urbanization water crisis dam built by british govt supply water to mumbai  Sakal
सप्तरंग

आपली शहरे गटारगंगा का झालीत?

आपण मोहंजोदडो-हडप्पा यांच्या वा मध्ययुगातील मोडलेल्या शहरांचे अवशेष पाहतो. अशी वेळ आपल्या शहरांवर येऊ द्यायची नसेल तर नव्या योग्य जागी नवी नगरे उभी केली पाहिजेत

अवतरण टीम

आपली शहरे ही खेड्यांची साधनसंपत्ती लुटत आहेत, असे महात्मा गांधींपासून सर्व विचारवंत म्हणत आले आहेत. ठाणे व पालघरसारख्या आदिवासी भागात इंग्रजांनी सहा-सात धरणे बांधून त्यांचे पाणी मुंबईची तहान भागवण्यासाठी तिथे नेले. मात्र, त्या आदिवासी पाड्यांचे काय? जास्त पाणी वापरल्याने शहरांची गटारगंगा झाली, तर खेड्या-पाड्यांवर पाण्याचे टँकर फिरत आहेत. त्यातून आपल्या नियोजनातला विरोधाभास स्पष्ट होतो.

- राजाराम सूर्यवंशी

२०२४ सालचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब ज्यांना देण्याची घोषणा भारत सरकारतर्फे करण्यात आली आहे, असे १९८९चे ‘पद्मविभूषण’प्राप्त भारतीय हरितक्रांतीचे जनक डाॕ. स्वामिनाथन यांनी भारताच्या नियोजनशून्य शहरीकरणावर टीका करताना म्हटले आहे की, एका प्रातःविधीसाठी आपण दहा लिटर पाणी फ्लॕशने सोडतो. ते पाणी वाया जातेच, शिवाय गटारे साचतात, रोगराई होते आणि प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतात.

आपण मोहंजोदडो-हडप्पा यांच्या वा मध्ययुगातील मोडलेल्या शहरांचे अवशेष पाहतो. अशी वेळ आपल्या शहरांवर येऊ द्यायची नसेल तर नव्या योग्य जागी नवी नगरे उभी केली पाहिजेत, जेथे सांडपाण्याची समस्या उद्‍भवणार नाही. काही प्रमाणात नवी मुंबईच्या सिडकोप्रमाणे त्यांची रचना असायला हवी. नाहीतर निसर्ग नियमाप्रमाणे आपली शहरे नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

आपली शहरे ही खेड्यांची साधनसंपत्ती लुटत आहेत, असे महात्मा गांधींपासून सर्व विचारवंत म्हणत आले आहेत. मुंबईचेच उदाहरण द्यायचे म्हटले, तर जवळच्या ठाणे व पालघर या आदिवासी भागात इंग्रजांनी सहा-सात धरणे बांधून त्यांचे पाणी मुंबई महानगराची तहान भागवण्यासाठी तिथे नेले आहे.

मात्र, या आदिवासी गाव, पाडे व खेड्यांचे काय? आजही पावसाळ्याचे चार-पाच महिने सोडले तर या आदिवासींना उर्वरित सात-आठ महिने पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागते. म्हणजे इंग्रजांनीही मुंबईचे नियोजन करताना शेजारच्या आदिवासी खेड्यांना वाऱ्यावर सोडले होते, असाच याचा अर्थ होतो.

मी मागे दोन वर्षे जव्हारला वास्तव्याला होतो. जव्हारसारख्या आदिवासी गावात असलेली व तेथील जनतेला वर्षाचे बाराही महिने शुद्ध पेयजल पाणी पुरवणारी योजना पाहून मला आश्चर्य वाटले. तेव्हा मी जव्हार संस्थानचा अभ्यास केला.

तो करताना मला जाणवले की, गेल्या ६०-६५ वर्षांपूर्वीपासून आजतागायत ही योजना यशस्वीपणे कार्यरत आहे. जव्हार संस्थानच्या यशवंतराव मुकणे महाराज या महादेव कोळी जमातीच्या राजाची दूरदृष्टी या योजनेमागे कार्यरत होती.

संस्थानातील नागरिक ही आपली लेकरे आहेत, त्यांचा उद्धार हेच आपले परम ध्येय आहे, याची जाणीव या लोकराजाला होती. मुकणे महाराजांनी जव्हारच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी तेथून जवळच ‘जयसागर’ धरणाची जागा १९५२ मध्ये नक्की केली होती.

जागतिक कीर्तीचे वास्तुशास्त्रज्ञ, नगररचनातज्ज्ञ व मुंबई शहराचे तत्कालीन मुख्य अभियंता नारायणराव मोडक या ख्यातनाम इंजिनिअरला जयसागर जलाशयासाठी निवडलेल्या जागेची पाहणी करण्याकरिता आणले असता, त्यांनी ती धरणासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य असल्याचा दाखला दिला होता. नारायणराव मोडक हे दादर येथील शिवाजी पार्क व मोडकसागर धरणाचे निर्माते म्हणून प्रसिद्धीस आले होते.

जव्हारपासून एक किमी अंतरावर असलेल्या ‘झिरपा झरा’ असे नाव असलेल्या नाल्यावर हे धरण बांधण्यात आले आहे. त्या धरणासाठी मुकणे महाराजांनी पाच लाख रुपये जव्हार नगरपालिकेला संस्थान देशात विलीनीकरणापूर्वी दिले होते.

या धरण कामाचा खर्च सुमारे ११ लाख ३४ हजार रुपये आला होता. उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासनाने अनुदान म्हणून दिली होती. हे धरण १९५९ मध्ये बांधून पूर्ण झाले व जलशुद्धीकरण केंद्र उभारणी आणि शहरभर नळावाटे पाणीपुरवठा करण्यासाठी उंच टाकी बांधणे व नळ जलवाहिनी टाकणे यात पुढील एक ते दीड वर्षाचा कालावधी गेला. १८ सप्टेंबर १९६१ पासून पाणीपुरवठा सुरू झाला आणि जव्हारमधील जनतेची पाण्यासाठीची वणवण कायमची थांबली.

आता प्रश्न उपस्थित होतो तो हा की, जी दूरदृष्टी यशवंतराव मुकणे महाराजांनी दाखविली तशी नंतरच्या ठाणे जिल्हा व आताच्या पालघर जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला का दाखवता आली नाही? मग महात्मा गांधींपासून सर्व विचारवंतांचे म्हणणे आहे की, ‘आपली शहरे खेड्यांची साधनसंपत्ती लुटत आहेत’ यात काहीच गैर नाही! मुळात हा प्रश्न महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही.

देशभरातील सर्वच शहरे खेड्यांच्या संसाधनांची लूटमार करूनच तट्ट झाली आहेत. जव्हार संस्थानचे विलीनीकरण झाले नसते किंवा ते लांबणीवर पडले असते तर (येथे मी फक्त जव्हार संस्थानाबद्दल बोलत आहे) यशवंतराव मुकणे महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी भागाची तहान भागवणारी छोटी छोटी धरणे बांधून आदिवासींचे पाण्यावाचून होणारे हाल थांबवले असते, कारण राजा आदिवासी होता, जाणता होता;

पण ते होऊ शकले नाही व शासनाला आदिवासींबाबत कागदी कळवळा व्यक्त करण्यापलीकडे काही करायचेच नाही! त्यांच्या शोषणातून शहरे कशी फुलतील एवढेच शासन पाहत असते. बरे, उभारलेल्या शहरातही नियोजनशून्यपणा व अंधानुकरण दिसले.

डाॕ. स्वामिनाथन यांची याबाबत टीका आहे की, आपण आपली नगररचना लंडन व न्यूयॉर्क शहराकडून उसनी घेतली आहे. तिकडे वर्षभर पाऊस पडतो आणि सूर्यकिरणे तिरपी पडतात. त्यामुळे ते शहर स्वच्छतेसाठी अतिरिक्त पाण्याचा वापर करतात.

संपूर्ण झाड धुऊन काढतात. त्यांना ते जमते, कारण पाणी मुबलक आहे. त्या उलट आपल्याकडची परिस्थिती आहे. आपल्याकडे मोसमी पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर पाण्याचा तुटवडा भासतो. उन्हाळ्यात सूर्यकिरणे सरळ पडतात.

पाण्याचे बाष्पीभवन जलद होते. धरणांतील साठवलेल्या पाण्याची पातळीसुद्धा जलद गतीने खाली जाते. त्यावर आपल्याकडे नियोजन नाही हेच खरे; परंतु आता आतापर्यंत त्यावरही पारंपरिक नियोजन होते. सरळ पडणाऱ्या सूर्यकिरणांचा त्यासाठी उपयोग केला जात असे. त्याकाळी प्रातःविधीसाठी लोक घरात नाही तर परसाकडे जात असत.

त्यानंतर त्यांचे परसदार स्वच्छ करायला गावात सोडलेली काही डुकरे येत. पाणी फार थोडे लागत असे. पर्यायाने दहाऐवजी एखाद लिटर पाण्यात स्वच्छता होऊन माणसी दरवेळी नऊ लिटर पाण्याची बचत होत असे. आंघोळीसाठी माणसे नदीवर जात असत. ओल्या अंगावरचे व ओली कापडे पिळल्याने फारच थोडे पाणी वाया जात असे. अशाप्रकारे कमी पर्जन्यमान होऊनही पिण्यासाठी विहिरीचे पाणी पुरत असे.

गावात, आमराईत, नदीकाठी आणि रस्त्याच्या दुतर्फा भरपूर प्रमाणात आंबा, निंब, चिंच, वड व पिंपळाची झाडे असत. ती जमिनीची धूप थांबवून मुळांद्वारा जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून ठेवत असत.

त्यामुळे आजच्यासारखा पाणी व स्वच्छतेचा प्रश्न त्या काळी नव्हता. मात्र, आपल्या नियोजनकर्त्यांनी विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल केली आहे. पर्यावरणाची अन् असंख्य किड्या-मुंग्यांची हानी केली आहे. शहरीकरणाने निसर्ग व पर्यावरणच उद्ध्वस्त केले आहे व प्रदूषण आणि रोगराईला आमंत्रण दिले आहे.

मुळात निसर्गात प्रदूषण नसते. मातीवर पडलेले शेण, शेणकिडे दोन दिवसांत खाऊन नष्ट करतात. शेणकिड्यांना पाखरे खातात, पाखरांना घारी खातात व घारींना माणसे मारतात. अशाप्रकारे एका जीवाच्या आहाराने दुसऱ्या जीवाची घाण नष्ट होते व कालांतराने निसर्ग पुन्हा नव्हाळीने झळाळत राहतो; मात्र या निसर्गाची माती केली ती माणसाने.

आकाशातील मेघांमधून पडणारे पाणी अडवून ते शेतीसाठी वापरता यावे, म्हणून स्वातंत्र्यानंतर अनेक धरणे बांधली गेली; मात्र वाढत्या व नियोजनशून्य शहरीकरणामुळे ते पाणी शहरांना पिण्यासाठी व उद्योगधंद्यांना द्यावे लागले. जास्त पाणी वापरल्याने शहरांची गटारे झाली... हिवतापाची माहेरघरे झाली. वृक्षतोड व जंगलांचा नायनाट केल्याने भूगर्भातली पाण्याची पातळी खाली गेली. गावोगावच्या विहिरी ओस पडल्या व खेडोपाडी पाण्याचे टँकर फिरू लागले. ही सर्व नियोजनशून्यतेची फळे आहेत!

शहरांची गटारगंगा झाली तर खेड्या-पाड्यांवर पाण्याचे टँकर फिरतात, यात आपल्या नियोजनातला विरोधाभास स्पष्ट होतो. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. हे चित्र बदलायचे असेल तर, डाॕ. स्वामिनाथन यांच्या विचार सिद्धांतावर शासनाने गांभीर्याने काम करायला हवे! २०२४चा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार डाॕ. स्वामिनाथन यांना देण्यामागे शासनाच्या डोक्यात हाच विचार रुंजी घालत असणार का, लवकरच कळेल. थोडी वाट पाहू या..!

rssatyawedhi@gmail.com(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT