असे सांगायचे होते, तसे सांगायचे होते
मला आता सुचे तेव्हा किती बोलायचे होते!
अनेक वर्षांपूर्वी (अजून अपूर्णच असलेल्या गझलेत) मी हा शेर लिहिला होता तेव्हा असं वाटलं होतं ‘सांगण्याबद्दल’ याहून आणखी कमी शब्दांत काही सांगता येणार नाही; पण स्पृहा जोशीनं लिहिलेली ‘किती सांगायचंय मला...’ ही ओळ ऐकली आणि एकदम ‘युरेका’ झालं. गेल्या काही वर्षांत मी वाचलेली सर्वांत सोपी, बोलकी आणि तरीही कमालीचा आशय पोटात दडवलेली ही ओळ. माझ्या मते या ओळीनंतरचं गाणं लिहिलं नसतं तरीही त्याचा परिणाम तसूभरही कमी झाला नसता.
किती सांगायचंय मला किती सांगायचंय
कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन् पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला मग आवरू किती
किती सांगायचंय मला किती सांगायचंय
मना, हवे असे, अलवारसे कोणा कसे सांगायचे हे गाणे
मना, माझ्या जगी जा रंगुनी पाहून घे हे स्वप्न दिवाणे
हलके हलके सुख हे बरसे
हलके हलके सुख हे बरसे
मनाच्या पाऱ्याला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओलेती लहर
घेऊ दे मनाला श्वास मोकळा
किती सांगायचंय मला किती सांगायचंय
हसऱ्या सुखाचा पहिलावहिला मोहर हा
थकल्या जिवाला पहिल्या सरीचा दरवळ हा
क्षण हे हळवे जपावे, इवल्या ओठी हसावे
आज चिंब व्हावे, पार पैल जावे
किती सांगायचंय
मनाच्या पाऱ्याला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओलेती लहर
मनाच्या गावी असे दोघांचेच घर
घेऊ दे मनाला श्वास मोकळा
‘डबल सीट’ या चित्रपटासाठी स्पृहानं लिहिलेलं हे गाणं म्हणजे सुख-दु:खाचं बेमालूम मिश्रण आहे. पडद्यावर अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या नात्यातले आनंदी क्षण दिसत राहतात; पण जसराज जोशी आणि आनंदी जोशीच्या आवाजातून आर्तता ठाव घेत राहते. हृषीकेश, सौरभ, जसराज या संगीतकारांबरोबर बरंच काम केलेलं असल्यानं मला हे नक्की माहीत आहे की, त्यांच्या चालींमधून अनेकदा शब्दांचे वेगवेगळे अर्थ सामोरे येतात. संपूर्ण गाणं हे कथेला अनुसरून असलं तरी जसराजच्या आवाजात ‘किती सांगायचंय मला...’ ऐकलं की स्वत:चं सांगणं सुरू होतं. शक्यतेच्या पटावर आपले अनुभव उमटू लागतात.
या जगात प्रत्येकालाच काही ना काही सांगायचं आहे. प्रत्यक्ष भेटींना लागलेली ओहोटी आणि संभाषणातली कुचंबणा यांमुळे तर ही अस्वस्थता, ही घुसमट भळभळून वाहते आहे, म्हणूनच कदाचित या ‘सांगण्यानं’ समाजमाध्यमं दुथडी भरून वाहताना दिसतात; पण सांगण्याची इच्छा असणं, सगळं सांगता येणं आणि वाचणाऱ्याला ते सगळं जसंच्या तसं ‘ऐकू’ येणं यांत सांगण्यातला आत्मा हरवून जाण्याची शक्यताच जास्त! छापील मेसेजरूपी संभाषणांना ‘ध्वनी’ नसल्यानं समोरची व्यक्ती आपलं म्हणणं तिच्या स्वरात, तिच्या मन:स्थितीत ऐकते आणि संवादाआडचा विसंवाद मनात साचत राहतो.
या साचण्यामुळेच ‘काही सांगायचंय’नं झालेली सुरुवात ‘किती सांगायचंय!’ पर्यंत येऊन पोहोचते. गैरसमज होण्यापेक्षा न बोललेलंच बरं म्हणून कवाडं घट्ट मिटून घेतली जातात आणि त्याचाही विपर्यास होत राहतो.
शान्ताबाई शेळके म्हणतात तसं :
काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही, विपरीत होत आहे
अशा वेळी स्वच्छ, पारदर्शी संभाषण करायचं असेल तर मनासारखा दुजा नाही रे सोयरा. कल्लोळाच्या टोकाला मौनाचं विष लावलेला तीर नीरवतेच्या जिव्हारी लागतो आणि जखमेतून कविता वाहू लागते.
संजीवनीताई बोकील लिहितात :
संवेदनांच्या बाणांची टोकं
बाहेर वळली की जखमा होतात
आत वळली की कविता!
म्हणूनच ‘किती सांगायचंय मला...’ या ओळीनंतर गाणं ऐकू येतच नाही, ऐकू येत राहतो तो फक्त आपला, आपल्या मनाशी सुरू असलेला शब्दविरहित, संततधार संवाद. स्पृहाचं सांगणं हे नसेलही; पण तिच्या एका ओळीनं माझं सांगणं आतल्या दिशेनं वळवलं हे नक्की. या आगळ्या वेगळ्या अनुभवाबद्दल तुझे आभार, स्पृहा!
शेवटी , शब्देंविण संवादु, दुजेंविण अनुवादु हेच अंतिम सत्य!
(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.