‘संवर्धित शेती’चे उपयुक्त तंत्र sakal
सप्तरंग

‘संवर्धित शेती’चे उपयुक्त तंत्र

संकटे सांगून येत नाहीत. संकटांशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सदैव सज्ज राहायला हवे.

प्र. र. चिपळूणकर

संकटे सांगून येत नाहीत. संकटांशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सदैव सज्ज राहायला हवे. त्यासाठी नवे तंत्र शेतकऱ्यांना मदतकारक ठरून स्वतःच्या पायावर उभे करू शकते. या साध्या, सोप्या तंत्राविषयी...

जुलैअखेरीस कृष्णा खोऱ्यातील नद्यांना महापूर आले. नदीकाठची पिके पाण्यात बुडाली. प्रचंड हानी झाली. बहुतेक नदीकाठच्या गावातील कमी-अधिक घरे पाण्यात बुडाली. साधारण गावठाणे उभी करताना पुराचे पाणी घरात शिरू नये अशाच जागा निवडलेल्या असतात; परंतु २०१९ आणि २०२१ मधील महापुराने त्याला छेद दिला. सहसा सलग दहा वर्षामध्ये एखादे वर्ष पुराचे असते. ज्या शेतीत ५०-६० गाडी गूळ होत असे, तेथे ४-५ गाडी गूळ होई. पुढील २-४ वर्षे हे नुकसान भरून काढण्यात जाई. परंतु २००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुरांनी शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडवलंय. प्रश्‍न असा आहे की, असे पाठोपाठ पूर येत राहिले तर शेतकरी कर्जबाजारी होईल. बहुसंख्य समाजाकडे पैसा कमी असेल तर सार्वत्रिक मंदी येते. त्याचे दूरगामी परिणाम होतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार मदतही करेल; परंतु त्याचा कितपत उपयोग होणार?

निसर्गावर बंधने आणणे आपल्या हातात नाही. जागतिक तापमानवाढ, हवेतील कर्बवायूचे प्रमाण, कार्बनचे उत्सर्जन कमी करणे अशा बाबींवर चर्चा करण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो, याचा विचार करू या. नुकसान १०० टक्के टाळू शकणार नाही; परंतु ते जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न करू या.

गेली १५ वर्षे आम्ही वेगळ्या पद्धतीने शेती करतोय. याला ‘संवर्धित शेती’ (कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर) म्हणतात. म्हणजे कमीत कमी संसाधनांद्वारे केलेली शेती. या पद्धतीमध्ये जमिनीची नांगरणी अगर पूर्वमशागत केली जात नाही, गरजेपुरतीच म्हणजे बी पेरण्यासाठी लागेल तेवढीच केली जाते. असे केल्याने मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष जमिनीत तसेच राहतात. ते आपोआप वाळून जातात किंवा परत फुटून येत असल्यास (उदा. ऊस) ते तणनाशकाने मारले जातात. उसाच्या पाचटाचा जमीन सुपीक करण्यासाठी फारसा उपयोग होत नसल्याचे अनुभवल्यानंतर आता ते जाळून टाकण्याची शिफारस होते.

काही तणे असल्यास ती उपटून न काढता तणनाशकानेच मारली जातात. जमीन स्वच्छ होते. उसाच्या जुन्या सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने भुईमूग, सोयाबीन, हिवाळी गहू अगर भाजीपाला असे कोणतेही पीक या तंत्राने घेता येते. नवीन पीक वाढीच्या काळात मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष कुजत राहतात. म्हणजे चालू पिकाच्या मुळाशी सेंद्रिय खताचा कारखानाच सुरू राहतो. कच्चा पदार्थ थेट पीक वाढत असताना जमिनीतच कुजविला पाहिजे, या तत्त्वाचे आपोआप पालन होते.

जमिनीखालील अवशेषांचा उपयोग

परिणामी जमिनीत सतत उच्च पातळीवर सेंद्रिय कर्बाची टक्केवारी राखली जाते. त्यामुळे शेतीतील अनेक प्रश्‍न मुळातून संपतात. जमिनीची जलधारण शक्ती वाढल्याने पिकाला पाणी कमी लागते. दोन पावसाच्या सत्रात अगर पाण्याच्या पाळीत जास्त अंतर पडले तरी पीक वाळत नाही. खतातील अन्नांश पिकापर्यंत पोहोचवण्याचे काम जमिनीतील सूक्ष्मजीव करतात. त्यांनी हे काम व्यवस्थित करण्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्याच्या गरजा प्रथम भागवाव्या लागतात. सेंद्रिय कर्ब हे केवळ त्याचेच खाद्य. ते योग्य राखल्यास रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते.

मी १९७० पासून शेती करतोय. १९९० पर्यंत चांगले उत्पादन मिळायचे. नंतर चिंताजनक पातळीपर्यंत घटले. त्यावर अभ्यास करताना भू-सूक्ष्मजीवशास्त्राकडे वळलो. १०-१५ वर्षे वेगवेगळे प्रयोगांनंतर २००५मध्ये वरील तंत्र गवसले. केवळ एकाच वर्षात १९७०सारखे उत्पादन मिळू लागले. याचा अर्थच असा की पहिल्या वर्षात जमिनीची सुपिकता मूळ पातळीपर्यंत पोहोचली. शोध घेता असे लक्षात आले की, प्रचलित तंत्रामध्ये शेणखत कंपोस्टचा वापर करून जमिनी सुपीक करण्याचा प्रयत्न केला जात होता. आता या तंत्रात मागील पिकाच्या जमिनीखालील अवशेषाचा वापर या कामासाठी केला आहे. याचा अर्थ वनस्पतीच्या जमिनीवरील भागापेक्षा जमिनीखालील अवशेष सेंद्रिय खतासाठी सर्वांत चांगले.

ते जमिनीची कोणतीही हलवाहलवी न करता जसे वाढले त्याच अवस्थेत मारून टाकले की जमीन आपोआप सुपीक होते. हाच नियम तणांना का लावू नये? २०११पासून याच पद्धतीने तणापासून सेंद्रिय खत बनवणे सुरू केले. तण नियंत्रण हा आजवर कार्यक्रम राबविला जात आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ खर्च होते. आता तण व्यवस्थापनाच्या नवतंत्राने खर्चाऐवजी त्यातून मिळकत होत आहे. जागेवरच सेंद्रिय पदार्थ कुजत ठेवल्यामुळे कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणाऱ्या अनेक उपपदार्थामुळे जमिनीचा बिघडलेला सामू दुरुस्त करणे, निचरा शक्तीत, क्षारतेत सुधारणा करणे ही कामे आपोआप घडतात. जमिनीच्या शुद्धीकरणामुळे पीक उत्पादनाबरोबर दर्जात सुधारणा झाली. परिणामी उत्पादनाला त्याची आनुवंशिक मूळ चव, स्वाद, सुगंध प्राप्त होणे यावर आज फारशी चर्चा नाही. आज संख्यात्मक उत्पादन वाढीकडे धावतो आहोत. आता गुणात्मक वाढीकडे वळण्याची गरज आहे.

हे तंत्र का आहे उपयुक्त...

  • मशागतीचा संपूर्ण पैसा खिशात

  • सेंद्रिय खताचा खर्च शून्य

  • तण व्यवस्थापन ही उत्पन्नाची बाब

  • कमी पाणी, रासायनिक खते,

  • मनुष्यबळ, औषध फवारण्या

  • कमीत कमी खर्च आणि चांगले उत्पादन

(लेखक शेतीचे तज्ज्ञ अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT