काही वर्षांपूर्वी ‘नोबेल’ पुरस्कार मिळवणारी मलाला युसूफजई स्त्री-शिक्षणाची पुरस्कर्ती म्हणून जगापुढे आली. मात्र, भारताला दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या रूपातून अशीच प्रणेती मिळाली होती.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आतापर्यंत असंख्य पुस्तके येऊन गेलीत. अलीकडे रिटा राममूर्ती गुप्ता यांनी लिहिलेले ‘सावित्रीबाई फुले : हर लाईफ, हर रिलेशनशिप, हर लीगसी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवर नव्याने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक नव्या पैलूंबाबत त्यात वाचायला मिळते. त्यांच्या कार्याची माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिण्याची लेखिकेची इच्छा होती. पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचल्यानंतर त्याच्या प्रकाशनाच्या प्रवासाला चार वर्षे लागली.
एक मुलगी, एक कवयित्री आणि मित्र म्हणून सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे कंगोरे आहेत. मात्र, ते यापूर्वी जगासमोर आले नाहीत. पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सावित्रीबाई आणि त्यांचे वडील खंडोजी यांचे भावस्पर्शी नाते त्यात उलगडून दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय पुस्तकातून अनेक नव्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय वाचकांना होतो.
चार वर्षांपूर्वी पुस्तकनिर्मितीचा प्रवास सुरू झाला. लेखिका रिटा गुप्ता यांच्या मुलीने त्यांना एक प्रश्न केला, की महिला असूनही तू केवळ पुरुषांवर का लिहिते? मुलीच्या प्रश्नामुळे लेखिकेच्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न झाले. कर्तृत्ववान महिलांवरचे जीवनचरित्र फार कमी आले आहे. पुस्तकविश्वात पुरुषी एकाधिकारशाही येण्याची कारणेही वेगवेगळी आहेत.
सर्वाधिक खपाच्या टॉप टेन लेखिकांचा विचार केला तर त्यांच्या एकूण वाचकांमध्ये पुरुषांची संख्या केवळ १९ टक्के आहे. म्हणजे लेखिकांच्या पुस्तकाचे ८१ टक्के वाचक महिलाच आहेत. त्याउलट पहिल्या दहा बेस्ट सेलर लेखकांच्या पुस्तकाचा ५१ टक्के वाचकवर्ग पुरुष आहे. महिला वाचकांचे प्रमाण ४५ टक्के. याचा अर्थ वाचकांचे हे प्रमाण अंसुतलित आहे.
२००१ ते २०१२ दरम्यान उत्तर अमेरिकेत लेखिकांनी लिहिलेल्या पुस्तकांची किंमत तुलनेने ४५ टक्के कमी होती. प्रमाण कमी करण्याची गरज आहे. कुठून तरी सुरुवात करायची गरज होती, याची जाणीव लेखिकेला प्रकर्षाने झाली. आता हे पुस्तक प्रकाशित झाले; परंतु पुढील वर्षी अधिकाधिक महिला चरित्र लिहिण्याचे लेखिकेचे नियोजन आहे.
सावित्रीबाईंच्या राष्ट्रसेवेसाठी एक देश म्हणून आपण सर्वांनी त्यांचे ऋणी असायला हवे. एक महिला आणि एक लेखिका म्हणून माझ्या अस्तित्वासाठी मी सावित्रीबाईंची कायम ऋणी असेल, असे रिटा गुप्ता सांगतात.
सावित्रीबाई फुले यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या फातिमा शेख यांच्या जीवनावर या पुस्तकातून विस्तृत प्रकाश टाकण्यात आला आहे. फातिमा यांचा परिवार त्या काळी पडलेल्या प्रचंड दुष्काळामुळे उत्तर प्रेदशवरून मालेगावला कसा आला.
पितृछत्र गमावलेल्या फातिमा शेख आणि भाऊ उस्मान शेख यांचा पुण्यापर्यंतचा प्रवास, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उस्मान यांनी व्यापारी म्हणून केलेली प्रगती, उर्दू, मराठी, अरेबिक आणि इंग्रजी भाषेत पारंगत असलेल्या आपल्या बहिणीला उस्मान यांनी कशी साथ दिली, हा सर्व इतिहास लेखिकेने मांडला आहे. फातिमा यांच्या योगदानाबद्दल देशातील बहुसंख्य लोक अनभिज्ञ आहेत. अगदी मुस्लिम समुदायालाही फातिमा यांच्याबद्दल माहिती नाही.
जोतिबा आणि सावित्रीबाईंनी लेख, पुस्तके, डायरी स्वरूपात लिखाण करून ठेवले आहे; परंतु फातिमा शेख यांनी कधीच लिहून ठेवले नाही; तसेच आपली मतेही प्रकाशित केली नाही. आपल्या पुस्तकात फातिमा शेख यांचे एक छायाचित्र उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या अस्तित्वाचा कुठलाही दुसरा पुरावा उपलब्ध नाही.
त्यामुळे पुस्तक लिहिताना फातिमा यांच्याबद्दल माहिती मिळवणे हे आव्हानात्मक काम लेखिकेपुढे होते. मात्र मराठी इतिहासकार आणि अभ्यासकांमुळे ते शक्य होऊ शकले, असेही लेखिकेने पुस्तकात नमूद केले आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडण्याचे अफाट काम केले. सावित्रीबाई- फातिमा, ही हिंदू-मुस्लिम मैत्रीची अशी एक कथा आहे ज्यांनी भारताच्या शैक्षणिक प्रगतीचे दरवाजे उघड केले. १० ऑक्टोबर १८५६ मध्ये सावित्रीबाईंच्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख आहे.
त्या वेळी सावित्रीबाईंचे आरोग्य ढासळले होते. त्या नायगावला आपल्या आई-वडिलांसोबत राहत होत्या. या वेळी शाळा चालवण्याची जबाबदारी फातिमा यांच्यावर सोपवली गेली होती. त्या पत्रात सावित्रीबाई लिहितात, ‘मी बरी झाले की लवकरच पुण्यात परत येईन. माझ्याबद्दल काळजी करू नकोस.’ त्यावरून दोघींचा एकमेकांवर किती विश्वास होता, ते लक्षात येते.
अनेक व्यक्तिमत्त्वांचा परिचय
पुस्तकात सावित्रीबाईंशी संबंधित असंख्य व्यक्तींचा उल्लेख, परिचय येतो. कुठलीही एक व्यक्ती जगात क्रांती घडवू शकत नाही. ते नेतृत्व करू शकतात; परंतु त्यांचे असंख्य अनुयायी ही क्रांती घडवून आणण्यासाठी आपापले योगदान देत असतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलेल्या क्रांतीत अनेकांचा अप्रत्यक्ष वाटा होता. त्यामुळे या सर्व महत्त्वाच्या व्यक्तिरेखांशी पुस्तक वाचताना आपला परिचय होतो.
पुस्तकात चार दशकांचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असा १७७३ ते १८९७ पर्यंतचा सविस्तर इतिहास आहे. हा सर्व इतिहास एका चित्रपटाप्रमाणे संवादाच्या रूपात जिवंत करण्यात आला आहे. इतिहास सोप्या आणि ओघवत्या शैलीत आजच्या तरुणाईला समजावून सांगणे हे आव्हात्मक काम आहे. मात्र, हे कसब लेखिकेने साधले आहे.
एका चित्रपटाची पटकथा ज्या पद्धतीने लिहिली जाते, त्यातील सर्व पात्रांच्या वाटेला संवाद येतात तशाच प्रकारे एक मोठा कालखंड वाचकांच्या डोळ्यापुढे जिवंत होतो. महत्त्वाचे म्हणजे, एवढा मोठा कालखंड लेखिकेने तीन भागांतून १३ विभागातून तसेच ४० प्रकरणांतून उलगडून दाखवला आहे. महत्त्वाचे म्हणजे एक प्रकरण दोन ते तीन पानांचे आहे.
पुस्तक सुटसुटीत आहे. एकाच बैठकीत वाचता येणे शक्य आहे. रेल्वे प्रवास करताना वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका मुलीने तीन तासांत ते वाचून काढले. त्यातून सर्वांसाठी शिक्षणाचा उगम कसा झाला, हे सहज रीतीने तिला समजून आले. देशातील तरुणाईला भारतीय इतिहास त्यांना आवडेल त्या पद्धतीने समजावून सांगणे, हे माझे स्वप्न होते, असे लेखिका म्हणते. हे पुस्तक तरुणाईला आव्हान देणारे नाही, तर त्यांच्या संभाषणाचा दर्जा वाढवणारे असावे, हा हेतू लेखिकेचा होता. त्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे, असे म्हणता येईल.
पुस्तक प्रवासासोबत प्रेरणा
पुस्तकाला सर्व थरांतील वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नॉन फिक्शन पद्धतीची लिखाणाची शैली वाचकांच्या पसंतीला उतरली आहे. पुस्तकाच्या प्रवासातून वाचकांसोबत मलाही आयुष्यात अनेक गोष्टी शिकता आल्या, असे लेखिका सांगते. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोघींनी मिळून १८ शाळा उघडल्या.
हे काम करताना त्यांच्यावर टीका झाली, सामाजिक बहिष्कार टाकला गेला, शारीरिक इजा करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, दोघींवर दगडफेक आणि शेणाचे गोळे फेकून मारले, अपशब्दाला सामोरे जावे लागले... मात्र एवढे सर्व सहन करूनही त्यांनी आपले काम सोडले नाही. जेव्हा पहिली शाळा उघडली तेव्हा महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाईंना स्वतःच्या घरातून हाकलून देण्यात आले.
त्या वेळी फातिमा आणि उस्मान शेख यांनी दोघांना आश्रय दिला. त्यामुळे त्यांना आपले काम सुरू ठेवता आले. महिला आणि वंचितांना शिक्षण देण्याचा मार्ग कधीच सोपा नव्हता. शेणाचे गोळे फेकून मारल्यानंतर सावित्रीबाई दुसरी साडी बदलून शाळेत शिकवायला जात असत. मात्र, त्यांनी भविष्यात गुंतवणूक करणे सोडले नाही.
तेव्हा मुलींचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या पुरुषांसोबत लावून दिले जात होते. त्या कठीण काळातही सावित्री आणि फातिमा शेख यांनी आशावाद सोडला नाही. भविष्य बदलेल यावर त्यांनी विश्वास ठेवला, तो आज खरा झाला आहे.
पुस्तक : सावित्रीबाई फुले : हर लाईफ, हर रिलेशनशिप, हर लीगसी
लेखिका : रिटा राममूर्ती गुप्ता
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पृष्ठसंख्या : २७१
किंमत : ४९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.