अठराव्या शतकात ज्यू मुंबईत आले होते. कालांतराने संख्या वाढली. मुंबईतल्या मशीद बंदर परिसरात पहिले ज्युईश प्रार्थनास्थळ आकाराला आले. ज्यू समुदायासाठी सिनेगॉग हे केवळ प्रार्थनास्थळ नव्हते तर त्यांच्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक केंद्र होते.
२२७ वर्षांचा इतिहास असलेल्या या सिनेगॉगने मुंबईतील ज्यू धर्मियांना एकसंध ठेवले. हळूहळू मुंबईत बगदादी व सुधारणावादी ज्यू समाजाचे स्वतंत्र प्रार्थनास्थळ अस्तित्वात आले. पुढे जाऊन सिनेगॉग मुंबईच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य अंग बनले.
दाटीवाटीच्या मशीद बंदर परिसरातील भाजी गल्लीतील ‘गेट ऑफ मर्सी’ हे मुंबईतील पहिले ज्युईश प्रार्थनास्थळ! ज्यूंच्या प्रार्थनास्थळाला ‘सिनेगॉग’ असे म्हटले जाते. पहिल्या प्रार्थनास्थळाच्या उभारणीचा इतिहासही रंजक आहे. त्यावेळी ब्रिटिश लष्करात कमांडंट या पदावर असलेले मराठी ज्यू सॅम्यूअल दिवेकर यांनी याची उभारणी केली. १७८५ मध्ये टिपू सुलतान आणि ब्रिटिश फौजेत झालेल्या दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात दिवेकर यांच्या तुकडीने शौर्य गाजवले होते.
याच युद्धात दिवेकर आणि त्यांचे सैनिक टिपू सुलतानच्या फौजेच्या हाती सापडले. अटकेत असताना दिवेकर यांनी ईश्वराकडे त्यांच्यासकट सर्व सैनिकांची सुरक्षित सुटका झाल्यास मी ‘सिनेगॉग’ बांधेन, असा नवस बोलले. असे म्हटले जाते की, टिपू सुलतान यांच्या आईच्या मध्यस्थीमुळे दिवेकर आणि त्यांच्या तुकडीची अत्यंत सन्मानपूर्वक सुटका झाली.
लष्करातून निवृत्त झाल्यावर सॅम्यूअल आणि त्यांचा भाऊ इस्सार दिवेकर या दोघांनी मिळून मशीद बंदर भागात १७९६ मध्ये पहिले सिनेगॉग बांधले. या रस्त्याला त्यांच्या स्मरणार्थ ‘सॅम्यूअल रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे. त्यावेळी या परिसरात अनेक मराठी ज्युईश कुटुंबे राहत होती. हा सिनेगॉग ‘समजी हसीजी’ किंवा ‘सॅम्यूअल सिनेगॉग’ या नावाने ओळखला जायचा.
१८५० नंतर इथे प्रार्थनेसाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने जागा अपुरी पडली. त्यामुळे १८६० मध्ये जुनी इमारत पाडून याच ठिकाणी नवीन सिनेगॉग बांधले. देणग्या आणि बैठकांच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात आला. १८९६ मध्ये या सिनेगॉगचे नाव हिब्रू भाषेत शार हारहमीन अर्थाच ‘गेट ऑफ मर्सी’ असे दिले गेले.
हळूहळू पुढे मुंबईत मदनपुरा, कुर्ला, सात रस्ता, डोंगरी, मशीद बंदरमधील इस्राईल मोहल्ला या ठिकाणी स्वतंत्र सिनेगॉग अस्तित्वात आले. मात्र ‘गेट ऑफ मर्सी’ याचे महत्त्व आजही अबाधित आहे. बेने इस्राईल धर्मियांची मुंज, लग्न आणि बारमीसवा ते इतर महत्त्वाचे धार्मिक विधी या प्रार्थनास्थळात होतात.
भारतीय-पाश्चात्त्य शैलीचा प्रभाव
दोन मजल्यांच्या ‘गेट ऑफ मर्सी’च्या बांधकामावर भारतीय विशेषतः म्हैसूर स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. ‘गेट ऑफ मर्सी’चे बांधकाम साधे आहे. त्यावेळच्या प्रचलित स्थानिक स्थापत्यशैलीनुसार या प्रार्थनास्थळाचे बांधकाम केले आहे. यामध्ये चुना, विटांचा वापर आहे, तसेच छत हे कौलारू आणि लाकडाने बांधले आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रार्थनास्थळावर हिब्रूसोबत मराठीत ‘दयेचे दार’ असे लिहिले गेले आहे.
यावरून मराठीचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो, असे मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक भारत गोठोस्कर सांगतात. मशीद बंदर रेल्वेस्थानकाचे नाव या सिनेगॉगवरून पडले आहे. सिनेगॉगला मराठीत ‘मशीद’ म्हणतात. त्यावरून ‘मशीद बंदर’ असे नाव पडल्याचे गोठोस्कर सांगतात. या काळात मुंबईत फार पैसा नव्हता. त्यामुळे बांधकामे साधी होती. त्यावेळी बांधलेल्या पारशी अग्यारा अत्यंत साध्या होत्या, असे ते सांगतात.
‘गेट ऑफ मर्सी’ची इमारत कालांतराने जीर्ण झाली. तसेत ट्रस्टच्या अंतर्गत वादातून हे प्रार्थनास्थळ सात वर्षे बंद होते. नवी कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर प्रार्थनास्थळ पुन्हा खुले झाले. अलीकडे मशीद बंदरचा हा भाग अत्यंत वर्दळीचा, दाटीवाटीचा झाला आहे. त्यामुळे प्रार्थनेसाठी इथे येणाऱ्या ज्यूंची संख्या रोडावली आहे.
अर्थात मुंबईतील ज्युईश धर्मियांची संख्या आता साडेतीन हजारांवर आली आहे. या प्रार्थनास्थळाचे ऐतिहासिक महत्त्व बघता नवीन वर्षे, सेलिखोत, योम किप्पूम, शिमहात तोरा यांसारख्या विशेष सणांसाठी आजही समाज एकत्र येतो, असे या प्रार्थनास्थळाचे अध्यक्ष डेविड तळेगावकर सांगतात.
मागेन डेविड सिनेगॉग
बेने इस्राईल दोन हजार वर्षांपूर्वी भारतात रायगड किनारपट्टीवर दाखल झाले. मात्र अरब देशातून ज्युईश समाज १७८० पासून देशात दाखल व्हायला सुरुवात झाली. या समुदायाला ‘बगदादी ज्यू’ असे म्हटले जाते. हा समुदाय व्यवसायात आघाडीवर होता. डेविड ससून, सर एली कादरी यांच्यासह अनेक आघाडीचे उद्योगपती बगदादी ज्यू समाजाचे आहेत.
बगदादी ज्यू समाजाचा रंग, चेहऱ्याची ठेवण थोडी अरब, पाश्चात्त्य नागरिकांप्रमाणे आहे. या उलट मराठी ज्युईश समाज दोन हजार वर्षांपूर्वी इथल्या मातीत एकरूप झाल्यामुळे त्यांनी भारतीय रंग, संस्कृती आणि भाषादेखील घेतली. सुरुवातीला बगदादी ज्यू बेने इस्राईल धर्मियांच्या सिनेगॉगमध्ये प्रार्थना करण्यासाठी येत. १८५० पर्यंत मुंबईत या बगदादी ज्यूंची संख्या चांगली वाढली. त्यामुळे स्वत:चे वेगळे प्रार्थनास्थळ असावे, या भावनेतून १८५७ मध्ये भायखळ्यात जमीन खरेदी केली.
१८६१ मध्ये ‘मागेन डेविड सिनेगॉग’ हे बगदादी ज्यूंचे पहिले प्रार्थनास्थळ बांधून झाले. त्याला डेविड ससून यांच्या स्मरणार्थ ‘डेविड’ असे नाव देण्यात आले आहे. त्यावेळी मुंबईत बगदादी ज्यूंची संख्या ५०० पेक्षा जास्त होती. त्यामुळे १९१० मध्ये या प्रार्थनास्थळाचा विस्तार झाला. डेविड ससून यांचा नातू जेकब ससून यांनी यासाठी आर्थिक मदत केली. अलीकडे या सिनेगॉगमध्ये येणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे, असे मनीष चोरडेकर सांगतात. चोरडेकर हे मागेन डेविड सिनेगॉगमध्ये प्रार्थनेला जातात.
युरोपियन शैलीचा प्रभाव
‘मागेन डेविड सिनेगॉग’ची इमारत भव्य आणि देखणी आहे. इमारतीच्या बांधकामावर युरोपियन, ब्रिटिश स्थापत्य शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मागेन डेविड म्हणजे शिल्ड ऑफ डेविड. त्यावेळचे हे इस्राईलबाहेरचे आणि आशियामधील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ होते. मुंबईतील इतर ज्युईश सिनेगॉगपेक्षा हे भव्य का आहे, याचे कारण सांगताना मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक भारत गोठोस्कर म्हणतात की, १८५६ ते १८६० मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईतून जगाला कापसाचा पुरवठा होऊ लागला.
मुंबईत पैसा खेळायला लागला. असे म्हटले जाते की, त्यावेळी कापसाच्या निर्यातीच्या माध्यमातून ५१ कोटी रुपये मुबईत आले. डेविड ससून कुटुंबीयांच्या मालकीच्या तब्बल १४ सूत गिरण्या होत्या. त्यामुळे या काळात बगदादी ज्यू उद्योगपतींची आर्थिक भरभराट वाढली. त्याचे प्रतिबिंब बगदादी ज्युईश समाजाच्या काळा घोडा आणि भायखळ्यातील प्रार्थनास्थळावरून स्पष्ट दिसते.
रोडेफ शालोम
मुंबईत बेने इस्राईल, बगदादी ज्यू यांच्यानंतर एक तिसरा समाजही राहतो. त्याला उदारमतवादी-सुधारणावादी ज्युईश म्हटले जाते. हा समाज ज्युईश रिलीजीएस युनियनशी संलग्न आहे. इंग्लंडमध्ये १९०२ मध्ये ही चळवळ सुरू झाली होती. या समाजातही परंपरा, धार्मिक विधी इतर ज्युईश धर्मियांसारख्या असतात. मात्र हा समाज उदारमतवादी विचारधारेचा आहे. ऑर्थोडॉक्स ज्युईश धर्मियांप्रमाणे त्यांच्यात धार्मिक कट्टरता नाही.
भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाजवळ (विक्टोरीया) रोडेफ शालोम हे सुधारणावादी ज्यू समुदायाचे प्रार्थनास्थळ १९२५ मध्ये बांधण्यात आले. बेने इस्राईल, बगदादी ज्यू समाजाप्रमाणे सुधारणावादी ज्युईश धर्मियांच्या प्रार्थनास्थळात महिला आणि पुरुषांत कुठलाही भेदभाव केला जात नाही. या समुदायाच्या सदस्या असलेल्या ८० वर्षांच्या नॉर्मा इलायज सांगतात की, आम्हाला हिब्रू भाषा समजत नाही, मग त्याचे निव्वळ पठण करण्यात काय अर्थ?
त्यामुळे आम्ही इंग्रजीत प्रार्थना करतो. ज्युईश धर्मियांत प्रार्थना सुरू करण्यासाठी कमीत कमी १० पुरुषांची उपस्थिती लागते. मात्र सुधारणवादी ज्यूमध्ये १० महिला-पुरुष जमले तरी प्रार्थनेला सुरुवात होते. या समुदायात आंतरजातीय विवाहास परवानगी आहे. या शिवाय इतर धर्मियांना प्रार्थनेत सहभागी होता येते.
१९९२ च्या मुंबई दंगलीत या सिनेगॉगची जाळपोळ झाली. कुठल्याही दंगलीमध्ये लक्ष्य केलेले हे पहिले ज्युईश सिनेगॉग होते. या इमारतीत काही मुस्लिम भाडेकरू होते. त्यांनी ही जाळपोळ केल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर काही अपवाद वगळता हे सिनेगॉग कायमचे बंद झाले. पुढे इमारत जीर्ण झाली. पालिकेने आता इमारत सील केली आहे. लवकरच या इमारतीचा पुनर्विकास होणार आहे. २०२५ पर्यंत १७ माळ्यांची इमारत बांधून पूर्ण होईल. १७ व्या माळ्यावर सिनेगॉग बांधण्यात येणार आहे.
मुंबईत केवळ ६५ उदारमतवादी ज्यू कुटुंबे उरली असून, त्यातही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आल्याचे नॉर्मा इलायज सांगतात. आंतरजातीय विवाह आणि तरुणांची बाहेर देशात जाण्याची संख्या वाढल्यामुळे आमची संख्या कमी झाली आहे. विचारधारा मरणार नाही. नॉर्मा इलायज यांचे पती दाक्षिणात्य हिंदू समाजाचे आहेत. त्या हिंदू आणि ज्युईश धार्मिक परंपरा पाळतात. नॉर्मा कुटुंबाने आपल्या मुलांना आवडेल तो धर्म पाळण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मुलगा हिंदू, तर मुलगी ज्युईश धर्म पाळते.
सिनेगॉग ओस पडली
मुंबईत एकंदरीत ज्युईश समाजाची संख्या आता अडीच हजारांपर्यंत आली आहे. त्यामुळे सिनेगॉग ओस पडली आहेत. त्यात बगदादी ज्यू समाजाची १५ ते १६ कुटुंबे शिल्लक राहिली आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत. व्यवसायानिमित्ताने ते हॉंककॉग, अमेरिका, इस्राईलमध्ये स्थायिक झालेत. याचा परिणाम सिनेगॉगच्या प्रार्थना स्थळावर पडला आहे.
आता प्रार्थनास्थळांत सकाळी आणि संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी लोक जमणे कठीण आहे. अनेकदा पैसे देऊनही कुणी सिनेगॉगला प्रार्थनेला येत नाही. सुधारणावादी ज्युईश समाजाची ६० ते ६५ कुटुंबे शिल्लक राहिली आहेत. मराठी ज्यू धर्मियांची संख्या अडीच हजारांच्या आसपास आहे.
त्यातही तरुण पिढी शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने इस्राईल आणि इतर देशांत निघून गेली आहे, पण काळाचे हे चक्र असेच पुढे चालू राहिल्यास पुढच्या पाच वर्षांत हे सिनेगॉग कदाचित पूर्णपणे ओस पडेल. कारण येथे प्रार्थनेसाठी येणारे ज्युईश समाजबांधवच कदाचित शिल्लक राहणार नाहीत, अशी भीती वृद्धत्वाकडे झुकलेल्या एकांड्या ज्युईश बांधवांच्या मनात घर करून राहिली आहे.
vinod.raut@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.