india america friendship sakal
सप्तरंग

भारत-अमेरिका मैत्री आणि जागतिक आव्हान

अमेरिकेच्या परराष्ट्र उपसचिव एलिझाबेथ ॲलेन यांनी नुकताच मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संवादादरम्यान त्यांनी अनेक जागतिक घडामोडींवर भाष्य केले.

विनोद राऊत

अमेरिकेच्या परराष्ट्र उपसचिव एलिझाबेथ ॲलेन यांनी नुकताच मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संवादादरम्यान त्यांनी अनेक जागतिक घडामोडींवर भाष्य केले. ॲलेन यांच्यावर पब्लिक डिप्लोमसीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. चर्चेदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ऊहापोह केला.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक संधी खुल्या आहेत. सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर आमचा भर आहे. अमेरिकन विद्यार्थीही भारतात शिक्षणासाठी येण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही देशांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. सोबतच दोन्ही देशांमध्ये संशोधन आणि शिक्षणात भागीदारी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अलीकडे अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याच्या काही घटना घडल्या. मात्र, ते काही ठरवून किंवा भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य करून करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी टार्गेटवर आहेत, असे म्हणता येणार नाही. त्यासंदर्भात आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत.

बाहेरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अमेरिका कायम गंभीर आहे. त्यांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर आम्ही शिक्षण विभागासोबत मिळून काम करतोय. त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणे आणि कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे.

इंडो-पॅसेफीक धोरण महत्त्वाचा टप्पा

इंडो-पॅसेफीक धोरणात गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण बदल झालेत. हे धोरण म्हणजे भारत-अमेरिकी संबंधातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इंडो-पॅसेफीक क्षेत्र २१व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र असणार आहे. दोन वर्षांपूर्वी हे धोरण आकाराला आले. त्यामध्ये दोन्ही देशांची समान उद्दिष्टे आहे. ती म्हणजे, हा भाग खुला, मुक्त, समृद्ध आणि सुरक्षित असायला हवा. त्यावर अमेरिका-भारत मिळून काम करीत आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा समावेश असलेली ‘क्वाड’ संघटना अधिक मजबुतीने वाटचाल करत आहे. सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि समृद्धी अशी त्रिसूत्रीवर चारही राष्ट्रे एकमेकांसोबत मिळून काम करत आहेत. नुकताच भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या प्रगत तंत्रज्ञान करारदेखील त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

त्यामुळे या भागातील कच्च्या मालाचा पुरवठा, मालवाहतुकीची साखळी अधिक सशक्त होणार आहे. सोबतच युवकांसाठी शैक्षणिक गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट आहे. खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक अपेक्षित आहे.

नव्या तंत्रज्ञानाचा धोका

माहिती, चुकीची माहिती आणि माहितीचा गैरवापर सध्या जगभरातील चर्चेचा विषय आहे. डीप फेक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) गैरवापर लोकशाहीला अत्यंत मारक आहे. हे वर्ष निवडणुकांचे आहे. वर्षभरात अमेरिकेसह जगभरातील १८ देश निवडणुकांना सामोरे जात आहेत. अशा वेळी या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहणे, गैरवापर होण्याला प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.

नव्या तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी अमेरिका अन्य देशांना सोबत घेऊन काम करत आहे. त्यामध्ये ‘एआय’च्या वापरावर एक निश्चित धोरण तयार करणे तसेच त्यावर तांत्रिक मार्ग काढण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यासोबतच ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीनेही बघतो. त्यामुळे आपला वेळ वाचतोय.

आरोग्यापासून अनेक क्षेत्रांत ‘एआय’ मोलाची भूमिका बजावत आहे. ‘एआय’च्या भाषांतर सेवेमुळे तर आम्हाला अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचता येणे शक्य होत आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्या दोन्ही बाजू लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

‘एआय’ आणि पत्रकारिता

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक फटका पत्रकारांना बसतोय. एआय, चॅट जीपीटी इत्यादींच्या माध्यमातून कंटेन्ट मिळवणे सोपे झाले आहे. मात्र, त्यातून मिळालेली माहिती खरी आणि विश्वसनीय आहे का, हा प्रश्न कायम आहे. सध्या पत्रकारांच्या टाईमलाईनवर विश्वसनीय वाटणारा मजकूर आदळतो. पत्रकारिता करताना हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध असलेल्या माहितीची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेली माहिती जशीच्या तशी पत्रकारांनी अजिबात स्वीकारू नये. ती पडताळून पाहण्याची ताकदही इंटरनेटने आपल्याला दिली आहे. त्यासोबत खात्रीलायक, विश्वसनीय सूत्र शोधणे आज अधिक सोपे झाले आहे. एआय ही नोकरी टिकवण्यासाठी ठीक आहे. एखाद्या विषयावर गंभीर चिंतन, विश्लेषण करण्याला कुठलेही तंत्रज्ञान पर्याय होऊ शकत नाही. तुम्हाला जे काही सांगितले जाते ते जसेच्या तसे स्वीकारू नका.

तंत्रज्ञानाचे आव्हान

नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले आव्हान पेलण्यासाठी आम्ही सर्वत्र संवादक नेमतोय. माझ्या मते, ज्याप्रमाणे आपण मुलांना इतिहास, रसायनशास्त्र शिकवतो, तसेच आज त्यांना समाजमाध्यमे कशी हाताळायची हे समजावून सांगणे गरजेचे आहे. पब्लिक डिप्लोमसी हा माझा विभाग जगभरातील नागरिकांना जोडण्याचे काम करतो.

त्यासाठी समाजमाध्यमे आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे जगात काय सुरू आहे याची माहिती उपलब्ध होते. सध्या ‘एआय’मुळे अनेक संधी उपलब्ध होत आहेत. हे सर्व ठीक आहे; परंतु तरुणाईला रोजगाराची गरज आहे. अमेरिका-भारताच्या संबंधात शिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे.

वातावरण बदलावर पर्याय

वातावरण बदलावर अमेरिका भारत आणि अन्य देशांसोबत मिळून काम करत आहे. किंबहुना भारत-अमेरिका संबंधातील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यासोबतच अन्नसुरक्षाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. युक्रेनवर झालेल्या रशियन आक्रमणामुळे जागतिक अन्नसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी आम्ही विविध घटकांसोबत मिळून काम करतोय. सोबत टप्प्याटप्प्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय आहे.

अपारंपरिक ऊर्जास्रोत विकसित करण्यासाठी अमेरिका भारताला मदत करत आहे. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक व्यवस्था उभारण्याचे कामही सुरू आहे. भारतात जवळपास दहा हजार विद्युत बस उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

मात्र, वातावरण बदलावर काम करताना समाजाला सोबत घेऊन चालायला हवे, असे आमचे मत आहे. संपूर्ण भारतात हवामान केंद्र उभारण्यावर काम सुरू आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून हवामानाचे अचूक अंदाज घेता येतील. वातावरण बदलाचे आव्हान पेलण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

गाझा युद्धाचा वणवा रोखण्याचे प्रयत्न

गाझा-इस्राईल युद्ध असो की इतर जागतिक संघर्ष, त्या वेळी अमेरिकी मुत्सद्दी जगभरात सक्रिय असतात. आम्ही जगभरातील नागरिक, माध्यमे आणि नागरी समाजासोबत सातत्याने संवाद साधत असतो. त्याबद्दल अमेरिकेचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही जगासोबत अमेरिकी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील आहोत.

अमेरिकी परराष्ट्र सचिव एंटनी ब्लिंकन यांनी सांगितल्यानुसार, दहशतवादी हल्ले रोखण्याचा इस्राईलचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे त्या संघर्षात निरपराध नागरिक मारले जाऊ नयेत, याची काळजी घेणेही गरजेचे आहे. सध्या गाझा युद्धात शेकडो निरपराध नागरिक ठार होत आहेत. त्यात महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे.

युद्धात मनुष्यहानी टाळण्याकरिता आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिका सातत्याने इस्राईलवर दबाव टाकतोय. त्या सोबतच गाझामध्ये मानवी मदत पोहोचवण्याला अमेरिकेची प्राथमिकता आहे. या सर्वांसाठी आम्ही मध्य पूर्वेतील सर्व देशांसोबत सातत्याने संपर्कात आहोत.

त्यासंदर्भात भारतीय नेतृत्वासोबत आमची चर्चा सुरू आहे. गाझा युद्धाचा वणवा मध्य पूर्वेत पसरू नये, हा आमचा प्रयत्न आहे. मनुष्यहानी रोखणे हे आमचे सर्वांचे समान ध्येय आहे. या युद्धानंतर एक स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अस्तित्वात येण्यासाठी महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

vinod.raut@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT