vantara project sakal
सप्तरंग

‘वनतारा’तील वाटा आणि पळवाटा!

‘वनतारा’ प्रकल्पात बंदिस्त वन्यजीवांसाठी पशुवैद्यकीयतज्ज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा प्रयोग कौतुकास्पद आहे.

अवतरण टीम

- केदार गोरे

‘वनतारा’ प्रकल्पात बंदिस्त वन्यजीवांसाठी पशुवैद्यकीयतज्ज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा प्रयोग कौतुकास्पद आहे. प्रकल्पाची ती जमेची बाजू म्हणता येईल. मात्र, एखाद्या जाहीर सोहळ्यात तथाकथित आजारी आणि जखमी हत्तींचे झालेले प्रदर्शन कोणता ‘कल्याणकारी उपाय’ असावा, असा भाबडा प्रश्‍न कोणाच्या मनात आला तर ते वावगे ठरू नये.

अनंत अंबानी यांनी साकारलेल्या ‘वनतारा रेस्क्यू सेंटर ॲण्ड झूलॉजिकल पार्क’ प्रकल्पाने देशातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही वर्षांपासून सुरू असलेल्या ‘वनतारा’ प्रकल्पाची माहिती अनंत यांच्या लग्नापूर्वीच्या समारंभाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आली. तो प्राण्यांसाठी कसा कल्याणकारी आहे, असे भासवणाऱ्या अनेक चित्रफिती उपलब्ध केल्या गेल्या.

अनंत यांचे प्राण्यांवरील प्रेम आणि त्यांच्याविषयी असणारी कणव म्हणजे ‘वनतारा’चे स्थापना तत्त्व आहे, असे वेळोवेळी सांगितले गेले आहे. मात्र, या प्रकल्पाची कारणमीमांसा होणे आणि त्याच्या मूळ उद्दिष्टांवर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

भारतात वन्यप्राण्यांकरिता बचाव केंद्रे किंवा प्राणिसंग्रहालये उभारण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) मंजुरी लागते. या प्राधिकरणाची स्थापना १९९२ मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEF&CC) अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.

भारतात सुमारे १४७ मान्यताप्राप्त प्राणिसंग्रहालये आहेत (संदर्भ सीझेडए वेबसाईट मार्च २०२२). त्यात ५६०पेक्षा जास्त प्रजातींच्या ५७ हजारांपेक्षा अधिक संख्येने सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप इत्यादी प्रदर्शनाच्या उद्देशाने ठेवण्यात आलेले आहेत. सीझेडए भारतातील प्राणिसंग्रहालयांच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण करते.

प्राणी कल्याणाच्या नियमांचे ती पालन करतात की नाही, हे तपासण्याचे आणि त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करते... किंबहुना असे करणे अपेक्षितच आहे. भारतातील सर्व प्राणिसंग्रहालयांपैकी १३ बचाव केंद्रे आहेत आणि त्यात आता ‘वनतारा’ची भर पडली आहे.

वैचारिकदृष्ट्या प्राणी बचाव केंद्रे प्रामुख्याने आजारी, जखमी आणि आघातग्रस्त प्राण्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि शेवटी त्यांचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यासाठी स्थापन करण्यात येतात. ज्या प्राण्यांना अस्वास्थ्य वा वृद्धावस्थेसारख्या कारणांमुळे सोडता येणार नाहीत, त्यांना कायमस्वरूपी आश्रयस्थान मिळवून देण्याचे काम अशी बचाव केंद्रे करतात. ‘वनतारा’ प्रकल्पाचीही तीच उद्दिष्टे असायला हवीत, कारण नियम सर्वांसाठी सारखेच असतात.

प्राणिसंग्रहालये पर्यटकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बंदिवासात असूनही प्राणिसंग्रहालय वन्यप्राण्यांना जवळून पाहण्याची संधी देतात. संकल्पनात्मकदृष्ट्या प्राणिसंग्रहालयांनी तीन प्रमुख उद्दिष्टे पूर्ण करायला हवीत. वन्यजीव संवर्धनाचे शिक्षण व जागरूकता, प्रजनन आणि वैज्ञानिक संशोधनातून प्रजातींचे जतन आणि संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका ती बजावू शकतात.

आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असलेल्या प्राण्यांचे प्रजनन व्हावे, ही वैज्ञानिक गरज आहे. त्या उद्दिष्टांची पूर्तता झाली तरच एखाद्या प्राणिसंग्रहालयाच्या स्थापनेला अर्थ आहे; परंतु बऱ्याचदा काही प्रजाती केवळ सार्वजनिक मनोरंजनाच्या उद्देशाने प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात. उदात्त हेतूने प्रेरित प्राणिसंग्रहालये आजमितीला फार नाहीत, हे दुर्दैवी सत्य आहे.

आजच्या इंटरनेटच्या जगात वन्यजीव माहितीपट, चित्रपट आणि वेबसाईटवर सहज उपलब्ध असल्याने आधुनिक काळात प्राणिसंग्रहालये असावीत की नाही, यावर जगभरातील प्राणीप्रेमी कार्यकर्ते आणि संघटनांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. प्राणिसंग्रहालयाच्या गरजेचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि संवर्धनाच्या नावाखाली प्राण्यांच्या अनावश्यक प्रजननावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अखेरीस अनेक प्राणिसंग्रहालये टप्प्याटप्प्याने संपुष्टात येतील.

वन्यजीव बचाव केंद्रांची स्थापना अतिशय विशिष्ट उद्दिष्टांसह केली जाते. जखमी, अनाथ किंवा मानवांशी संघर्षाने पीडित प्राण्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचा मुख्य हेतू असतो. अशा प्राण्यांना जंगलात योग्य उपचार आणि पुनर्वसनासाठी बचाव केंद्रात ठेवले जाते. जिथे पुनर्वसन शक्य नाही, तिथे अशी केंद्रे त्यांची कायमची काळजी घेतात.

वाईल्डलाईफ एसओएस आणि वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियासारख्या काही नामवंत संस्था भारताच्या विविध भागांमध्ये अशी बचाव केंद्रे यशस्वीपणे चालवत आहेत. ‘वनतारा’ प्रकल्पामध्ये दोनशेहून अधिक हत्ती, तीनशेहून अधिक वाघ, सिंह, बिबट्या आणि जग्वार, तीन हजारांहून अधिक शाकाहारी प्राणी, बाराशेहून अधिक सरपटणारे प्राणी अन् विदेशी आणि अत्यंत धोक्यात असलेल्या स्पिक्स मेकॉव, इगुआना, चिम्पांझी, ओरंगुटान आणि कोमोडो ड्रॅगनसारख्या देशाबाहेरील अनेक प्रजाती आहेत.

‘वनतारा’मधील बंदिस्त वन्यजीवांसाठी अनेक पशुवैद्यकीयतज्ज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही या प्रकल्पाची जमेची बाजू आणि प्रशंसनीय बाब आहे. त्याचे कौतुकही केले पाहिजे; परंतु ‘वनतारा’ प्रकल्पाने एकूणच वन्यजीव संरक्षणासाठी कसा हातभार लागेल, याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

‘वनतारा’च्या संस्थापकाने सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून या प्रकल्पाचा एकंदर उद्देश स्पष्ट होत नाही. हे एक आधुनिक बचाव केंद्र आहे की, देशातील सर्वात मोठे आणि प्रदर्शनात जास्तीत जास्त प्राणी असणारे प्राणिसंग्रहालय याविषयी अनेक वन्यजीव अभ्यासक साशंक आहेत.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून जामनगरला हजारो किलोमीटर नेलेल्या हत्तींच्या वाहतुकीवर अनेकांनी गंभीरपणे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. या हत्तींना कोणत्या प्रकारच्या जखमा किंवा आजारांनी ग्रासले होते? या हत्तींना वाचवण्याची खरोखरच गरज असती, तर सर्वात व्यावहारिक आणि हत्ती-अनुकूल उपाय म्हणजे या भागात आधीच स्थापन केलेल्या बचाव केंद्रांना या प्राण्यांची काळजी घेण्याची विनंती करणे.

वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची I आणि २०२३च्या सुधारित आवृत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या हत्तींसारख्या वन्यप्राण्यांच्या हस्तांतरणासाठी विविध राज्यांच्या मुख्य वन्यजीव रक्षकांकडून परवानगी घेणे ही एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्या कशा मिळाल्या हे न उलगडणारे कोडे आहे.

या बचावकार्यात पकडलेल्या हत्तींचे कल्याण आणि काळजी हाच एकमेव उद्देश असेल, तर दक्षिण भारतातील अनेक मंदिरे किंवा इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांमधील हत्तींची सुटका का केली गेली नाही, जिथे हत्तींना अनेक दशकांपासून बंदिवासात ठेवले होते, असाही प्रश्न निर्माण होतो.

सुधारित वन्यजीव (संरक्षण) कायद्यातील नवीन तरतुदींप्रमाणे ‘धार्मिक किंवा इतर कोणत्याही हेतूने’ हत्तींचे व्यापारीकरण आणि हस्तांतरणास प्रोत्साहन देण्यासाठी कायदेशीर मार्ग तयार झाला आहे. या तरतुदीला हजारो वन्यजीव अभ्यासकांनी आणि संस्थांनी कडाडून विरोध केला होता. तरीही ही तरतूद सुधारित कायद्यात कायम ठेवण्यात आली.

ही तरतूद (पळवाट) या कायद्याच्या नीतिविचारांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे आणि तरीही कायदा बदल रेटला गेला याचे आश्‍चर्य वाटते. याचाच उपयोग करून ईशान्य भारत, महाराष्ट्र आणि कदाचित इतर भागांतून हत्तींच्या हस्तांतराची वाट सोपी करण्यात आली. ‘वनतारा’च्या संस्थापकाच्या विवाहपूर्व सोहळ्यात उपस्थित असलेल्या काही सेलिब्रिटी पाहुण्यांनी काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

त्यात सजवलेले हत्ती स्पष्टपणे दिसत आहेत. सुधारित वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत जामनगरमध्ये उत्सवादरम्यान हत्ती दाखवण्यासाठी ‘परवानग्या’ मिळाल्या होत्या? तथाकथित आजारी आणि जखमी हत्तींचे हे प्रदर्शन कोणता ‘कल्याणकारी उपाय’ असावा, असा भाबडा प्रश्‍न लोकांच्या मनात आला तर ते वावगे ठरू नये.

प्रकल्पात गुंतवलेले कोट्यवधी रुपये वन्यजीव संवर्धनाचा हेतू कधीच पूर्ण करणार नाहीत, जे ‘वनतारा’चे एक उद्दिष्ट आहे. निधीची कमतरता, प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा आणि सरकारी उदासीनतेमुळे बचाव केंद्रे चालवणाऱ्या अन् सध्याच्या प्राणिसंग्रहालयातील सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या संस्थांना सीएसआर समर्थन म्हणून हा निधी अधिक योग्यप्रकारे वापरता आला असता.

हा निधी संपूर्ण भारतातील व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बचाव आणि पुनर्वसन सुविधांचा अभाव आहे तिथे अधिक उपयुक्त ठरला असता आणि वन्यजीव संवर्धनात थेट योगदान झाले असते.

वन्यजीव संवर्धन हे एक विज्ञान आहे आणि चुकीची करुणा सहसा संवर्धनाच्या नीतिमूल्यांच्या विरुद्ध कार्य करते. भूतकाळातील प्रयत्न (जसे की प्राणिसंग्रहालयाची स्थापना) केवळ सहायक उपाय म्हणून उपयोजित करताना प्रजातींचे इन-सीटू संवर्धन हे प्राधान्य असले पाहिजे, उदा. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राजस्थान वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रेट इंडियन बस्टर्डचे (माळढोक) संवर्धन राजस्थानमध्ये हाती घेण्यात आले आहे.

या संवर्धन प्रजनन प्रकल्पात सार्वजनिकरीत्या पाहण्यासाठी पक्षी प्रदर्शित केले जात नाहीत. त्याचा केवळ प्रजाती-केंद्रित उद्दिष्ट आहे. इतर अनेक धोक्यात असलेल्या प्रजातींचे असे संवर्धन प्रजनन प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे आणि ‘वनतारा’च्या संस्थापकाने त्यांना पाठिंबा दिला असता तर अधिक सयुक्तिक झाले असते.

भारतातील वन्यजीव क्षेत्रांमध्ये असे अनेक अत्यावश्यक प्रकल्प आहेत ज्यांना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी, अधिवास पुनर्संचयित करण्यासाठी, वन विभागांना आधुनिक अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे; पण एकंदरीत दृष्टी जामनगरसारख्या अतिउष्ण परिसरात जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्याची दिसते.

‘वनतारा’च्या संस्थापकाने एका व्हिडीओमध्ये हत्ती आणि घोड्यांसारखे प्राणी भगवान कृष्णाने कसे पाळले होते ते उद्‌धृत केले आहे. आपल्या देवतांशी संबंधित असलेले वन्यप्राणी प्रतीकात्मक आहेत आणि आजच्या संदर्भात आपण प्राणिसंग्रहालयात नव्हे; तर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केले पाहिजेत.

पीडित प्राण्यांची सुटका करणे हे प्राणी कल्याण आहे; परंतु प्राणिसंग्रहालयात त्यांना प्रदर्शित करणे हे करुणा आणि दयाळूपणाच्या तत्त्वांना नक्कीच शोभत नाही. आशा आहे की, भविष्यात अर्थपूर्ण आणि वास्तविक वन्यजीव संवर्धन प्रकल्पांना ‘वनतारा’च्या संस्थापकाचे समर्थन मिळेल.

gore.kedar@gmail.com

(लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत आणि गेली दोन दशकांहून अधिक काळ वन्यजीव संवर्धनात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT