चित्रपट sakal
सप्तरंग

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मकत

व्ही. शांताराम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यात नायकाची भूमिकाही केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

किरण फाटक

‘दो आँखे बारह हाथ’ हा चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झाला. व्ही. शांताराम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यात नायकाची भूमिकाही केली आहे. हा चित्रपट उत्कृष्ट हिंदी चित्रपटांमधील एक मानला जातो, तसंच मानवतेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला विचार या चित्रपटातून प्रामुख्याने समोर येतो.

या चित्रपटाने बर्लिन इथल्या आठव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदक प्राप्त केलं होतं. अमेरिकेबाहेर प्रदर्शित झालेला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गोल्डन ग्लोब पुरस्कार या चित्रपटाला मिळाला.

सहा अट्टल कैद्यांना सुधारण्याचं जटिल काम आदिनाथ या तुरुंग अधिकाऱ्यानं अंगावर घेतलं. त्याने मनात एक योजना बनवून त्या सहा अट्टल कैद्यांना एका नापीक शेतावर नेऊन कामाला लावलं आणि श्रमाचं महत्त्व पटवून दिलं. व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटातील ‘ऐ मालिक तेरे बन्दे हम..’ हे गीत भरत व्यास यांनी लिहिलं असून, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि लता मंगेशकर यांनी आपल्या भावपूर्ण आवाजात गायलंय.

भरत व्यास यांच्या पाच प्रसिद्ध गाण्यांमधील हे एक गाणं आहे. अन्य चार गीतं अशी - १) जीवन मे पिया तेरा साथ रहे, २) ज्योत से ज्योत लगाते चलो, ३) आधा है चंद्रमा रात आधी, ४) आ लौटके आजा मेरे मीत....

वेगवेगळे अपराध केलेले कैदी यात दाखविले आहेत. या पार्श्वभूमीवर या गाण्यातील ईश्वराला घातलेलं साकडं यथार्थ ठरतं. यात गांधीवादी तत्त्वज्ञानही मांडलेलं दिसतं. या गाण्यात राग मालकंस आणि जोग यांचा एकत्र मिलाप केलाय.

पंचम आधिक्याने आलेला दिसत असल्याने पूर्णांशाने हे गाणं मालकंस या रागात आहे असं म्हणता येणार नाही. ‘बंदे हम’ इथं अचल अशा पंचमावर विश्राम केल्याने मनातील देवावरचा ठाम विश्वास दिसून येतो. हे गाणं मंद्र आणि मध्य सप्तकात फिरतं, त्यामुळे गाण्यातील गांभीर्य अधोरेखित होतं. गाण्यातील कोरसमुळे गाण्याचं गांभीर्य वाढत राहतं.

सर्व कैदी अतिशय करुण भावनेने, खाली मान घालून उभे आहेत आणि नायिका ईश्वराची आळवणी करत आहे. हे कारुण्य लताबाईंनी आपल्या दैवी सुरातून अतिशय समर्पकपणे प्रदर्शित केलं आहे. लताबाईंचा अचूक सूर हा कोणत्याही भावनेच्या छटेला अतिशय टोकदारपणे प्रदर्शित करतो, असं मला वाटतं.

या गाण्यात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कमालीची सकारात्मकता दिसून येते. माणूस हा जन्माला येतो तेव्हा वाईट प्रवृत्तीचा नसतो. जन्माला आल्यावर त्याला मिळणारी परिस्थिती, संस्कार त्याला चांगलं किंवा वाईट घडवत असते. माणूस हा मुळात चांगल्या प्रवृत्तीचा आणि चांगल्या स्वभावाचा असतो;

परंतु त्याला येणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवांतून तो शिकत जातो आणि त्याच्यावर बरे किंवा वाईट परिणाम होत जातात. अमुक एखादा माणूस असाच का वागतो याला उत्तर नसतं. म्हणून या चित्रपटात कैद्यांना सुधारण्याचं काम यातील तुरुंगातला अधिकारी करत असतो.

कैदी हे जरी चोऱ्यामाऱ्या किंवा त्याहीपेक्षा गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा झालेले असले, तरी त्यांना जर चांगली वागणूक दिली तर ते सुधारू शकतात, यावर त्या जेलरचा विश्वास असतो. आपण जर कुणाचं वाईट केलं, तर आपल्या कर्मांचं फळ आपल्याला तसंच मिळतं, असा उपदेश भगवद्‍गीतेत केलेला आहे. सत्य, अहिंसा, धर्म, दया, क्षमा, शांती या मार्गाने जर आपण चालत राहिलो आणि त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवली, तर आपल्यालाही समाज

त्याच प्रकारची चांगली आणि योग्य अशी वागणूक देत राहतो. ‘कर भला सो होगा भला’ असं म्हटलेलं आहे. साने गुरुजी म्हणतात, ‘‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे; जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे...’’ मराठीतसुद्धा असं म्हणतात की, ‘प्रेम लाभे प्रेमळाला’.

आपण जे देतो तेच आपल्याकडे अनेक पटींनी परत येत असतं. म्हणून आपण जी जी कर्मं करतो, ती जर पुण्यकारक, उपकारक, समाजोपयोगी अशी असली, तर ती सर्व कर्मं आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या माणसांकडून अनेक पटींनी परत येत असतात.

तुकाराम महाराज म्हणतात, ‘निंदकाचे घर असावे शेजारी.’ निंदक शेजारी असला की, आपल्यातले दोष आपल्याला कळून येतात आणि आपल्याला सुधारण्याची संधी प्राप्त होते. म्हणून जरी कोणी आपली निंदा केली, तरी दुःख न मानता, त्यात सुख मानून माणसाने आपले दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे गाणं म्हणजे केलेल्या प्रार्थनेत देवाकडे मागणं मागितलं आहे

की, कितीही घोर संकटांचा सामना करावा लागला तरी हे देवा, तू इतका बलशाली आहेस की, ती सगळी संकटं तुझ्या आशीर्वादाने नाहीशी होतील आणि जरी सुखाचा सूर्य मावळतीकडे झुकला असला, तरी पुन्हा तो पूर्वेला लवकरच नक्की उगवेल असा आम्हा सर्व प्राणिमात्रांना विश्वास आहे. कारण हे देवा, आम्ही सर्व माणसं अत्यंत कमजोर असून, तूच एक बलशाली आहेस.

तुझ्या मनात आलं तर तू अमावास्येची पौर्णिमा करू शकतोस किंवा रात्रीचा दिवस करू शकतोस. आमच्यावर कोणीही कितीही जुलूम-जबरदस्ती केली, आम्हाला कितीही छळलं, तरीसुद्धा हे देवा, तू जर आमच्या मदतीला असलास, तर आम्हाला त्या सर्व जुलूम-जबरदस्तीला तोंड देण्याचं बळ येईल आणि तेही दिवस आम्ही अत्यंत सहजगत्या काढू शकतो.

हे देवा, जन्म आणि मृत्यू हे तुझ्या हातात आहे, आम्ही माणसं केवळ तुझे दास आहोत. आमच्या हातून सर्व पुण्यकारक गोष्टी घडू दे आणि आमच्या हातून पापकृत्यं होणार नाहीत याची तूच काळजी घे. अशाच प्रकारची प्रार्थना रवींद्रनाथ टागोर यांनी ईश्वराला केली आहे.

थोडक्यात, ईश्वराजवळ आपण खालील प्रार्थनेप्रमाणे मागणं मागू या...

इतनी शक्ती हमें देना दाता

मन का विश्वास कमजोर हो ना

हम चलें नेक रास्ते पे हमसे

भूलकर भी कोई भूल हो ना...

‘ऐ मालिक तेरे बन्दे हम’ हे गीत शांत आणि भक्तिरसाची ज्योत मनात प्रज्वलित करणारं आहे. नवविधा भक्तीमधील आत्मनिवेदन भक्ती या गाण्यात दिसून येते. या प्रार्थनेत ईश्वरालाच सर्वस्व मानलं आहे. ‘तू आम्हाला जन्म दिलास, तूच आमच्या दुःखाची बोचणी सुसह्य करशील. कोणी जरी आमच्याशी वाईट वागलं, तरी आम्ही मात्र चांगलंच वागू. त्यामुळे द्वेष, क्रोध यांना आळा बसून, हिंसाचाराचा विचारही मनात येणार नाही, सर्वजण शांतीचा अनुभव करतील.’

(लेखक हे ‘संगीत अलंकार’ असून, संगीत क्षेत्रात चार दशकांपासून कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT