सप्तरंग

राजा मुंबईला जाऊन आला! (उत्तम कांबळे)

उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com

रोज शेकडो तरुण मुंबईत भाकरीचा शोध घेतात. सगळ्यांनाच ती सापडते, असं नाही. या शोधात मुंबईत या तरुणांचं काय होतं, हेही मुंबईला ठाऊक आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर बहुतेक तरुण सांगतात ः ‘नोकरी मिळेल, न मिळेल ती वेगळी गोष्ट; पण नोकरीच्या प्रयत्नात सरकारी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या आम्हांसारख्या धडपड्या तरुणांची तिथं काहीतरी तात्पुरती सोय करायला हवी.’ अर्थात, ही अपेक्षा आहे. व्यवस्थेपर्यंत ती पोचणार का आणि पोचली तर काही सकारात्मक पावलं उचलली जाणार का ते ठाऊक नाही.

विदर्भातून पोट भरण्यासाठी आलेल्या एका अपंग वॉचमनचा तो मुलगा. त्याच्या वडिलांनी आमच्या आजूबाजूलाच अनेक बांधकाम प्रकल्पांवर वॉचमन म्हणून काम केलेलं. एका पायानं अपंग असल्यानं त्याला कष्टाची कामं फार जमत नाहीत. रखवालदारीचं काम जमतं. प्रकल्प तयार होईपर्यंत त्याच्या निवासाची सोय होते. तो पूर्ण झाला की मग कंत्राटदाराच्या नव्या प्रकल्पावर तो रखवालदाराचं काम करतो. त्याची बायको आजूबाजूला धुण्या-भांड्याची कामं करते. एका पत्र्याच्या शेडमध्ये तिघांचा संसार. हा, त्याची बायको आणि त्याचा मोठा मुलगा राजा. आता हा राजा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात आहे, हे कुणाला पटणार नाही.

रखवालदाराचा मुलगा इंजिनिअरिंगला कसा, असा प्रश्‍न कुणीही स्वाभाविकपणे विचारेल. तो कॉलेजही करतो. घरही सांभाळतो. बाजारहाट, दळणवळण ही कामं त्याच्याकडं. खरंतर त्याला कोणत्याही होस्टेलमध्ये सहज प्रवेश मिळू शकला असता; पण अपंग वडिलांना, धुणी-भांडी करणाऱ्या आईला आपलीही थोडीफार मदत व्हावी म्हणून त्यानं शेडमध्ये पालकांबरोबर राहणं पसंत केलं. कंत्राटदारानं कुठं कुठं लावलेल्या बल्बच्या उजेडात तो अभ्यास करतो. फ्लॅटसाठी चार भिंती उभ्या झाल्या की तिथंही अभ्यासाला बसतो.

...तर हा राजू कधी कधी माझ्याबरोबर फिरायला येतो. चालत असतानाच त्याला त्याची आई कुठून तरी फोन करते. दळण निवडलं का, दळून आणलं का, पाणी भरलं का, भाजी आणली का? मग हा मध्येच चालायचं बंद करतो. कामासाठी निघून जातो. जमेल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा मला तो पकडतो कधीतरी. जेव्हा केव्हा येतो तेव्हा त्याच्या खिशात माझ्या कुत्र्यासाठी पावाचा एक तुकडा असतो. तसं बांधकामावर त्यांच्या शेडसमोरही बरीच गावठी कुत्री आहेत. जणू काही ती त्याच्या मालकीची आहेत. कॉलनीतली अनेक मांजरं अन्नाच्या शोधात त्याच्या शेडमध्ये घुसतात. कधी हा, तर कधी गावठी कुत्री भुंकून, पाठलाग करून मांजरं पळवतात त्यांच्या त्यांच्या लक्‍झरी फ्लॅटमध्ये. हा राजा जुन्या बाजारात जीन्सची पॅंट विकत घेतो. रस्त्यावर स्वस्तात मिळणारे बूट घेतो. जुन्या बाजारातून मोबाईल आणतो. त्याच्याकडं तीन हॅंडसेट आहेत. आई-वडिलांकडं दोन आणि एक याच्याकडं. कोणत्या तरी स्कीममध्ये तो आहे. कॉलिंग फ्री आणि इनकमिंगही फ्री. अगदीच किरकोळ बिल येतं. मध्येच दहा-वीस रुपयांचं पॅक मारतो. ऑनलाइन होऊन नोकऱ्या कुठं मिळतील, याची माहिती शोधतो. सायबर कॅफेत कधी कधी जातो, तर कधी पेपरात डोळे खुपसून नोकऱ्या शोधतो. त्याला कॉलेजही करायचं आणि नोकरीही. होता होईल तेवढं शेडमधून लवकर बाहेर पडायचं. राबराबून हाडं गायब करून घेतलेल्या आई-वडिलांना सांभाळायचं. घरात बसवून त्यांना खाऊ घालायचं. मी अनेकदा त्याला घरी जेवायला, चहाला बोलवायचा प्रयत्न केला. काही वेळा ‘तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जुने कपडे हवेत का,’ असं विचारलं. मात्र, त्यानं नम्रपणे हसत नकार दिला. भीक मागायची सवय काही चांगली नाहीय, असं त्याचं म्हणणं. मग मी माझं शब्दचातुर्य वापरून भीक या शब्दाला पर्यायी ‘मदत’ असा शब्द वापरायचो. ते त्याला कळायचं. ‘नाही’ म्हणायचा आणि हळूच खिशातला पाव काढून कुत्र्याला द्यायचा. मला कसंसंचं वाटायचं; पण कुत्रा दोन फूट उडी मारून पाव पकडायचा.

एक दिवस मी रस्त्यावर चालत असताना त्यानं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून आवाज दिला. ‘थांबा सर, मी येतोच,’ असं म्हणत तो धावतच आला. अर्थात, पावाचा एक तुकडा घेऊनच. आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. हा म्हणाला ः ‘‘सर, मी मुंबईला जाऊन आलो.’’
मी ः ‘‘कशासाठी?’’
तो ः ‘‘जॉबसाठी. लेखी परीक्षा होती. मेडिकल टेस्टही होती.’’
मी ः ‘‘मिळाली का नोकरी?’’
तो ः ‘‘नाही अजून. ओरल बाकी आहे.’’
मी ः ‘‘कसा गेलास मुंबईला? पूर्वी कधी गेला होतास का?’’
माझ्या या प्रश्‍नावर त्याला सविस्तर बोलायचं असावं. तो पहिल्यांदाच मुंबईला गेला होता. ती पाहिल्याचा त्याला खूप आनंद झाला होता. ‘‘मग सांगू का थोडं सविस्तर?’’ असं म्हणत तो सांगू लागला आणि मी गांभीर्यानं ऐकू लागलो. त्यानं खूप बोलावं यासाठी प्रोत्साहन देऊ लागलो.

...तर राजा म्हणाला ः ‘‘सर, परीक्षा दहा वाजता होती म्हणून आम्ही रात्रीच निघायचं ठरवलं. मुंबईला मी पहिल्यांदाच जात होतो. सोबत दूरचा एक नातेवाईक घेतला. त्याला मुंबई माहीत होती. रात्री नाशिक रोडला अकरा वाजता पोचलो. मिळेल त्या रेल्वेनं जायचं ठरवलं. गाडी आली; पण जनरलचा डबा खचाखच भरलेला. आम्ही आत शिरूच शकलो नाही. मग या नातेवाइकाच्या - वसंत त्याचं नाव -  डोक्‍यात आयडिया आली. रेल्वे चुकू द्यायची नाही, असा निर्धार करत त्यानं मला धावायला लावलं. तो पुढं, मी मागं असं धावत पार्सलच्या डब्यात घुसलो. मांडी घालून बसलो. मोठ्या संकटातून बाहेर पडलो. रेल्वे सुरू झाली आणि थंडी थोबाडीत मारायला लागली. हुडहुडी सहन करतच ठाण्यात पोचलो. तिथं रेल्वेचे कर्मचारी डब्यात आले. ‘चला सामान ठेवायचंय; जनरलमध्ये घुसा,’ असं म्हणू लागले. आम्ही त्या डब्यात घुसलो. पाय ठेवायला कशी तरी जागा मिळाली. रेल्वे सुरू झाली. गर्दीत एक फायदा झाला, तो म्हणजे थंडी कमी वाजू लागली. तेवढ्यात एक हिजडा घुसला. त्याच्या मागं दुसरा, मग तिसरा. त्यांची एक टोळीच तयार झाली. पुढचा टाळ्या वाजवायचा; मागचा पैसे मागायचा. कुणीतरी दहा रुपये द्यायचं. कुणीतरी पैसे दिले नाही म्हणून शिव्या खायचं. वश्‍यानंही दहा रुपये दिले. तो म्हणाला ः ‘‘यांचा रेट ठरलाय. दहाची पत्ती दिली की हे काही त्रास देत नाहीत. नाहीतर आपले गाल ओढतात. त्यांना पन्नास-शंभराची पत्ती दिली तरीही दहाच रुपये घेतील... बाकीचे पैसे परत देतील.’’ वश्‍याला बरीच माहिती असावी, असं मला वाटलं. रेल्वे सुरूच राहिली. वाटेत सिग्नल नसल्यामुळं तिनं बराच वेळ मुक्काम केला होता. दादरला पोचायला सात वाजले. रेल्वे स्टेशनमध्ये तोंड धुतलं. कपडे बदलण्याचा प्रश्‍न नव्हता. एकाच ड्रेसवर आम्ही आलो होतो. बाहेर येऊन वडापाव-चहा घेतला. मुलाखतीच्या ठिकाणी जाण्यासाठी दहा रुपये देऊन ‘बेस्ट’चं तिकीट काढलं. ‘बेस्ट’चं एक बरं आहे सर, थोड्या पैशांत खूप प्रवास करता येतो. आता बसायला जागा मिळत नाही ही गोष्ट वेगळी. आमचा थांबा आला आणि एक सीट मोकळी झाली. मुलाखतीला म्हणजे लेखी परीक्षेला खूपच वेळ लागला. मग फिजिकल टेस्ट झाली. पळायला, ओझं उचलायला, छाती फुगवायला, उड्या मारायला लावलं. बराच वेळ गेला. चांगली गोष्ट म्हणजे, परीक्षेचा निकालही लगेचच लागला. मी पास झालो. खूप आनंद झाला; पण एक अवघड गोष्ट तयार झाली. ती म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी व्यक्तिगत चर्चा करायला बोलावलं होतं. एकेक गट करून चर्चा होणार होती. केंद्र सरकारची संरक्षण खात्यासंदर्भातली नोकरी होती. पगारही चांगला सांगण्यात आला. मीही गटचर्चेसाठी थांबायचं ठरवलं. संस्थेतून बाहेर पडलो. जवळच असलेला वांद्रा-वरळी सी लिंक पाहून वश्‍या परत आला. आता मुक्काम करायचा कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्‍न होता. हॉटेलमध्ये रूम घेण्याइतके पैसे नव्हते. मुक्काम होईल असं आम्हाला वाटलंही नव्हतं. वश्‍या म्हणाला की सी लिंकच्या एका बाजूला कोपऱ्यात झोपू. त्याचं पटलं. पुन्हा गाड्यावर जाऊन वडा-पाव पोटात ढकलला. एक भेळही खाल्ली. सी लिंकजवळ आलो. आता उघड्यावरच झोपायचं होतं. अंथरूण-पांघरूण काही नव्हतं. दोघंही मांडी घालून गप्पा मारू लागलो. रात्रीचे दहा वाजले असतील. आता तिथंच पाय लांब करणार तोच बाईकवरून वर्दीतला पोलिस आला. त्यानं आमची चौकशी केली. आम्ही खरीखरी माहिती दिली. तो आम्हाला समजावत म्हणाला ः ‘‘या भागात चोरांच्या, मारहाण करणाऱ्यांच्या टोळ्या येतात. अनोळखी लोकांना मारहाण करून पैसे काढून घेतात. साहित्य घेतात. रिस्की आहे इथं झोपणं आणि तसं झोपायला परवानगी नाही. कुणी दिसतं का इथं झोपलेलं? जा कुठं तरी. नाहीतर तुमची कागदपत्रंही ते काढून घेतील. पैसे घेऊन पळून जातील. आम्ही काही इथं कायम असत नाही. चार-सहा तासांनी एकदा राउंडला येतो.’’
शिपायानं खूपच छान समजावून सांगितलं. आमची काळजी त्याला वाटत असावी. आम्ही चालत शेजारच्या बसस्टॉपवर आलो. दादरला जाणाऱ्या बसमध्ये बसलो. चालत चालत स्टेशनमध्ये गेलो. बुक स्टॉलवर जाऊन दोन पेपर घेतले. चार रुपयांचा पेपर दोन रुपयांत घेतला. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आजचा पेपर रद्दी झाला होता. चार रुपयांत दोन पेपर आले. भरपूर पानं होती. स्टेशनमध्ये फिरून एक मोकळा बाक शोधला. बाकावर पेपर अंथरले तर तेवढ्यात तिथंही एक पोलिस आला. ‘बाकावर नको; फरशीवर झोपा,’ असं सांगून निघून गेला. आम्ही फरशीवर पेपर अंथरले. निवांतपणे अंग टेकलं. तेवढ्यात काठी वाजवत आणखी एक पोलिस आला. ‘इथं झोपू नका. बाहेर जाऊन फुटपाथवर कुठं तरी झोपा,’ असं म्हणू लागला. आम्ही त्याला खूप विनंती केली. ‘परीक्षेसाठी आलोय. अचानक मुक्काम करावा लागला. रात्र काढू द्या,’ अशी विनंती करत त्याला कागदपत्रं दाखवली. त्यालाही दया आली. त्यानं झोपायला परवानगी दिली. झोप काही लागत नव्हती. उद्याचा दिवस आणि त्यात लपलेली नोकरी दिसत होती. आम्ही जिथं झोपलो ती जागा कुणातरी भिकाऱ्याची असावी. तासा-दोन तासाला येऊन कुणी तरी उठवायचं. मग तीच विनंती...तीच गयावया...सकाळी सहालाच उठून बसलो. रेल्वे स्टेशनमध्ये तोंड धुतलं. आंघोळीचा प्रश्‍न आलाच नाही. दातही घासले नाहीत. स्टेशनबाहेर येऊन चहा घेतला. परीक्षेच्या ठिकाणी पुन्हा व्यायाम करायला लावतील म्हणून नाश्‍ता केला. दिवसभर बसवून ठेवलं. सायंकाळ होता होता चर्चा झाली. ‘तोंडी परीक्षेसाठी पत्र येईल,’ असं सांगितलं. पुन्हा दादरकडं जाण्यासाठी निघालो; पण आता तिकिटासाठी पैसे नव्हते. चालत-बसत-उठत दादर स्टेशनमध्ये पोचलो. तिकीट न काढताच रेल्वेत घुसायचं ठरवलं. घुसलोही. पहाटे पहाटे नाशिक रोडला पोचलो. मुंबईत सारखं धावायला लागतं. आम्हीच काय आख्खी मुंबईच धावत असते. घामानं अनेकदा कपडे ओलेचिंब झाले. घाण वास सुटायचा; पण करता येण्यासारखं काहीच नव्हतं. आता ओरलसाठी वाट पाहतोय...’’

आमचं चालून संपलं तरी राजाचं बोलणं काही संपत नव्हतं. आता ओरलला जातानाही असंच करावं लागणार आहे, हे सांगायला तो काही विसरला नाही. ०९वाटेत तो त्याच्या शेडमध्ये गेला. मी एकटाच निघालो. नोकरीच्या शोधात मुंबईला जाऊन मीही लोअर परेलमध्ये फुटपाथवर झोपलो होतो. राजाचं ऐकून तीस-पस्तीस वर्षं मागं गेलो. रोज शेकडो तरुण मुंबईत भाकरीचा शोध घेतात. सगळ्यांनाच ती सापडते, असं काही नाही. या शोधात मुंबईत या तरुणांचं काय होतं, हेही मुंबईला ठाऊक आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर बहुतेक तरुण सांगतात ः ‘नोकरी मिळेल, न मिळेल ही वेगळी गोष्ट आहे; पण नोकरीच्या प्रयत्नात सरकारी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या या धडपड्या तरुणांची तिथं काहीतरी तात्पुरती सोय करायला हवी.’ अर्थात, ही अपेक्षा आहे. व्यवस्थेला ते कळणार की नाही ठाऊक नाही. राजाचीही तीच अपेक्षा होती. परीक्षा पूर्ण होईपर्यंतच्या काळात गरीब पोरांच्या अन्नपाण्याची आणि रात्री पाय पसरण्याची सोय झाली तर खूप बरं होईल, असं त्याला वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT