Cars sakal
सप्तरंग

मोटारींचं गाव

इंग्लंडमधील लहानशा गेडन गावाची एक अनोखी ओळख आहे. या गावाने गाड्यांचा इतिहास जीवापाड जपला आहे.

अवतरण टीम

- वैभव वाळुंज

इंग्लंडमधील लहानशा गेडन गावाची एक अनोखी ओळख आहे. या गावाने गाड्यांचा इतिहास जीवापाड जपला आहे. या ठिकाणी जगप्रसिद्ध ‘ॲस्टन मार्टिन’, ‘जॅग्वार’ अन् ‘लॅण्डरोवर’ गाड्यांची निर्मिती करण्याचे कारखाने आहेत. जुन्या विंटेज गाड्यांचे मालक अनेकदा आपल्या गाड्या लोकांनी पाहाव्यात, यासाठी येथील संग्रहात लावून जातात.

गेडन हे इंग्लंडच्या वॉरिकशायर काऊंटीमधलं लहानसं गाव आपल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि आसपास असणाऱ्या सैन्याच्या छावणीसाठी प्रसिद्ध आहे. मिडलँड या इंग्लंडच्या मध्यवर्ती भागातील काही गावांजवळ ब्रिटनमधील यादवी युद्धाची सांगता झाली होती, त्याच्याही काही पुरातन आठवणी येथे फुटकळ प्रमाणात टिकून आहेत; पण तरीही जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर या गावाचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं, त्याचं कारण म्हणजे या गावाला असणारा आणि त्यांनी जीवापाड जपलेला गाड्यांचा इतिहास.

ब्रिटनची ‘फॉर्म्युला वन’ गाड्यांची शर्यत होते ते ठिकाण म्हणजे सिल्वरस्टोन इथला जगप्रसिद्ध ट्रॅक. गेडन गावी होणाऱ्या गाड्यांच्या वार्षिक महोत्सवाला मी हजेरी लावली. सिल्वरस्टोन फेस्टिवल हा तीन दिवस चालणारा महोत्सव आपल्या आगळ्यावेगळ्या नियमांनी बांधलेल्या शर्यतींसाठी ओळखला जातो.

सहसा एकत्र पाहायला न मिळणाऱ्या गाड्या आपल्या बांधणी आणि जुळणीतील फरकांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी झुंजत असतात. एकामागोमाग एक वेगवेगळ्या गटांतील शर्यतींची रेलचेल या महोत्सवात दिसून येते. जगभरातील विविध देशांमधून आलेल्या नव्या गाड्या तसेच विविध शर्यतींमध्ये गाजलेल्या जुन्यापुराण्या कारदेखील या वर्षी शर्यतीत भाग घेत होत्या.

यंदा जमलेल्या लोकांमध्ये शेजारच्या गावात संग्रहालय पाहायला जाण्याचा बेत ठरला. मी गेडन गावाजवळ असणाऱ्या ब्रिटिश मोटर म्युझियम या संग्रहालयाला भेट दिली. इथे असलेला संग्रह हा जगभरातील ऐतिहासिक गाड्यांचा सर्वात मोठा साठा म्हणून शर्यतप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.

समोर आधीच इतक्या शर्यती सुरू असताना मला पुन्हा लावलेल्या गाड्या पाहण्यात रस नव्हता. मात्र, गेडन गावाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तींनी इथे भारतातील महाराजांच्या काही गाड्या असल्याची व त्यासोबतच सैन्याने वापरलेले रणगाडे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठेवण्यात आले असल्याची गोष्टही सांगितली.

भारतातील कोण्या राजाने आपल्या संस्थानात रस्ता झाकण्यासाठी ठेवलेल्या गाड्या आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या बंगाल प्रांतात निर्यात केलेल्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा तेथे आलेल्या कार दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली. हे ऐकल्यानंतर मात्र मी उत्साहाने या ठिकाणाला भेट देण्यासाठी सज्ज झालो.

अगदी लहानसं आणि इंग्लंडच्या ग्रामीण भागातील एका कोपऱ्यातलं गाव असतानाही या ठिकाणी जगप्रसिद्ध ‘ॲस्टन मार्टिन’ व ‘जॅग्वार’ आणि ‘लॅण्डरोवर’ या गाड्यांची निर्मिती करण्याचे कारखाने आहेत. सुरुवातीला शर्यतीसाठी प्रसिद्ध झालेल्या या गाड्यांनी नंतरच्या काळात प्रवासासाठीची साधने तसेच सैन्य आणि इतर विशेष वाहतुकीसाठी व शेतीसाठी गरजेची वाहनं या सर्वांचं उत्पादन करायलाही सुरुवात केली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा तंत्रवैज्ञानिक प्रगती गतिमान झाली त्याच काळात गाड्यांचा वेग वाढता वाढू लागला आणि अनायसे इंग्लंडच्या याच भागामध्ये सिल्वरस्टोन हे शर्यतीचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. साहजिकच गाड्यांची आवड असणारे लोक या ठिकाणाला भेट देऊ लागले आणि त्यातूनच जुन्या व नावाजलेल्या प्रसिद्ध गाड्या जतन करण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून इथल्या निसर्गरम्य वातावरणात गाड्यांचे गुरगुरणारे आवाज नेहमीचे बनून राहिले.

अर्थात या ठिकाणाला संग्रहालय असं नाव असलं तरी जुन्या, थोडक्यात पडलेल्या गाड्या येथे असतील असे समजू नका. इथे असणाऱ्या जवळपास सर्वच्या सर्व जुन्या गाड्या या चालत्या स्थितीत आहेत आणि वेळोवेळी त्यांना शर्यतीत भाग घेण्यासाठी बाहेर काढलं जातं. अगदी दीडशे वर्षांपूर्वीच्या गाड्याही आपल्या मूळ स्वरूपात जतन करून त्यांची दुरुस्ती करून वापरायला काढल्या जातात.

अशा अतिमहागड्या गाड्यांचा शौक असणाऱ्या लोकांना त्या दाखवण्याचीही हौस असते. त्यामुळे जुन्या विंटेज गाड्यांचे मालक अनेकदा आपल्या गाड्या लोकांनी पाहाव्यात, यासाठी या संग्रहात लावून जातात व वेगवेगळ्या मोटर्स आणि रॅलीसाठी गरज पडेल तेव्हा त्या परत नेतात. म्हणूनच वर्षात केव्हाही गेलं तरी या संग्रहालयात काही गोष्टी नव्याने अनुभवास येतात.

इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गाड्या कशा बदलत गेल्या, तंत्र आणि विज्ञान यांच्यातील प्रगतीनुसार गाड्यांसोबतच त्यांच्याविषयीचे कायदे आणि त्यांचा वापर करणारी माणसे यांच्यात कोणते बदल झाले, वेगवेगळ्या व्यवसायांत असणाऱ्या लोकांनी गाड्यांना आपापल्या आवडीनुसार कसं स्वरूप दिलं, तसेच गरज आणि चंगळवाद या दोघांच्या मिश्रणातून एक वेगळीच जागतिक संस्कृती आणि छंद कसे तयार झाले, याचा अनुभव येतो.

भारत व पाकिस्तान वगळता जगाच्या इतर भागांमध्ये रेडिओ प्रसारणासाठी उदार कायदे असल्यामुळे इंग्लंडच्या या भागात छंदिष्ट माणसांनी गाड्यांसाठी माहिती सांगणारी विशेष रेडिओ केंद्रे बनवली आहेत. त्यावरून सातत्याने गावात नव्याने येणाऱ्या गाड्यांची माहिती प्रसारित केली जाते, तसेच आसपास घडणाऱ्या शर्यतींचं समालोचनही केलं जातं.

आता वाहन व्यवसाय हा फार क्लिष्ट आणि एकाच कारागिराची मक्तेदारी न राहता जगभरातील हजारो-लाखो ‘फोर्डोत्तर’ कामगारांमध्ये विभागला गेला आहे. असं असतानाही विज्ञानाच्या प्रगतीला हातभार लावण्याचं काम, सुदूर प्रयत्नांतून का होईना, गाड्यांच्या माध्यमातून केलं जात आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT