Police Officer Pradip Sawant Sakal
सप्तरंग

शिक्षा : न केलेल्या गुन्ह्याची....

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त असलेल्या प्रदीप सावंत यांच्यावर राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर तीन वर्षांनी काय वेळ आली पाहा.

सकाळ वृत्तसेवा

- वेल्ली थेवर, vellythevar@gmail.com

नव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात गुणवत्तापूर्ण सेवेसाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांमधील एक नाव होते प्रदीप सावंत यांचे. अतिशय उत्तम पोलिस अधिकारी ही त्यांची ओळख.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त असलेल्या प्रदीप सावंत यांच्यावर राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर तीन वर्षांनी काय वेळ आली पाहा. पोलिस अधिकाऱ्याच्या नात्याने त्यांनी ज्या कुख्यात गुन्हेगारांना येरवड्याच्या कारागृहात पाठविले होते. त्यांच्याच बरोबर त्या बराकीत राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. केवढं हे दुर्दैव!

सावंत १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबई पोलिस दलात दाखल झाले. तेव्हा हा तरणाबांड अधिकारी उत्साहाने सळसळलेला आणि आश्वासक वाटत होता. सर्व समवयस्क सहकाऱ्यांचे ते अगदी आवडते. हसऱ्या डोळ्यांचे सावंत चुकून या पेशात आल्याचे जाणवे तेव्हा. कारण त्यांच्यामध्ये छद्मीपणा, कावेबाजपणा किंवा उद्धटपणा चुकूनही दिसत नव्हता. असा हा सज्जन, सचोटीचा माणूस मुंबई पोलिस दलात का भरती झाला असेल हो ?

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या विशाल मैदानावर लहानाचं मोठं झालेल्या, वडील पोलिस अधिकारी असलेल्या (ते सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले.) सावंत यांना पोलिस अधिकारीच बनायचं होतं. दुसरी काही नोकरी किंवा पेशाची कल्पनाही त्यांच्या डोक्यात येणं कठीणच! त्यांच्या साध्या-सोप्या सरळ जगातील पोलिस दिसत होते फत्तेसिंह गायकवाड यांच्यासारखे.

भल्या मोठ्या अक्कडबाज मिशा आणि मोठ्या रुबाबात त्या पिळणारे गायकवाड. पोलिस अधिकाऱ्याचा रुबाबदार गणवेश आपण केव्हा एकदा घालून अभिमानाने मिरवू आणि ओठांवर अशाच मिशा असतील, याची वाट पाहणंही त्यांना जड जात असावं. पोलिसांचं जीवन कसं नि किती गुंतागुंतीचं असतं, याची त्यांना वडिलांनी बहुदा पुसटशीही कल्पना दिली नसावी. किंवा मग कदाचित त्यांना आपल्या मुलापुढे नेहमीच वर्दीचं गुणगान केलं असणार.

ते काहीही असो, कितीही अपरिहार्यता असो; सावंत यांना त्यांच्या आवडीचं कोणतंही क्षेत्र नोकरी-पेशासाठी निवडणं अवघड नव्हतं आणि तिथंही ते खात्रीने चमकले असते. पण त्यांनी पोलिस अधिकारी होणंच ‘लिहिलेलं’ होतं. भारतामध्ये पोलिस अधिकाऱ्याची नोकरी करणं फार गौरवशाली आहे, हा त्यांच्या मनातील समज वडिलांनी कधीच दूर केला नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम यश मिळविल्यानंतर सावंत यांनी नाशिकच्या पोलिस प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांच्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली - पोलिस अधिकारी म्हणून आपलं काम एकच, ते म्हणजे बदमाशांना जेरबंद करणं. आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी त्यांना नऊ वर्षं लागली.

भायखळ्याचे सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम करणाऱ्या सावंत यांचं गुप्त माहिती काढण्याचं कौशल्य १९९७ मध्ये त्यांच्या वरिष्ठांना दिसलं. सशस्त्र दरोडा टाकून सोन्याचे दागिने लांबविल्याच्या गुन्ह्यामधले गावदेवीच्या ‘कोठारी ज्वेलर्स’चे २९ लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी परत मिळविले! नव्वदीच्या दशकात २९ लाख रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती. त्यामुळे त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट तपासाचे पारितोषिक त्यांना मिळाले.

भायखळा परिक्षेत्रात काम करताना सावंत यांनी छडा लावलेले हे काही एकमेव प्रकरण नव्हे. अगदी किरकोळ गुन्ह्यापासून दरोडे, खुनापर्यंत जवऴपास हरएक गुन्ह्याचा तपास लागला. याचं कारण असं की, एक तर ते आपल्या कामात अतिशय कुशल होते किंवा प्रचंड नशीबवान होते! त्यांच्यासारखा अधिकारी मुंबई पोलिसांना बऱ्याच दिवसांत लाभला नव्हता. आपल्या कामात पूर्ण बुडून गेलेला माणूस होता हा.

अट्टल गुन्हेगार, अतिरेकी आणि माफिया यांना कचाट्यात पकडणाऱ्या प्रदीप सावंत यांच्यासारखा अधिकाऱ्याला सोन्याच्या पेढीवरील दरोडे आदींसारख्या गुन्ह्यांच्या तपासात अडकवून टाकण्यात काय अर्थ आहे, असं तेव्हाचे पोलिस आयुक्त आर. एच. मेंडोन्सा यांना वाटलं असणार. त्यामुळे सावंत यांना गुन्हे अन्वेषण शाखेत सहायक पोलिस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

गुन्हे शाखा किंवा गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय.डी.) म्हणजे पोलिस खात्यातला प्रतिष्ठित, मानाचा विभाग. त्या पदाच्या शर्यतीत अनेक स्पर्धक असताना सावंत यांना संधी मिळाली, ती निव्वळ आत्यंतिक परिश्रम आणि सर्वस्व झोकून काम करण्याच्या वृत्तीमुळे.

गुन्हे शाखेचा सहायक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच प्रदीप सावंत यांना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. ही घटना ऑक्टोबर २००८ मधली. पोलिस आयुक्तालयाच्या अगदी समोरच असलेल्या ‘रूपम स्टोअर्स’चे मालक भरत शहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली.

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पोलिस मुख्यालयाजवळ मोठा बंदोबस्त असतानाही हल्लेखोर गोळीबार करून झटक्यात पसार झाले.

या गुन्ह्यानंतर प्रदीप सावंत यांनी अशी काही पावलं उचलली की, त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या तपासाची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची व्याख्याच बदलून गेली. सावंत यांनी जे काही केलं ते वादग्रस्त सदरात मोडणारं असलं, तरी ती त्या वेळची आवश्यकता होती. त्यासाठी वाजवी कारणं होती. दूरध्वनी करणाऱ्यांचा शोध घेण्याचं आणि ओळख पटवण्याचं त्यांनी ठरवलं.

त्या काळात मोबाईल सेवा पुरविणाऱ्या ‘मँक्स टच’ आणि ‘बीपीएल’ या दोन अग्रणी कंपन्या होत्या. या विषयाची माहिती नसल्याने त्यांनी त्या संदर्भातील पुस्तकं वाचून स्वतःचं ज्ञान अद्ययावत करण्याचं ठरवलं. त्यांनी नेहमीच असं काही तरी वेगळं केलं. त्यांना वाचनाची आवड होतीच.

सावंत यांनी एकाच वेळी दोन गोष्टी केल्या. त्यांचं खबऱ्यांच जाळं व्यापक होतं. त्यातून त्यांनी गोळीबार करणाऱ्यांची नावं मिळविली. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी त्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचायचं होतं. मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या मदत करण्यासाठी एका पायावर तयार होत्या. गुन्ह्याची उकल झाली आणि गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी मुंबई पोलिसांच्या शस्त्रागारात नव्या हत्याराची भर पडली - तांत्रिक पाळत ठेवायची किंवा दूरध्वनी ‘टँप’ करायचा.

‘रूपम स्टोअर्स’चे मालक भरत शहा यांच्या खुनाचं तपास लागल्यामुळे मुंबईतील व्यापारी-व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरातील संघटित गुन्हेगारी १९९५ ते २००२ या काळात अगदी शिगेला पोहोचली होती. ‘कधीच हार मानायची नाही’ ही मुंबईची उपजत वृत्ती. तीच ओळख माफिया टोळ्या उद्ध्वस्त करू पाहत होत्या. छोटा शकीलच्या टोळीने छोटा राजनच्या टोळीविरुद्ध जणू युद्धच पुकारलं होतं. त्यांच्यातील या वैरामध्ये आठवड्याला एक तरी खून घडत होता.

अशा काळात या माफिया टोळ्यांचा ‘बंदोबस्त’ करण्याची जबाबदारी ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांच्या गटाने स्वीकारली. ‘पोलिस चकमकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घटना म्हणजे पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या हत्याच! ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ पोलिसांची ही मोहीम वादग्रस्त ठरली. त्यांनी सहा वर्षांच्या कालावधीत माफिया टोळ्यांच्या शेकडो सदस्यांचा खात्मा केला.

यातील बहुतेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती गुन्हे शाखेत होती. प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत होते. वेगवेगळ्या स्वभावधर्माचे अधिकारी-कर्मचारी यांना संघ म्हणून एकत्र संभाळून, अहंकार न दुखविता त्यांना कार्यरत ठेवून सावंत यांनी उत्तम व्यवस्थापकीय कौशल्य दाखवून दिलं.

या दरम्यान पटापट बढत्या मिळविण्यात यशस्वी झाल्यामुळे सावंत यांची कारकीर्द अगदी भरात होती. गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदावर त्यांना बढती मिळाली. भारतीय पोलिस सेवेतील (आय. पी. एस.) अधिकारी स्वतःला ‘उच्चकुलीन’ वा ‘खानदानी’ मानतात. सावंत यांना या पदावर बढती मिळाल्याने या ‘खानदानी’ अधिकाऱ्यांना राग आला. त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली, धुसफुस सुरू झाली. त्यांना सावंत यांच्याबद्दल कमालीचा द्वेष आणि आकस होता. ते गृहमंत्र्यांचे लाडके अधिकारी झाले आणि त्यांच्या खास गोटातले बनले.

लोकप्रिय बनण्याची कला सावंत यांना अवगत झाली होती. आमिर खानच्या ‘सरफरोश’मधील ‘एस. पी. राठोड’ तेव्हा भलताच प्रसिद्ध झालेला. सर्वसामान्य जनता सावंत यांना ‘राठोड’ म्हणून ओळखू लागली - अत्यंत यशस्वी पोलिस अधिकारी. पोलिस दलात भरती झाल्यावर लगेच सावंत यांनी त्यांचे आदर्श फत्तेसिंह गायकवाड यांची भेट घेतली.

ते म्हणाले होते, ‘मला तुमच्यासारख्याच मिशा ठेवायच्या आहेत.’ गायकवाड म्हणाले, ‘साहेब, मला फक्त या अक्कडबाज मिशा आहेत. तुम्ही काम करून एवढं नाव कमावलं आहे की, स्वतःची वेगळी ओळख दाखवून देण्यासाठी तुम्हाला मिशीची गरजच नाही!’

असं सगळं काही चांगलं चालू असलं तरी त्याचाही कुठं तरी शेवट असतोच. तसंच झालं आणि सावंत यांची गाडी घसरणीला लागली. मुंबईत २००३ मध्ये झालेल्या दुहेरी बाँबस्फोटात ५० नागरिक मृत्युमुखी पडले. त्याच्या तपासात सावंत व्यग्र राहिले. त्यांनी या गुन्ह्याच्या तपासात यश मिळविलं खरं; पण त्याच वेळी वेगळं काही तरी शिजत होतं.

अब्दुल करीम तेलगीचा बनावट मुद्रांकांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा त्या काळात मोठा गाजत होता. अथक प्रयत्नांनंतर कर्नाटक पोलिसांनी तेलगीला अटक केलेली होती. खटल्याची सुनावणी चालू असताना मुद्रांक घोटाळा झालेल्या विविध शहरांमध्ये त्याला पाठविलं जात होतं. त्याच कारणासाठी मुंबईमध्ये आणल्यावर तेलगी गुन्हे शाखेच्या ताब्यात होता. त्या वेळी गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला कुर्ला येथील हॉटेलात राहण्याची मोकळीक देऊन उघडपणे नियमभंग केला.

तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एस. आय. टी.) त्या वेळचे पोलिस आयुक्त आर. एस. शर्मा आणि त्यांच्या खास मर्जीतले, गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप सावंत यांना लक्ष्य का केलं, हे पोलिसांच्या वर्तुळात जवळपास सगळ्यांनाच माहीत होतं. विशेष तपास पथकातील एका विशिष्ट अधिकाऱ्याला पोलिस आयुक्त शर्मा यांच्याबरोबरचा व्यक्तिगत हिशेब चुकता करायचा होता, हेही सर्वांना ठाऊक होतं.

त्यामुळे विशेष पोलिस पथक आर. एस. शर्मा व त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे गेले. या दोन गटांच्या लढाईत प्रदीप सावंत नेमके अडकले. एवढं कमी आहे म्हणून की काय, सावंत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (MCOCA) कारवाई झाली. हा खटला चार वर्षं चालला आणि त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. सावंत जिंकले!

निर्दोष सुटका झाल्यानंतर सावंत पुन्हा आपल्या छावणीत दाखल झाले. त्यांना त्यांचं पद परत मिळालं. असं असलं तरी त्यांच्याच खात्यातील कुणी तरी केलेली चूक त्यांना फार महाग पडली. आयुष्यातली चार वर्षं त्यांना तुरुंगात घालवावी लागली. मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांची वर्दी सन्मानाने दिली. पण त्यामुळे त्यांच्याविरुद्धचं हे षड्यंत्र आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल भोगाव्या लागलेल्या तुरुंगवासामुळे न्यायाची झालेली भ्रूणहत्या याची भरपाई होईल का?

(लेखिका मुंबईतल्या जेष्ठ पत्रकार असून महानगरातल्या घडामोडी व मुंबईतील गुन्हेगारी जगताबद्दल लेखन करतात.)

(अनुवाद - सतीश स. कुलकर्णी)

shabdkul@outlook.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT