Viagra sakal
सप्तरंग

स्मृतिभ्रंशावर ‘व्हायग्रा इफेक्ट’?

अवतरण टीम

- डॉ. छाया वजा

ऑक्सफर्डच्या सर्वेक्षणानुसार, व्हायग्रामुळे स्मृतिभ्रंशासारख्या आजारांवर मात करता येणार आहे. या दाव्यात तथ्य किती ते कळेलच; पण कोणत्याही उपचारांना वैद्यकीय आधार हवाच.

भारतातील जवळपास ४० टक्के नागरिकांना रक्तवहिन्यांशी संबंधित स्मृतिभ्रंश (व्हस्क्युलर डिमेन्शिया) आहे, जो मेंदूला रक्तप्रवाह बिघडवणाऱ्या अनेक घटकांमुळे होतो; परंतु नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात, लैंगिक संबंधांसाठीच नाही; तर आता स्मृतिभ्रंशाची समस्या असणाऱ्यांना व्हायग्राची गोळी उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले आहे. वैद्यकीय क्षेत्रात आता त्याबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेक पुरुष डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हायग्राचे सेवन करतात. इरेक्टाईल डिसफंक्शनने ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही डॉक्टर व्हायग्राची गोळी देतात. व्हायग्रामुळे पुरुषांच्या जननेंद्रियातील रक्तपुरवठा वाढण्यास मदत होते; परंतु ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, मेंदूच्या नसांसाठीही व्हायग्राचे सेवन अतिशय फायदेशीर ठरत आहे.

व्हायग्राच्या सेवनामुळे स्मृतिभ्रंशासारख्या धोकादायक आजारांवर मात करता येईल, असा दावा संबंधित संशोधकांनी केला आहे. स्मरणशक्ती कमी असणाऱ्या रुग्णांची समस्या दूर होण्यासही त्यामुळे मदत मिळते.

अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए)च्या अहवालात व्हायग्रामध्ये आढळणारा सक्रिय घटक ‘सिल्डेनाफिल’ पुरुषांच्या जननेंद्रियाच्या रक्तवाहिन्याच नव्हे; तर मेंदूच्या सर्वात लहान नसादेखील उघडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहही सुधारतो. स्मरणशक्ती चांगली होण्याचे प्रमाण सुधारण्यासही त्यामुळे मदत मिळते. एवढेच नाही; तर व्हायग्रा मेंदूचे कार्य सुधारण्यास फायदेशीर आहे.

त्यावरून व्हायग्राच्या सेवनामुळे स्मृतिभ्रंशाने पीडित असणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता अशा संशोधनातून अनेक प्रश्न समोर आले आहेत आणि त्याचे वैद्यकीय निरसन यथावकाश होईलच.

रक्तवहिन्यांशी संबंधित स्मृतिभ्रंशात मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ज्यामुळे मेंदूच्या ऊतींचे नुकसान होते. ही स्थिती अल्झायमर रोगापेक्षा वेगळी आहे; जेथे न्यूरॉन कनेक्टिव्हिटी अवरोधित करणाऱ्या अमायलोइड बिटा प्लेक्समुळे कार्यात बिघाड होतो. व्हस्क्युलर डिमेन्शियामध्ये रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते.

परंतु, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात नवीन माहिती समोर आली आहे, की व्हायग्राच्या सेवनाने स्मृतिभ्रंशासारख्या आजारावरदेखील मात करता येऊ शकते. जर्नल सर्क्युलेशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षानुसार मेंदूच्या रक्तवहिन्यांशी संबंधित स्मृतिभ्रंशासारख्या आजारात ही गोळी फायदेशीर ठरेल.

सर्वेक्षणात असे म्हटले आहे, की जेव्हा स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत ‘सिल्डेनाफिल’ पोहोचते तेव्हा ते रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. रक्ताची कमतरता आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. ‘सिल्डेनाफिल’ हे स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी सहज उपलब्ध औषध असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

व्हस्क्युलर डिमेन्शिया म्हणजे वाढत्या वयानुसार येणारा आजार आहे. ५० ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये तो वाढताना आढळून येतो. ७५ वर्षांपुढील २५ ते ३० टक्के व्यक्तींमध्ये डिमेन्शिया होण्याचे प्रमाण जास्त आहे. बदलती जीवनशैली, आजार, मानसिक आघात इत्यादी कारणांमुळे डिमेन्शिया होऊ शकतो.

अशा आजारामुळे आजारी व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर, विचारशक्तीवर, वागण्यात, स्वभावात आणि त्यामुळे स्वावलंबनावर परिणाम होत जातो. डिमेन्शिया मेंदूच्या क्षमतेचा ऱ्हास करतो. डिमेन्शियामुळेच स्मरणशक्ती कमी होते. डिमेन्शिया आजारात मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना हळूहळू इजा होऊन त्याची झीज होते. त्यामुळे अशा आजाराचा धोका वाढतो. भारतात ५० लाखांहून अधिक व्यक्ती डिमेन्शिया आजाराने त्रस्त आहेत.

त्यांपैकी सुमारे ४० टक्के रक्तवाहिन्यांशी संबंधित स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत. डिमेन्शियाची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असतात. ती हळूहळू दिसत असल्याने डिमेन्शिया आहे, याची जाणीवच होत नाही. अशा व्यक्ती एखादी गोष्ट लगेच विसरतात. तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतात. स्थळ, काळ आणि वेळेचे भान राहत नाही. पूर्वी काय घडले आहे, ते आठवत नाही. चेहऱ्यांची ओळख पटत नाही. विचार करण्याची क्षमता कमी होते.

संभाषणात अडथळे येतात. शब्द आठवत नाहीत. रस्ताही विसरतात. त्यामुळे असा आजार असलेल्या व्यक्ती हरवण्याच्या घटनाही घडू लागतात. राग येणे, चिडचिडेपणा वा उदास राहणेदेखील डिमेन्शियाची लक्षणे आहेत. कधी कधी त्याचा आजार इतका बळावतो, की शारीरिक हालचालींवर नियंत्रण राहत नाही. स्मृतिभ्रंशावर विविध औषधोपचार उपलब्ध आहेत; परंतु औषधांनी तो आजार पूर्णपणे बरा होत नाही याची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

औषधोपचाराने आजाराची वाढ मात्र निश्चितच रोखता येऊ शकते. सध्याच्या सर्वेक्षणानुसार लैंगिक संबंधासाठी वापरण्यात येणारी व्हायग्रा गोळी आता स्मृतिभ्रंशावर फायेदशीर असल्याचे म्हटले जात आहे; परंतु त्यावर वैद्यकीय मोहर उमटणे गरजेचे आहे.

मुख्यतः स्ट्रोक मोठा असो वा छोटा, त्याचा मेंदूच्या पेशी आणि ऊतींवर वाईट परिणाम होतो. एथेरोस्क्लेरोसिसमुळे व्हॅस्क्युलर डिमेन्शियादेखील होऊ शकतो. कारण त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह कमी होतो. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची समस्या आहे किंवा जे जास्त प्रमाणात धूम्रपान करतात त्यांना व्हॅस्क्युलर डिमेन्शियाचा धोका अधिक असतो.

तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आला असेल, जर तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत असाल किंवा तुम्हाला मधुमेह असेल, तर व्हायग्राचा वापर करू नका. त्याशिवाय जर तुम्हाला किडनीच्या गंभीर समस्या असतील, तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय गोळ्यांचे सेवन करू नका. रिकाम्या पोटी, अल्कोहोल किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थासह व्हायग्राचे सेवन करू नका.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करणे धोकादायक ठर शकते. चुकून अधिकचा डोस घेतला गेला, तर त्यामुळे अंधुक अंधुक दिसणं, रंगांची ओळख न पटणं इत्यादी प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा प्रत्येक पाऊल जपून उचला आणि त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे तो वैद्यकीय सल्ला...

chhayavaja498@gmail.com

(लेखिका एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात ज्येष्ठ अंतर्गत औषध तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT