Urbanization weather climate changes city rainfall Sakal
सप्तरंग

लहरी पावसाचं गणित...

अवतरण टीम

- श्याम पेठकर

तिथे गावा-गावाच्या निसर्गात रिमझिम सुरू झालीय आणि आपलं शहर अजूनही वैशाख वणव्याच्या झळा झेलतंय. पावसाची आतुरता मन चिंब करून टाकतेय; पण त्याची स्वारी अजूनही आपल्या शहराच्या उंबरठ्यापर्यंत पोहचलेली नाही.

शहरांवरून फरफटत वाहताना ढगांमध्येही शहरी मोजकेपणा आलेला आहे. त्यामुळे ऋतूही शहरांना टाळून निघून जाणं पसंत करतात की काय, असा प्रश्न बालमनालाही पडू लागला आहे. एकंदरीत लहरी पावसाचं गणित समजून घ्यायला हवं...

महानगरातल्या मोठ्या निवासी गाळ्याच्या दोन आकडी अंकात जाईल अशा मजल्यावरच्या बेडरूमच्या बाल्कनीत उभी राहून कोरडं आभाळ न्याहाळत उभी असलेली छकुली तिच्या आईला विचारते, ‘‘रेनी सिझन सुरू झाला आहे ना?

मग पाऊस का नाही येत?’’ तिच्या आईकडे या प्रश्नाचं उत्तर आहे; पण ते छकुलीला कळणार नाही... कळलं तरीही तिच्या आईला केवळ या प्रश्नानेच अपराधभाव दाटून आलेला. सिमेंटच्या जंगलापासून विश्वाचं तापमान वाढविण्यापर्यंत आपलाही कुठेतरी सहभाग आहे, याची जाणीव कितीही नाकारली तरीही छकुलीच्या आईला आहे.

‘रेनी सिझन’ सुरू झाल्याबरोबर अगदी मृगनक्षत्राला पाऊस अगदी आज्ञाधारकपणे यावा, यासाठी आपल्याला खूप मागं जावं लागेल, हे छकुलीच्या आईला कळतं. उंच इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरच्या आलिशान फ्लॅटमध्ये हवा अगदी खळाळून वाहत असते.

दूरचे डोंगर दिसतात. डोंगर, कुठेतरी श्वापदांच्या भीतीने लपून बसलेल्या सावजासारखी अजूनही टिकून असलेली झाडी कोपऱ्यात अंग चोरून बसलेली. दूरच्या आभाळाच्या कनातीची निळी-काळी कमान तयार झालेली. विहंगम कोनातून दिसत असलेलं ते विलोभनीय दृष्य... म्हणून तर हा फ्लॅट घेतलेला.

विकसकाने, ‘बाल्कनीतून बघा तुम्हाला कवेत घ्यायला निघालेला पाऊस!’ अशी जाहिरात केलेली. मात्र, आजूबाजूला तितक्याच उंचच उंच इमारतींची दाटी. त्यामुळे छकुलीच्या आईने तिच्या लहानपणी ‘बालभारती’च्या पुस्तकातच हिरव्या झाडीतून गावाकडे जाणारी पायवाट अनुभवलेली. नंतर तिची आई शिकत गेली. हिरव्या झाडीची कविता मात्र तिच्या आईला अजूनही पाठ होती. हिरवी गच्च झाडी आता केवळ कवितेतच उरलेली.

आता अगदी ७ जूनलाच पाऊस पडायचा असेल तर खूप मागं जावं लागेल अन् आता पुन्हा मागं फिरता येणार नाही. छकुलीला तर नाहीच अन् तिच्या आईलाही नाही. हं, आता छुकलीच्या आईच्या आग्रहावरून छकुलीच्या तातनी त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये तळकोकणातील एका गावाचं भिंतभर थोरलं छायाचित्र लावलेलं.

भाताची शेती, नारळी-पोफळीची झाडं, शेताचं कुंपण, शेतात एक छोटंसं झोपडं अन् दूरवर दिसणाऱ्या टुमदार कौलारू घरांच्या रोड डिव्हायडरवरच्या काळ्या-पिवळ्या पट्ट्यांसारख्या रांगा. पायवाटा अन् मस्तपैकी दाटून आलेलं आभाळ... छकुली ड्रॉइंग रूममध्ये बसली की त्या चित्रात हरवून जाते.

कुठल्या तरी फिरस्त्या छायाचित्रकाराने काढलेलं ते छायाचित्र... त्याचं प्रदर्शन लागलं होतं इकडे छकुलीच्या महानगरातील प्रतिष्ठित कला दालनात. तिथे छकुलीच्या बाबांनी हे पोट्रेटवजा छायाचित्र विकत घेतलेलं. तेव्हा छकुलीची आई तिच्या मैत्रिणींना मोठ्या गर्वाने सांगत होती, ‘‘याला किनई, निसर्गाची खूपच आवड... आवड म्हणजे काय प्रेमच... याचं सगळं लहानपण गावातच गेलं.’’

गावांची खंत हीच, की अनेक छुकल्यांच्या बाबांचं लहानपण गावात जातं; पण तरुणपण आणि पुढचं आयुष्य महानगरातच जातं. ही महानगरं म्हणजे अजस्र अजगरासारखी असतात. लहान लहान गावं गिळून अशी टम्म फुगलेली...

आता कदाचित छुकलीच्या बाबांचं ते गावही अशाच एखाद्या महानगराने महाअजगरासारखं गिळून टाकलं असेल अन् डोंगर, दऱ्या, झाडी, खळखळणारी अवखळ नदी यांच्या ‘साईट’चं प्रलोभन दाखवून अशाच मोठ्या निवासी इमारती विकून टाकल्या असतील.

‘‘यांच्या गावाच्या परिसरात इतकं दाट जंगल होतं की तिथे पोहचेपर्यंत म्हणे वाघ यायचा... रात्री डरकाळ्या ऐकू यायच्या.’’ छकुलीची आई स्मरणरंजनात हरवत सांगत राहायची... आता वाघ गावाकडे येत नाही अन् छुकलीचे बाबाही जात नाहीत तिकडे.

वाघाला तहान लागते अन् मग तो गावाकडे जाऊन पाण्यासाठी हंड्यामध्ये तोंड टाकतो. मग त्याची मान अडकून बसते हंड्यात... माणसांचंही तसंच झालेलं आहे. आधी घरांवर वृक्ष सावली धरायचे, आता वृक्षांवर विशाल इमारतींची सावली पडलेली असते.

छकुलीची आई तिच्या सदनिकेच्या बाल्कनीतून त्यांच्या वसाहतीच्या कम्पाऊंडमध्ये मुद्दाम ठेवलेल्या वड, पिंपळ, कडुनिंबाच्या केविलवाण्या वृक्षांकडे खूप खूप वरून पाहत असते. ते विशाल वगैरे म्हणावेत असे वृक्ष बाविसाव्या मजल्याच्या बाल्कनीतून रांगोळीच्या ठिपक्यांसारखे दिसतात तिला... झाडं असतात, झाडांवर पक्ष्यांची घरटी असतात.

पावसाळा सुरू होण्याच्या आधी पक्षी झाडाच्या टोकावर की आत घरटी बांधतात त्यावरून पाऊस यंदा कसा येणार, हे ग्रामस्थ आधी ठरवत गावाकडे. आधी माणसांच्या घरांवर झाडं सावली धरून असायची.

आता माणसांची घरटी इतकी उंचावर झाली आहेत, की मग कशाचवरून यंदा पाऊस कसा येणार, मुळात येणार की नाही, ते सांगता येत नाही. थोडं नैसर्गिक अन् देशी होऊ म्हणून छकुलीची आई तिची ‘मम्मी’ झाली नाही. वडिलांना ‘पप्पा’ न होऊ देता अगदी ‘बाबा’ या संबोधनाशीही न थांबता एकदम ‘तात’ केलं होतं...

आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत खूप सारी झाडं लावली होती. त्यात अगदी बोन्साय वृक्षही होते. माणसांच्या सावलीत वाढणारी झाडं खुजी होतात. छकुलीची आई तिच्या किचन गार्डनमध्ये भाज्या वगैरे उगवते. अगदी नैसर्गिक वातावरण घरी.

तरीही पाऊस आताशा काही वेळेवर येत नाही. त्यात मग छकुली अशी उन्हाळ्याला कंटाळून ‘‘आता कधी येणार पाऊस?’’ असं तिच्या आईला विचारतेच. पहिल्यांदा छकुलीने असं विचारलं होतं तेव्हा तिच्या आईला कळलं होतं, की आपल्या मुलीला समज आलेली आहे.

तसं घर पूर्ण एअरकंडिशन्ड. तरीही छकुलीला अन् तिच्या आईलाही ऋतूंच्या एका वळणार उन्हाचा कंटाळा येतोच... पाऊस आता आला पाहिजे, असं साऱ्यांनाच वाटत असतं. पाऊस असा आला अन् मग तो रुळला की छकुली कधी कधी बाल्कनीत उभी राहून पाऊस पडत असताना आईला विचारते, ‘‘आई, झाडांना रेनकोट का नाही घालत आपले सोसायटीवाले?’’

तिचा हा प्रश्न ऐकून पाऊस एक क्षण ओथंबतो आणि पावसाच्या हसऱ्या सरी छकुलीच्या आईच्या ‘अशा पावसात चिंब भिजावं छकुलीसह’ या इच्छेवरच पाणी फेरतात. छकुलीलाही मग झाडांसारखंच पावसात भिजायचं असतं. कधी कधी ती बाल्कनीत उभी राहून आपली हौस भागवून घेते. मात्र, तिचं महानगर हे ऋतुवेगळं आहे.

तिथे पाऊस येतो; पण पावसाळाच असला पाहिजे, असं नाही. थंडी फक्त घरातल्या वातानुकूलित यंत्रातूनच येते. ऊन्हं मात्र सतत असतात... आता छकुलीच्या या महानगराला ऋतू नाहीत, म्हणून तिच्या या शहराला आभाळाकडे मोकळेपणाने बघता येत नाही. गर्दीतल्या कोपऱ्या-कोपऱ्यात आभाळाचे तुकडे अस्तित्वाचा शोध घेत विसावलेले असतात.

‘वेल फर्निश्ड’ फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा, गावातून शहरात आलेल्या एखाद्या हळव्या जीवाला गावातल्या स्वच्छंद ऋतूंची आठवण करून देतो. उत्तुंग इमारतींच्या टेरेसवरून दिलेले निरोप गावाकडे पोहोचविणं आताशा ढगांनी बंद केलं आहे, हे छकुलीला माहीत नाही अन् तसं तिने गावच पाहिलेलं नाही...

शहरांवरून फरफटत वाहताना ढगांमध्येही शहरी मोजकेपणा आलेला आहे. त्यामुळे ऋतूही शहरांना टाळून निघून जाणं पसंत करतात. बरं, आभाळाकडे बघण्यासाठी हिरव्या झाडांच्या पानांचे डोळे लागतात. फुलांच्या पापण्याआड हे डोळे दडलेले असतात. मुख्य म्हणजे, जमिनीचा जामीन नाकारून आभाळाकडे बघता येत नाही.

शहराचं तसंही जमिनीशी नातं तुटलेलं असतं. शहर सतत भूक शांत करण्यासाठी धडपडत असतं आणि अशा अवस्थेत कुणाशी नातं जोडता येत नाही. नातं जोडण्यासाठी गरज संपवावी लागते आणि भूक तर सतत स्वत:शी बांधून ठेवते... हे सगळे ‘रेनी सिझन आला तरी आता पाऊस का नाही येत?’ असं विचारणाऱ्या छकुलीला कसं सांगावं, असा प्रश्न तिच्या आईला पडला आहे.

खरं तर जमीन आणि आकाश जिथे एकत्र येतात, त्या क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू गावात येतात. ऋतूंच्या स्वागतासाठी गाव सज्ज असतं. कधी गावाच्या वाटेवर गुलमोहर आपली फुलं पसरवून ठेवतो, तर अमलताशचे सोनेरी झुपके ऋतूंची वाट बघतात.

ऋतू यायचेत म्हटलं, की गावाच्या आभाळाला डोळे फुटतात. छकुलीच्या आईने असे ऋतुदेखणे डोळे पाहिले आहेत. तसेच डोळे छकुलीलाही कधीतरी फुटतील, असं तिच्या आईला वाटतं. मात्र, त्यासाठी पाऊस आला पाहिजे. ऋतुस्पर्शी डोळ्यांची स्वप्नं जमिनीत पेरून ठेवली, की मग पावसाळ्यात ती नेमकी उगवतात अन् अनेकांना ऋतुस्पर्शी डोळ्यांचं दान मिळतं.

छकुलीच्या आईला तिच्यासाठी अशी पेरणी करून ठेवायची आहे. त्यासाठी मग तिला गावाकडे नेऊन माणसांपेक्षा उंच झाडे, नद्या, डोंगर अन् विशेष म्हणजे माती दाखवायची आहे. गावचं आभाळही छकुलीच्या डोळ्यात पेरून ठेवायचं आहे. कारण पाऊस आला की गावाच्या आभाळालाही गंध फुटतो.

असा आभाळगंध येण्यासाठी आकाश जिवंत असावं लागतं. गावाच्या जमिनीप्रमाणे गावाचं आभाळही केवळ जिवंतच असतं असं नाही, तर ते जातिवंतही असतं. म्हणूनच ऋतूंची वस्ती गावात होण्याआधी आभाळ गाईंच्या डोळ्यांत उतरून जातं. पाखरं मग चोचींवर ढग तोलण्याचा सराव करतात. पावसाळा येण्याआधी नाही का गाईंचं हंबरणंही ओलसर होतं!

झाडंही बेटी वाऱ्याला कवटाळण्याचा प्रयत्न करतात. असं करताना झाडं मात्र एक काळजी घेतात. पक्ष्यांच्या घरट्यांमधील अंडी पडून फुटणार नाहीत, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. अशा झाडांच्या सावलीत वाढणारी माणसंही मग तितकीच हळवी होतात.

पक्ष्यांची घरटी असलेलं झाड ते सहसा तोडत नाहीत. म्हणूनच ऋतू कुठलाही असो, गावाचा झरा मात्र आटत नाही. पावसाने परमावधी गाठण्याआधी उन्हाच्या तप्त वास्तवाने परिसीमा गाठली पाहिजे अन् केवळ जमीनच तापली पाहिजे, असं नाही तर माणसांची मनंही ओलाव्याअभावी भेगाळली पाहिजेत.

कोकीळ पाऊसगाणं गाऊ लागली की, पाऊस येतो. पावसाचा अन् या गोष्टीचा जवळचा संबंध आहे. मोहोर फळला आणि आंब्याची झाडं जडावली की, कोकिळेला आपल्या पिलांची आठवण येते; पण सुरांना गाण्याचा शब्द दिला असल्याने ती परत फिरू शकत नाही.

अधूनमधून ती काळ्या पक्ष्यांच्या थव्यांमध्ये आपली पिलं शोधते. हवेला पाण्याचा वास आला की मग मात्र ती अस्वस्थ होते. तिचं असं केविलवाणं होणंही मोठं सुस्वर असतं. पाऊस येण्याआधी आपली पिलं शोधण्यासाठी कोकीळ सैरभैर झालेली असते.

महानगराने अनेक गावं गिळली असल्याने महानगराच्या पोटातही या गावांनी आपलं गावपण आणि मातीशी नाळ तोडलेली नाही. त्यामुळे पाऊसवेणा सुरू झाल्या की महानगरातही अनेकांना वाऱ्याला आलेला ओलाव्याचा वास येतो... छकुलीच्या आईला आठवतं, गावात असताना पाऊसवेणा सुरू झाल्या की भरल्या सांजेला तिची पावलं हमखास नदीकडे वळायची. वास्तविक कोरड्या नदीशी गावाने नातं तोडलेलं असतं.

ती मात्र नेमाने जायची. वाळूची घरं मात्र ती करत नव्हती. घर आलं की माणसं येतात आणि माणसं आपल्या अकर्मण्यतेवर पांघरूण घालण्यासाठी देव निर्माण करतात, हे तिला ठाऊक होतं. देवांची करुणा भाकून पाऊस येतो, असं खोटंच सांगण्यात येतं.

विशेष म्हणजे, सुरक्षित घरातली सुसंस्कृत माणसं पावसाशीही सौदेबाजी करतात. म्हणून ती नदीशी नातं तोडत नाही. छकुलीच्या आईला तिने लहानपणी तोंडपाठ केलेली, ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा...’ ही कविताही पावसाला भ्रष्ट करणारी अन् छकुलीला फर्स्ट स्टँडर्डला असताना असलेली ‘रेन रेन गो अवे...’ही पावसाशी बेईमान होणारीच...

म्हणून नदीकाठाहून परतताना छकुलीच्या आईची पावलं जमिनीला उजविण्याची दीक्षा देतात. जमिनीलाही मग पावसाचे वेध लागतात. नेमक्या अशाच वेळी वैशाखाने फुलांशी केलेला दुरावा संपलेला असतो.

तिच्या हातच्या देवतबकातून सांडलेल्या मोगऱ्याच्या वासाने वारा वेडा होतो. वाटेत पडलेली मोगऱ्याची फुलं वेचीत गावात शिरतो आणि मग पाऊस कोसळायला सुरुवात होते. रानातल्या मंदिराचा कळस चिंब भिजतो. पाऊस कोसळताना भेदाभेद करत नाही. तो कुठेही आणि कशावरही कोसळतो. फुलांवरही आणि निर्माल्यावरही.

झोपड्यांवर आणि महालांवरही. भरल्या शेतावर आणि कचऱ्यावरही; पण पाऊस असा कुठेही कोसळला, तरी तो पाऊसच असतो. पावसाचा स्वीकार करणाऱ्यांच्या प्रवृत्तीवर त्याचं अवस्थांतर ठरलेलं असतं. पावसाचे थेंब मोती होतात आणि चिखलही. वैशाखातली तापलेली तपश्चर्या कुणी किती प्रामाणिकपणे केली, यावरच सारं ठरलेलं असतं. तिने ती केली आहे. पावसाचे थेंब धारण करण्यासाठी तिचे लांबसडक केस तयार असताना पावसाने आता वेळ करू नये...

pethkar.shyamrao@gmail.com (लेखक प्रसिद्ध नाटककार आणि कथाकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT