प्रिय जानकी,
आज बऱ्याच दिवसांनी मी तुला ई-मेल लिहितेय. मला हे सगळं नीट बोलता येणार नाही कदाचित, म्हणून हे लिहिलं. त्या भयानक घटनेनंतर आता मी बरीच सावरलेय. मी पुन्हा "मी' झालेय. आपल्या माणसांचे आभार मानू नये म्हणतात; पण माझ्या बाबतीत घडलेल्या त्या अमानुष घटनेनंतर, तू केलेली मदत मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्या घटनेनंतर तू जणू माझी सावली बनूनच राहिलीस. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून, पोलिस चौकशीत धीर देण्यापासून, थेरपीस्टकडे नेण्यापर्यंत सगळं तू केलंस. टीका, मीडिया सगळं तू हाताळलंस. मला आत्मभान आणि आत्मसन्मान मिळवून देण्यात तुझा मोठा वाटा आहे.
आज पहाटे मी टेरेसमध्ये आले. सगळीकडे नीरव शांतता. आकाशाकडे दृष्टी गेली. त्या अथांग निळाईमध्ये शांतपणे तेवणाऱ्या असंख्य चांदण्या दिसल्या. काही चमचमणाऱ्या...मिरविणाऱ्या तर काही शांतपणे तेवणाऱ्या... काही लख्ख प्रकाशणारे तारे.. क्षणभर मी हरवून गेले... पूर्वीची होऊन गेले... खूप भावुक; पण प्रत्येक क्षणात आनंद शोधणारी... थोड्याच वेळात मी भानावर आले, अन खूप फ्रेश वाटायला लागलं. मधलं सगळं सावट निघून गेलंय असं वाटून गेलं. मी मला मिळालेय असं वाटून गेलं, अन ठरवलं की माझ्या recovery विषयी लिहायचं. आत आले अन तुला लिहायला बसले.
आठ महिन्यांपूर्वी काही विकृत, वासनांध नराधमांनी माझ्यावर पाशवी बलात्कार केला. त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम मला भोगायला लागले. त्या गुन्हेगारांना पकडलं गेलं. कायद्याचे सगळे सोपस्कार सुरू आहेत. त्यांना शिक्षा होईलच. आज हे सगळं लिहिण्याचं धैर्य माझ्यात आलं आहे. घटनेनंतर मला विलक्षण शारीरिक, मानसिक त्रास झाला. हॉस्पिटलमधल्या त्या तपासण्या, प्रश्नोत्तरं. नकोसं झालं होतं सगळं. आतून अक्षरशः फाटून गेले होते मी. विलक्षण बधिरत्व आलं होतं. माझं शरीर, अस्तित्व सगळं अस्वच्छ वाटायला लागलं. सारखं शरीर धुवावं असं वाटायचं. मळमळायचं, उलटी व्हायची. कधी आतून घृणा वाटायची. कधी voilent व्हायचे. सगळं जग माझ्याचकडं बघतंय असं वाटायचं. आत्महत्या करावीशी वाटायची. मग कुठल्या कुठल्या गोळ्या आणि injections द्यायचे... बधिर होऊन जायचे. पुरुष दिसला तरी संताप यायचा. बऱ्याच काळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तू साक्षी होतीस या सगळ्याला. मग, PTSD आणि नैराश्यासाठी औषधांबरोबरच सुरू झाली आणि थेरपीस्टबरोबर थेरपी सेशन्स अन मग परिस्थिती पालटायला लागली.
1.मला relaxation टेक्निक्स शिकवण्यात आली. जेणेकरून मी वर्तमान क्षणात स्वतःला ठेवू शकेन आणि स्वस्थ, स्थिर होऊ शकेन. MBSRT म्हणजेच माइंडफुलनेस तंत्रांवर आधारित ताण निवारणाच्या पद्धती शिकवल्या गेल्या.
2. Stress Inoculation Rape Therapy शिकवली गेली, ज्यायोगे सतत मनात उसळी मारणारी अस्वस्थता आणि भीती कमी व्हायला मदत झाली. शिकवलं गेलं की अशा घटनांनंतर वाटणारी भीती ही नैसर्गिक आहे आणि तिच्यावर मात करणं शक्य आहे. अशी स्किल्स develope झाली, ज्यायोगे मनातले विचार आणि त्यांचा त्रास कमी होऊ शकेल. स्वतःशी असलेला संवाद सकारात्मक होईल आणि शारीरिक आणि मानसिक, भावनिक जखमा भरून यायला मदत होईल. स्वतःला दोष देणं बंद होईल. तसंच थेरपीमध्ये होत असलेल्या प्रगतीबद्दल स्वतःला शाबासकी देणं, प्रोत्साहन देणं सुरू होईल. सुरू राहील.
3. Prolonged Exposure Therapy किंवा flooding थेरपीद्वारे घडलेली घटना शांतपणे recount करत, टप्प्याटप्प्याने भीतीचं निर्बलीकरण करणं शक्य होतं. अर्थात घडलेली घटना इतकी भयानक होती, की अतिशय नाजूकपणे या सगळ्या procedures कराव्या लागल्या.
4. Cognitive Processing Therapy सगळ्याच घटनांकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलणं शक्य झालं. घडलं त्यातून पुन्हा उभं राहण्याची शक्ती मला मिळाली.
5. Eye Movement Desensitization Reprocessing (EMDR) वगैरे थेरपीज आणि उत्तम समुपदेशन मला लाभलं.
औषधं, या अशा उपयुक्त थेरपीज, घरच्यांचा व तुझ्यासारख्या सखीचा आधार आणि माझे स्वतःच्या प्रयत्नांमुळे मी या दुर्घटनेतून बाहेर पडतेय.
मला काही सांगायचं, "जानकी, जे घडायचं ते घडलं. माझ्या जीवनावर त्याचा परिणाम झाला; पण मी पुन्हा उभी राहिलेय. मी स्त्री आहे याचा मला अजूनही सार्थ अभिमान आहे. मला सन्मान मिळायलाच हवा. जे घडलं त्यात माझा काहीच दोष नव्हता. म्हणूनच 'टाकाऊ' असं लेबल मला लागता कामा नये. माझं शरीर म्हणजेच काही "मी' नव्हे. ते तर सर्वच स्त्री-पुरुषांसारखं हाड, मांस, रक्तानं बनलेलं आहे. ते त्या नराधमांनी बळजबरीनं भ्रष्ट केलं, याचा अर्थ त्यांनी 'मला' भ्रष्ट केलं असं नव्हे. असलं घृणास्पद कृत्य करून त्या भेकड विकृतांनी माझ्यावर विजय मिळवलाय, स्त्रीवर विजय मिळवलाय असं होत नाही. ज्यांनी गुन्हा केला त्यांच्याइतकाच राग समाजातल्या अशा व्यक्तींचा येतो ज्यांची या घटनेनंतर माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. वेगवेगळे अर्थ काढले. माझ्या काही नातेवाइकांनी तर आमच्या कुटुंबाशी संबंध तोडले. सर्वांत वाईट वाटतं ते, ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं, त्यानं त्याच्या घरच्यांचं कारण सांगून लग्न मोडलं. पण झालं ते बरंच झालं. कारण या सगळ्याचा अर्थ तो माझ्या शरीराशीच लग्न करणार होता. असा पती मला नकोच आहे. माझ्याकडे किंवा माझ्यासारख्या अन्यायग्रस्त मुलींकडे समाजानं करुणेनं अजिबात बघू नये. प्रेमळ पित्याच्या नजरेनं, विश्वासानं पाहावं. आम्ही तुझ्याबरोबर आहोत, हे आम्हाला जाणवावं. त्यानं आम्हाला पुन्हा उभं राहायला ताकद मिळेल आणि अशी माणसं समाजात आहेत हे मी अनुभवलंय. स्त्रीला स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण लहानपणापासून मिळायला हवं. त्यासाठी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, वाड्या-वस्त्यांत व्यवस्था करायला हवी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगारांना तातडीनं जबरदस्त शिक्षा व्हायला हवी. तितकंच महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना मूल्यशिक्षण, स्त्री प्रती सन्मान असायलाच हवा, ती उपभोग्य वस्तू नाही.
माझ्यासारख्याच काही दुर्दैवी मुली आहेत, ज्यांच्या बाबतीत कमी-अधिक प्रमाणात घाणेरडे प्रकार घडलेत, घडताहेत. बऱ्याचदा त्यांना याबद्दल बोलताही येत नाही.
जानकी, आज खूप बोलले मी तुझ्याशी. मोकळी झाले. आता थांबते. बाहेर उजाडलंय. हवेत गारवा आहे. समोर निळं अथांग आकाश दिसतंय. खूप छान वाटतंय. आज आकाश स्वच्छ आहे. नितळ, पारदर्शी. मी मला पुन्हा सापडलेय... नव्या रूपात...
लेखक मानस तज्ज्ञ व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.