण सांगितल्यानंतर भाईंनी कपाळावर हातच मारला.

कर्णिक मटका खेळायचे. त्या वेळी ‘रतन मटका’ प्रसिद्ध होता. ज्याचा रतन खत्री मालक असे. त्याला ‘मेन’ बाजार म्हणत. दोन दिवस आधी रात्री भाई कर्णिकांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी त्यांना एक फोरकास्ट सांगितला, तो त्यांनी पन्नास पैशावर लावला होता. तोच फोरकास्ट निघाला. ज्यावर ते साडेचार हजार रुपये जिंकले... ‘फोरकास्ट म्हणजे काय कर्णिक?’ भाईंनी त्यांना विचारलं. मग काय, कर्णिकांनी भाईंची शिकवणीच घेतली.

सिंगल जोडी, डबल जोडी, ओपन काय? क्लोज काय? मेंढीचा एक्का, मेंढीचा पंजा अशी सर्व गणितं त्यांनी भाईंना समजावून दिली. माझ्या मात्र ते डोक्यावरून जात होतं. कर्णिक त्या खुशीतच आले होते. ‘अहो कर्णिक, हा जुगार, मटका उद्ध्वस्त करतो’ भाई त्यांना पदोपदीने समजावण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. कर्णिकांनी सांगितलं की, ‘गुरुजी, मला यादी द्या.

मटका जिंकल्यामुळे आपल्याला वाजत-गाजत सत्यनारायणाची पूजा घालायची आहे आणि तुमचा फोटोसुद्धा मी त्या दिवशी घरात लावणार आहे.’’ भाईंकडून त्यांनी पूजेची तारीखही घेतली. चार दिवसांनंतर कर्णिक पुन्हा आले. त्यांचा चेहरा थोडा हिरमुसलेला होता. हिरमुसल्या चेहऱ्यानेच कर्णिक म्हणाले, ‘‘गुरुजी, आपण पूजा थोडी पुढे ढकलू.

काय झालं, की त्या दिवशी पैसे मिळाले म्हणून मी पहिल्यांदा माझ्यावर असलेलं कर्ज फेडलं, घरात जेवणाचं थोडं सामान भरलं. बाकीचे पैसे परत लावले; पण मी हरलो. त्यामुळे होते ते सगळे पैसे संपले.’’ भाई हसले. त्यांनी कर्णिकांना सांगितलं, ‘‘अहो, असं मी स्वप्नात येऊन आकडे सांगत नसतो. उद्ध्वस्त होताना लोक पाहिलेत आपण. यापुढे त्या वाटेला जाऊ नका.’

कुटुंब वाढायला लागल्यामुळे शिक्षकाच्या अपुऱ्या पगारात घर चालवणं भाईंना कठीण जात होतं. त्यांच्या शिकवण्याही सुरू होत्या. ते सकाळी लवकर जात आणि रात्री उशिरा येत. ते येईपर्यंत मी आणि आई जेवायचे थांबत असू. सर्व भावंडांची जेवणं आटोपली, की आई आणि मी घराच्या बाहेर भाईंची वाट पाहत बसत असू. आमच्या घराच्या बाहेरून बस स्टॉप स्पष्ट दिसत असे. मालवणी हाऊसिंग बोर्डाकडे जाणाऱ्या बस स्टॉपजवळ एक पान टपरी होती.

भाई उतरलेले दिसत नसत; परंतु पान टपरीवर एखादी सिगारेट हाताच्या दोन बोटात शिलगावून झुरका मारताना दिसलं की ते भाईच आहेत, अशी आमची खात्री होत असे. भाई पिवळा हाथी सिगारेट ओढत. मी इतर वेळेला त्यांना घरात कधी सिगारेट ओढताना पाहिलेलं नाही; परंतु शाळा, शिकवण्या करून बस स्टॉप ते घर यात मात्र ते सिगारेट ओढत. मग मी भाईंना घ्यायला थोड्या अंतरावर चालत जात असे आणि त्यांच्या हाताला धरून, ते दिवसभराच्या ज्या काही गप्पा सांगत, त्या ऐकत मी घरी येत असे.

घराचा खर्च भागवणं शक्य नसल्याने, भाईंनी पौरोहित्य करण्याचाही निर्णय घेतला. भाईंचे उच्चार अस्खलित. शिवाय पूजेचे मंत्र, पोथी ते अतिशय स्पष्टपणे वाचत. त्यामुळे यजमानांना भाई आवडत. ‘पंडित गुरुजी’ नावाने ते हळूहळू प्रसिद्ध झाले. भाई कुटुंबाची गरज म्हणून पौरोहित्य करीत; परंतु ज्योतिषाबद्दल त्यांना विश्वास नव्हता. म्हणजे भविष्यावर त्यांचा विश्वास नव्हता. विवाहाच्या पत्रिका जुळवण्यासाठी त्यांच्याकडे अनेक जण येत.

भाईंचा पहिला प्रश्न असे, ‘अहो, मुलाने मुलीला पाहिलंय का? मुलीने मुलाला पाहिलंय का? ते दोघे एकमेकांना पसंत आहेत का? ते दोघे एकमेकांच्या घरी गेले आहेत का?’ त्यावर येणाऱ्या उत्तरांवर भाईंचं ठरलेलं असायचं. भाई दोन्ही पत्रिका ठेवून घेत आणि सांगत की, ‘आधी दोघांनाही विचारून घ्या. मी तुम्हाला पत्रिकांचं नंतर सांगतो.’’ कधी कधी भाई मुलाकडले आणि मुलीकडले दोघांनाही आमने-सामने बोलावत.

कधी मुलाला आणि मुलीलासुद्धा बोलावत. याला समुपदेशन म्हणतात, हे मला फार नंतर कळलं आणि जर ते दोघेही विवाहयोग्य असतील तर मग भाई त्यांना पुन्हा बोलावून घेत आणि पत्रिकेचे गुण कसे जुळतात ते समजावून सांगत. जर भाईंना ते योग्य वाटलं नाही तर ते विवाह न करण्याचाही सल्ला देत. ते सर्वांच्या कडे, विशेषतः गरिबाकडे आणि त्यातही मागासवर्गीयांकडे जर पूजा असेल तर त्याला प्राधान्य देत.

एखाद्या गरिबाच्या घरी पूजा असेल, तर ते त्याला पूजेची यादी करून देत आणि त्याचबरोबर त्याला सांगत की, ‘यातलं फक्त एवढंच आण. बाकीचं माझ्या घरून घेऊन जा...’ प्रश्न दक्षिणेचा यायचा, तर जवळपास प्रत्येकाला भाई, ‘‘तुला जे शक्य होईल ते दे’’ असंच सांगत. कुणालाही त्यांनी ‘दक्षिणा इतकीच दे...’ असं सांगितलं नाही. भाईंबरोबर मीदेखील पौरोहित्य करायला जात असे.

मालाडला आल्यानंतर अधूनमधून मी वरोरला जात असे. आमच्याकडील बरेचसे शिक्षक हे शनिवारी वरोरला जात. श्रीनिवास पाटील हे त्यातले एक होते. मी आई-भाईंना सांगून वरोरला जाण्यासाठी निघे. बोरिवली स्टेशनवर श्रीनिवास पाटील यांना मी प्लॅटफॉर्मवर शोधून काढत असे आणि मग त्यांचा हात धरून कधी वाणगावला, कधी बोईसरला रेल्वेतून उतरलं की, धावत धावत वरोरच्या बसमध्ये जाऊन बसायचं अन् आपली जागा पटकवायची, यात मी प्रवीण झालो होतो.

आप्पा काका माझी वाट बघत एसटी स्टॅण्डवर यायचे. आप्पा एकटेच वरोरला असायचे. ते पहाटे लवकर उठत, सूर्योदयाच्या आधीच त्यांचं जेवण तयार असे. मग जितक्या लवकर जेवायला देता येईल तेवढ्या लवकर जेवायला द्यायची त्यांची घाई असायची. मला काय इतक्या लवकर जेवण जाईना; पण त्यांचा आग्रह असे. मग सकाळी कधी तरी आठ-साडेआठलाच ते जेवायला वाढत. त्यानंतर मी गावभर मित्रांना भेटत असे. माझा दिवस तसाच जाई.

दुपारी पुन्हा आप्पा मला वरण-भात जेवायला देत. संध्याकाळीसुद्धा सूर्यास्ताच्या आधीच आप्पांचं जेवण तयार... आंब्यांच्या मोसमात ते भातावर पिकलेले आंबे पिळून तो भात कुस्करून खाणं त्यांना खूप आवडत असे. ते मलाही तसं करायला लावत. मी निघायच्या दिवशी म्हणजे रविवारी जरी दुपारी दोनची बस असली तरी आप्पा मला सकाळी जेवायला वाढलं की, डोक्यावर टोपी चढवत, पायात वहाणा घालत. बऱ्याचदा त्यांच्या पायात वहाणा नसत आणि अस्वस्थपणे घरात इथूनतिथून येरझाऱ्या मारत.

मला म्हणत, ‘चल, निघ... चल निघ लवकर.’ ‘आप्पा, आता तर दहा वाजलेत. दोन वाजता जायचंय.’ ‘तयारी करून ठेव’’ असा त्यांचा घोषा सतत चाललेला असे. खरं तर मी निघणार, यामुळे ते अस्वस्थ होत. मीदेखील अस्वस्थ होत असे. मलाही त्यांच्याजवळ जास्तीत जात राहावंसं वाटे.

आप्पा बिनबाह्याची, छाती-पोटाकडे असा कप्पा असलेली बंडी घालत. त्या कप्प्यामध्ये आप्पांची पूजेत आलेली चिल्लर असे. मग मी आप्पांच्या अंगावर हात ठेवून हळूच त्यांच्या खिशात हात घालत असे. मग आप्पा झोपलेले असले, तरी उठून जागे होत आणि माझ्याकडे बघून मिश्कील हसत. मग हात त्यांच्या खिशावर देत.

माझ्या हातातली चिल्लर हातातच राही आणि माझा हात ते पकडून ठेवत. मग मी ‘आप्पा’ असं म्हणून हातात आलेली चिल्लर काढून घ्यायचो. पुन्हा आप्पा हसत हसत उठायचे आणि माझ्याकडे बघत बसायचे. मी आप्पांना म्हणायचो, ‘‘आप्पा, हे घेऊ का? का देऊ तुम्हाला परत?’’ आप्पा माझी मूठ बंद करत म्हणायचे, ‘‘ठेव तुला.’’ खूप हृदयस्पर्शी प्रसंग होते ते. आप्पांनी चिल्लरवरच दिवस काढले. ते दिवस चिल्लरचेच होते. त्या वेळेला पाच पैसे, दोन पैसे यांना किंमत होती.

मी दोन वाजता निघताना आप्पा मला मालाडला आणण्याकरता तांदूळ देत. हे सगळे भिक्षुकी करून आलेले तांदूळ असत. कुणाकडले जाड, कुणाकडले कोलमचे... निरनिराळ्या जातीचे तांदूळ एकत्र असत. ते सर्व तांदूळ एकसारखे शिजत नसत; परंतु तेव्हा ते आईला संसाराला खूप हातभार लावत. आप्पा मला वरोरच्या एसटी स्टॅण्डवर पोहोचवायला येत. तिथल्या वडाच्या झाडाला एक पार होता.

तिथे बोईसर, वाणगाव, पालघर इथून एसटी येत असे. एखादी एसटी डहाणू खाडीवरून बोईसरकडे जाणारी... मग हळूहळू गावातले काही इतर लोक जमत. आप्पा गावातले इतर लोक आले, की मला घेऊन बाजूला जात असत. नुसते माझ्याकडे बघत बसत किंवा माझा हात धरून इथे-तिथे बघत. आप्पांचं चित्त निरोपाची वेळ आली की भिरभिरे. आतली कालवाकालव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसे.

‘आता कधी येशील?’ एवढंच बोलत. निरोपाच्या क्षणी माझ्याकडे बघणंही आप्पा टाळत. मी सारखा त्यांच्याकडे बघून, ‘‘आप्पा... आप्पा’’ करीत राही. ते मात्र बघणं टाळत. बस आली, की आप्पा माझी पिशवी त्यात नेऊन ठेवत आणि मला सांगत, ‘‘बस इथे.’’ बस सुटली, की आप्पा मागे वळूनसुद्धा बघत नसत, इतके आतल्या आत ते दुःखी होत. मी आप्पा ज्या दिशेने जाणार त्या खिडकीकडे बसत असे.

बस सुटली की परतताना, ‘‘विवेक आला होता ना, त्याला पोहोचवायला आलो’’ असं रस्त्यात जो भेटेल त्याला सांगत. मला निरोप देताना त्यांच्या जीवाची इतकी घालमेल होई, की ते बस सुटायची वाटही पाहत नसत. मला बसमध्ये बसवलं, की पटकन घराच्या रस्त्याला लागत आणि मागे वळून न बघता पटपट पटपट चालायला लागत. वळणावर गेल्यानंतर तिथे फक्त एकदा नजर वळवून बघत.

मी सारखा हात बाहेर काढून, ‘‘आप्पा, आप्पा, आप्पा’’ ओरडत असे. मांगेला समाजाचं कुणी बसमध्ये बाजूला असलं की म्हणत, ‘‘अरे, तू डुंगाबरोबरच राहा ना इथे. कशाला जातो मुंबईला? तो बघ डुंगा तुला सोडायला तयार नाही. डोळ्यात पाणी आहे बघ त्याच्या.’’ मग माझ्याही डोळ्यात पाणी वाहायला लागे. आप्पा माझ्याकडे न बघता घरी निघून जात. आप्पांना मी हवा होतो हे ते न सांगताही त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीतून स्पष्ट दिसत होतं.

मालाडला गेल्यानंतर वर्षभरातच आजीच्या माहेरची जमीन विकली गेल्यावर त्या वेळेस भाईंच्या आणि आप्पांच्या वाट्याला सोळाशे रुपये आले. आप्पांनी भाईंना सांगितलं, की ‘‘अरे, आता हे सोळाशे रुपये आले आहेत तर दुसरीकडे खर्च करू नको. पोरांची मुंज करून टाक.’’ मग त्या सोळाशे रुपयांत त्या वेळच्या थाटामाटात माझा छोटा भाऊ विनोद आणि माझी वरोरला मुंज झाली. एखाद्या लग्नासारखा विधी झाला.

नातेवाईक जमले, गावातले लोक आले... भाईंच्या परिचयाचे मुंबईतले शिक्षक-शिक्षिकासुद्धा दोन दिवस वरोरला राहण्याकरता आले. घर गजबजून गेलं. गावातही चैतन्याचं वातावरण झालं. एकाच वेळेला दोन भावंडांची मुंज असल्यामुळे माझ्यासोबत आई नि भाई तर विनोदसोबत आमचे चुलत काका व काकू पूजेला बसले. असा हा उपनयन सोहळा वरोरला पार पडला. मी द्विज झालो. त्या वेळी मी सहावी-सातवीला होतो.

मुंज झाल्यानंतर प्रथेप्रमाणे पाच घरी जाऊन भिक्षा मागायची असते; पण मी तर आप्पांबरोबर आधीच भिक्षा मागायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला भिक्षा मागणं काही नवीन वाटलं नाही. उजव्या हाताने झोळी डाव्या खांद्यावर टाकून, गावात जाऊन, ‘‘उद्या मकरसंक्रांत... ब्राह्मणाला शिधा- दक्षिणा’’ असं म्हणत मी गावात आधीच भिक्षा मागायला सुरुवात केली होती. तशी ही भिक्षा पण आम्ही घेतली. मुंज झाल्यानंतर मला थोडी जबाबदारीची जाणीव झाल्यासारखं वाटलं आणि मी वडिलांबरोबर ‘छोटा भटजी’ म्हणून पौरोहित्य करायला सुरुवातही केली.

मालाडला गेल्यानंतर वर्षभरातच आजीच्या माहेरची जमीन विकली गेल्यावर त्या वेळेस भाईंच्या आणि आप्पांच्या वाट्याला सोळाशे रुपये आले. आप्पांनी भाईंना सांगितलं, की ‘‘अरे, आता हे सोळाशे रुपये आले आहेत तर दुसरीकडे खर्च करू नको. पोरांची मुंज करून टाक.’’ मग त्या सोळाशे रुपयांत त्या वेळच्या थाटामाटात माझा छोटा भाऊ विनोद आणि माझी वरोरला मुंज झाली. एखाद्या लग्नासारखा विधी झाला. नातेवाईक जमले, गावातले लोक आले... घर गजबजून गेलं. एकाच वेळेला दोन भावंडांची मुंज असल्यामुळे माझ्यासोबत आई नि भाई तर विनोदसोबत आमचे चुलत काका व काकू पूजेला बसले होते... मी द्विज झालो...

(क्रमशः)

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT