farukh batatawala and dawood ibrahim sakal
सप्तरंग

फारूक : दाऊदचा कट्टर विरोधक !

दरवर्षी महाराष्ट्रदिन जवळ आला की फारूक बटाटावाला या माझ्या मित्राची व्याकूळ करणारी आठवण आल्यावाचून रहात नाही. तो गेला त्याला आता वीसेक वर्षे उलटून गेलीत यावर माझा विश्वासच बसत नाही.

सकाळ वृत्तसेवा

दरवर्षी महाराष्ट्रदिन जवळ आला की फारूक बटाटावाला या माझ्या मित्राची व्याकूळ करणारी आठवण आल्यावाचून रहात नाही. तो गेला त्याला आता वीसेक वर्षे उलटून गेलीत यावर माझा विश्वासच बसत नाही.

- वेल्ली थेवर, vellythevar@gmail.com

दरवर्षी महाराष्ट्रदिन जवळ आला की फारूक बटाटावाला या माझ्या मित्राची व्याकूळ करणारी आठवण आल्यावाचून रहात नाही. तो गेला त्याला आता वीसेक वर्षे उलटून गेलीत यावर माझा विश्वासच बसत नाही. फारूक बटाटावाला हा कस्टम खात्याच्या सागरी आणि प्रतिबंधक शाखेत इन्स्पेक्टर पदावर होता. या खात्याने नुकत्याच पकडलेल्या सोन्याच्या बिस्किटांसंदर्भात काही खास माहिती मिळते का हे पहायला मी मरीनलाईन्स वरील त्यांच्या कार्यालयात गेले होते. केवळ वीस वर्षाची तरुण पत्रकार होते मी त्यावेळी.

उत्साह आणि उत्सुकतेने भारलेली. पकडलेल्या मालाची आणि स्मगलरांच्या नावांची मिळेल तेव्हढी माहिती मला हवी होती. पण अनेक फेऱ्या मारूनही माझ्या हाती काही लागलं नव्हतं. सगळ्या सरकारी कार्यालयात होत असे तेच इथंही झालं होतं. कुणी ताकास तूर लागू देत नव्हतं. दुपारी उशिरा प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्रात, मी त्यावेळी वार्ताहर म्हणून काम करत होते. माझ्या तिसऱ्या भेटीदरम्यान अचानक एका व्यक्तीशी माझी गाठ पडली. योगायोगाने तो खबऱ्या निघाला.

तो एक मल्याळी मुसलमान होता. त्याचा पेहराव मोठा विचित्र दिसत होता. डोळ्यावर अत्यंत महागडा गॉगल, पांढराशुभ्र शर्ट, पांढरीच पॅंट, इतकेच काय बूट सुद्धा पांढरेच घातले होते त्याने. सागरी आणि प्रतिबंधक शाखेच्या त्या इमारतीखाली तो उभा होता. मी येथे कशासाठी आलेय असा प्रश्न त्याने मला विचारला. मी त्याला सरळच सांगितलं की काही विशेष माहिती मिळते का हे मी पाहतेय. आणि मग त्या खबऱ्याने मला अत्यंत मोलाची टिप दिली. फारूक बटाटावालाची माहिती देऊन त्याच्याशी संपर्क साधायला त्याने मला सांगितले. हा शुभ्रवेषधारी माणूस वस्तुतः एक खबऱ्या होता ही गोष्ट मला नंतर कळाली.

फारुकशी माझी पहिली गाठ पडली तेव्हा अगदी सौम्य भाषेत सांगायचं तर मला धक्काच बसला. भरगच्च दाढी राखली होती त्याने आणि ती व्यवस्थित कोरलेली होती. त्याने मिशाही ठेवल्या होत्या. तो अत्यंत सश्रद्ध मुसलमान होता ही गोष्ट मला खूप उशिरा कळली. अर्थात धर्म या विषयावर आमचं बोलणं कधी झालंच नाही. तो नेहमी डेनिमच वापरायचा. माफिया आणि खास करून दाऊद इब्राहिम हे त्याच्या आयुष्यातील एकमेव वेड होतं. दक्षिण मुंबईमधल्या गरीब मुस्लिम वस्तीतील बोळात, दाऊद इब्राहिम बरोबर तो लहानपणी विटीदांडू खेळला होता. पुढे दाऊद डॉन झाला आणि फारूक पोलीस अधिकारी बनला.

परंतु फारूक कस्टम खात्यातील आपली नोकरी अगदीच मन लावून करत असल्याने या दोघांच्या वाटा बऱ्याच वेळा परस्परांना भिडत असत. सोने किंवा चांदी स्मगल करून भारतात आणू पाहणारे एखादे जहाज पकडण्याच्या ईर्ष्येने फारूक महिनोंमहिने भर समुद्रातच असे. त्याच्या पत्नीला त्याच्या या सागरभ्रमंतीची आता सवय होऊन गेली होती. शबनम नाव होतं तिचं. फारुक आपल्या खात्यात बरेच सन्मान प्राप्त केलेला अधिकारी बनला होता. सोने चांदी पकडल्याच्या कितीतरी गौरवशाली कामगिरी त्याच्या नावावर जमा होत्या. दाऊदच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड चीड होती आणि त्याने त्याचा काटा काढायचा प्रयत्नही अनेकदा केला होता.

फारुककडे खबऱ्यांचे विस्तीर्ण जाळे होते. शिवाय दक्षिण मुंबईतल्या दरिद्री चाळीतील बोळातच लहानाचा मोठा झालेला असल्याने इतरही अनेक माणसांशी त्याचे लागेबांधे होते. आपल्या कामात त्याला या गोष्टीचा विशेष लाभ होत असे. परंतु प्रामाणिकपणा, स्वत:च्या कर्तव्यावरची अविचल निष्ठा आणि निखळ व्यावसायिक सफाई या त्याच्या गुणांमुळेच फारूक इतरांपेक्षा वेगळा उठून दिसे.

सोन्याची एकदोन बिस्किटे गुपचूप पदरात पाडून घेत स्मगलर मंडळींच्या कारवायांकडे कानाडोळा करणेच सुखावह मानणारे इतर काहीजण त्याच्या खात्यात होतेच.

पण फारूक तसा नव्हता. तो एक समर्पित, कठोर परिश्रमावरच भरवसा ठेवणारा सच्चा माणूस होता. त्याचं स्वतःच धडंस घर सुद्धा नव्हतं. दक्षिण मुंबईच्या दाट वस्तीतल्या अरुंद गल्लीतील एका चाळीत, एकच खोली असलेले छोटेसे घरच काय ते त्याला त्याच्या पगारातून परवडत होते. आमची भेट नेहमी एका ठराविक हॉटेलात होत असे. हे हॉटेल मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळच होते. फारुक सदैव सावध असे. हॉटेलचे प्रवेशद्वार जिथून दिसू शकेल अशाच जागी तो बसायचा. त्याची चिनी माऊजर बंदूक नेहमी त्याच्या पाठीमागे लटकलेली आणि सदैव सज्ज असे.

कोकाकोला त्याला फार आवडे. कोकाकोलाच्या बाटल्यांमागून बाटल्या तो रिचवू शके. गुन्हेगार आणि गुन्हेगारी याबद्दल बोलू लागला की तो थांबायचं नाव घेत नसे. माफिया जगताबद्दल त्याने मला भरभरून माहिती दिली. बंदुकीतून सटासट गोळ्या सुटत असाव्यात अशा वेगाने तो बोलत असे. डझनावारी नावे तो मला सांगायचा. त्याच्या क्षेत्रातील सगळ्या गुंडांची आणि गुन्हेगारांची खडा न खडा माहिती त्याला होती. त्यांची सगळी पार्श्वभूमी त्याला माहीत असायची आणि त्यापैकी प्रत्येकाची कुवतही तो जाणून होता. आपला व्यवसाय ते कसा चालवतात याची इत्थंभूत माहिती त्याला होती. त्यांचे बेत हाणून पाडायच्या खटाटोपातच तो नेहमी असे.

१९९३ मधल्या १२ मार्चच्या त्या बॉम्बस्फोटाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना फारुकचा खूप उपयोग झाला. कारण त्या स्फोटात सहभागी गुंडांची सगळी कूळकथा फारूकला अगोदरपासून माहीत होती. पण मुंबई पोलिसातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांना फारुकच्या हिंमतीचा हेवा आणि तिरस्कार वाटे. फारुकला भ्रष्ट अधिकाऱ्यांची पुरेपूर माहिती होती. त्यामुळेही तो या अधिकाऱ्यांना काट्यासारखा सलत असे. फारुकने अनेक व्यक्तींशी माझी ओळख करून दिली होती. त्यातल्या एकाचे नाव होते दिलावर खान. हा खान गुन्हेगारी जगतातला छोटा खेळाडू होता. एक दिवस फारूक आणि दिलावर यांच्यात कशावरून तरी बाचाबाची झाली. एकंदरीत सर्वच माणसांच्या बाबतीत फारूक नेहमीच अतिसंशयी असे आणि पटकन चिडे.

वादाच्या भरात, दिलावर आपले पिस्तूल बाहेर काढत आहे असा फारुकचा गैरसमज झाला. त्याची ही चाल प्रत्यक्षात येण्यापूर्वीच मोडून काढावी म्हणून फारूकने तडकाफडकी आपल्या चिनी माऊजर बंदुकीतून दिलावरच्या दिशेने गोळी झाडली. ही चिनी बंदूक हे फारूकला खात्यामार्फत मिळालेले अधिकृत हत्यार होते. दिलावरला भेटायला मी जे जे हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा फारुकनेच त्याच्यावर गोळी झाडली असल्याची काहीच कल्पना मला नव्हती. २९ वर्षाचा दिलावर उपचाराविना सात तास हॉस्पिटलात नुसता पडून होता. तो मरावा अशीच पोलिसांची इच्छा होती. कारण त्याशिवाय ते फारुकला खुनाच्या गुन्ह्यात अडकवू शकले नसते. बिचाऱ्या दिलावरला अत्यंत वेदनामय मृत्यू आला.

शेवटी फारुकला तुरुंगवासाची शिक्षा झाली. शिक्षा भोगून परत आला तेव्हा तो पूर्वीचा फारूक राहिलाच नव्हता. कटुता त्याच्या नसानसात भरलेली दिसत होती. खटला दाखल होताच फारुकची अधिकृत बंदूक जप्त करण्यात आली होती. अखेरीस आपल्या आणखी एका कट्टर वैऱ्याला संपवण्यात दाऊदला यश आलं. फारुकला मारायची कामगिरी दाऊदने त्याचा उजवा हात असलेल्या छोटा शकीलवर सोपवली आणि ती त्याने पार पाडली. फारुकच्या बायकोने - शबनमने नंतर मला सांगितलं की त्या नेमबाजाला फारुकने दुरूनच हेरलं होतं. पण तो असहाय्य होता. त्याची बंदूकच त्याच्याकडे उरलेली नव्हती.

गुन्हेगारी विश्वाच्या बातम्या देणारी पत्रकार म्हणून अनेकदा मी पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागांत गेलेय. अगदी खरं सांगायचं तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी, नेमून दिलेल्या कामाच्या पलीकडे जाऊन कष्ट उचलणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पोलीस अधिकारी मी पाहिलेत. पण त्यांतही फारुक सारखा फारुकच. तसा दुसरा कोणी मला आढळला नाही. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकात फारुक सारखे अधिकारी निश्चितच मोलाचे ठरतील. केवळ त्याच्या धर्मामुळे नव्हे, तर आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या त्याच्या निष्ठेमुळे आणि त्याने आपल्या भोवती गोळा केलेल्या माहिती स्रोताच्या विस्तृत जाळ्यामुळे. माहितगार आणि दक्ष खबऱ्यांचे घट्ट जाळे हेच पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचे मुख्य रहस्य असते.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार असून मुंबईतल्या अनेक वृत्तपत्रात गुन्हेगारीविश्‍व आणि मुंबई शहर या विषयावर लेखन करतात.)

अनुवाद : अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.co

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT