British sakal
सप्तरंग

इंग्रजांचे नामपुराण

क्रिकेट खेळताना इंग्लंडचा संघ मैदानात उतरतो. मात्र ऑलिंपिक खेळताना ‘ग्रेट ब्रिटन’च्या झेंड्याखाली खेळतात. ‘युनायटेड किंगडम’ या देशाच्या खेळाडूंचा ऑलिंपिकमध्ये पत्ता नसतो.

अवतरण टीम

- वैभव वाळुंज

क्रिकेट खेळताना इंग्लंडचा संघ मैदानात उतरतो. मात्र ऑलिंपिक खेळताना ‘ग्रेट ब्रिटन’च्या झेंड्याखाली खेळतात. ‘युनायटेड किंगडम’ या देशाच्या खेळाडूंचा ऑलिंपिकमध्ये पत्ता नसतो, मात्र त्या देशाच्या ध्वजाखाली ‘टीम जीबी’चे खेळाडू खेळताना दिसतात. मग या देशाचे नाव नक्की आहे तरी काय?

अमेरिकेच्या वसाहतींसोबत युद्ध हरल्यानंतर अमेरिकन नागरिक ब्रिटिशांना काय म्हणाले?’ - ‘युनायटेड किंगडम’ म्हणाले असतील!

‘युनायटेड किंगडम’मधील अनेक भागांमध्ये फिरताना हा विनोद बरेचदा कानी पडतो. ब्रिटिशांच्या आपल्या देशाच्या नामकरणाच्या बारा भानगडी हा औत्सुक्य, राष्ट्रीयता, वंश, ओळख आणि अनायासे विनोदाचाही विषय आहे.

नाव बदलण्याची किंवा एका देशासाठी अनेक नावे असण्याची पद्धत अनेक देशांसाठी नवी नाही.

‘भारत’ व ‘इंडिया’ या नावावरून पडघम वाजत असताना स्वतःच्या नावाविषयी प्रचंड विविधता असणाऱ्या देशात नावावरून वेगवेगळे अनुभव येत असतात. या सदराला दिलेले आंग्लभ्रमण नाव हे इंग्लंडमधील प्रवासावर आधारित म्हणून इंग्लंडच्या संस्कृत-मराठी नावानुसार दिलेले आहे. पण अनेकदा त्याला युके, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, ब्रिटिश आयल्स अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. याची नेमकी गोम काय?

आता इंग्लंड हेच नाव बघा- क्रिकेट खेळताना इंग्लंडचा संघ मैदानात उतरतो. मात्र ऑलिंपिक खेळताना ‘ग्रेट ब्रिटन’च्या झेंड्याखाली खेळतात. ‘युनायटेड किंगडम’ या देशाच्या खेळाडूंचा ऑलिंपिकमध्ये पत्ता नसतो, मात्र त्या देशाच्या ध्वजाखाली ‘टीम जीबी’चे खेळाडू खेळताना दिसतात. मग या देशाचे नाव नक्की आहे तरी काय?

युरोपच्या उत्तरेला पसरलेल्या दोन बेटांवर सध्या आयर्लंड व युके अर्थात ‘युनायटेड किंगडम’ हे दोन देश वसलेले आहेत. सध्या या दोन्ही देशांना एकत्रितपणे ‘ब्रिटिश आयल्स’ असे म्हटले जाते. अर्थात हे नाव आयरिश नागरिकांना आवडत नाही व या विरोधात आयर्लंडच्या सरकारने आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करत हे नाव कागदपत्रांतून काढून टाकले आहे.

‘युनायटेड किंगडम’ या देशामध्ये सध्या चार प्रांत आहेत : इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड. ब्रिटिश राजघराण्याचा अंमल असल्याने या चारही प्रांतांना एकत्रितपणे ‘युनायटेड किंगडम’ असे म्हटले जाते. पहिल्या तीन प्रांतांना एकत्रितपणे ‘ब्रिटन’ असे संबोधले जाते. यापैकी नॉर्दर्न आयर्लंड हा प्रांत मुख्यभूमी आयर्लंड बेटावर आहे.

म्हणून चार प्रांतांना एकत्रितपणे ‘ग्रेट ब्रिटन’ असेही म्हणतात. नॉर्दर्न आयर्लंडमधील नागरिकांना हे नाव आवडत नाही व म्हणून ऑलिंपिकमध्ये खेळणाऱ्या संघाचे नाव बदलून ‘टीम जीबी’पासून टीम युके करावे, अशी मागणी दर ऑलिंपिकला केली जाते.

‘युनायटेड किंगडम’ या देशाचा मुख्य कारभार इंग्लंड या प्रांतातून चालतो, ज्याची लंडन ही राजधानी आहे. स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयलँड हे प्रांत असले तरी त्यांना स्थानिक भाषेत कंट्री किंवा देश असे संबोधले जाते. त्यांना काळाच्या ओघात अनेक प्रशासकीय अधिकार मिळाले आहेत.

युकेची मुख्य संसद इंग्लंडमध्ये असली तरीही उरलेल्या तीन प्रांतांना आता देश या अधिकाराखाली स्वतःची संसद मिळाली आहे. त्यांच्या संसदेमध्ये इंग्रजी व त्याबरोबर आपल्या स्थानिक भाषेत राज्य कारभार चालतो. अर्थात बऱ्याच अंशी परराष्ट्र धोरणाचे हक्क हे लंडनमधील मुख्य संसदेकडे अबाधित आहेत.

एकीकडे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी व राष्ट्रकुल खेळांमध्ये आपल्याला या चारही प्रांतांचे वेगवेगळे संघ खेळताना दिसतात, पण ऑलिंपिकमध्ये मात्र हे चारही संघ एकत्र खेळताना दिसतात. असं का? कारण या तीन खेळांचा उगम ब्रिटनमध्येच झाला होता, त्यामुळे या खेळांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यापूर्वीच चार वेगवेगळे संघ अस्तित्वात आले होते.

या खेळांचे प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करणाऱ्या संघटना पूर्वीपासूनच ब्रिटनशी जोडलेल्या असल्याने त्यांनी या चारही संघांना एकत्र खेळण्यासाठी मान्यता दिली. या संघांना एकत्रितपणे ‘होम नेशन्स’ असे म्हटले जाते, पण ऑलिंपिकसाठी एका देशाकडून एकच संघ पाठवता येतो व अद्यापही ‘युनायटेड किंगडम’ हा एकसंध देश असल्याने येथून ऑलिंपिकसाठी मात्र एकच संघ असतो, पण जर क्रिकेट ऑलिंपिकमध्ये खेळले गेले तर? तर सध्याच्या हॉकी व फुटबॉलप्रमाणे क्रिकेट संघाचीही अवस्था होईल- त्यांना इंग्लंड नव्हे तर जीबीच्या झेंड्याखाली खेळावे लागेल.

२०१२ मध्ये जेव्हा जग लंडन ऑलिंपिकसाठी सज्ज झाले होते, तेव्हा ‘युनायटेड किंगडम’मध्ये या प्रांतांनी आम्ही ‘टीम जीबी’कडून खेळणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अनेक खेळाडूंनी या ऑलिंपिकवर बहिष्कार टाकत आपापल्या प्रांतांना स्वतंत्र संघ देण्यात यावे, अशी मागणी केली. काही खेळाडू ‘टीम जीबी’कडून खेळले. मात्र त्यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी नकार दिला होता.

अर्थातच, ती मागणी मान्य होणे शक्य नव्हते. नॉर्दर्न आयर्लंडमधील खेळाडूंना मात्र आयर्लंड व युके या दोन्ही देशांकडून खेळण्याची अनुमती आहे. खेळाडू वैयक्तिक पातळीवर कोणत्या देशाकडून खेळायचे याचा निर्णय घेऊ शकतात. रग्बी खेळामध्ये मात्र नॉर्दर्न आयर्लंडमधील सरसकट सर्व खेळाडू हे आयर्लंडच्या संघाकडूनच खेळतात.

राष्ट्रकुल खेळांमध्ये ‘युनायटेड किंगडम’च्या संघांची रीघ लागलेली असते. यात ‘युनायटेड किंगडम’चे चार प्रांत आपापले वेगवेगळे चार संघ पाठवतातच, पण युकेच्या आजूबाजूला पसरलेली लहान-मोठी बेटे आपला वेगवेगळा संघ पाठवतात. जर्सी, गर्णसी, आयल ऑफ मॅन यांचे स्वतःचे वेगळे संघ राष्ट्रकुलमध्ये सहभागी होतात. युनायटेड किंगडमच्या ताब्यात जगभरातील अनेक लहान-सहान बेटे अजूनही आहेत.

उदाहरणार्थ सेंट हेलेना हा आफ्रिकेजवळील बेटांचा समूह किंवा फॉकलँड आयलँड हा अर्जेंटिनाजवळील ब्रिटिश बेटांचा समूह आपले स्वतंत्र संघ पाठवतो. म्हणूनच राष्ट्रकुल कुटुंबामध्ये ५६ देश असतानाही ७२ ध्वजांखाली खेळाडू खेळताना दिसतात.

‘युनायटेड किंगडम’ सरकारने ब्रिटिश आयल्स या शब्दाचा वापर कमी करत आणला आहे. ग्रेट ब्रिटन याचाही वापर तुरळक अपवाद वगळता फार कमी वेळा सरकारी कागदपत्रांमध्ये होतो. वेगवेगळ्या संसदा तयार झाल्यापासून प्रांतांना स्वतःची वेगळी ओळखही मिळाली आहे व त्यांनी स्वतःच्या वेगळ्या राजधान्या तयार केल्या आहेत.

जगभरातील अनेक देशांमध्ये ‘युनायटेड किंगडम’साठी आपापल्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्द आहेत- जसे फिनलँडमध्ये युकेला ‘ब्रिटानिया’ म्हणून ओळखले जाते. या नावाला रोमन देवतेच्या नावाचे संदर्भ आहेत. चिनी नागरिक या देशाला युंगो अर्थात सुंदर देश म्हणून ओळखतात. भारतामध्ये इंग्लंड, ब्रिटन, युके ही नावे परस्परांसाठी सरसकट वापरली जातात.

युकेमधील सामान्य नागरिकांसाठी मात्र एकत्रितपणे युके व स्वतंत्रपणे आपल्या प्रांताची व मूळ ठिकाणाची ओळख दाखवणारे संबोधन वापरतात. युके सरकार आपल्या नागरिकांसाठी पाच वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट देऊ करते, ज्यात ब्रिटिश पासपोर्ट हा इतर युके पासपोर्टपासून वेगळा ठेवला जाऊ शकतो.

काही लोक या विषयी फार काटेकोरपणे वेगळेपण बाळगताना आढळले तर काही अगदीच उदासीन. शेवटी ‘नावात काय आहे’ असं काही वर्षांपूर्वी इंग्लंडचाच एक शेक्सपियर नावाचा कुणी लेखक म्हणून गेला ते काही खोटं नाही. (अर्थात शेक्सपियर वेल्श होता, असाही लोकांचा कयास आहे).

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT