vinayak thalkar sakal
सप्तरंग

आपली चळवळ

आपण लाचार नाही, आपण मागास नाही, आपली संस्कृती समृद्ध आहे, परस्परांना सांभाळणारी आहे, नवीन काळानुसार नवीन गोष्टी शिकलो तर आपल्याला ‘घेणारे’ म्हणून नाही तर ‘देणारे’ म्हणून जगता येईल...

अवतरण टीम

- विनायक थाळकर, vinayak.vayam@gmail.com

आपण लाचार नाही, आपण मागास नाही, आपली संस्कृती समृद्ध आहे, परस्परांना सांभाळणारी आहे, नवीन काळानुसार नवीन गोष्टी शिकलो तर आपल्याला ‘घेणारे’ म्हणून नाही तर ‘देणारे’ म्हणून जगता येईल... ही आमची ओळख आम्हाला वयम् चळवळीने दिली आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, ही चळवळ आमची-तुमची असा भेद करत नाही. ही आपल्या विकासाची, आपली चळवळ आहे. कधीही कोणीही या, चळवळीची दारे सर्वांसाठी उघडी आहेत.

घरची परिस्थिती गरिबीची असली तरी माझे थोडेफार शिक्षण झाले होते. आधी वस्ती शाळा, नंतर एकल विद्यालय अशा शैक्षणिक अभियानांत मी मानसेवी शिक्षक म्हणून काम केले होते. चार गावे हिंडल्यामुळे समाजाची स्थिती कळत होती. एका बाजूला आम्ही परंपरेने स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगणारे लोक. लग्न, सण-उत्सव असो किंवा काही अडीअडचण, यात गाव-समाज एकमेकांना मदत करत राहतो. दुसऱ्या बाजूला कागदावरील हक्क अधिकारांसाठी हाल करणारा समाज.

समाजात आर्थिक विषमतेमुळे दरी पडत होती. परंपरेनुसार गावगाडा चालवणाऱ्या गावांना मूलभूत हक्क आणि पायाभूत सुविधा हे शासनाचे कागदावरील शब्द अंमलबजावणीत कसे येतील, त्याचा गावाला उपयोग कसा करता येईल, हा मनाला भेडसावणारा प्रश्न- आम्हा रुणांना त्रास देत होता. आम्ही अनेक वेळा पुढारी, अधिकारी, पत्रकार मित्र यांना भेटून अडलेल्यांची कामे सोडवायचा प्रयत्न करत होतो, पण सर्व प्रश्न सुटत नाहीतच.

मग यासाठी पायाभूत कायमस्वरूपी मार्ग काय असेल, तो कसा शोधायचा या विचारात असतानाच योगायोगाने मिलिंद दादा (थत्ते) याची भेट झाली. माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांची समाजाविषयी तळमळ आणि गाढा अभ्यास दोन्ही असल्याने त्यांना मजबूत काम सुरू करावे अशी आकांक्षा होतीच. मग काय जमली जोडी आणि सुरू केली गाडी! शहरातून आलेला आपला हा भाऊ आपल्या समाजासाठी एवढे करतो तर आपण का करू नये! या चळवळीसाठी आधीच आळाबांधणी करून सवंगडी गोळा केले होतेच दादांनी. त्यात मीही सामील झालो. आता सुरू केलेली गाडी जोरात चालवायची असे ठरले.

काम कोणासाठी तर लोकांसाठी, अडचण कोणाची तर लोकांची, मग लोकांत जायचं, त्यांना कायदा सांगायचा. त्याचा कोणाला फायदा झाला तर तो पाहायचा. नसेल कायदा माहीत; पण शिकायची इच्छा असेल तर भाऊबंदांना घेऊन सामाजिक हात देऊन त्या त्या गावात काम सुरू करायचं असं ठरवून कधी पत्रके, कधी कायद्याची दोन पुस्तके असे घेऊन पायीपायी डोंगराची चढ-उतार करून आज या गावात, तर उद्या त्या गावात असा आमचा प्रवास सुरू केला.

आम्ही सांगायचो, आता गावातच राहायचं अन् बेस काम करायचं. रोजगार हमीचा कायदा आहे. लोक सांगायचे, ‘दादा, आम्हालं तर आझून बाचक्या बांधून जगायला तं धनसुली, राबाडा, रत्नागिरी, ठाणे, पालघर हेकडच जाया लागं. रोजगाराचा कोठला कायदा सांगस?’ वनहक्काबाबतही असेच ऐकायला मिळे, ‘कायदा माहीत नाही. ऐकीव गोष्टीवर कोणी ३००, ५००, १००० रुपये घेऊन पलाटाचा फारम भरून देत. पण पोच नाय, कागद गेला कोठं तर ठणठण गोपाळ.’

आम्ही कायदा शिकवला, अर्ज भरायला शिकवला की लोक सुखी होत. एक आजोबा सांगत, ‘आताधर असा होता रे की सायब सांगल त्याच खरा. सायबालं तीन डोळं अन् आम्ही डोळं असून आंधळं! पोरां, तुम्ही आपली पोट-पाणेची गोठ समजून सांगा तसा कोन्ही नाय सांगं. जे माहीत नाय त्येचाच भेव पडतो रे. आता बेस समजला. आता काय कशाक कधी अन् कोनी करायचा तेही सांगा. आता कंबर बांधलीच आम्ही.’

मग आम्ही सांगायचो, तुम्ही वडीलधारी अन् गावातली शिकलेली मुलं एकत्र बसून पुढचे काम करू. वेळ कशाला दवडायचा... अशी तयारी होऊन एकेका गावातली चळवळीची पेरणी झाली. शिका कायदा अन् करा फायदा... हे लोकांना आवडू लागले.

रस्त्यात स्पीडब्रेकर असतात, तसे गावात पण होतेच. कधी भीती दाखवत, दमदाटी, धमक्या देत या कामात अडथळा आणायला स्वार्थी डोमकावळे होतेच. गावात पुढाकार घेणाऱ्या तरुणांना, वडील माणसांनाच काय आम्हालाही धमक्या आल्या.

निर्जीव स्पीडब्रेकर बरे... त्यावर वेग कमी करून पुढे तरी जाता येते, पण हे सजीव डोमकावळे कठीण! तशा लोकांशी बोलताना सुरुवातीला वाईट वाटे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच गावकऱ्यांच्या वाटेत स्वार्थापायी हे लोक येतात, याचा राग येई. आता त्यांच्यावर मात करून पुढे जाणे जमते आहे. वयम् चळवळीची सातत्याने वाढ होते आहे. चळवळीची सुरुवात मूलभूत हक्क आणि पायाभूत विकासासाठी झाली.

त्यात शिबिरांतून, प्रशिक्षण वर्गांतून शिकलेल्या कार्यकर्त्यांची माळ उभी राहिली. काही वेळा प्रलोभनांना, स्वार्थाला बळी पडून चळवळीत घडलेले काही जण वेगळ्या वाटेलाही गेले. पण त्यांची संख्या तांदळातल्या खड्याएवढीच! त्याचा परिणाम कधी चळवळीच्या वाढीवर झाला नाही.

आता तर कामाचा विस्तार दोन जिल्ह्यांत, चार तालुक्यांतल्या शेकडो खेड्यापाड्यांत झाला आहे. निरंतर धडपडणाऱ्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या टीमसोबत अनेक अंशकालीन विस्तारक व गावातले स्वयंसेवी कार्यकर्ते असा फौजफाटा वाढत चालला आहे. आपल्या चळवळीच्या ध्येयाकडे चालण्यासाठी नियोजनबद्ध काम करायला आम्ही दीपाली वहिनींकडून शिकलो आहोत.

२००८ साली वयम् चळवळ सुरू झाली, तेव्हा आमच्याकडे ना सत्ता होती, ना पैसा, ना कीर्ती... होते काय तर लोकांचा विश्वास, लोकवर्गणी, शहरातल्या कित्येक भावाबहिणींनी दिलेल्या देणग्या... आणि पाठीशी उभे राहलेली दीपाली वहिनी व मिलिंद दादा. कधी चुकलो, कधी थकलो; पण आम्ही शिकलो अन् आता तर हा घेतला वसा जन्मभर सुटायचा नाही.

आपण लाचार नाही, आपण मागास नाही, आपली संस्कृती समृद्ध आहे, परस्परांना सांभाळणारी आहे, नवीन काळानुसार नवीन गोष्टी शिकलो तर आपल्याला ‘घेणारे’ म्हणून नाही तर ‘देणारे’ म्हणून जगता येईल... ही आमची ओळख आम्हाला वयम् चळवळीने दिली आहे. आणि लक्षात ठेवा सर्वांनी, ही चळवळ आमची-तुमची असा भेद करत नाही. ही आपल्या विकासाची, आपली चळवळ आहे. कधीही कोणीही या, चळवळीची दारे सर्वांसाठी उघडी आहेत.

भाऊबंधांनो, या लेखमालेतला हा शेवटचा लेख आहे; पण हा निरोपाचा नाही, तर स्वागताचा लेख समजा.

(लेखक वयम् चळवळीचे अध्यक्ष आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT